मुंबई येथील सतारवादक श्री. सारंग भोसले यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

मिरज येथील श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली यांचीही आश्रमाला पुन्हा भेट

 सनातनच्या रामनाथी आश्रमात यायला मिळाले, हाच माझा शब्दातीत अनुभव ! – श्री. सारंग भोसले

श्री. सारंग भोसले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! खरेतर रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात यायला मिळाले, हाच माझा शब्दातीत अनुभव आहे. इथे असणे म्हणजे एका मोठ्या कल्पवृक्षाच्या छायेत आणि स्वर्गात असण्यासारखेच आहे. यापेक्षा दुसरा स्वर्ग असू शकेल, असे मला वाटत नाही. या ठिकाणी सतारवादनाची सेवा करतांना जे काही वादन झाले, ती गुरुकृपाच आहे. वादन करतांना जरी मी दिसत असलो, तरी वादन करून घेणारी ती दैवी शक्तीच होती. येथे वादन करतांना वेगवेगळ्या दैवी शक्तींच्या अनुभूती येत आहेत. वादन करतांना अनेक देवतांचे दर्शन झाले. यातून मला हीच जाणीव होत आहे की, मी शून्य आहे. अभोगी रागाचे वादन करतांना साक्षात् देवीचे दर्शन होऊन माझी भावजागृती झाली.

श्री. संतोष दाभाडे

रामनाथी (गोवा) – मूळ सांगलीचे रहिवासी असणारे आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे सतारवादक श्री. सारंग भोसले यांनी दीपावलीच्या कालावधीत येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. मिरज येथील श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली हे श्री. सारंग भोसले यांचे श्रद्धास्थान आहेत. श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये येथील सनातन आश्रमाला भेट देऊन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संगीताच्या संदर्भात चालू असलेले संशोधनकार्य जाणून घेतले होते. माऊलींच्या प्रेरणेने, तसेच संगीताविषयीच्या जिज्ञासेमुळे श्री. सारंग भोसले यांनी सनातनच्या आश्रमाला ही सदिच्छा भेट दिली आणि उस्फूर्तपणे संगीत सेवा सादर केली. वादनाच्या संदर्भातील विविध प्रयोगांसाठी, तसेच विविध संशोधनात साहाय्य करण्यासाठी प्रत्येक मासात येथील सनातनच्या आश्रमात येण्याची श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली आणि श्री. सारंग भोसले यांनी सिद्धता दर्शवली आहे.

 

वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांवर उपचार होण्यासाठी
श्री. संतोष दाभाडे अन् श्री. सारंग भोसले यांनी केले उपयुक्त रागांचे सतारीवर वादन !

श्री. सारंग भोसले यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून चालू असलेल्या संगीत विषयक संशोधनकार्यात सहकार्य केले. पंचतत्त्व आणि त्याच्याशी संबंधित संगीतातील विविध रागांचे, तसेच वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांवर उपचार होण्यासाठी उपयुक्त रागांचे त्यांनी सतारीवर वादन केले. यासह संगीताच्या एका सत्रात श्री. सारंग भोसले यांच्यासह श्री. संतोष दाभाडे यांनी तबल्यावर साथ दिली. आध्यात्मिक गुरु-शिष्यांचे एकत्रित वादन ऐकण्याची एक अविस्मरणीय संधी साधकांना लाभली.

श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली यांनी या वेळी रेकी पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या साधकांचे त्यांनी शंकानिरसनही केले. विविध विषयांवरील अगाध ज्ञान माऊलींना असल्याने त्यांनी संगीत, रेकी आणि अन्यही बर्‍याच विषयांचा सूक्ष्म अभ्यास कसा करावा?, याविषयी साधकांना मार्गदर्शन केले.

 

परिचय

श्री. सारंग भोसले हे मूळ सांगली येथील राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबात आजोबांपासून सतारवादन केले जात आहे. यामुळे लहानपणापासूनच ते स्वतःही सतारवादन करायचे. वडील श्री. रमेश भोसले आणि काका श्री. नरेंद्र भोसले हे त्यांचे सतार शिकवण्यातील पहिले गुरु असून त्यानंतर मुंबई येथील पद्मविभूषण पं. अरविंद पारेख हे गुरु म्हणून लाभले आहेत. सध्या ते मुंबई येथील गणेश संगीत विद्यालयात विद्यार्थ्यांना सतारवादन शिकवतात.

 

नम्र आणि कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणारे श्री. सारंग भोसले  !

श्री. सारंग भोसले हे अत्यंत नम्र आहेत. कर्तेपणा सतत गुरुचरणी अर्पण करणे, हाच त्यांचा स्थायीभाव जाणवतो. सतारवादन करतांना समोर कोण बसले आहे ?, याकडे त्यांचे लक्षच नसते. ते अंतर्मुख राहून भावपूर्ण वादन करतात, असे साधकांना जाणवले. सतारवादनाविषयी श्री. भोसले म्हणतात, मी ठरवून काहीच वाजवत नाही. त्या वेळी भगवंत जे सुचवतो, ते वाजवतो. त्यामुळे वेगळा सरावही करत नाही. याच कारणामुळे माझ्याकडून एकच राग प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो.

 

आश्रम पाहतांना श्री. सारंग भोसले यांना आलेल्या विविध अनुभूती

१. आश्रम पाहतांना त्यांनी सर्व माहिती जिज्ञासेने जाणून घेतली.

२. संपूर्ण आश्रम पाहिल्यावर त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव वृद्धींगत झाला.

३. ध्यानमंदिरात गेल्यावर त्यांची भावजागृती झाली.

४. सूक्ष्मजगताविषयीचे प्रदर्शन पाहतांना श्री दुर्गादेवीच्या चित्रात झालेला पालट पाहून  ते काही वेळीहात जोडून चित्रासमोर उभे होते. तेथेही त्यांची भावजागृती झाली.

५. रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षात साधकांच्या भावामुळे सजीव झालेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र पाहून श्रीकृष्ण आपल्याशी बोलत आहे, अशी अनुभूती त्यांना आली.

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

Leave a Comment