व्रत करणार्‍याने पाळायचे नियम (व्रतपरिभाषा)

व्रत अंगीकारल्यावर ते फलद्रूप होण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक ठरते. या नियमांचा भंग झाल्यास पाप लागू नये; म्हणून प्रायश्चित्तही घ्यावे. व्रताचरण करतांना पाळावयाचे नियम आणि बंधने यांविषयीची माहिती खालील लेखातून जाणून घेऊया.

 

१. डोळसपणा हवा

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ असे म्हटले आहे, ते अक्षरशः सत्य होय. व्रत हे अंधपणाने घ्यायचेच नसते. अजाणपणा आणि अज्ञान त्याविषयी चालत नाही. डोळे उघडे ठेवून ते स्वीकारावे लागते.

 

२. कठोर पालन

व्रताचे पालन काटेकोरपणाने व्हावे लागते. मग त्यासाठी किती कष्ट करावे लागतील, याचा विचार मनात येता उपयोगी नाही.

 

३. पूर्ण करणे आवश्यक

करवितां व्रत अर्धपुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ।।

तुका म्हणे तपतीर्थव्रतयाग । भक्ती हे मार्ग मोडूं नये ।। – संत तुकाराम महाराज

अर्थ : एखाद्याने व्रताला आरंभ केला, तर ते व्रत त्याने पूर्ण केलेच पाहिजे; कारण जर त्याने निष्काळजीपणाने ते व्रत मध्येच सोडून दिले, तर फार मोठे वाईट परिणाम होतील, असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. व्रत तुटले, सुटले तर त्याला ‘प्रायश्चित्त’ सांगितलेले असते. ‘प्रायश्चित्त’ म्हणजेच ‘पश्चात्ताप’ असेच समीकरण आज मांडायला हवे. चुकून व्रतभंग झाल्यास तीन दिवस उपोषण आणि पुरुषाने क्षौर करून (केस कापून) पुन्हा व्रत करावे.

 

४. नियम

अ. दात घासणे

उपवासाच्या दिवशी आणि श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत. आवश्यकता वाटल्यास पाण्याने गुळण्या कराव्यात. बारा चुळा भराव्यात अथवा आंब्याच्या पानाने, काष्ठाने किंवा बोटाने दात स्वच्छ करावेत.

आ. स्नान

प्रतिदिन स्नान केले पाहिजे. वायू सरला असता, जोरात रडल्यावर, रागावल्यावर, उंदीर आणि मांजर यांना शिवल्यावर, मोठ्याने हसल्यानंतर अन् खोटे बोलल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे.

इ. वस्त्र आणि अलंकार

व्रत आचरत असतांना गंधफूल, माळा, कापड आणि व्रतयोग्य असे अलंकार धारण करावेत. व्रतपूजा करत असतांना किंवा होम इत्यादी करत असतांना केवळ एक वस्त्र धारण न करता उपवस्त्रही घ्यावे. याहून अधिक वस्त्रे धारण करून मंत्रोच्चार, जप किंवा होम इत्यादी करणे योग्य नाही. मंत्र किंवा जपामुळे अंगात निर्माण होणार्‍या उष्णतेचा त्रास होऊ नये; म्हणून हा नियम आहे. व्रत करणारा पुरुष असो अथवा सौभाग्यवती स्त्री, व्रताचे संपूर्ण आचरण करत असतांना त्याने किंवा तिने लाल वस्त्र आणि सुगंधित पांढरे फूल धारण करावे. ब्राह्मणाने पांढरे स्वच्छ, क्षत्रियाने केशरी, वैश्याने पिवळे आणि अन्यांनी निळे अथवा कोणत्याही रंगाचे कापड वापरावे. तीन कासोट्यांचे धोतर परिधान करणे उत्तम होय. धोतर नेसणारा ब्राह्मण ‘मुनीराज’ असतो. ध्वजासारखे, ग्रंथीयुक्त (गाठ मारलेले) धोतर नेसणे योग्य नाही.

ई. दिवसभरात योग्य वेळी करावयाच्या कृती

जप, भोजन आणि मलमूत्रत्याग योग्य वेळी करावा.

उ. आचमन

मोहात, विचारात गुंतून व्रत करणारा आचमन करायचे विसरला, तर त्याचे व्रत व्यर्थ होते. आंघोळ करतांना, खातांना, पितांना आणि बाहेरून हिंडून आल्यावर जरी आचमन केले असले, तरीसुद्धा दुसर्‍यांदा आचमन केले पाहिजे.

ऊ. देवतापूजन

ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ एखादे व्रत अंगीकारलेले असेल, त्या देवतेची पूजा करावी. तिचा जप, ध्यान, कथाश्रवण, अर्चन, कीर्तन, धार्मिक ग्रंथवाचन इत्यादी करावे.

ए. आहार

१. मर्यादित असावा. पाणीही अनेकदा पिऊ नये.

२. हविष्यान्न : पाणी, फळ, मूळ, दूध, ब्राह्मणाची इच्छा, औषधसेवन अणि गुरुवचन यांनी व्रताला बाधा येत नाही. होमासाठी केलेली खीर, भिक्षेचे अन्न, जवस, भाजीपाला (दोडका, काकडी, मेथी इत्यादी), गायीचे दूध, दही, तूप, मुळा, आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्री आणि केळी इत्यादी पदार्थ व्रतकालात खाण्यास योग्य होत.

३. क्षार, लवण, मध आणि मांस यांचे सेवन करता कामा नये.

४. स्त्रिया आणि शूद्र यांना दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस उपवास करण्याचा अधिकार नाही.

ऐ. पथ्ये

पुढील गोष्टी करू नयेत –

१. शरिराला आणि मस्तकाला तेल लावणे, अभ्यंगस्नान,

२. विडा खाणे,

३. अंगाला उटी लावणे,

४. ज्या गोष्टींच्या योगाने शारीरिक सामर्थ्य अथवा मनोविकार बळावतील अशा गोष्टी,

५. राग, लोभ, मोह अणि आळस,

६. धूम्रपान,

७. दिवसा झोपणे आणि

८. चोरी करणे.

ओ. ब्रह्मचर्यपालन करणे

चातुर्मासात ब्रह्मचर्यपालन करावे.

औ. वाहनाने प्रवास वर्ज्य

व्रत करणार्‍याने बैल, उंट आणि गाढव यांवर बसू नये. (म्हणजे वाहनाने प्रवास करू नये.)

अं. गुणांची जोपासना

क्षमा, सत्य, दया, दान इत्यादी गुणांची जोपासना करावी.

क. पूजा करणे

गुरु, देव आणि ब्राह्मण यांची पूजा अन् सत्कार करावा.

ख. भोजन घालणे

ब्राह्मणभोजन घालावे. सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिका यांना भोजन घालावे.

ग. दान करणे

गायी, द्रव्य, अलंकार इत्यादींचे दान करावे.

घ. अन्नदान

अंध, दरिद्री आणि पंगू यांना अन्न द्यावे. ‘कालिका पुराणा’मध्ये असा नियम सांगितला आहे की, व्रताच्या दिवशी चवदार आणि स्वादिष्ट अन्न अन् पेये अनाथ, अंध आणि बधीर यांना मुक्त हस्ताने वाटावीत. ‘एखादे व्रत आचरण करत असणार्‍याने अंध, संकटग्रस्त आणि असाहाय्य लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान करावे’, असे भविष्यपुराणामध्ये सांगितले आहे.

च. अशौच

पुष्कळ दिवस आधी व्रताचा संकल्प केला आहे आणि अशा वेळी –

१. जन्ममरणाचे सोयर-सुतक आले, तर व्रताला त्याचा बाध येत नाही. व्रतकालात सुतक आले, तर त्यातून सुटका होण्यासाठी दानधर्म आणि पूजा सांगितली आहे. कित्येक व्रतांत दान, धर्म आणि पूजा तिन्ही असतात. गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी आणि अर्कसप्तमी या व्रतांत व्रतदेवतेची पूजा, वाण आणि दान सांगितलेली आहेत. अशा व्रतांत अशौच आले, तरी व्रत करावे; पण दानधर्म आणि पूजा करू नयेत.

२. एखाद्या व्रताचे पालन करत असतांना स्त्री रजस्वला झाली, तर त्यामुळे व्रतात अडथळा येत नाही.’

छ. आचारांचे फलप्राप्तीच्या संदर्भात तौलनिक महत्त्व

अनु. क्र.

आचार

महत्व (प्रतिशत)

१. संकल्प
२. देवतापूजन
३. पुरोहित सत्कार आणि दक्षिणा
४. सुवासिनी आणि कुमारिका भोजन
५. अनाथांना अन्नावस्त्रदान
६. गुणांची जोपासना
७. पथ्ये पाळणे
८. ब्रह्मचर्यपालन
९. आहार, स्नान इत्यादी
१०. नित्यसाधना
११. प्रत्यक्ष विधी ५४
१२. उपवास १०
१३. काल
१४. उद्यापन
१५. आचमन, अशौच, पथ्ये पाळणे १४

(संकलक प.पू. डॉ. जयंत आठवले यांना मिळालेले ज्ञान)

 

५. व्रताचरण हेच संजीवन असलेले रामाचार्य !

‘रामाचार्य हे गेल्या पिढीतले संस्कृतचे पंडित. त्यांची शास्त्रनिष्ठा विलक्षण. ते विलक्षण कर्मठ. रुग्णाईत असतांना, वैद्याचे औषध घेतांनाही कुठे व्रतभंग होऊ नये, याची दक्षता घ्यायचे. साखर न खाण्याचा त्यांचा संकल्प होता. तसे व्रतच ते अनेक वर्षांपासून आचरित होते. ते विलक्षण रुग्णाईत असायचे. अंगात ताप फणफणलेला, शुद्ध हरपायची. वैद्य पडताळून साखरेतून औषध द्यायचे. त्यांच्या जीभेवर औषध ठेवताच ते किंचाळत, “साखर ! साखर !’’ ते चटकन उठून बसत आणि औषध थुंकून टाकत. कड पालटण्याची शक्ती नसलेल्या त्यांना उठून बसलेले पाहिल्यावर वैद्य स्तिमित होत. त्यांचा मुलगा सांगतो, “ते मृत्यू पत्करतील; पण व्रतभंग करणार नाहीत.’’ व्रताचरण हेच त्यांचे संजीवन आहे. नितांत धर्मश्रद्धा भगवंतालाही दास बनवते.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment