अधिकमास

Article also available in :

अधिकमास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ ! अधिकमासाला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. अधिकमासात मंगलकार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये केली जातात; म्हणून याला पुरुषोत्तम मास, असे म्हणतात.

अधिक मास आणि व्रत

अधिकमासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करण्यामागील शास्त्र

प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिकमासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिकमासात सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र-सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे पालट होत असतात. या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये; म्हणून या महिन्यात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.

अधिकमास – या काळात पुढील व्रत तथा पुण्‍यकारी कृत्‍य करावे

अधिकमासात श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन (अकस्मात एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे), नक्तभोजन (दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे) अथवा एकभुक्त (दिवसभरात एकदाच जेवावे) रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे.
या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
अपूपदान (अनारशांचे दान) करावे.
‘या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे.
अन्नपूर्णादेवी

अधिकमास निमित्त धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

१. अन्‍नदानाचे अनन्‍यसाधारण महत्त्व !

‘अन्‍नदान करणे’, हे श्रेष्‍ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्‍त्रानुसार जो गृहस्‍थ अर्थार्जन करतो आणि ज्‍याच्‍या घरी प्रतिदिन अन्‍न शिजते, त्‍याने अन्‍नदान करणे, हे त्‍याचे कर्तव्‍यच आहे. ‘सद़्‍भावनेने ‘सत्‍पात्रे अन्‍नदान’ केल्‍यास अन्‍नदात्‍याला त्‍याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्‍याचा उद्धार होऊन तो ईश्‍वराच्‍या जवळ जातो’, असे धर्मशास्‍त्र सांगते. अन्‍नदान केल्‍यास अन्‍नदात्‍याला आध्‍यात्‍मिक स्‍तरावरही लाभ होतो.

२. धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करा !

सध्‍या धर्मग्‍लानीचा काळ असल्‍याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्‍यक कार्य आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्‍था वा संघटना यांना अन्‍नदान करणे’, हे सर्वश्रेष्‍ठ दान आहे. सनातन संस्‍था राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. सनातन संस्‍थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमधून धर्मप्रसाराचे कार्य केले जाते. सध्‍याच्‍या काळात राष्‍ट्र आणि धर्म यांची सेवा करण्‍याचे महत्त्व लक्षात घेऊन शेकडो साधक आश्रमांत राहून पूर्णकालीन सेवा करत आहेत. धर्मजागृतीचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदानासाठी धनरूपात साहाय्‍य करण्‍याची संधी अर्पणदात्‍यांना आहे.

३. हिंदु संस्‍कृतीत सांगितलेले दानाचे महत्त्व !
भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

जे अर्पणदाते अधिक मासाच्‍या निमित्ताने साधकांसाठी अन्‍नदानाकरता धनरूपात साहाय्‍य करून धर्मकार्यात सहभागी होऊ इच्‍छितात, त्‍यांनी खालील लिंक‍वर अवश्य क्लिक करावे.

–  श्री. वीरेंद्र मराठे, व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त, सनातन संस्‍था. 

अधिकमास – कोणती कर्मे करावीत ?

या मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत.
अधिक मासात सतत नामस्मरण केल्यास श्री पुरुषोत्तम कृष्ण प्रसन्न होतो.
ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्मे करावीत.
या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते.
ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन आदी संस्कार करावेत.
मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे.

अधिकमास – कोणती कर्मे टाळावीत ?

नेहमीच्या काम्य कर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्य कर्मांचा आरंभ आणि समाप्ती करू नये.
अपूर्व देवदर्शन (पूर्वी कधी न गेलेल्या ठिकाणी देवदर्शनाला जाणे)
गृहारंभ, वास्तूशांती
संन्‍यासग्रहण
नूतनव्रत ग्रहणदीक्षा
विवाह
चौल, उपनयन
देवप्रतिष्ठा

अधिकमास – या मासात वाढदिवस किं‍वा श्राद्ध आल्यास काय करा‌वे ?

अधिक मास - वाढदिवस

एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या मासात झाला असेल, तोच मास अधिक मास आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस निज मासात करावा, उदा. वर्ष २०१७ मध्ये ज्येष्ठ मासात जन्मलेल्या बालकाचा वाढदिवस या वर्षी ज्येष्ठ मास अधिक असल्याने अधिक मासात न करता निज ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावा.

अधिक ज्येष्ठ मासात ज्या बालकाचा जन्म होईल, त्या बालकाचा वाढदिवस प्रतिवर्षी ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावा.

अधिक मास - श्राद्ध

ज्या मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्याचे वर्षश्राद्ध तोच मास पुढील वर्षी अधिक मास येतो, तेव्हा त्या अधिक मासातच करावे, उदा. वर्ष २०१७ च्या ज्येष्ठ मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध अधिक ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावे. केवळ याच वर्षी असे करावे; कारण वर्ष २०१७ च्या ज्येष्ठ मासात निधन झालेल्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध, म्हणजे १२ मास या वर्षी अधिक मासात पूर्ण होतात. ज्या वेळी अधिक मास नसेल, तेव्हा वर्षश्राद्ध त्या तिथीला करावे.

अ. शके १९४१ च्या ज्येष्ठ मासात मृत्यू झाला असेल, तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके १९४२ च्या अधिक ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावे.

आ. प्रतिवर्षीचे ज्येष्ठ मासातील प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या वर्षी निज ज्येष्ठ मासात करावे; मात्र पूर्वीच्या अधिक ज्येष्ठ मासात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सरीक श्राद्ध या वर्षी अधिक ज्येष्ठ मासात करावे.

इ. शके १९४१ मध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद इत्यादी मासांत मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या त्या मासातील त्यांच्या तिथीस करावे. १३ मास होतात; म्हणून १ मास आधी करू नये.

ई. अधिक आश्‍विन किंवा निज आश्‍विन मासात मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी आश्‍विन मासात त्या तिथीला करावे. (संदर्भ : धर्मसिंधु – मलमास निर्णय, वर्ज्‍य-अवर्ज्‍य कर्म विभाग)’ (संदर्भ : दाते पंचांग)

अधिकमास म्हणजे काय ?

१ अ. चांद्रमास
सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळेपासून, म्हणजे एका अमावास्येपासून पुनः अशी युती होईपर्यंत, म्हणजे पुढील मासाच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे ‘चांद्रमास’ होय. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदु धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे (चंद्राच्या गतीवरून) ठरलेली आहेत. चांद्रमासांची नावे त्या मासात येणार्‍या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडली आहेत, उदा. चैत्र मासाच्या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असते.

१ आ. सौरमास
ऋतू सौरमासाप्रमाणे (सूर्याच्या गतीवरून) ठरलेले आहेत. सूर्य अश्‍विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुनः त्याच ठिकाणी येतो. तेवढ्या काळाला ‘सौरवर्ष’ असे म्हणतात.

१ इ. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा, यासाठी अधिक मासाचे प्रयोजन !
चांद्रवर्षाचे ३५४ दिवस आणि सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात, म्हणजेच या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे, तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा; म्हणून स्थूलमानाने सुमारे ३२॥ (साडेबत्तीस) मासांनी एक अधिक मास धरतात. म्हणजे २७ ते ३५ मासांनी १ अधिक मास येतो.

अधिकमास कोणत्या मासात येतो ?

अ. चैत्र ते अश्‍विन या सात मासांपैकी एक मास ‘अधिक मास’ म्हणून येतो.

आ. क्वचित फाल्गुन मासही ‘अधिक मास’ म्हणून येतो.

इ. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांना जोडून अधिक मास येत नाही. या तीन मासांपैकी कोणता तरी एक मास क्षय मास होऊ शकतो; कारण या तीन मासांत सूर्याची गती अधिक असल्यामुळे एका चांद्रमासात त्याची दोन संक्रमणे होऊ शकतात. क्षय मास येतो, तेव्हा एका वर्षात क्षय मासाच्या पूर्वी १ आणि नंतर १, असे २ अधिक मास जवळजवळ येतात.

ई. माघ मास मात्र अधिक किंवा क्षय मास होत नाही.

अधिकमास काढण्याची पद्धत

अ. ज्या मासाच्या कृष्ण पंचमीस सूर्याची संक्रांत येईल, तोच मास प्रायः पुढील वर्षी अधिक मास होतो; परंतु हे स्थूलमान (सर्वसाधारण) आहे.

आ. शालिवाहन शकास १२ ने गुणावे आणि त्या गुणाकारास १९ ने भागावे. जी बाकी राहील, ती ९ किंवा त्यापेक्षा न्यून असेल, तर त्या वर्षी अधिक मास येईल, असे समजावे.

इ. आणखी एक पद्धत (अधिक विश्‍वसनीय) : विक्रम संवत् संख्येत २४ मिळवून त्या बेरजेला १६० ने भागावे.

१. बाकी ३०, ४९, ६८, ८७, १०६, १२५ यांच्यापैकी एखादी उरली तर चैत्र,

२. बाकी ११, ७६, ९५, ११४, १३३, १५२ यांच्यापैकी एखादी उरली तर वैशाख,

३. बाकी ०, ८, १९, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ यांच्यापैकी एखादी उरली तर ज्येष्ठ,

४. बाकी १६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ यांच्यापैकी एखादी उरल्यास आषाढ,

५. बाकी ५, २३, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ यांच्यापैकी एखादी उरल्यास श्रावण,

६. बाकी १३, ३२, ५१ यांच्यापैकी एखादी उरल्यास भाद्रपद आणि

७. बाकी २, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५ यांच्यापैकी एखादी उरल्यास आश्‍विन मास हा अधिक मास असतो.

८. अन्य संख्या बाकी उरल्यास अधिक मास येत नाही.

येणार्‍या अधिकमासांचे कोष्टक

शालिवाहन शक १९४२

२०२० – आश्‍विन

शालिवाहन शक १९४५

२०२३ – श्रावण

शालिवाहन शक १९४८

२०२६ – ज्‍येष्‍ठ

शालिवाहन शक १९५१

२०२९ – चैत्र

शालिवाहन शक १९५३

२०३२ – भाद्रपद

शालिवाहन शक १९५६

२०३५ – आषाढ

शालिवाहन शक १९५९

२०३८ – ज्‍येष्‍ठ

शालिवाहन शक १९६१

२०४१ – आश्‍विन

10 thoughts on “अधिकमास”

 1. ya masat jar mulila bal zale asel tr javayala dan detat te deu shakto ka…aani javyala pn soyar lagu aste tr te dan gheu shaktat ka

  Reply
  • नमस्कार

   आपण सोयर संपल्यावर देऊ शकतात.

   आपली
   सनातन संस्था

   Reply
  • नमस्कार

   हो. अधिक मासात डोहाळे जेवण करू शकतो.
   या सोबतच बाळाला आणि आईला आवश्यक संस्कारांविषयी माहिती सनातनच्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. आपण ते अवश्य बघून घ्या. – https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-parenting/

   आपली,
   सनातन संस्था

   Reply
    • नमस्कार,

     अधिक मासात विशेष कोणतेही काम निषिद्ध आहे. त्यामुळे भू खरेदी हे करता येणार नाही.

     आपली,
     सनातन संस्था

     Reply
  • नमस्कार

   हो. अधिक मासात नवीन कपडे घेऊ शकतो, मंगल कार्ये निषिद्ध आहेत.

   आपली
   सनातन संस्था

   Reply
  • नमस्कार

   आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

   अनेक प्रांतांमध्ये ‘अधिक मासात आईची ओटी भरण्याची’ प्रथा आहे. तरी आपल्या प्रांतात अशी प्रथा असेल तर करू शकतात.

   आपली,
   सनातन संस्था

   Reply

Leave a Comment