Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !

सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

 

श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ?

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो. त्यासाठी बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या !

सात्ति्वक श्री गणेश मूर्तीची मापे येथे पहा !

अथर्वशीर्ष ऐकण्यासाठी आणि त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

 

शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती लाभदायी का असते ?

मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितकी ती उपासकाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी.

 

थर्मोकोलचा वापर टाळावा !

श्री गणेशाच्या मूर्तीसाठी मखर बनवतांना थर्मोकोलचा वापर करू नये. थर्मोकोल हा अविघटनशील घटक असून त्याच्या वापराने पर्यावरणाचा र्‍हास होतो. तसेच थर्मोकोल रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेला असल्यामुळे तो रज-तमोगुणी आहे.

 

केळीच्या खोडाचा वापर करा !

केळीच्या खोडापासून बनवलेले मखर अधिक सात्त्विक असते.

 

अनु. क्र. गणेशोत्सवात हे नसावे !

गणेशोत्सवात हे असावे !

१. वर्गणी बळाने वसूल करणे ऐच्छिक वर्गणी स्वीकारणे
२. ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
३. थर्माकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोषणाई) नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास
४. फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण तालबद्ध आरत्या आणि भावपूर्ण नामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचे आयोजन
५. विसर्जन मिरवणुकीत गुलाल, हिडीस नाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन् मद्यपान विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचा नामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता

गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा !

१. उत्सवस्थळी चित्रपटगीते, ‘रेकॉर्ड डान्स’, जुगार, मद्यपान, गुटख्यांची विज्ञापने टाळा !

२. उत्सवस्थळी स्तोत्रपठण, राष्ट्र व धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवा !

३. रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करा !

४. राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा वाढवणार्‍या विषयांवरील देखाव्यांचे सादरीकरण करा !

 

गणेशोत्सव मंडळांनो, लोककल्याणासाठी गणेशोत्सव साजरा करा !

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि सवंग लोकप्रियतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रतिवर्षी चित्रविचित्र रूपांतील आणि अवाढव्य आकारांतील श्री गणेशमूर्ती बसवतात. श्री गणेशाची मूर्ती धर्मशास्त्रानुसार बनवावी आणि तिची उंची एक ते दीड फूट एवढीच का ठेवावी, असे शास्त्र असले तरी, श्री गणेशाच्या रूपात काही नाविन्य वा आकर्षकता नसेल आणि मूर्ती लहान असेल, तर गणेशोत्सवाला गर्दी कशी होणार ?, असा प्रश्‍न मंडळांच्या पदाधिकार्‍यांना पडू शकतो. यासंदर्भात मंडळांनी काय करायला हवे, हे पुढे दिले आहे.

१. समाजाला गणेशोत्सवाकडे पहाण्याची आध्यात्मिक दृष्टी देणे

आपण समाजापुढे जे ठेवू, त्यानुसार समाजाला पहाण्याची सवय लागते. गणेशोत्सव मंडळांनी श्री गणपति अथर्वशीर्षाच्या सामुदायिक पठणासारखे कार्यक्रम आयोजित केले, तरीही लोकांची दाटी होऊ शकते. लोकांची तशी मानसिकता सिद्ध करणे, हे मंडळांचे कर्तव्य आहे. पुणे येथील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपति संस्थान अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण आयोजित करते अन् त्या कार्यक्रमास प्रचंड दाटी होते.

२. राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करणे

सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ सामाजिक सोहळा नसून, हिंदूंची संस्कृती अन् संघटन वर्धिष्णू करण्याची, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची ती एक पर्वणीच आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करावे. याची काही उदाहरणे –
अ. श्री गणेशाची उपासना वाढवणारे धर्मशिक्षण फलक अन् ग्रंथ यांचे प्रदर्शन
आ. संतांनी लिहिलेली भजने, दासबोधाचे निरूपण, राष्ट्रपुरुषांवरील पोवाडे इत्यादी कार्यक्रम
इ. हिंदु धर्मियांवरील अत्याचार, तसेच राष्ट्र अन् धर्म यांची होत असलेली हानी यांच्या विरोधात जागृती करणारी भाषणे
ई. स्वसंरक्षण प्रशिक्षण, उदा. कराटे, दंडसाखळी यांचे वर्ग
उ. क्रांतीकारकांच्या जीवनावरील प्रदर्शने
ऊ. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीचा दर्शनसोहळा
या कार्यक्रमांना होणारी दाटी खर्‍याखुर्‍या राष्ट्रप्रेमी किंवा धर्मप्रेमी लोकांची असेल आणि अशा लोकांच्या प्रयत्नांतूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचे सुराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होईल.

 

गणेशोत्सव मंडळांनो, असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती तुम्हाला साहाय्य करतील.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’