देवद येथील सनातन आश्रमातील श्री. शिवाजी वटकर १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

संतपदी विराजमान झालेले पू. शिवाजी वटकर

पनवेल – देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातन संस्थेच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले. गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी देवद आश्रमात झालेल्या एका सोहळ्यात सनातन संस्थेच्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी पू. शिवाजी वटकर यांच्या प्रगतीची आनंददायी घोषणा केली. तेव्हा उपस्थित सर्वांचीच भावजागृती झाली. या भावसोहळ्याला देवद आश्रमातील संत, सद्गुरु आणि साधक उपस्थित होते. संत आणि साधक यांनी पू. शिवाजी वटकर यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

पू. शिवाजी वटकर यांचा सन्मान करताना पू. रमेश गडकरी (डावीकडे)

 

श्री. शिवाजी वटकर यांनी संतपद प्राप्त
केल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

धर्मकार्याची अतीव तळमळ आणि भावपूर्ण सेवा या गुणांद्वारे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून
सनातन संस्थेच्या १०२ व्या समष्टी संतपदावर आरूढ झालेले देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) !

‘श्री. शिवाजी वटकर पूर्वी एका जहाज आस्थापनात मोठ्या पदावर कार्यरत होते. उच्चपदस्थ अधिकारी असूनही त्यांच्या सहज वागण्या-बोलण्यातून तसे कधीच जाणवायचे नाही. सर्वसाधारणपणे उतारवयात एखादी नवीन सेवा शिकून ती करणे कठीण असते; परंतु वटकर मात्र याला अपवाद आहेत. ते कोणतीही सेवा अगदी मनापासून, तळमळीने आणि भावपूर्ण रितीने करतात. त्यांच्यामध्ये ‘भाव’ आणि ‘तळमळ’ या गुणांचा अपूर्व संगम पहायला मिळतो.

त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध सात्त्विक चीड असून देव आणि धर्म यांची विटंबना होऊ नये, यासाठी ते अत्यंत जागरूक असतात. कुठेही देवतांचे विडंबन होत असल्याचे कळले की, स्वतःचा कोणताही विचार न करता ती रोखण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या समर्पण भावामुळे अन् त्यांच्यातील क्षात्रवृत्तीमुळे त्यांना धर्महानी रोखण्यात यशही मिळते. अशक्य वाटणार्‍या गोष्टीही त्यांनी सहज साध्य करून दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘आदर्श धर्मरक्षक’ असे म्हणता येईल.

नम्रता, चिकाटी, भगवंतावर दृढ श्रद्धा आदी गुणांमुळे श्री. शिवाजी वटकर यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. आज गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते सनातन संस्थेच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत.

‘पू. शिवाजी वटकर यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी साधनेसह समाजात धर्मरक्षणाविषयी जागृती करणे, ही काळानुसार आवश्यक साधनाच आहे. परात्पर गुरूंच्या या शिकवणीचे अनुसरण करत सनातन संस्थेचे साधक आध्यात्मिक प्रगती करत आहेत. ‘धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले । ऐसे जाणून रामभक्तीकरिता ऐश्‍वर्य हे लाभले ॥’ या पंक्तींप्रमाणे निष्ठेने धर्मकार्य करणारे देवद आश्रमातील श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) यांच्या रूपाने क्षात्रतेज असणारे संतरत्न सनातन संस्थेला लाभले.

१६ जुलैला गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील एका भावसोहळ्याद्वारे हे घोषित करण्यात आले. ‘धर्माचे रक्षण करणे, हेच भगवंताने नेमून दिलेले विहित कार्य आहे’ या भावाने वयाची बंधने ओलांडून अखंड उत्साहाने कार्य करणार्‍या पू. वटकरकाकांनी सर्वांसमोर एक आदर्शच ठेवला आहे. भाव आणि तळमळ यांचा अपूर्व संगम, नम्रता, चिकाटी, शिकण्याची वृत्ती या व्यष्टी गुणांसमवेतच ‘धर्मरक्षणाचा ध्यास’ या समष्टी गुणामुळे त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. पू. वटकरकाका म्हणजे राष्ट्र अन् धर्म कार्यात दक्ष असणारे ‘आदर्श धर्मरक्षक’च आहेत !

सनातन संस्थेचे पू. रमेश गडकरी यांनी पू. शिवाजी वटकर यांना हार घालून, तसेच भेटवस्तू देऊन आणि शाल, श्रीफळ अर्पण करून त्यांचा सन्मान केला. या भावसोहळ्याचे सूत्रसंचालन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर यांनी भावपूर्णरित्या केले.

 

…अशी झाली श्री. शिवाजी वटकर यांच्या संतपदाची घोषणा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्या गुरूंची सेवा कशी केली असेल, याचे कुतूहल सर्वच साधकांना असते. श्री. शिवाजी वटकरकाका यांनी परात्पर गुरुदेवांचा शिष्यावस्थेतील साधनाप्रवास जवळून अनुभवला आहे. जणू साधकांची ही जिज्ञासा जाणून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी या सोहळ्यामध्ये श्री.वटकरकाकांना गुरुदेवांविषयीचे अनुभव सांगण्यास सांगितले. वटकरकाका यांनी ‘कैलास पर्वत जसा उच्च आहे, तशी गुरुदेवांची शिकवणही उच्च आहे आणि मी मात्र स्वतः त्यांच्यासमोर एका कणाएवढाही नव्हतो’, अशा भावपूर्ण शब्दांनी आरंभ करून परात्पर गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्यातील आध्यात्मिक नाते उलगडले. ही मुग्ध करणारी भाववाणी ऐकून साधक श्री गुरूंप्रती कृतज्ञता अनुभवत असतांना पू. (सौ.) अश्‍विनीताई म्हणाल्या, ‘‘वटकरकाकांची भावावस्था आणि वाणीतील चैतन्य यांमुळे ते सांगत असलेले शब्द अंतःकरणापर्यंत जाऊन गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायला मिळाले. काकांच्या अहंशून्यतेचे दर्शन झाले. गुरुदेवांनी जशी प.पू. भक्तराज महाराज यांची सेवा केली, त्याच भावाने वटकरकाकांनी प.पू. डॉक्टरांनी दिलेली सेवा केली.’’ यानंतर पू. (सौ.) अश्‍विनीताईंनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री. शिवाजी वटकर यांच्याविषयी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यातून त्यांनी काकांच्या संतत्वाचे गुपित उलगडले आणि ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते सनातन संस्थेच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात