हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीता श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये भावपूर्ण सोहळ्यात आनंददायी घोषणा

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – भोळा भाव असलेल्या, देहभान विसरून देवाची भक्ती करणार्‍या आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावात रहाणार्‍या हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीताबाई श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावपूर्ण सोहळ्यात सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक आणि पू. जोशीआजींचे नातजावई श्री. विनायक शानभाग यांनी ही आनंददायी घोेषणा केली.

 

देवाच्या भक्तीत देहभान विसरून तल्लीन होऊन
नाचणार्‍या पू. (श्रीमती) सीताबाई श्रीधर जोशी (वय ९३ वर्षे) !

१. बालपण

१ अ. भक्तीप्रधान घराणे

श्रीमती सीताबाई श्रीधर जोशी यांचा जन्म वर्ष १९२६ मध्ये फेब्रुवारी मासात कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील बोम्मनहळ्ळी या गावात झाला. आजींच्या माहेरच्या कुलदेवीचे नाव चंदला परमेश्‍वरी असे होते. त्यांच्या घरच्यांनी आजींचे नावही चंदला परमेश्‍वरी असेच ठेवले होते. घरी सर्व जण त्यांना चंदा असे म्हणत असत. त्यांचे वडील श्री. शंकर दीक्षित हे मोठे कीर्तनकार होते. त्यांची आई पार्वतीबाई दीक्षित पतिव्रता आणि भगवद्भक्त होत्या.

१ आ. भक्ती अणि शक्ती यांचे बालवयातच संस्कार होणे

बालपणापासूनच आजी फार हुशार होत्या. घरी येणार्‍या सर्वांची सेवा त्या अगदी प्रेमाने करायच्या. आजींचे वडील श्री. शंकर दीक्षित हे मोठे कीर्तनकार असल्याने आजींवर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. त्यांच्या वडिलांचे काका शिवानंद महाराज हे थोर संत होते आणि त्याचसमवेत ते क्रांतीकारी विचारांचेही होते. त्यांच्या संस्कारांमुळे आजींमध्ये क्षात्रतेज निर्माण झाले. अन्याय त्यांना सहन होत नसे. त्यांच्या घरातील काका आणि त्यांचा मुलगा साधना करत ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. त्यामुळे आजींच्या बालमनावर भक्ती आणि शक्ती असे दोन्ही संस्कार झाले होते.

२. विवाह

आजींचा विवाह त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी हुब्बळ्ळीचे श्री. श्रीधर कृष्णभट जोशी यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी आजींच्या यजमानांनी त्यांचे नाव पालटून सीतादेवी असे ठेवले. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना पहिला मुलगा (श्री. कृष्णाजी जोशी) झाला. त्यानंतर त्यांना ६ मुली झाल्या.

३. उत्साही

आज वयाच्या ९३ व्या वर्षीही आजी घरातील सर्व कामे उत्साहाने करतात आणि गेली अनेक वर्षे प्रत्येक काम करतांना त्या भावपूर्णपणे देवाचे भजन किंवा स्तोत्र म्हणतात. आजींमुळे सर्वच मुलांवर धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार झाले आहेत.

४. क्षात्रतेज

आजींना नवीन घर बांधण्यासाठी आवश्यक जमीन मिळाली होती; पण जमिनीची कागदपत्रे मिळत नव्हती. तेव्हा आजी स्वतः धारवाड येथील जिल्हाधिकार्‍यांकडे गेल्या आणि त्यांच्याकडून एकाच दिवसात त्यांनी सर्व कागदपत्रे मिळवली.

५. कर्तव्यपूर्ती

अ. आजींना एकूण ७ अपत्ये. त्यामध्ये ६ मुली आणि १ मुलगा. त्या सर्वांचे शिक्षण आजींनी स्वतः पुढाकार घेऊन केले आणि सर्वांचे विवाह चांगली घराणी पाहून करून दिले.

आ. वर्ष १९४२ मध्ये लग्न झाल्यापासून ते वर्ष २००४ मध्ये यजमानांच्या देहत्यागापर्यंत ६२ वर्षे आजींनी यजमानांची सेवा केली.

६. साधनेचा आरंभ

६ अ. श्रीधर स्वामींच्या मठात सेवा करणे

वर्ष १९८६ ते वर्ष २००० अशी १४ वर्षे आजी कर्नाटकातील वरदहळ्ळी येथील थोर संत श्रीधर स्वामी यांच्या मठात जात होत्या. मठात प्रतिवर्षी होणार्‍या सर्व उत्सवांमध्ये आजी सहभागी होत होत्या. मठात गेल्यावर केर काढणे, रांगोळी काढणे, गोशाळेत स्वच्छता करणे, गायींना गोग्रास देणे, जेवणाच्या पंक्तींनंतर पाने काढणे अशा सर्व प्रकारच्या सेवा आजींनी तिथे केल्या आहेत. या सेवा सतत करण्यामुळे आजींच्या मनात आधीपासून असलेली गुरुभक्ती किंवा देवभक्ती हळूहळू अंकुरू लागली, फुलू लागली.

६ आ. गुरुभेट
६ आ १. चित्रदुर्ग जिल्ह्यातील थोर संत आणि गुरु मल्लिकार्जुन स्वामी यांची भेट होणे आणि त्यानंतर आजींना आपोआपच आतून भजने स्फुरणे

वर्ष २००४ मध्ये आजींच्या यजमानांनी देहत्याग केल्यानंतर आजींमधील गुरुभक्ती वाढतच गेली. ब्रह्मानंद स्वामी नावाचे आजींचे संन्यास घेतलेले एक नातेवाईक आहेत. त्यांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील दोडेरी गावातील थोर गुरु मल्लिकार्जुन स्वामी यांच्याशी आजींची ओळख करून दिली. गुरु मल्लिकार्जुन स्वामी यांच्या आशीवार्दाने आजींनी मनातल्या मनात गुरुभक्ती करायला आरंभ केला. तेव्हापासून आजींना आपोआपच आतून भजने स्फुरू लागली.

६ आ २. स्वतः भजने रचून त्यांना चाली लावून ती म्हणणे

वर्ष २००४ पासून आजपर्यंत आजींनी श्रीकृष्ण, दत्त आणि गुरुमहिमा यावर ३० पेक्षा अधिक भजने स्वतः रचली असून त्या सर्व भजनांना आजींनी स्वतःच चालीही लावल्या आहेत. ही सर्व भजने त्यांना या वयातही पाठ आहेत. आजींची सून सौ. पुष्पा जोशी यांनी ती लिहून ठेवली आहेत.

७. काविळ बरी करण्याचे ज्ञान गुरुभगिनीकडून मिळणे आणि आजींना आयुर्वेदीय औषधांचेही ज्ञान असणे

आजींना गुरुभक्त असलेल्या साध्वी महालसा यांनी काविळ बरे करण्याचे सिद्ध औषध बनवण्यास शिकवले. गेली अनेक वर्षे आजी हे सिद्ध औषध अनेक जणांना देऊन त्यांची काविळ बरी करत आहेत. मुंबई, पुणे आणि कर्णावती (अहमदाबाद) येथूनही अनेक जण येऊन आजींकडून औषध घेऊन जातात. आजींना अनेक घरगुती आयुर्वेदीय औषधांचेही चांगले ज्ञान आहे.

८.  आजींची असलेली उत्कट भावस्थिती

अ. गेली अनेक वर्षे त्या प्रतिदिन न्यूनतम २ घंटे गुरु आणि देव यांचे स्मरण करत स्वतःला विसरून जातात आणि त्याच भावाच्या स्थितीत भजने म्हणतात.

आ. गेल्या ५ – ६ वर्षांपासून आजी भजन गाता गाता मध्येच भावावस्थेेत नाचायला लागतात. त्या वेळी आजी स्वतःचे देहभानही विसरलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या पायाला आलेली सूजही त्यांना कळत नाही.

९. रामनाथी आश्रम हे श्रीकृष्णाचे वृंदावन असून
परात्पर गुुरु डॉ. आठवले श्रीकृष्ण आहेत, असा भाव असलेल्या आजी !

वर्ष २०१५ मध्ये आजी त्यांची नात शिल्पा (आताच्या सौ. विद्या शानभाग) यांच्या लग्नाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आल्या होत्या. तेव्हा आजींची परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. तेव्हापासून आजी परात्पर गुुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करतात. परात्पर गुुरु डॉ. आठवले हे भगवान श्रीकृष्णाचा अवतार असून सनातनचे सर्व साधक म्हणजे गोप-गोपी आहेत ! रामनाथी आश्रम हे श्रीकृष्णाचे वृंदावन आहे, असा आजींचा भाव आहे.

१०. अनुभूती

१० अ. दत्तगुरूंचे दर्शन होणे

दत्तजयंतीच्या दिवशी आजींना त्यांची नात नगर येथील दत्त मंदिरात घेऊन गेली होती. मंदिरात दर्शनार्थींची पुष्कळ गर्दी झाली होती आणि काही काळासाठी गाभार्‍याचे मुख्य प्रवेशद्वारही बंद होते. तेव्हा आजींचे लक्ष गाभार्‍याच्या बाहेर बांधलेल्या पाळण्याकडे गेले. त्या पाळण्यात आजींना क्षणभर वीज चमकल्यासारखे दिसून तिथे त्यांच्या गुरूंचे दर्शन झाले.

१० आ. खोलीतील आरशात शिवावतार असलेले थोर संत चिदंबर दीक्षित यांचे दर्शन होणे

एके दिवशी दुपारी आजी श्रीगुरूंचे स्मरण करत झोपल्या होत्या. सहज त्यांचे लक्ष खोलीतील आरशाकडे गेले. तेव्हा आरशात त्यांना कर्नाटकातील पूर्वीच्या काळातील थोर संत शिवाचे अवतार असलेले चिदंबर दीक्षित यांचे दर्शन झाले.

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment