संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर (वय ७४ वर्षे) यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर

 

१. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

१ अ. व्यष्टी साधनेचा आढावा नियमित पाठवणे

‘जिल्ह्यातील सर्व साधकांना आपला व्यष्टी साधनेचा आढावा पाठवण्यास सांगण्यात आले होते. तेव्हापासून श्री. चपळगावकरकाका त्यांच्या व्यष्टी साधनेचा (नामजपाचा) आढावा सौ. रिचा वर्मा यांना नियमितपणे देतात. कधी गावी गेले किंवा प्रवासात असले, तरीही ते आढावा पाठवतात. ‘नामजपामुळे काय जाणवले ?’ हेसुद्धा ते कळवतात.

१ आ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व कळल्यावर रामनाथी आश्रमात जाऊन प्रक्रिया शिकून घेणे

काकांना स्वभावदोष-निर्मूलन प्रकियेविषयी समजल्यावर ते केवळ ही प्रक्रिया शिकण्यासाठी रामनाथीला गेले आणि सौ. सुप्रियाताई घेत असलेल्या व्यष्टी आढाव्याला बसून त्यांनी प्रक्रिया शिकून घेतली. (सौ. सुप्रिया माथुर प्रक्रिया शिकण्यासाठी आलेल्या साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचा आढावा घेतात.) ते त्यांच्या शंका सुप्रियाताईला विचारून घेत असत. त्यानंतर त्यांनी चिंतन करून स्वतःमध्ये पुष्कळ पालट केला. त्यानंतरही ते काही वेळा केवळ प्रक्रिया-सत्संगासाठी रामनाथीला आले होते.

 

२. प्रेमभाव

२ अ. साधकांकडून चुका होऊ नयेत; म्हणून त्यांना ‘चुका टाळण्यासाठी कसे प्रयत्न करायचे’, हे प्रेमाने सांगणे

कु. चैताली डुबे

वर्ष २०१७ ची गुरुपौर्णिमा झाल्यावर नेहमीप्रमाणे ‘कार्यक्रम छान झाला’, असे सांगून काका घरी गेले आणि दुसर्‍या दिवशी मला पुन्हा त्यांचा दूरभाष आला. तेव्हा ते माझ्याशी गुरुपौर्णिमेविषयी अनौपचारिक बोलत होते. त्या वेळी मी त्यांना म्हटले, ‘‘गुरुपौर्णिमा चांगली झाली; पण माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या.’’ तेव्हा काकांनी मला एक एक चूक विचारून ‘कसे प्रयत्न केले असते, तर त्या चुका टाळता आल्या असत्या’, हे आपुलकीने आणि प्रेमानेे सांगितले. तेव्हा ‘देव मला किती साहाय्य करतो’, या विचाराने माझी पुष्कळ भावजागृती झाली. पूर्वी मला काकांची पुष्कळ भीती वाटायची; पण या प्रसंगानंतर ती न्यून झाली.

२ आ. ‘जिल्ह्यातील साधकांची प्रगती लवकर व्हायला हवी’, असे वाटणे

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ज्या साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित होते, त्यांची नावे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येतात. तेव्हा काका ज्यांची पातळी वाढली असेल, त्यांना दूरभाष करून त्यांचे अभिनंदन करतात, तसेच ज्यांची पातळी वाढली नाही, त्यांच्याशीही ते बोलतात आणि त्यांना साहाय्य करतात. ‘जिल्ह्यातील साधकांची प्रगती लवकर व्हायला हवी’, असे काकांना नेहमी वाटते.

२ इ. सेवा करून रात्री परतणार्‍या साधिकेची चौकशी करणे

मी रात्री सेवेनिमित्त काकांकडे गेल्यावर तेथून निघण्यापूर्वी ते मला ‘सेवाकेंद्रात पोचल्यावर दूरभाष कर’, असे सांगतात. कधी माझ्याकडून दूरभाष करण्यास विलंब झाला, तर ते स्वतः दूरभाष करून ‘पोचलीस का ?’, असे विचारतात.

 

३. संतांप्रती भाव

काकांचे वय पुष्कळ आहे आणि मध्यंतरी त्यांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म झाल्याने सद्गुरु जाधवकाका त्यांना भेटायला गेले होते. (अन्य वेळीही अनेकदा सद्गुरु काका स्वत:च त्यांना भेटायला त्यांच्या घरी जातात.) तेव्हा त्यांना ‘सद्गुरूंना आपल्याला भेटायला यावे लागले’, याची पुष्कळ खंत वाटली. ती खंत दूर होण्यासाठी ते जेथे सद्गुरु काका निवासाला असतील, त्या ठिकाणी भेटायला जातात.

 

४. साधकांची सोय पहाणे

काकांना भेट आलेले ग्रंथ त्यांचे वाचून झाल्यावर ते जिल्ह्यात उपयोगात येतील; म्हणून लगेच सेवाकेंद्रात पाठवून देतात. त्याचप्रमाणे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘हे दैनिक संग्रही ठेवा’ किंवा ‘वाचून झाल्यावर जमा करा’, अशी सूचना असेल, तर ते दैनिक काका सेवाकेंद्रात जमा करतात.

 

५. श्री. चपळगावकर काकांमध्ये जाणवलेले पालट

५ अ. देहातील पालट

काका या वयातही तरुण असल्यासारखेच वाटतात. ते सर्वकाही स्वत:चे स्वत:च करतात. त्यांच्या मुखावर एक वेगळीच चकाकी आली आहे. ही चकाकी त्यांचे हात आणि पाय यांवरही दिसून येते.

५ आ. मनाने स्थिर रहाणे

एकदा त्यांची छायाचित्रे काढण्याची सेवा होती. त्या वेळी कितीही वेळा काकांना बसण्याच्या स्थितीत पालट सांगितला, तरी ते सहजतेने करायचे. हे सर्व करतांना त्यांच्यात पुष्कळ स्थिरता जाणवत होती.

– कु. चैताली डुबे, संभाजीनगर (२८.५.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment