अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी

डोंबिवली (जिल्हा ठाणे)  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खचून न जाता संघर्ष करत आणि सर्व लोटलीकर कुटुंबियांवर साधनेचे संस्कार करत त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणार्‍या श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे १६ जूनला झालेल्या अनौपचारिक भेटीच्या कार्यक्रमात सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी यांनी ‘श्रीमती लोटलीकरआजी या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदाला पोचल्या आहेत’, अशी घोषणा केली अन् सर्व उपस्थित साधक आणि पू. आजींचे कुटुंबीय भावविभोर झाले. पू. गडकरीकाका यांनी पू. (श्रीमती) लोटलीकरआजी यांना पुष्पहार अर्पण करून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

लहानपणापासून आजारपण, गरिबी, लग्नानंतरही अनेक समस्यांना तोंड देत पू. आजींनी कष्ट करत आणि श्रद्धेची कास धरत मुले, नातवंडे आणि पतवंडे यांच्यामध्ये संस्कारांचे बीज रोवून त्यांना आदर्श असे घडवले आणि सर्व कर्तव्ये भगवंतावर श्रद्धा ठेवून पार पाडली.

पू. (श्रीमती) लोटलीकरआजी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करतांना पू. रमेश गडकरी

‘डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील लोटलीकर कुटुंबियांच्या घरी ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशीला (१६ जून या दिवशी) सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी यांनी अनौपचारिक भेटीच्या कार्यक्रमात ‘श्रीमती विजया लोटलीकरआजी या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदाला पोचल्या आहेत’, असे सांगताच उपस्थितांची भावजागृती झाली. येथे पू. गडकरीकाका यांनी पू. (श्रीमती) लोटलीकरआजींच्या संदर्भात सर्वांना दिलेली आनंदवार्ता दिली आहे.

पू. लोटलीकरआजी यांचा सन्मान केल्यावर पू. रमेश गडकरी म्हणाले, ‘‘पू. आजींना मी यापूर्वी भेटलो नव्हतो. आज पहिल्यांदाच भेटलो. मी पाहिले की, पू. आजी येणार्‍या सर्वांचीच पुष्कळ प्रेमाने विचारपूस करत होत्या आणि सर्वांना भरभरून आशीर्वाद देत होत्या. ‘पू. आजींशी बोलतच रहावे’, असे वाटत होते. पूर्वी आमचे साधनेच्या संदर्भातील अभ्यासवर्ग श्री. विजय लोटलीकर (पू. आजींचा मुलगा) घेत असत. आज त्यांची आई संत झाल्यामुळे पुष्कळ आनंद वाटत आहे.’’

‘डोंबिवली येथील श्रीमती विजया विनायक लोटलीकरआजी मागील २५ वर्षांपासून साधना करत आहेत. लहानपणापासून आणि नंतर वैवाहिक जीवन जगतांना त्यांना पुष्कळ कष्ट सहन करावे लागले; पण सहनशील वृत्तीने त्यांनी प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. पहिल्यापासून त्यांची देवावर श्रद्धा होती आणि जीवनातील खडतर प्रसंगांना तोंड देतांना त्यांची ही श्रद्धा आणखी दृढ झाली.

‘आदर्श पत्नी’, ‘आदर्श माता’ आणि ‘आदर्श आजी’ अशा भूमिका बजावतांना त्यांनी त्यांच्या कुटुंबावर चांगले संस्कार केले. त्यामुळेच आज सारे लोटलीकर कुटुंब साधनारत आहे. आजींची मुले, सुना आणि नातवंडे साधना करत असून त्यांची पतवंडे उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आली आहेत.

वयोमानामुळे आजींना आता स्मृतीभ्रंश झाला आहे; पण अशा स्थितीतही त्यांना देवाचा आणि नामजपाचा विसर मात्र पडलेला नाही. त्या अखंड नामानुसंधानात असून त्यांची शून्यात असलेली दृष्टी त्यांचा निर्गुणाकडील प्रवास दर्शवत आहे. निरपेक्ष प्रीती, देवावर दृढ श्रद्धा आणि अखंड नामानुसंधान यांमुळे लोटलीकरआजींची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होऊन त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे अन् त्या आता सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदावर आरूढ झाल्या आहेत.

पू. श्रीमती विजया लोेटलीकरआजी यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. लोटलीकरआजी यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

मध्यभागी आसंदीवर बसलेल्या पू. श्रीमती विजया लोटलीकर आजी, डावीकडून उभ्या असलेल्या आजींची नातसून सौ. आर्या लोटलीकर, नातू श्री. अमेय लोटलीकर, थोरला मुलगा श्री. विजय लोटलीकर, जावई श्री. प्रदीप गिंडे, धाकटा मुलगा श्री. विलास लोटलीकर, सून सौ. नेहा लोटलीकर, नातू श्री. अपूर्व लोटलीकर, त्यांच्यासमवेत आजींचा पणतू चि. आरव लोटलीकर, आजींची नातसून सौ. अक्षया लोटलीकर, त्यांच्यासमवेत पणतू चि. आर्यन लोटलीकर, खाली बसलेले डावीकडून नात कु. प्रियांका लोटलीकर, पणती कु. पूर्ती लोटलीकर, (आजींच्या डावीकडे) पणती चि. सान्वी लोटलीकर आणि नातू श्री. अभिनय लोटलीकर.

१. आईने आमच्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांमुळे आज मी
पूर्णवेळ साधना करू शकत आहे ! – विजय लोटलीकर (पू. आजींचा मोठा मुलगा)

‘आईला (पू. आजींना) स्मृतीभ्रंश झाला आहे. एकदा ती घरातून दरवाजाकडे चालली होती, त्या वेळी मी तिला विचारले की, ‘‘आई कुठे चाललीस ?’’ त्या वेळी ती म्हणाली, ‘‘मी आता परमेश्‍वराकडे जाणार !’’ आई त्या वेळी असे का बोलली होती, त्याचे कारण आज ती संत झाल्यानंतर लक्षात आले. मी आणि माझ्या भावाने सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईला श्रीफळ दिले होते. आईने आमच्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांमुळे आज मी पूर्णवेळ साधना करू शकत आहे.’

२. पू. आजींना स्मृतीभ्रंश झाल्याने त्या कोणाला
ओळखत नाहीत; मात्र केवळ परात्पर गुरु डॉक्टरांना ओळखतात !
– कु. प्रियांका विजय लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (पू. आजींची नात)

‘पू. आजी म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर हे माझे गुरु आहेत.’’ त्यामुळे मला लक्षात आले की, पू. आजी मायेतील सर्व नात्यांच्या पलीकडे गेल्या असून आता त्यांच्यासाठी केवळ ‘गुरु-शिष्य’ हे नाते, म्हणजे आध्यात्मिक नाते हे एकच खरे नाते आहे, जे आपल्या समवेत जन्मोजन्मी असते. जगात सर्वांचा विसर पडावा; मात्र गुरूंचा कधीच विसर पडू नये.

पू. आजींच्या साधनेमुळे त्यांच्या देहातही दैवी पालट झाले आहेत. त्यांची त्वचा पारदर्शक झाली असून पायावरील आणि हातावरील त्वचेला चकाकी आली आहे अन् ८६ वर्षे वय असूनही त्यांचे केस अजूनही काळे आहेत.’

३. पू. आजी सतत भावाच्या स्थितीत राहून नामजप करतात आणि
प्रत्येकाकडे क्षमायाचना करतात ! – अभिनय विश्‍वास लोटलीकर, पुणे (पू. आजींचा नातू)

‘पू. आजी त्यांच्याकडे येणार्‍या सर्वांनाच भरभरून आशीर्वाद देतात. त्या म्हणतात, ‘‘माझे काही चुकले असल्यास मला क्षमा करा.’’ त्यांच्यात प्रेमभावही पुष्कळ वाढला आहे. त्यांचा तोंडवळाही तेजस्वी झाला आहे.’

४. पू. आजी म्हणजे निरपेक्ष प्रेम, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, त्याग आणि
सहनशीलता यांचे मूर्तीमंत रूपच ! – अमेय विजय लोटलीकर, डोंबिवली. (पू. आजींचा नातू)

‘पू. आजींनी कुटुंबातील सर्वांवरच संस्कार आणि साधना यांचे जे बीज रोवले, त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. पू. आजींची सर्व मुले, मुली, सुना, जावई, नाती, नातू, नातसुना आणि पतवंडे ही आज त्यांच्या क्षेत्रात अन् अध्यात्मातही प्रगतीपथावर आहेत. आम्हा सर्व कुटुंबियांना जोडून ठेवणारा एक अदृश्य धागा म्हणजे पू. आजी होय. त्यांच्यात देवत्व निर्माण करून आम्हा सर्वांनाच साधनारत करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

५. काटकसरीने संसार कसा करायचा, प्रसंगाला कसे सामोरे जायचे,
हे पू. आजींनी शिकवले ! – सौ. संगीता विजय लोटलीकर, रायगड (पू. आजींची मोठी सून)

पू. आजींनी मला ‘काटकसरीने संसार कशा प्रकारे करायला हवा ? आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला, तरी त्या प्रसंगात घाबरून न जाता धैर्याने कशा प्रकारे सामोरे जायला हवे ?’, हे शिकवले. पू. आजींसमवेत प्रत्येक कृती करतांना सुगंधाची अनुभूती येऊन चैतन्य जाणवत असते.’ (सौ. संगीता लोटलीकर या सध्या सेवेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात असून त्यांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून या सोहळ्याचा लाभ घेतला.)

 

सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संत पू. श्रीमती विजया
लोटलीकर यांचे आध्यात्मिक उन्नती केलेले कुटुंब आणि नातेवाईक !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment