प्रभु श्रीराम

 

श्रीराम Shriram

पहा : ‘रामनवमी’शी संबंधित व्हिडिओ मालिका

श्रीराम

देवाबद्दल जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होते आणि त्यामुळे साधनाही चांगली होते. उपासकात उपास्य देवतेची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो त्या देवतेशी एकरूप होऊ शकत नाही. यासाठी या लेखमालेत श्रीरामाविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती दिली आहे.

 

१. श्रीरामाच्या काही नावांचा उगम

अ. राम

हे नाव रामजन्माच्या आधीही प्रचलित होते. (रम्-रमयते) म्हणजे (आनंदात) रममाण होणे, यावरून राम हा शब्द बनला आहे. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍यांना आनंदात रममाण करणारा.

आ. रामचंद्र

रामाचे मूळ नाव ‘राम’ एवढेच आहे. तो सूर्यवंशी आहे. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.

इ. श्रीराम

‘श्री’ हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. भगवंताचे षड्गुण याप्रमाणे आहेत – यश, श्री (शक्‍ति, सौंदर्य, सद्‍गुण, वगैरे), औदार्य, वैराग्य, ज्ञान आणि ऐश्‍वर्य.

दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला श्रीराम म्हणू लागले. वाल्मीकिरामायणात रामाला देव नव्हे, तर नरपुंगव म्हणजे ‘नरांतील श्रेष्ठ’ असे म्हटले आहे. (हनुमानाला कपिपुंगव म्हटले आहे. केवळ पुंगव या शब्दाचा अर्थ आहे बैल.)

 

२. सर्वसामान्यांच्या नावापूर्वी ‘श्री.’ लावणे आणि अवतारांच्या नावापूर्वी ‘श्री’ लावणे, यांतील भेद

आपल्या नावाच्या आधी लावण्यात येणार्‍या ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम असतो; कारण ते ‘श्रीयुत्’चे संक्षिप्त रूप आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावांमध्ये ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम नाही. आपण श्रीयुत् असतो, म्हणजे ‘श्री’ युक्‍त असतो, म्हणजे आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट श्रीराम आणि श्रीकृष्ण हे साक्षात् भगवंतच होते.

 

३. रामपरिवार आणि अवतार

ईश्‍वर अवतार घेतो त्या वेळी इतर देवही अवतार घेतात. या नियमानुसार श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला, तेव्हा इतर देवांनी कोणते अवतार घेतले आणि इतरही कोणाचे अवतार होते, याची माहिती पुढील सारणीत दिली आहे.

राम आणि परिवार

अवतार कोणाचा ?

राम आणि परिवार

अवतार कोणाचा ?

१. राम श्रीविष्णु ४. भरत शंख
२. सीता श्रीविष्णूची शक्‍ती ५. शत्रुघ्न चक्र
३. लक्ष्मण आदिशेष ६. मारुति अकरावा रुद्र, शिव

 

४. दोन वेळा ‘राम-राम’ म्हणण्यामागील कारण

‘पुष्कळ लोक एकमेकांना भेटतात, तेव्हा ते दोन वेळा ‘राम राम’ का म्हणतात ? दोन वेळा ‘राम राम’ म्हणण्याच्या मागे फार मोठे रहस्य आहे. ते आदी काळापासून चालत आले आहे. हिंदूंच्या बाराखडीत ‘र’ हे अक्षर सत्ताविसावे आहे, ‘आ’ची जागा दुसरी आहे आणि ‘म’ हे पंचविसावे अक्षर आहे. आता या तिन्ही अंकांची बेरीज केली, तर २७ + २ + २५ = ५४ होते. म्हणजेच राम या शब्दाची बेरीज ५४ होते. त्यामुळे दोन वेळा ‘राम राम’ म्हटल्याने १०८ वेळा म्हटल्यासारखे म्हणजे ‘राम राम’ म्हटल्याने संपूर्ण एक माळ नामजप होतो.’

– (संदर्भ : संकेतस्थळ) (१.१२.२०१९)

श्रीरामाचे गुण जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

श्रीरामाविषयीच्या उपासनेमागील शास्त्र जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘विष्णु व विष्णूची रूपे (श्रीविष्णु, श्रीराम व श्रीकृष्ण)’

Leave a Comment