प्रभु श्रीरामांचा जन्म होण्यामागे अनेक उद्देश असणे !

Article also available in :

अनुक्रमणिका

‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.

 

श्रीरामप्रभूंच्या न उमगलेल्या स्वरूपाला शतशः प्रणाम !

‘श्रीरामप्रभु, आपण ‘अधोक्षज’, म्हणजे इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाच्या वर असल्याने आणि विशेष म्हणजे ‘अव्यय’ म्हणजे अविनाशी असल्याने आम्हाला आजवर आपले स्वरूप कळलेच नाही. त्या आपल्या स्वरूपाला शतशः प्रणाम !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साभार – मासिक ‘घनगर्जित’ फेब्रुवारी २०१८)

 

सर्वोत्तम आदर्श श्रीराम !

‘श्रीरामासारखा दुसरा आदर्श पती नाही, पुत्र नाही, राजा नाही, मानव नाही आणि शत्रूही नाही. तसा आदर्श आजवर झाला नाही आणि पुढे व्हायचा नाही.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार – ‘मासिक घनगर्जित’, फेब्रुवारी २०१७)

 

१. जय आणि विजय यांना शापामुळे
मिळालेल्या तामसिक शरिराच्या, म्हणजे रावण अन् कुंभकर्ण यांच्या संहारासाठी श्रीरामचंद्राचा जन्म होणे

श्रीहरिचे जय आणि विजय या दोन प्रिय द्वारपालांना आपण सर्व जाणतो. त्या दोन बंधूंना ब्राह्मणाच्या (सनकादि) शापामुळे असुरांचे तामसिक शरीर मिळाले. एका जन्मात ते पृथ्वीवर जाऊन देवतांना जिंकणारे रावण आणि कुंभकर्ण नामक अत्यंत बलाढ्य अन् महावीर राक्षस झाले, जे सर्वांना ठाऊक आहे. त्यांच्या संहारासाठी श्रीरामचंद्राचा जन्म झाला.

 

२. श्रीरामाने जालंधर नामक दैत्याला युद्धात ठार मारून त्याला परमपद देणे

एका कल्पात पराक्रमी जालंधर नामक दैत्याने सर्व देवतांना युद्धात पराजित केले. देवतांना दुःखी पाहून शिवाने जालंधराशी मोठे घनघोर युद्ध केले; परंतु तो महाबली दैत्य मरता मरत नव्हता. त्या दैत्यराजाची पत्नी वृंदा मोठी पतिव्रता होती, जिच्यामुळे त्रिपुरासुरासारख्या अजेय शत्रूचा विनाश करणारे शिवही त्या जालंधर दैत्यावर विजय प्राप्त करू शकले नाहीत. तेव्हा प्रभु श्रीहरि विष्णूने कपटाने त्या पतिव्रता वृंदेचा व्रत भंग केला आणि देवतांचे कार्य केले. जेव्हा त्या वृंदाने हे रहस्य जाणले, तेव्हा तिने क्रोधाने भगवान श्रीहरिला शाप दिला. तेव्हा लीलासागर कृपाळू हरिने त्या स्त्रीच्या शापाला प्रमाण मानून स्वीकारले. तोच जालंधर त्या कल्पात रावण झाला, ज्याला श्रीरामाने युद्धात ठार मारून परमपद दिले.

 

३. एका कल्पात देवर्षि नारदाच्या शापाला श्रीहरिने शिरोधार्य मानून श्रीरामाच्या रूपात मनुजावतार घेणे

नारदाचा अभिमान आणि मोह यांच्याशी जोडलेला हा प्रसंग अत्यंत रोचक आहे. यामध्ये साक्षीदार असलेल्या शिवाच्या दोन गणांनाही शाप मिळतो आणि श्रीहरि विष्णुलाही ब्रह्मर्षि नारद शाप देतात.

लक्ष्मीनिवास श्रीहरि विवाह करून वधूला घेऊन गेले. अयशस्वी राजमंडळी निराश होऊन परतले. मोहामुळे नारदमुनींची बुद्धी भ्रष्ट झाली होती, त्यामुळे राजकुमारी प्राप्त न झाल्यामुळे ते अत्यंत व्याकुळ झाले. तेव्हा भगवान शिवाच्या गणांनी हसत म्हटले, ‘हे मुनी !  एकदा जाऊन आपले मुख आरशात तरी पहा जरा’, असे म्हणून ते दोघेही पुष्कळ भयभीत होऊन पळून गेले. नारदमुनींनी पाण्यात वाकून आपले मुख पाहिले. आपले रूप पाहून त्यांना पुष्कळ क्रोध आला. त्यांनी भगवान शिवाच्या त्या गणांना अत्यंत कठोर शाप दिला, ‘‘तुम्ही दोघे कपटी-पापी असुर होऊन जाल, तुम्ही माझी थट्टा केलीत, त्याचे आता फळ चाखा. नंतर कोणा मुनींची थट्टा करा.’’

पुढे त्या शिवगणांनी देवर्षि नारदाच्या शापापासून उःशाप मागण्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा नारदांना त्यांची दया आली. ते म्हणतात,‘‘तुम्ही दोघे राक्षस (रावण आणि कुंभकर्ण) व्हाल. तुम्हाला महान ऐश्वर्य, तेज आणि बळ यांची प्राप्ती होईल. तुम्ही बाहुबलाने जेव्हा संपूर्ण जग जिंकून घ्याल, तेव्हा भगवान श्रीविष्णु मनुष्याचे शरीर (श्रीरामावतार) धारण करतील आणि श्रीहरिच्या हातून तुमचा मृत्यू होईल. त्यामुळे तुम्ही मुक्त व्हाल आणि पुनः पृथ्वीवर जन्म घेणार नाही.’’

पुढे नारदमुनी श्रीहरिला म्हणतात की, ‘ज्या शरिराला धारण करून तुम्ही मला फसवले, तुम्हीही तेच शरीर धारण कराल, असा माझा शाप आहे. तुम्ही माझे शरीर वानराचे करून टाकले होते, त्यामुळे वानरेच तुम्हाला साहाय्य करतील. मी ज्या स्त्रीची कामना करत होतो, तिचा माझ्याशी वियोग घडवून तुम्ही माझे मोठे अहित केले आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या स्त्रीच्या वियोगाने दुःखी व्हाल.’ अशा प्रकारे एका कल्पाच्या त्रेतायुगाची श्रीरामकथा त्याला अनुरूपच आहे. त्या कल्पात देवर्षि नारदाचा शाप श्रीराम जन्म होण्याला कारणीभूत होतो.

 

४. राजा प्रतापभानूने मुनींना छळल्यामुळे त्याला राक्षस होण्याचा
शाप मिळणे आणि त्या राक्षसाच्या अत्याचारांपासून मुक्ती देण्यासाठी श्रीरामावतार होणे

श्रीरामाचा अवतार घेण्याचे एक अन्य कारण सांगतांना महर्षि याज्ञवल्क्य आणि भारद्वाज मुनी हे चक्रवर्ती राजा प्रतापभानूची कथा सांगतात. ज्याने कपटाने राजा प्रतापभानूने मुनींना छळले होते आणि त्यामुळेच ब्राह्मणांनी राजाला शाप देत म्हटले होते, ‘‘अरे मूर्ख राजा ! तू परिवारासहित राक्षस होशील.’’ यथा समयी तोच राजा प्रतापभानू परिवारासहित रावण नावाचा राक्षस झाला. त्याला १० मस्तके आणि २० बाहू होते. तो प्रचंड शूरवीर होता. अरिमर्दन नावाचा जो राजाचा लहान भाऊ होता, तो बलशाली कुंभकर्ण झाला. त्याचा जो मंत्री होता, ज्याचे नाव धर्मरुची होते, तो रावणाचा सावत्र लहान भाऊ म्हणजे त्याचे नाव विभीषण असे होते, ज्याला सर्व जग जाणतात. तो विष्णुभक्त आणि ज्ञान-विज्ञानाचा भांडार होता. राजाचे पुत्र आणि सेवक सर्व मोठे भयानक राक्षस झाले. त्यांच्या अत्याचारांपासून मुक्ती देण्यासाठी त्या कल्पात श्रीरामावतार झाला.

 

५. भगवान विष्णुने संतापात भृगुपत्नीचा शिरच्छेद
करणे आणि भृगूंनी त्यांना मनुष्यलोकात जन्म घेण्याचा शाप देणे

वाल्मीकि-रामायणाच्या उत्तरकांडाच्या ९१ व्या सर्गातील कथेत आले आहे, ‘प्राचीन काळची गोष्ट आहे. एकदा देवासुर-संग्रामात देवतांपासून पीडित झालेल्या दैत्यांनी महर्षि भृगुच्या पत्नीकडे आश्रय मागितला. भृगुपत्नीने त्या वेळी दैत्यांना अभय दिले आणि ते त्यांच्या आश्रमात निर्भय होऊन राहू लागले. ‘भृगुपत्नीने दैत्यांना आश्रय दिला आहे ’, हे पाहून कोपित होऊन देवेश्वर भगवान विष्णूने तीक्ष्ण धारदार सुदर्शनचक्राने तिचे शिर कापले. आपल्या पत्नीचा वध झालेला पाहून भार्गववंशाचे प्रवर्तक भृगूंनी त्वरित कोपित होऊन, शत्रूकुलनाशन भगवान श्रीहरि विष्णुला शाप दिला, ‘‘हे जनार्दन ! माझी पत्नी वध करण्यास दोषी नव्हती; परंतु आपण क्रोधाच्या आवेशात तिचा वध केला आहे. त्यामुळे तुम्हाला मनुष्यलोकात जन्म घ्यावा लागेल आणि तेथे पुष्कळ वर्षे तुम्हाला पत्नी वियोगाचे दुःख सहन करावे लागेल.’’ त्यानंतर अशा प्रकारचा शाप दिल्यानंतर भृगु ऋषींना मोठा पश्चाताप झाला होता.

 

६. तपस्वी दांपत्य मनु-शतरूपा यांनी श्रीहरिकडे त्यांच्यासारखा पुत्र
मिळण्याचे वरदान मागणे आणि स्वत: श्रीहरिने रामावतारात त्यांच्या पोटी जन्म घेणे

एका अन्य कल्पात श्रीहरिच्या मनुजावताराचे वर्णन करतांना भगवान शिव गिरिराजकुमारी (पार्वती) ला म्हणतात, ‘हे गिरिराजकुमारी (पार्वती), आता भगवंताच्या अवताराचे  दुसरे कारण ऐका. मी त्याची विचित्र कथा विस्ताराने सांगतो, ज्यामुळे अजन्मा, निर्गुण आणि रूपविरहित (अव्यक्त सच्चिदानंदघन) ब्रह्म अयोध्यापुरीचे राजा झाले.

पुढे ते पार्वतीला स्वयंभू मनु आणि त्याची पत्नी शतरूपा यांच्या अनुपम तपश्चर्येची प्रशंसा करतात. तपस्वी दांपत्य मनु-शतरूपा यांनी हरिकडे ते वरदान मागण्याचे वर्णन करतात, ज्यामुळे त्या कल्पात श्रीहरिचा रामावतार होतो. तसे श्रीहरि तपस्वी दांपत्याला म्हणतात, ‘‘हे राजन ! निःसंकोच होऊन माझ्याकडे वरदान मागावे. तुम्हाला देऊ शकत नाही, असे माझ्याकडे काहीच नाही.’’ ते ऐकून राजा मनुने हात जोडून श्रीहरि विष्णुला म्हटले, ‘‘हे दानशूरांचे शिरोमणी ! हे कृपानिधान ! हे नाथ ! मी आपल्या मनातील खरा भाव सांगतो, मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. प्रभुपासून भले कशाला लपवू ?’’ राजा-राणीची अशी अद्भुत भक्ती पाहून आणि त्यांचे अमूल्य वचन ऐकून करुणानिधान भगवंत म्हणाले, ‘‘असेच होवो. तथास्तु ! हे राजन, मी माझ्यासारखा दुसरा कुठे बरे शोधणार? त्यामुळे मी स्वतःच तुमचा पुत्र म्हणून येईन.’’ आता तुम्ही माझी आज्ञा मानून देवराज इंद्राची राजधानी अमरावतीमध्ये जाऊन वास करा. हे तात (पिता) ! तेथे पुष्कळ भोगांचा उपभोग घेतल्यानंतर काही काळानंतर तुम्ही अवधचा (अयोध्येचा) राजा बनाल. त्यानंतर मी तुमचा पुत्र होईन.’’

भगवंताने अवतार घेण्यामागे अनंत उद्देश दडलेले असतात, ज्याचे वर्णन ‘नेति-नेति.’

– डॉ. रमेश मंगलजी वाजपेयी

(साभार : मासिक ‘कल्याण’, एप्रिल २०२१)

Leave a Comment