श्रीराम : वैशिष्ट्ये आणि कार्य

श्रीराम Shriram

पहा : ‘रामनवमी’शी संबंधित व्हीडीओ मालिका

श्रीराम

पाण्याच्या थेंबात तेलाचा थोडासा अंश असल्यास तो पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे श्रीरामभक्‍तातही श्रीरामाची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो श्रीरामाशी एकरूप होऊ शकत नाही; म्हणजेच त्याला सायुज्य मुक्‍ती मिळणार नाही. या संदर्भात येथे दिलेली वैशिष्ट्ये उपासकाला मार्गदर्शक वाटतील.

 

१. सर्वार्थाने आदर्श

अ. आदर्श पुत्र

रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने ‘दुःख करू नका’ असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला १४ वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो आणि पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.

आ. आदर्श बंधू

अजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.

इ. आदर्श पती

श्रीराम एकपत्‍नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्‍तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्‍नीची आवश्यकता असतांना दुसरी पत्‍नी न करता त्याने सीतेची प्रतिकृति आपल्याशेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्‍नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने बर्‍याच राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्‍वभूमीवर श्रीरामाचे एकपत्‍नीव्रत प्रकर्षाने जाणवते.

ई. आदर्श मित्र

रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात साहाय्य केले.

उ. आदर्श राजा

१. राजधर्माचे पालन करण्यात तत्पर

प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने ‘कौलिनभीतेन गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः ।’ (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.) असा मार्मिक श्‍लोक लिहिला आहे.

ऊ. आदर्श शत्रू

रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

 

२. धर्मपालक

श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.

 

३. एकवचनी

अ. एखादा मुद्दा सत्य आहे, असे ठासून सांगायचे असल्यास आपण तो पुनःपुन्हा सांगतो, ‘मी त्रिवार सत्य सांगतो’ असे म्हणतो. ‘शांतिः । शांतिः । शांतिः ।’ असेही तीन वेळा म्हणतात. त्रिवार सत्यमधील त्रिवार हा शब्द पुढील दोन अर्थांनी वापरलेला आहे.

१. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची शपथ घेऊन सांगतो.

२. त्रिवार हा शब्द त्रि ± वार (म्हणजे तीन वार) या शब्दांपासून बनला आहे. तीन वारी तेच स्वप्न दिसले तर त्याला नुसते स्वप्न न म्हणता स्वप्नदृष्टान्त असे म्हणतात. त्यातील सूचनेनुसार वागावे किंवा त्या संदर्भात एखाद्या उन्नतांना विचारावे. तसेच तीन वेळा एखादी गोष्ट ऐकली, तरच ती सत्य समजावी.

श्रीराम मात्र एकवचनी होता, म्हणजे त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुनःपुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूर नसायची. कोणी श्रीरामालाही विचारायचे नाही, ‘खरंच का ?’

आ. संस्कृत व्याकरणात एकवचन, दि्ववचन आणि बहुवचन अशी तीन वचने आहेत. त्यात श्रीराम हा ‘एकवचनी’ आहे. याचा अर्थ असा की, श्रीरामाशी एकरूप होणे, म्हणजे तीनकडून (अनेकाकडून) दोघांच्या, म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांच्या नात्यातून एकाकडे, म्हणजे श्रीरामाकडे जाणे. अनेकातून एकाकडे आणि एकातून शून्याकडे जाणे अशी अध्यात्मात प्रगती असते. येथे शून्य म्हणजे पूर्णावतार कृष्ण होय.

इ. भूमितीनुसार तीन हा त्रिमिती (तीन डायमेन्शन्स) दर्शवितो, तर श्रीराम एका मितीचा दर्शक आहे. या एका मितीतून त्रिमिती निर्माण झाली आहे. ही एक मिती स्थल-कालातीत आहे.

 

४. एकबाणी

श्रीरामाचा एकच बाण लक्ष्य वेधीत असल्याने त्याला दुसरा बाण मारावा लागत नसे.

 

५. अती उदार

सुग्रीवाने रामाला विचारले, ‘‘बिभीषण शरण आल्यावर तुम्ही त्याला लंकेचे राज्य दिले. (युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच रामाने तसे सांगितले होते.) आता रावण शरण आला, तर काय करणार ?’’ त्यावर राम म्हणाला, ‘‘त्याला अयोध्या देईन. आम्ही सर्व भाऊ जंगलात रहायला जाऊ.’’

 

६. सदैव स्थितप्रज्ञ असलेला

स्थितप्रज्ञता हे उच्च आध्यात्मिक पातळीचे लक्षण आहे. श्रीरामाची स्थितप्रज्ञावस्था पुढील श्‍लोकावरून लक्षात येते.

प्रसन्नता न गतानभिषेकतः तथा न मम्ले वनवासदुःखतः ।
मुखाम्बुजश्री रघुनंदनस्य या सदास्तु मे मंजुल मंजुलमंगलप्रदा ।।

अर्थ : राज्याभिषेकाची वार्ता ऐकून जिच्यावर प्रसन्नता उमटली नाही आणि वनवासाचे दुःख पुढे उभे राहिले असताही जिच्यावर विषण्णता पसरली नाही, ती श्रीरामाची मुखकांति आमचे नित्यमंगल करो.

गीतेच्या परिभाषेत यालाच ‘न उल्हासे, न संतापे । त्याची प्रज्ञा स्थिरावली ।।’ असे म्हटले आहे.

 

७. प्रभु श्रीरामावर टीका करणारे, श्रीरामाचे मानवत्व कसे होते, ते जाणून घेतील का ?

राम मानवाप्रमाणे सुख-दुःख दाखवितो (व्यक्‍त करतो) आणि म्हणून तो आपल्याला इतर देवांपेक्षा अधिक जवळचा वाटतो, उदा. सीताहरण झाल्यावर राम अत्यंत शोकाकुल झाला होता. मात्र अशा प्रसंगीही रामाचे ईश्‍वरत्व शाबूत असायचे, हे शिव (शंकर)-पार्वतीच्या पुढील संवादावरून लक्षात येईल.

पार्वती : आपण ज्याचे नामस्मरण करता, तो सामान्य माणसाप्रमाणे पत्‍नीसाठी किती शोक करीत आहे, ते पहा.

शंकर : तो शोक वरवरचा आहे. त्याने मनुष्यदेह धारण केल्यामुळे त्याला त्याप्रमाणे वागावे लागत आहे.

पार्वती : राम झाडाला आलिंगन देत फिरत आहे, म्हणजे तो सीतेसाठी खरंच वेडा झाला आहे.

शंकर : मी म्हणतो ते खरं कि खोटं याचा तूच अनुभव घे. तू सीतेचे रूप घेऊन त्याला भेट. मग राम कसा वागतो ते पहा.

त्याप्रमाणे पार्वती गेली; पण रामाने तिला पाहिल्याबरोबर नमस्कार केला आणि म्हणाला, ‘‘तुला मी ओळखले. तू आदिमाया आहेस.’’ हे ऐकून रामाचा शोक वरवरचा आहे, याची पार्वतीला खात्री पटली.

 

८. रामराज्य

अ. त्रेतायुगात एकटा श्रीराम सात्त्विक होता असे नाही, तर प्रजाही सात्त्विक होती; म्हणूनच रामराज्यामध्ये एकही तक्रार श्रीरामाच्या दरबारात आली नव्हती.

आ. खरे रामराज्य (भावार्थ) : पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘श्रीराम’

Leave a Comment