श्रीरामरक्षास्तोत्र पठणाच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपाचा परिणाम अधिक होणेे

Article also available in :

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे. रामरक्षा बुधकौशिकऋषींनी रचले आहे. आत्मज्ञानसंपन्न ऋषिमुनी अन् साधूसंत यांना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असते. या अवस्थेत त्यांचे ईश्‍वराशी पूर्ण अद्वैत असल्याने आणि ईश्‍वरच या सार्‍याचा कर्ता आहे, या अनुभूतीमुळे ‘रामरक्षा श्री शिवांनी स्वप्नावस्थेत सांगितली’ असे बुधकौशिकऋषींनी लिहिलेले आढळते.

‘ईश्‍वरप्राप्ती करून घेण्याचे कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी साधनामार्ग आहेत. दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्‍या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग.’(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’)

 

१. चाचण्यांचे स्वरूप

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांनी २८.३.२०१९ या दिवशी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करण्यापूर्वी आणि पठण केल्यानंतर त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

२८.३.२०१९ या दिवशी दोन्ही साधकांनी श्रीरामाचा नामजप करण्यापूर्वी आणि नामजप केल्यानंतर त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करण्यासाठी दोन्ही साधकांना प्रत्येकी १५ मिनिटे लागली. त्यांनी श्रीरामाचा नामजप २० मिनिटे केला.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. श्रीरामरक्षास्तोत्राच्या पठणानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहिशा होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या अन् त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे १.३४ मीटर आणि ०.९० मीटर होत्या. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यानंतर साधिकेतील दोन्ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशा झाल्या.

२ अ २. श्रीरामाचा नामजप केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या अन् त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे २.६६ मीटर आणि २.२० मीटर होत्या. श्रीरामाचा नामजप केल्यानंतर साधिकेतील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.८६ मीटर घटून ती ०.८० मीटर झाली, म्हणजे तिच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली. तसेच साधिकेतील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा तिची प्रभावळ मोजता न येण्याइतपत न्यून झाली. त्या वेळी साधिकेच्या संदर्भात ‘यू.टी. स्कॅनर’ने १४० अंशाचा कोन केला. (‘यू.टी. स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)

२ अ ३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे; पण श्रीरामरक्षास्तोत्राच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपामुळे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नव्हती. साधिकेने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यानंतर तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिची प्रभावळ अनुक्रमे १.६१ मीटर अन् २.१६ मीटर होती, म्हणजे श्रीरामरक्षास्तोत्राच्या पठणाच्या तुलनेत श्रीरामाचा नामजप केल्यावर तिच्यामध्ये अधिक प्र्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

२ आ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर त्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होणे; पण ही वाढ श्रीरामरक्षास्तोत्राच्या तुलनेत श्रीरामाचा नामजपामुळे अधिक प्रमाणात होणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर त्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेली वाढ पुढे दिली आहे.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. श्रीरामरक्षास्तोत्राचे महत्त्व

‘अध्यात्मवाङ्मयात मंत्रयोगाला पुष्कळ महत्त्व आहे. श्रीरामरक्षास्तोत्र हा मंत्रच आहे. रामरक्षेच्या प्रारंभी ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ असे म्हटले जाते. मंत्र म्हणजे इष्टसाधक आणि अनिष्टनिवारक वर्णसमूह. मंत्र म्हणजे एक नाद (ध्वनी), एक अक्षर, एक शब्द किंवा शब्दांचा समूह. ज्या वेळी ठरावीक लयीत अन् सुरात एखादा मंत्र जपला जातो, त्या वेळी त्या जपातून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते. याकरता रामरक्षा विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे.

‘स्तूयते अनेन इति’ म्हणजे ज्यायोगे देवतेचे स्तवन केले जाते ते स्तोत्र, अशी स्तोत्र या शब्दाची व्याख्या आहे. स्तोत्रात देवतेच्या स्तुतीसमवेतच स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्तीही असते. स्तोत्रांमध्ये दिलेल्या फलश्रुतीमागे रचयित्याचा संकल्प असल्याने ते पठण करणार्‍याला फलश्रुतीमुळे फळ मिळते.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘श्रीरामरक्षास्तोत्र’)

३ आ. श्रीरामाचा जप

‘कलियुगात नामजप हीच सर्वोत्तम साधना आहे आणि नामजपाला पर्याय नाही’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

‘श्रीराम जय राम जय जय राम’ यातील शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

श्रीराम : हे श्रीरामाचे आवाहन आहे.

जय राम : हे स्तुतिवाचक आहे.

जय जय राम : हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतिदर्शक आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्रीराम’)

श्रीरामरक्षास्तोत्राच्या पठणामुळे विशिष्ट शक्ती (चैतन्य) निर्माण होते आणि स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती त्यामुळे संरक्षककवच निर्माण होते. श्रीरामाचा नामजप केल्याने नामजप करणार्‍याला श्रीरामतत्त्वाचा लाभ होतो. चाचणीतील दोन्ही साधकांना श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यावर आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले. ते पुढे दिले आहेत.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये वाईट शक्तींच्या त्रासामुळे त्रासदायक शक्तीचे स्थान होते, तसेच तिच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरणही होते. शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवली जाते आणि शरिराभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवले जाते. श्रीरामरक्षास्तोत्र पठण, तसेच श्रीरामाचा जप केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील नकारात्मक ऊर्जा (‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा) आणि साधिकेभोवतीची नकारात्मक ऊर्जा (‘इन्फ्रारेड’ ऊर्जा) या पूर्णपणे नाहिशा झाल्या वा त्या पुष्कळ प्रमाणात न्यून झाल्या, तसेच तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, हेही विशेष आहे.

२. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाभोवती नकारात्मक ऊर्जा नव्हती. श्रीरामरक्षास्तोत्र पठण, तसेच श्रीरामाचा नामजप केल्यानंतर त्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली.

हा सर्व परिणाम श्रीरामरक्षास्तोत्र, तसेच श्रीरामाचा नामजप यांतील सकारात्मक ऊर्जेमुळे झाला. सकारात्मक ऊर्जेमुळे एखाद्याभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे सोपे आहे; पण एखाद्यातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती दूर होण्यासाठी पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आवश्यक असते. श्रीरामरक्षास्तोत्राच्या केवळ १५ मिनिटांच्या पठणाने, तसेच श्रीरामाच्या केवळ २० मिनिटांच्या जपाने हे दोन्ही साध्य झाले.

येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे चाचणीतील दोन्ही साधकांवर स्तोत्रपठणापेक्षा नामजपाचा परिणाम अधिक प्रमाणात झाला. यातून सतत नामजप करण्याचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.४.२०१९)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment