पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

१. पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी २. कु. श्रिया राजंदेकर ३. श्री. योगेश जलतारे ४. सौ. मुक्ता लोटलीकर ५. सौ. माया श्रीकांत पिसोळकर ६. सौ. मानसी राजंदेकर ७. चि. वामन राजंदेकर ८. श्री. अनिरुद्ध राजंदेकर

 

पू. आईमध्ये ईश्‍वराविषयी दृढ श्रद्धा
असून सेवेविषयी तळमळ आहे ! – योगेश जलतारे, लहान पुत्र

लहानपणापासून परिस्थिती स्वीकारणे

माझ्या आजीचे, म्हणजे आईच्या आईचे निधन झाले, तेव्हा आई केवळ १२ वर्षांची होती. तिला ३ भांवडे होती. तिचे वडील कर्मठ ब्राह्मण होते. त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक लागायचा. त्यांनी आईला तो शिकवला. आई इतर भावंडांचा अभ्यासही घ्यायची. विवाह झाल्यावर आईला सासूसासरेही कडक शिस्तीचे मिळाले. घरात सासरी २५ जण होते. त्या काळात चुलीवर सर्वांचा स्वयंपाक करावा लागत असे. शेणामातीने घर सारवावे लागत असे आणि भिंतीही लिंपाव्या लागत.

ईश्‍वराप्रती दृढ श्रद्धा

आमचे वडीलही आध्यात्मिक वृत्तीचे होते. कचेरीतून घरी आल्यावर ते बर्‍याच वेळा भजनाच्या कार्यक्रमाला जायचे. त्या वेळी आईलाच घरचे सर्व पहावे लागायचे. कधीकधी ‘रात्री घरी जेवणासाठी काय करायचे’, याचीही विवंचना असायची; पण आईच्या ईश्‍वरावरील श्रद्धेमुळे काही तरी सोय व्हायची.

सेवेची तळमळ

देवद आश्रमात असतांना आई सात्त्विक उत्पादनांची सेवा करायची. रामनाथी आश्रमात आल्यावर ‘सेवा होत नाही’, अशी तिला रुखरुख वाटायची. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले तिला म्हणाले, ‘‘आता समष्टीसाठी नामजप हीच तुमची सेवा !’’

वक्तशीरपणा

आईला संतांनी जे जे प्रयत्न करायला सांगितले ते ती नित्यनेमाने करते. तिच्यात वक्तशीरपणा हा गुण पूर्वीपासूनच आहे. ती आश्रमात प्रतिदिन होणार्‍या दत्तमाला मंत्रपठणाच्या सेवेला जाते. ही सेवा ती कधीच चुकवत नाही. तिच्या व्यष्टी साधनेत कधीच खंड पडत नाही. तिला कुठलीही समष्टी सेवा दिली, तरी ती चुकवत नाही.

विचारण्याची आणि आज्ञापालनाची वृत्ती

तिच्यात विचारून घेण्याचा भाग आहे. ती सांगितलेल्या सूत्रांचे कटाक्षाने आज्ञापालन करते. तिला एकदा पू. संदीप आळशी यांनी ‘रामरक्षा म्हणण्यापेक्षा नामजप करा’, असे सांगितले. तेव्हा तिने अनेक वर्षांपासून करत असलेली रामरक्षेची उपासना बंद करून नामजपाकडे अधिक लक्ष दिले.

 

पू. आईमुळेच आम्ही साधनेत असून गुरुकृपा अनुभवत
आहोत ! – सौ. माया श्रीकांत पिसोळकर, अकोला (पू. आजींची कन्या)

आईने आमच्यावर लहानपणापासूनच धार्मिकतेचे संस्कार केले. ‘जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ईश्‍वरामुळेच घडते’, असा दृष्टीकोन आईकडून मिळत गेला. त्यामुळे जेव्हा श्री. पिसोळकर (पती) यांनी चांगली नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला कोणताही ताण आला नाही. पू. आईमुळेच आज आम्ही साधनेत आहोत आणि गुरुकृपा अनुभवत आहोत.

 

पू. आजींनी आध्यात्मिक दृष्टीकोन
दिले ! – सौ. मुक्ता लोटलीकर (नात), पुणे

आजीला ‘पू. आजी’ असे म्हणतांना अतिशय आनंद होत आहे. मला लहानपणापासून आजी-आजोबा यांचे सान्निध्य मिळाले. आईबाबा बाहेर सेवेला असायचे, तेव्हा आमच्या जवळ आजी-आजोबा रहायचे. तेव्हा आजी मला धार्मिक आणि संतांच्या गोष्टी सांगायची. आजीचे दृष्टीकोनही आध्यात्मिकच असायचे. आजी नियमितपणे मन लावून दैनिक सनातन प्रभात वाचायची. कधी आजोबा तिला गमतीने म्हणायचे, ‘तू संत होशील कि काय ?’ आजोबांनी तेव्हा उच्चारलेले शब्द आज खरे झाले.

 

‘पू. आत्याची आध्यात्मिक प्रगती होत
आहे’, असे जाणवले होते ! – अनिरुद्ध राजंदेकर (भाचा), पुणे

निगुर्णावस्था

मागील वर्षी श्री. श्रेयस पिसोळकर (आजींचा नातू) यांच्या विवाहानंतर पू. आत्याची एका संतांशी भेट झाली. तेव्हा त्यांना पाहून आत्याचे मन निर्विचार झाले होते. त्यांच्यातील संभाषण निर्गुण वाटले. त्या वेळी ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती होत आहे’, असे वाटले.

सोशिक वृत्ती

पू. आत्याने आयुष्यात अतिशय कष्ट सोसले; पण त्याचा उच्चारही कधी कोणाकडे केला नाही.

साधेपणा

साधेपणाने जीवन कसे जगायचे, हे पू. आत्याने प्रत्यक्ष कृतीतून शिकवले.

स्वीकारण्याची वृत्ती

ती नेहमीच परिस्थिती स्वीकारते. आश्रमात रहायला आल्यावर तिने सर्व परिस्थितीचा स्वीकार केला.

 

‘पू. आजींचे मन रिकामे आणि शांत आहे’,
असे जाणवते ! – सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (भाचेसून), पुणे

नात्याने पू. जलतारेआजी माझ्या आत्येसासूबाई लागतात; पण आत्या असल्याप्रमाणेच माझी त्यांच्याशी जवळीक आहे. त्या बोलतांना ‘देव कसे साहाय्य करतो’, हे सांगतात. त्यांचा नातू श्री. श्रेयस पिसोळकर याचे गेल्या वर्षी लग्न झाले. तेव्हा लग्नासाठी नातेवाईक जमल्यावर साड्या, दागिने यांविषयी चर्चा व्हायची; पण आत्यांची या सगळ्यामध्ये अलिप्तता जाणवायची. ‘माझ्या मनात आता काहीच नसते. नामस्मरण आपोआप होते’, असे त्या अलीकडे म्हणायच्या. ‘त्यांच्या मनामध्ये काहीच नाही. त्यांचे मन रिकामे आणि शांत आहे’, असे जाणवते. कुटुंबियांनी साधनेचे कसे प्रयत्न करायला हवेत, असे विचारल्यावर ‘सगळ्यांनी आज्ञापालन करायला हवे’, असे त्यांनी सांगितले. त्या कुटुंबात सर्वांच्याच लाडक्या आहेत.

पूर्वसूचना

चि. वामन (८ मास) त्यांना ‘आत्या-आता’ अशी हाक मारत होता. भावसोहळ्याच्या वेळीही तो ‘आत्या-आता’ असे म्हणत होता. ‘आमच्या आत्या पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आता संत झाल्या आहेत’, असे तो सांगत असावा’, असे मला वाटले.

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (नात), पुणे

‘गेल्या वर्षीच आजी संत झाल्या असतील’, असे वाटले होते. मला आजीजवळ रहायला पुष्कळ आवडते.

 

संगणकीय प्रणालीद्वारे जोडलेल्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. राजेश जलतारे (पू. आजींचे ज्येष्ठ पुत्र), पुणे

आई संत झाली, हे ऐकून पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२.  श्री. विनायक राजंदेकर (पू. आजींचे भाऊ), अकोला

आज आम्ही पू. ताईंमुळे सुसंस्कृत बनलो आहोत. पू. ताई निरपेक्ष वृत्तीने जीवन जगत आल्या आहेत. आयुष्यातील दायित्व पूर्ण करून आज त्या संत झाल्या आहेत.

३. सौ. विमल राजंदेकर (पू. आजींच्या वहिनी), अकोला

त्या अतिशय शांत स्वभावाच्या आणि मायाळू आहेत.

४. रामरायाने पू. ताईंचे कल्याण केले ! – श्याम राजंदेकर (पू. आजींचा भाऊ), अकोला

नारायणस्वरूप गुरुमाऊलींमुळे आज गुरुपौर्णिमेसारखा क्षण आहे. पू. ताईंचा परेच्छेने वागण्याचा भाग पूर्वीपासूनच आहे. कर्मकांड, देवावरील श्रद्धा, घरातील कामे आनंदाने करणे आदी गोष्टी पू. ताईंनीच मनावर बिंबवल्या. ती सतत श्रीरामाला आळवायची. ‘कल्याण करी रामराया…’ हे तिचे आवडीचे भजन आहे. आज रामरायाने तिचे कल्याण केले. गुरुदेवांनी तिच्यावर कृपा केली.

५. पू. ताईंनी आम्हाला आईसारखे सांभाळले ! – विष्णु राजंदेकर (भाऊ), पुणे

पू. ताई लहानपणापासून श्रीरामाची भक्ती करायची. त्यामुळे तिच्या जीवनात प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) गुरु म्हणून आले. आमची आई लहानपणीच वारली. तेव्हा ताईने आम्हाला आईसारखे सांभाळले.

६. इतरांकडून अपेक्षा नसल्यामुळे पू. आई सतत
आनंदी असतात ! – श्रीकांत पिसोळकर (जावई), अकोला

त्यांच्यात ‘परेच्छेने वागणे’ हा भाग पुष्कळच अधिक आहे. इतरांकडून अपेक्षा नसल्यामुळे त्या आनंदी असतात. त्यांच्यात परिस्थिती स्वीकारणे आणि प्रेमभाव हा भाग पूर्वीपासून पुष्कळ होता. माझे आई-वडील मी लहान असतांनाच वारले. त्यामुळे मला त्यांचा (पू. जलतारेआजींचा) आधार वाटतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात