सतत वात्सल्यभावात राहून तळमळीने सेवा करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

 

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा सन्मान करतांना पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (डावीकडे)

 

रत्नागिरी, २१ मे (वार्ता.) – वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात साधकांना व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. या आनंदवार्तेने सर्व साधकांना भावाश्रू अनावर झाले. सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांनी पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.

यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला पू. (श्रीमती) शेट्येकाकूंविषयीचा संदेश महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन समन्वयक कु. प्रियांका लोटलीकर यांनी वाचून दाखवला. या सोहळ्याला सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन वागळेआजोबा यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या
अन् साधकांवर आईच्या मायेने प्रेम करणार्‍या तपोधाम येथील
श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ७० वर्षे) सनातनच्या ९४ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

‘मूळच्या देवरुख, रत्नागिरी येथील आणि मागील ७ वर्षांपासून तपोधाम येथे रहात असलेल्या श्रीमती स्नेहलता शेट्ये यांच्यामध्ये व्यष्टी साधनेसह समष्टी साधनेची तळमळ आहे. शेट्येकाकूंमध्ये मातृवात्सल्यभाव असल्याने त्या सर्व साधकांची प्रेमाने काळजी घेतात. तपोधामात येणार्‍या-जाणार्‍या साधकांकडे त्या आईच्या मायेने लक्ष देतात. त्याचसमवेत तपोधाममध्येही त्यांचे चौफेर लक्ष असते.

एकाच वेळी व्यष्टी आणि समष्टी साधनेची उत्तम प्रकारे सांगड घालणार्‍या श्रीमती शेट्येकाकू यांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे. त्यांच्या सहवासात साधकांना चैतन्य मिळत असल्याची आणि आनंदाची अनुभूती येत असून त्यांच्या देहात दैवी पालट झाले आहेत. साधकांना येणार्‍या अनुभूती आणि शेट्येकाकूंमध्ये होत असलेले दैवी पालट हे त्यांनी संतत्व प्राप्त केल्याचे दर्शक आहे. अल्प अहं, सतत कृतज्ञताभावात असणे आणि सर्व साधकांप्रती वात्सल्यभाव या गुणांमुळे त्या सनातनच्या ९४ व्या व्यष्टी संतपदावर आरूढ झाल्या आहेत.

‘पू. स्नेहलता शेट्ये यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

या आनंददायी सोहळ्याच्या वेळी पू. शेट्येकाकू
यांनी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पू. शेट्येकाकूंचे
कुटुंबीय आणि अन्य साधक यांनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.

सर्वकाही प.पू. डॉक्टरांनीच करून घेतले ! – पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

कृतज्ञता व्यक्त करतांना पू. स्नेहलता शेट्येकाकू म्हणाल्या, ‘‘मी ठरवून आणि ध्येय ठेवून असे काही केले नाही. प.पू. डॉ. जे काही सांगतील, त्यातील जमेल तेवढे मी करत असते. इतरांना साहाय्य करण्याची आवड मला पूर्वीपासूनच असल्याने सर्वांना साहाय्य करते. साधनेसाठी विशेष असे प्रयत्न कधी केले नाहीत. सर्वकाही त्यांनीच करून घेतले. आपला भाव आणि तळमळ असेल, तर २१ व्या शतकातही भक्त प्रल्हादासारखी अनुभूती आपण घेऊ शकतो.’’

पू. शेट्येकाकूंविषयी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

आईमध्ये झालेले पालट पाहून आम्हालाही साधनेची गोडी लागली ! – राजेश शेट्ये (पू. शेट्येकाकूंचा ज्येष्ठ पुत्र)

‘आम्ही साधनेत जे काही आहोत, ते केवळ आमच्या आईमुळेच आहोत. आई आमच्याकडून नामजप करून घ्यायची. आम्हाला सत्संगाला घेऊन जायची. प्रारंभी इतर संप्रदायाप्रमाणेच हे आहे, असे मला वाटले होते; पण आईमध्ये झालेले पालट पाहून आम्हालाही साधनेची गोडी लागली. अलीकडे काही दिवस आईचा फोन आला की, घरातील वातावरणात पालट व्हायचे. नकारात्मता जाऊन सकारात्मता येत होती. असे अनेक वेळा अनुभवायला मिळाले. आई संत झाली हे पाहून खूप आनंद झाला.’

आईंकडून घेण्यासारखे पुष्कळ गुण आहेत ! – सौ. पूजा शेट्ये (ज्येष्ठ सून)

‘आई खूप साध्या आणि सरळ स्वभावाच्या आहेत. त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखे पुष्कळ गुण आहेत. त्यांची तळमळ एवढी आहे की, त्यांना साधनेविषयी काही समजले किंवा त्यांच्या वाचनात आले, तर ‘ते सर्वांना कधी एकदा सांगते’, असे त्यांना होते. सगळे म्हणजे साधक, नातेवाईक, समाजातील व्यक्ती यांना ते सूत्र त्या त्वरित सांगतात. अशा आई मिळणे, हे माझे भाग्य आहे.’

‘आजी संत झाल्याचे पाहून पुष्कळ आनंद झाला. आजी तपोधाम येथे असल्यामुळे तिच्या सहवासात अधिक वेळ रहाता आले नाही. आजी घरी आल्यावर पुष्कळ छान वाटते.’- कु. केदार शेट्ये (नातू)

पू. शेट्येकाकूंविषयी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

१. प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने सेवा करणार्‍या शेट्येकाकू ! – सौ. पल्लवी लांजेकर, रत्नागिरी

‘पू. शेट्येकाकू म्हणजे प्रेमाचा, वात्सल्याचा सागरच ! ‘निरागसभाव कसा असावा’, हे त्यांच्याकडून शिकता आले. पू. शेट्येकाकूंनी अधिकोषातील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर विश्रांती न घेता गुरुसेवेचा पुरेपुर लाभ करून घेतला. उत्तरदायी साधक जी सेवा सांगतील, ती सेवा त्यांनी केली. कधीही ‘मला सेवा जमणार नाही’, असे सांगितले नाही. त्यांना नेसाई, कुडाळ, रत्नागिरी, तपोधाम या सेवाकेंद्रांत सेवेसाठी जाण्यास सांगितल्यावर त्यांनी कधीही ‘नाही’ म्हटले नाही. तपोधाम येथे प्रतिकूल परिस्थिती असतांनाही त्या आनंदाने सेवा करत आहेत. तपोधाम येथे कोणीही साधक गेल्यावर त्या त्यांची प्रेमाने चौकशी करतात. ‘आम्हाला व्यष्टी साधना कशी करायची ते सांगा, आमच्या चुका सांगा’, असे त्या आवर्जून सांगतात. ‘पू. शेट्येकाकूंमधील आज्ञापालन, शिकण्याची वृत्ती, प्रेमभाव, वात्सल्यभाव आमच्यामध्ये येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ दे’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना आहे.’

२.‘पू. शेट्येआजी तपोधाम येथे गेल्या ७ वर्षांपासून रहात आहेत. जशी आई मुलांना हाक मारल्यावर लगेच येते, तशा त्या लगेच येतात. त्या नेहमी तळमळीने आमच्या चुका सांगतात. त्या मनमोकळेपणाने बोलतात.’- श्री. महेंद्र चाळके, चिपळूण

३. ‘पू. शेट्येकाकू अत्यंत प्रेमळ आणि प्रामाणिक आहेत. माझी आणि त्यांची फार पूर्वीपासूनची ओळख आहे. त्यांना अनेक कठीण प्रसंगांना समोरे जावे लागले, तरीही त्या परिस्थितीमध्ये स्थिर रहायच्या. भगवंताची कृपा त्यांच्यावर पूर्वीपासूनच आहे. पू. शेट्येकाकू म्हणजे प्रेमाचा सागर आहेत.’- श्री. विनायक फाटक, देवरुख

४. ‘पू. शेट्येकाकू यांचा आम्हाला खूप आधार वाटतो. त्या आजारपणात आमची खूप काळजी घेतात. सर्वांचे पथ्य, औषधे लक्षात ठेवून कोणाला काय हवे-नको ते न सांगता देतात. तपोधाम येथे संत नव्हते. आम्हाला संत हवे होते. देवाने आमची इच्छा पूर्ण केली.’ – श्रीमती कल्पना चव्हाण, तपोधाम

पूर्वसूचना

‘जेव्हा आम्ही देवरुख मध्ये सत्संगाला यायचो तेव्हा पू. काकू दोन ते अडीच कि.मी. चालत तेही वेळेत सत्संगाला उपस्थित रहायच्या. सद्गुरु दादांचे मार्गदर्शन असल्याचे कळल्यावर ‘शेट्येकाकू संत होणार’, असा माझ्या मनात विचार आला आणि मी तसे पत्नीलाही बोलून दाखवले. ती पूर्वसूचनाच होती.’ – श्री. चंद्रशेखर गुडेकर, देवरुख

Leave a Comment