होळीची रचना

देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्‍या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची आणि तिला सजवण्याची पद्धतस्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते. होळीची रचना शास्त्रीय पद्धतीने नेमकी कशी करावी, याविषयीची माहिती पुढील लेखातून आपल्याला पहायला आणि वाचायला मिळेल.

 

१. स्थान आणि वेळ

‘देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.

 

२. कृती

श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून अन् रांगोळी घालून सुशोभित करतात. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या आणि सुकी लाकडे रचतात. प्रथम कर्त्याने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून ‘सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये ।’ असा संकल्प करावा आणि नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’ असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी. श्री होलिकादेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच नारळ अर्पण करावा. मग जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. सारी रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी.

होळीची रचना
होळीची रचना

अ. होळीची रचना करतांना मधोमध एरंड, नारळ, सुपारी किंवा ऊस उभा ठेवण्यामागील शास्त्र

१. एरंड : एरंडाचा धूर वाईट शक्‍तींनी वातावरणात पसरवलेल्या दुर्गंधीयुक्‍त वायूला नष्ट करतो.

२. नारळ : नारळाकडे आकृष्ट होणार्‍या ब्रह्मांडमंडलातील सात्त्विक लहरींमुळे होळीतील अग्नीरूपी तेजस्वरूप शक्‍तीतील देवत्व टिकून रहाण्यास साहाय्य होते.

३. सुपारी : सुपारीचा मूळ गुणधर्म रजोगुण धारण करण्याचा असल्याने या रजोगुणाच्या साहाय्याने होळीतील तेजाच्या कार्य करण्याच्या गुणधर्मात वृद्धी होते.

४. ऊस : ऊस हाही प्रवाही रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असल्याने याच्या सान्निध्यामुळे वायूमंडलात होळीतील शक्‍तीरूपी तेज प्रक्षेपित होण्यास आणि वायूमंडलाची शुद्धी अल्प कालावधीत होण्यास साहाय्य होते.

आ. होळीची रचना करतांना वापरावयाचे एरंड, नारळ, सुपारी किंवा ऊस यांचा आकार

१. ऊस

ऊस संपूर्ण घ्यावा. उसाच्या खोडातून, तसेच पानातून प्रवाही रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण होत असते. हे खोड होळीत घनीभूत झालेल्या अग्नीरूपी तेजाला प्रवाही बनवून त्याचे वायूमंडलात कारंजासारखे प्रक्षेपण करते. हा रजोगुणात्मक लहरींचा तेजरूपी कारंजा परिसरातील रज-तमात्मक लहरींचा नाश करतो. यामुळे वायूमंडलाची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

२. झाडाचे खोड

झाडाच्या खोडाची उंची ४ फुटापर्यंत असावी.

३. होळीची रचना करतांना तिचा आकार शंकूसारखा असण्यामागील शास्त्र

अ. शंकूसारखा आकार इच्छाशक्‍तीचे प्रतीक आहे.

आ. होळीच्या रचनेतील शंकूसारख्या आकारात घनीभूत होणारे अग्नीस्वरूपी तेजतत्त्व भूमंडलावर आच्छादीत झाल्याने तिचा भूमीला लाभ मिळण्यास साहाय्य होते आणि पाताळातून भूगर्भाच्या दिशेने प्रसारीत होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते.

इ. या रचनेतील घनीभूत तेजाच्या अधिष्ठानामुळे भूमंडलातील स्थानदेवता, वास्तूदेवता आणि ग्रामदेवता अशा क्षुद्रदेवतांचे तत्त्व जागृत झाल्याने भूमीमंडलातील वाईट शक्‍तींच्या उच्चाटनाचे कार्य सहज साधले जाते.

ई. शंकूच्या आकारात घनीभूत झालेल्या अग्नीरूपी तेजाच्या संपर्कात येणार्‍या जिवाची मनःशक्‍ती जागृत होण्यास साहाय्य झाल्याने त्याच्या कनिष्ठ स्वरूपातील मनोकामना पूर्ण होऊन त्याला इच्छित फलप्राप्ती होणे शक्य होते.

४. होळीचे लाभ आणि ते होण्याची प्रक्रिया अन् होळीची पुरुषभर उंची

अ. साधारणतः होळीमुळे मध्यवायूमंडल आणि भूमीलगतचे वायूमंडल शुद्ध होण्याचे प्रमाण जास्त असते.

आ. साधारणतः पुरुषभर उंचीची होळी बनवल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजाच्या लहरींमुळे ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होऊन त्यानंतर ती ऊर्जा जडत्व धारण करून मध्यवायूमंडलात, तसेच भूमीलगतच्या वायूमंडलात घनीभूत होऊ लागते; म्हणून होळीची उंची साधारणतः पाच ते सहा फूट असावी. म्हणजे शंकूस्वरूप पोकळीत तेजाच्या लहरी घनीभूत होऊन त्याची आवश्यक ती ऊर्जा मध्यमंडलात सिद्ध होण्यास साहाय्य होते.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment