होलीदहनानंतर प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

sanatan-drushtikonहोलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याची किंवा धावण्याची प्रथा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांत आहे. या वर्षी कर्नाटकमधील तुमकूर गावात होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत असतांना तीन जणांचा भाजल्याने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर या प्रथेवर बंदी आणण्यासाठी कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तरतूद करणार असल्याची घोषणा तेथील एका मंत्र्यांनी केली आहे. याविषयीचा सनातन दृष्टीकोन पुढे दिला आहे.

१. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेचा धर्मशास्त्रात कुठेही उल्लेख नाही. असे असले, तरी हिंदु धर्म हा स्वतःची उपासनापद्धत निर्माण करण्याचे आणि त्याद्वारे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचे स्वातंत्र्य देतो. यानुसार तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेल्यांनी तेजतत्त्वाची उपासना म्हणून प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत गेल्यास त्यांना त्याचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर पहुडण्याविषयी कुठेही धर्मशास्त्रात म्हटलेले नाही. असे असले, तरी तंजावूर (तमिळनाडू) येथील अग्नीयोगी प.पू. रामभाऊस्वामी तेजतत्त्वाची उपासना म्हणून यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर १०-१५ मिनिटे पहूडतात. त्या वेळी यज्ञाग्नीमुळे त्यांचे शरीर जळत नाही, हे अनेकांनी पाहिले आहे.

२. साधना न करणार्‍या सर्वसामान्य व्यक्तींनी मात्र साहसी कृत्य म्हणून होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालू नये. उदाहरणार्थ तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेली व्यक्ती सूर्याकडे पाहून त्राटक लावू शकते; मात्र सामान्य व्यक्ती क्षणभरही सूर्याकडे पाहू शकत नाही; कारण सूर्याचे तेज धारण करण्याची क्षमता तिच्यात नसते.

३. एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्‍यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

४. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या २००९ या वर्षीच्या अहवालानुसार व्यक्तीच्या शरिरातील अवयव जाळणार्‍या सिगारेटमुळे भारतात प्रतिवर्षी ९ लक्ष म्हणजेच प्रतिदिन २४६६ व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. तरीही सिगारेटवर बंदी आणण्यासाठी काहीही न करणारे मंत्रीमहोदय केवळ ३ व्यक्तींचा मृत्यू झाला; म्हणून निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालण्याचा विचार करतात, हे आश्चर्यकारक, तसेच धर्मद्रोहीही आहे.

५. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत असतांना तीन युवकांच्या कपड्यांना आग लागून त्यांचा मृत्यू होणे, हा केवळ अपघात आहे. प्रतिदिन रस्त्यांवर शेकडो अपघात घडत असतात; म्हणून शासन काही रस्त्यांवरून वाहन चालवण्यास बंदी घालणारा कायदा करत नाही; मग या अपघातासाठी थेट कायदा करण्याची भाषा करणे, हे हास्यास्पद ठरते.

६. गेल्या वर्षी हज यात्रेला चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ७०० हून अधिक मुसलमानांपैकी १०० हून अधिक मुसलमान भारतीय होते; मग शासन हज यात्रेला जाण्यास बंदी घालेल का ?

७. हिंदूंनी धर्मशिक्षित होण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच साधना न करणार्‍या सर्वसामान्य व्यक्तींनी अशा प्रकारच्या कृती करू नयेत, यासाठी प्रबोधन करणे, हेच या घटनेवरील खरे उपाय आहेत. शासनाने हे लक्षात घेऊन त्यानुसार कार्य केले पाहिजे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले