कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानातील काही महत्त्वाचे उत्सव

देवळात साजरे केले जाणारे उत्सव म्हणजे भाविकांसाठी चैतन्य मिळवण्याची पर्वणीच होय ! हे चैतन्य घेण्यासाठी लक्षावधी सश्रद्ध भाविक उत्सवांच्या काळात देवतेच्या दर्शनाला जातात. या लेखात श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील विविध उत्सवांची माहिती जाणून घेऊया.

 श्री महालक्ष्मी देवस्थानातील उत्सव, कोल्हापूर

श्री महालक्ष्मी देवस्थानातील उत्सव, कोल्हापूर

१. पालखी प्रदक्षिणा

प्रत्येक शुक्रवारी रात्री देवीला पालखीत बसवून देवळाच्या आवारात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. अशीच पालखी प्रदक्षिणा आश्‍विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या पाच मासांतील (महिन्यांतील) पौर्णिमेला निघते.

२. गंधलेपन पूजा

चैत्र मासात वसंतपंचमीच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची गंधलेपन पूजा बांधली जाते.

३. रथोत्सव

प्रतिवर्षी चैत्र कृष्ण प्रतिपदेला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव साजरा केला जातो. या वेळी देवीला रथात बसवून तिची मिरवणूक काढली जाते.

४. अलंकार पूजा

वैशाख मासात येणार्‍या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी देवीला झोपाळ्यावर बसवून तिची भरजरी वस्त्रे आणि रत्नजडित अलंकारांनी युक्त अशी अलंकार पूजा बांधली जाते. झोपाळ्यास झोके दिले जातात.

५. शारदीय नवरात्रोत्सव

आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्री महालक्ष्मीदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दसर्‍याच्या दिवशी शिलंगणासाठी (सीमोल्लंघनासाठी) देवीची पालखी निघते.

६. महाप्रसाद

आश्‍विन पौर्णिमा हा श्री महालक्ष्मीदेवीच्या महाप्रसादाचा दिवस.

७. दीपोत्सव

हा सोहळा दीपावलीच्या दिवसापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. या पंधरा दिवसांत प्रतिदिन देवीला दुग्धस्नान घालतात.

८. किरणोत्सव

किरणोत्सवाच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती

किरणोत्सवाच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती

प्रतिवर्षी कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ मासात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात. दुसर्‍या दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात आणि तिसर्‍या दिवशी ते देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन काढतात. किरणोत्सवाच्या प्रसंगी देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)’

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील ‘किरणोत्सवाचे केलेले सूक्ष्म-परिक्षण ’पहाण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

Leave a Comment