श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळाची रचना आणि मूर्ती

श्री महालक्ष्मीदेवी, कोल्हापूर

श्री महालक्ष्मीदेवी, कोल्हापूर

या लेखात आपण पुरातन काळात बांधलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळाची रचना आणि मूर्ती यांविषयी पाहूया. सहस्त्रो वर्षांपूर्वी बांधलेले हे देऊळ म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना होत.

देवळाची रचना

विविध शीलालेख, कागदपत्रे आणि ऐतिहासिक पुरावे यांच्या आधारे श्री महालक्ष्मीदेवीचे देऊळ अती प्राचीन आहे, हे सिद्ध होते. सध्याच्या देवळाचा मुख्य भाग हा सहाव्या-सातव्या शतकातील असल्याचा पुरावा मिळतो. नवव्या शतकात राजा गंडवादिक्ष याने या देवळाचा विस्तार केला. वर्ष १२१८ मध्ये यादव राजा तोलम याने महाद्वार बांधले. हे देऊळ हेमाडपंथी बांधणीचे आहे. देवळाला ५ शिखरे असून देवळाच्या आवारात ७ दीपमाळा आणि ५ प्रमुख देवळे आहेत. देवळाला जोडून एक सभामंडप असून त्याला ‘गरुडमंडप’ असे संबोधले जाते.

देवळाच्या रचनेचे एक अनोखे वैशिष्ट्य

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पश्‍चिमाभिमुख आहे. देवालयाच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे पश्‍चिमेच्या दिशेने असलेल्या गवाक्षातून (खिडकीतून) प्रत्येक वर्षी दोनदा अस्ताचलास जाणार्‍या सूर्यदेवाचे किरण देवीच्या मूर्तीवर पडतात. या अपूर्व सोहळ्याला ‘किरणोत्सव' म्हणतात. हा सोहळा तीन दिवस असतो. प्रत्येक वर्षी ठराविक दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीवर पडणे, हा हिंदु स्थापत्यकलेचा हा एक अनोखा आविष्कार आहे.

‘किरणोत्सवा’विषयीचे अधिक विवेचन या लिंकवर पाहूया.

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती

श्री महालक्ष्मीदेवी

श्री महालक्ष्मीदेवी

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती वालुकामय हिरकखंडमिश्रित रत्नशीलेची बनवलेली आहे. मस्तकी मुकुट धारण केलेल्या देवीच्या मूर्तीची उंची ३ फूट असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीच्या पाठीमागे समोर तोंड करून सिंह उभा आहे, तर मूर्तीवर शेषनागाने छाया धरली आहे. मूर्ती चतुर्भुज असून देवीने वरील हातांत गदा आणि खेटक (ढाल), तसेच खालच्या उजव्या हातात मातुलिंग (म्हाळुंग), तर डाव्या हातात भवरोगहारक ज्ञानामृताने भरलेले पानपात्र धारण केले आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)’

Leave a Comment