गुरु हे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून ‘ज्ञान’ आणि ‘गुण’ उत्पन्न करून हिंदूंना देत आहेत ! – महंत श्री धर्मप्रकाशजी महाराज, सुलतानपूर, उत्तरप्रदेश

महंत श्री धर्मप्रकाशजी महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना श्री. सुनील घनवट

प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेने चांगले प्रदर्शन लावले आहे. सर्व हिंदूंनी म्हणजेच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी काय करायला हवे, हे या प्रदर्शनातून कळेल. सर्व क्षेत्रांत ज्ञान देण्यासाठी गुरु असतात, त्याप्रमाणे या प्रदर्शनातही सर्व माहिती देणारे गुरुच असून ते ज्ञान आणि गुण उत्पन्न करून हिंदूंना देत आहेत, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील फतेहपूर संगत येथील महंत श्री धर्मप्रकाशजी महाराज यांनी येथे ११ फेब्रुवारी या दिवशी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी महंत श्री धर्मप्रकाशजी महाराज यांचा सन्मान करून त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘देवनदी गंगाकी रक्षा करे !’ हा ग्रंथ भेट दिला.

महंत श्री धर्मप्रकाशजी महराज पुढे म्हणाले, ‘‘समाजात हिंदूंच्या विरोधात विविध प्रकारचे दुष्कृत्य होत आहे. हिंदूंचे धर्मांतर होत असून यामुळे ते ठिकठिकाणी विखुरले आहेत. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सनातन संस्थेने केलेले कार्य उत्कृष्ट आहे. देशात क्रांती आणण्याची आवश्यकता आहे. घरात बसून क्रांती होऊ शकत नाही, यासाठी समाजातील हिंदूंना जागृत केले पाहिजे. देश, राज्य, क्षेत्र, गाव येथील संस्कृती नि श्रद्धा यांना धरून हिंदूंनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. घरातून बाहेर पडून हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती करावी, जेणेकरून आपण अखंड हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकतो. अखंड भारतासाठी संकल्प करायला हवा. खरेतर सनातनच्या प्रदर्शनातील माहिती आचरणात आणल्यावरच आपण अखंड भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणू शकतो.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment