संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे ! – वृंदावन आचार्य नित्यानंद गिरी महाराज

प्रयागराज येथील कुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या सनातनच्या
‘धर्मशिक्षण आणि राष्ट्र-धर्म रक्षण प्रदर्शना’स विविध साधूसंतांच्या भेटी !

साध्वी हरिप्रियाजी महाराज आणि आचार्य नित्यानंद गिरी महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना (डावीकडे) श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

प्रयागराज (कुंभनगरी) – भारतीय संस्कृतीमधील पारंपरिक खाणे-पिणे, कपडे परिधान करणे, मर्यादा पाळणे, बोलणे, अशा सर्व गोष्टी मनुष्य विसरत आहे. या पारंपरिक गोष्टींचे जे पुनर्जागरण आहे, ते सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. याला अद्वितीय प्रयत्न असे म्हणू शकतो. या गोष्टीला वेळ लागेल; मात्र यश नक्कीच मिळेल. संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे, कारण आज विश्‍व हे बॉम्ब, दारूगोळा आणि मिसाईल यांवर बसलेला आहे. युद्धाच्या दिशेने विश्‍वाची वाटचाल चालू आहे. शांतीच्या दिशेने कोणतीही वाटचाल चालू नसून उत्पाताचा प्रयत्न केला जात आहे. अशा स्थितीत द्वेष, मत्सर आणि पूर्वग्रह या दोषांनी पीडित असणार्‍यांना समाधान मिळण्यासाठी सनातन संस्थेचा आधार आहे, असे मौलिक मार्गदर्शन वृंदावन आचार्य नित्यानंद गिरी महाराज यांनी येथे केले.

आचार्य नित्यानंद गिरी महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेल्या साध्वी हरिप्रियाजी महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी ग्रंथप्रदर्शनाची संपूर्ण माहिती दिली.

या प्रसंगी आचार्य नित्यानंद गिरी महाराज म्हणाले, ‘‘आजच्या धकाधकीच्या जीवनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अतिशय उत्कृष्ट अन् सुंदर पद्धतीने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन पाहून आचरण केल्यास सुख, शांती आणि समृद्धी यांची प्राप्ती होऊ शकते. मनुष्यजन्म घेतल्याचे सार्थक होऊ शकते. मनुष्याने जन्म घेतला, तरी सध्या मनुष्याचे कर्म, विचार, वागणे हे सर्व जंगली पशूप्रमाणे पहायला मिळते. मनुष्यात माणुसकी वाढून तो मुक्तीच्या मार्गाने जायला हवा. मनुष्याने साधना केल्यास विश्‍वाला शांती प्राप्त होऊ शकते. संस्थेच्या वतीने सनातन-निर्मित वेद, पुराण, भागवत आदींना घेऊन त्याचा प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी माझ्याकडून संस्थेला शुभेच्छा देतो की, ही संस्था अशा प्रकारचे कार्य करत राहो. या संस्थेचे ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील आणि जेथे माझी आवश्यकता असेल, तेथे मी संस्थेला सहकार्य करीन. कोणतीही संस्था संस्कृती आणि धर्मप्रसार करण्याचे कार्य करत असेल, तर मी त्यांना सहकार्य करतो. अशा संस्थांना सहकार्य करणे, हे माझे संत, धर्मप्रसारक आणि ब्राह्मण म्हणून कर्तव्य असून ते माझे दायित्वही आहे.’’

प्रदर्शनातील माहितीद्वारे कृती केल्यास मनुष्यावर
ईश्‍वर आणि संत यांची कृपा होईल ! – साध्वी हरिप्रियाजी महाराज

‘जनजागृती होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील माहितीद्वारे कृती केल्यास ईश्‍वर आणि संत यांची कृपा होईल; मात्र यासाठी मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे. जे झोपलेले आहेत, त्यांना ईश्‍वर साहाय्य करत नाही. ज्याला काहीतरी मिळवायचे आहे, विशिष्ट ध्येय गाठायचे आहे, त्याने साधना करण्यासाठी एक पाऊल पुढे ठेवल्यानंतर अदृश्य शक्तींची त्याच्यावर कृपा होऊ लागते. भौतिक विश्‍व पहायला मिळते; मात्र आध्यात्मिक शक्ती दिसत नाही. आपण अध्यात्माकडे वळल्यानंतर आध्यात्मिक शक्ती सदैव साथ देते. जो धर्माचे कार्य करतो, तेथे श्रीकृष्ण आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment