राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामदिंडी !

श्रीरामभक्तांचा करवीरनगरीत उद्घोष ‘एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम !’

श्रीरामाचे चित्र असलेल्या रथासह मार्गक्रमण करणारी दिंडी

 

कोल्हापूर

कोल्हापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी कोल्हापूर शहरात श्रीरामनामदिंडी काढण्यात आली. मिरजकर तिकटी येथून या दिंडीचा प्रारंभ झाला. दैवज्ञ बोर्डींग, खरी कॉर्नर, महाद्वार रस्ता, घाटी द्वार, संत गाडगे महाराज चौकमार्गे श्रीराममंदिर (श्रीमहालक्ष्मी मंदिर पूर्व द्वार) येथे या दिंडीची सांगता झाली. या वेळी राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर होण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्रांना प्रार्थना आणि आरती करण्यात आली. या दिंडीत अग्रभागी श्रीरामचंद्रांचे चित्र असलेल्या छोट्या रथाचा समावेश होता आणि श्रीरामभक्त श्रीरामनामाचा जप करत होते. या दिंडीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थित होती. ९ जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या दिंड्या, तसेच श्रीरामाला साकडे, सामूहिक आरती असे उपक्रम घेण्यात आले.

दिंडीत सहभागी श्रीरामभक्त

दिंडीचे या ठिकाणी करण्यात आले स्वागत !

खरी कॉर्नर येथे सौ. माधुरी दत्तात्रेय कुलकर्णी, बिनखांबी गणेशमंदिर येथे श्रीमती मंजुषा सौंदलगेकर आणि श्री. इंद्रजित सौंदलगेकर, श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्री. सागर पोतदार, तर जोतिबा रस्ता येथे श्री. नीलेश सोनार यांनी दिंडीचे स्वागत केले.

विशेष

१. दिंडी विविध मार्गांवरून पुढे पुढे जात असतांना अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वत:हून पूजा केली. रस्त्यावरच्या काही फुलवाल्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेला फुले अर्पण केली. तसेच रस्त्यावरील अनेक नागरिक दिंडी पाहून दिंडी आणि श्रीरामाची प्रतिमा यांना नमस्कार करत होते.

२. दिंडीच्या प्रारंभी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मिरजकर तिकटी येथील राममंदिरात जाऊन श्रीरामाला प्रार्थना केली.

या प्रसंगी एका भजनी मंडळातील महिला तेथे उपस्थित होत्या. या महिलाही काही काळ टाळ घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

३. दिंडींच्या समारोपप्रसंगी आरती चालू असतांना आजूबाजूच्या दुकानातील अनेक  दुकानदार त्यांच्या दुकानात हात जोडून आरती म्हणत होते.

आरती झाल्यावर ‘आज आरती ऐकून खूप छान वाटले’, अशी प्रतिक्रिया स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली.

राममंदिरासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
यांनी घेतलेला पुढाकार मनाला भावणारा ! – शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

गेली ७० वर्षे राममंदीर होण्यासाठी न्यायालयीन, तसेच विविध मार्गांनी हिंदू प्रयत्नशील आहेत. अशा वेळी या लढ्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी घेतलेला पुढाकार मनाला भावणारा आहे, तरी सरकारने हिंदूंच्या भावनांची नोंद घेऊन लवकरात लवकर श्रीराम मंदिराची उभारणी करावी.

उपस्थित मान्यवर

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. बबन लगारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. धर्माजी सायनेकर-भोसले (सर), गजानन महाराज मंदिराचे पुजारी श्री. पांडुरंग पाटील, केर्ली येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. भीमराव पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक.

 

मुंबई

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलने,
महाआरती, श्रीरामनामाचा गजर आणि नामदिंडी यांचे आयोजन

मुंबई – प्रभु श्रीराम म्हणजे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान ! अयोध्यानगरीत राममंदिराच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न प्रत्येकच हिंदू पहात आहे. राममंदिराच्या खटल्याची सुनावणी लवकरच चालू होणार आहे. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी राममंदिर उभारणीचे आश्‍वासन दिले; मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ९ आणि १० जानेवारीला ठिकठिकाणी आंदोलने, महाआरती, रामनामाचा गजर आणि पनवेल, कल्याण आणि नालासोपारा येथे नामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्र श्रीरामनामाच्या गजराने दुमदुमला. अनेकजण या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘श्रीरामाच्या नामजपामुळेच राममंदिराची निर्मिती होणार आहे’, ही समस्त हिंदूंची, तसेच रामभक्तांची श्रद्धा दृढ झाली.

 

सोलापूर

सोलापूर येथे राममंदिर उभारणीच्या
मागणीसाठी समस्त हिंदूंचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

सोलापूर येथील आंदोलनाला उपस्थित धर्मप्रेमी

राममंदिराविषयी हिंदूंना शौर्य दाखवण्यासाठी
सरकारने भाग पाडू नये ! – अभय कुलथे, गोरक्षक सोलापूर

सोलापूर, १० जानेवारी (वार्ता.) – अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेल्या प्रभु श्रीरामाच्या मंदिराचा कायदा संसदेमध्ये तात्काळ पारित करून त्याचा केवळ शिलान्यास न करता ते मूर्त स्वरूपात लवकरात लवकर साकार करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी भाजप सरकारला माझी विनंती आहे. वेळोवेळी हिंदूंच्या भावनांची पायमल्ली होते आणि आम्ही ती निमूटपणे सहन करतो. सनदशीर मार्गानेच हिंदू न्याय मागत आहेत. सरकारने आतापर्यंत कायद्याचे कारण पुढे करून चालढकलपणा केला. अन्य धार्मिक स्थळांना मात्र कायद्यात सवलत दिली जाते. भारत ही शूर-वीरांची भूमी आहे. हे शौर्य दाखवण्यासाठी सरकारने आम्हाला भाग पाडू नये. सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनाला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी येथील गोरक्षक श्री. अभय कुलथे यांनी केली.

सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर बांधावे या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. विनोद रसाळ, सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘सियावर रामचंद्र की जय, बजरंगबली हनुमान की जय’, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचा विजय असो’, ‘घर घर भगवा छायेगा रामराज्य फीर आऐगा’ या घोषणा देण्यात आल्या.

सोलापूर येथील आंदोलनात उपस्थित मान्यवर

या वेळी सर्वश्री कृष्णहरी पंतुलू, मधुसूदन मेरगू, प्रतीक्षित परदेशी, जंबय्या काकी, संशोधन न्यारम, गणेश स्वामी, यशपाल चितापुरे, सिद्धराम नंदर्गी यांसह १०० हून अधिक धर्मप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

पनवेल

पनवेल येथील दिंडीत सहभागी रामभक्त

पनवेल, १० जानेवारी (वार्ता.) – राममंदिर उभारण्यात येणारे अडथळे दूर व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी पनवेल शहरात सायंकाळी ५ वाजता श्रीरामनामदिंडी काढण्यात आली. जाखमाता मंदिर, पनवेेल येथून दिंडीचा आरंभ झाला. श्री हनुमान मंदिर, लाईन आळी येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीतील धर्मप्रेमींना हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी संबोधित केले. सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे म्हणाल्या, ‘‘श्रीराम कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. आता आपण श्रद्धेने आणि भावपूर्णरित्या श्रीरामाला आळवूया. श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूया, तरच राममंदिर बनेल.’’ यानंतर मंदिरात भावपूर्ण आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. दिंडीला सनातनच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

दिंडीत पंतप्रधानांना देेण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षर्‍या घेऊन स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. हे निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. दीपक आकडे यांना देण्यात आले.

रोहा (रायगड) – येथील तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर श्रीरामाचा नामजप आणि जयघोष करत आंदोलन करण्यात आले, तसेच स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. आंदोलनानंतर सर्व धर्मप्रेमींनी नायब तहसीलदार, रोहा तालुका श्री. एस्. ए. आर् तुळवे यांना निवेदन देण्यात आले. पेण आणि रामनाथ (अलिबाग) या ठिकाणी रामभक्तांनी रामाला साकडे घालून भावपूर्ण नामजप केला.

 

कल्याण

कल्याण, १० जानेवारी (वार्ता.) – येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नामदिंडी काढून रामनामाचा जागर केला. कल्याण पश्‍चिम येथे असलेल्या दत्तमंदिराकडून नामदिंडीस प्रारंभ होऊन पारनाका येथे श्रीराम मंदिराजवळ आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीत २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.

लक्ष्मी नारायण मंदिराचे व्यवस्थापक आणि पुजारी श्री. सुधीर सानोरकर, अनंत हलवाई या दुकानाचे मालक श्री. अनंत गवळी, तसेच श्री. प्रतीक ठक्कर आणि हितेन गाला, श्री. राजू कांबळे, श्री. योगेश मोकाशी या धर्मप्रेमी व्यापार्‍यांनी, तर ‘खिडकी वडा’चे मालक श्री. शैलेश वझे, कल्याण येथील श्री. बी. आर. शंक्लेशा यांनी श्रीरामाच्या पालखीला विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

सहभागी संघटना : श्रीराम हिंदू संघटना, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

कल्याण येथे झालेल्या रामनामदिंडीतील मान्यवरांची भाषणे

रामसेतूप्रमाणे राममंदिरही रामनामानेच
निर्माण होईल ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

७० वर्षे झाली, तरी राम तंबूतच आहे. मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. शासनाने निवडणुकीचा मुद्दा बनवू नये. जोपर्यंत मंदिर उभारले जात नाही, तोपर्यंत आम्ही अखंड रामाचा नामजप करू. रामसेतू हा रामनामाने निर्माण झाला आहे आणि मंदिरही राम नामानेच उभे राहील.

राममंदिर उभारण्यासाठी वेळीच संघटित व्हायला हवे ! – विजय ठाकरे, पत्रकार

हा देश प्रभु श्रीरामचंद्रांचा आहेे; मात्र आजही श्रीराम एका तंबूत आहेत, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी जायचे असेल, तरी तिथे आडकाठी केली जाते. दोन मिनिटांचे दर्शनही घेऊ दिले जात नाही, ही आपली शोकांतिका आहे. शनिशिंगणापूर किंवा शबरीमला प्रकरणात न्यायालय तत्परतेने निर्णय देते. एवढेच नव्हे, तर एका अतिरेक्यासाठी न्यायालय रात्री ३ वाजता उघडले जाते; पण हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारण्यासाठी विलंब केला जात आहे. आपणच आता संघटित व्हायला हवे. राममंदिर उभारण्यासाठी संघटित झालो नाही, तर पुन्हा कधीच राममंदिर उभारले जाणार नाही. आता नाही तर कधीच नाही !

सरकारने हिंदूंच्या मर्यादेचा अंत पाहू नये ! – गणेश पवार, हिंदुत्वनिष्ठ

अयोध्येत राममंदिर निर्माणाचे सकारात्मक कार्य पूर्ण करण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये तशी सकारात्मक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. येणार्‍या निवडणुकीत हिंदू केवळ पेट्रोल आणि भाज्या यांचे भाव न्यून करण्याची मागणी करणार नाहीत, तर सर्वप्रथम राममंदिर निर्माणाचीच मागणी करणार. सरकारने हिंदूंच्या मर्यादेचा अंत पाहू नये. हिंदू संविधानाचा आदर बाळगून आहे; म्हणून सनदशीर मार्गाने राममंदिर निर्माणाची मागणी करत आहेत.

नालासोपारा

 

नालासोपारा, १० जानेवारी (वार्ता.) – हातात भगवे ध्वज घेऊन आणि मुखाने रामनामाचा गजर करत नालासोपारा येथील हिंदू धर्मप्रेमी एकवटले. येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या येथून फेरीला प्रारंभ झाला. पुरोहित श्री. विजय जोशी यांनी प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन केले. फेरीच्या अग्रस्थानी धर्मध्वजानंतर प्रभु श्रीराम यांचे लावण्यात आलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. परशुराम सेना, हिंदू युवा वहिनी, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह बहुसंख्य धर्मप्रेमी, रामभक्त यात सहभागी झाले होते.

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी अंधेरी
आणि भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे श्रीरामाचा गजर !

मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा आणि ही पवित्र भूमी हिंदूंना पूजा करण्यासाठी कायमस्वरूपी द्यावी, या मागण्यांसाठी भाईंदरच्या मुर्धा गावातील श्रीराम मंदिर येथे आणि अंधेरी मालपा डोंगरी  क्र. ३ येथील मारुति मंदिर येथे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अन्य समविचारी संघटना आणि श्रीराम भक्तांनी श्रीरामाचा सामूहिक गजर केला. प्रारंभी आरती म्हणून नंतर श्रीरामाचा जप केला गेला. भाईंदर येथे समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी आणि मालपा डोंगरी क्र. ३  येथे श्री. संदीप गवंडी यांनी उपस्थितांसमोर विषय मांडला. याविषयी सरकारला देण्यात येणार्‍या निवेदनाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

क्षणचित्रे

१. भाईंदर येथे स्थानिक श्री गणेश मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय भट गुरुजी यांनी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करवून घेतले.

२. श्री. योगेश पुरंदरे गुरुजी यांनी त्यांच्या मंदिराच्या माध्यमातून अधूनमधून ‘राम मंदिर उभारणी’ हा विषय घेत राहू आणि ‘रामनाम गजर करत राहू’, असे सांगितले.

 

पुणे

तुळशीबाग राममंदिरात नामजप करतांना भाविक

पुणे, १० जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथे रामनामाच्या माध्यमातून श्रीरामाला साकडे घालण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ, भाविक यांसह ‘सनातन प्रभात’चे वाचक या उपक्रमात सहभागी झाले होते. तुळशीबागेतील प्रसिद्ध प्रभु श्रीराममंदिर, नर्‍हे येथील श्रीराममंदिर, हडपसर येथील श्रीराममंदिर, गावठाण येथील श्री काळाराम मंदिर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, जुन्नर, सांगवी, सातारा रस्ता, भोर, कोथरूड, विश्रांतवाडी, चंदननगर आदी एकूण ३५ हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप करत प्रभु श्रीरामाला साकडे घालण्यात आले. तुळशीबाग येथील मंदिरात १५० हून अधिक रामभक्त उपस्थित होते. सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजातील नामजपाचे ध्वनीमुद्रण लावण्यात आले होते. श्रीरामाची आरती करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.

कोल्हापूर

गिजवणे येथे श्रीरामाच्या चित्रासमोर बसून नामजप करणारे धर्मप्रेमी

कोल्हापूर, १० जानेवारी (वार्ता.) – रेंदाळ (तालुका हातकणंगले) येथे श्रीराम मंदिरात उपक्रम घेण्यात आला. श्रीरामाला प्रार्थना करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सर्व धर्मप्रेमींनी श्रीरामनामाचा ३० मिनिटे जप केला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. प्रवीण पाटील आणि श्री. माणिक पाटील, शिवसेनेचे श्री. नितीन काकडे, श्री. सुशांत शिंदे, मंदिराचे पुजारी आणि अध्यक्ष श्री. भिवराज शर्मा यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

अभिप्राय

१. श्रीराम मंदिराचे अध्यक्ष श्री. शर्मा – सरकारच्या इच्छाशक्तीमुळे श्रीराम मंदिर होत नाही, हे दुर्दैव आहे. ‘श्रीराम मंदिरासाठी आता हिंदु जनजागृती समिती काहीतरी करू शकेल’, अशी आशा निर्माण झाली आहे.

२. श्री. राजू लोहार, धर्मप्रेमी – अशाच प्रकारे हिंदूंचे व्यापक संघटन उभे राहिल्यास श्रीराम मंदिर निश्‍चित उभे राहील.

गडहिंग्लज येथील गिजवणे येथील विठ्ठल मंदिरात उपक्रम घेण्यात आला. यात सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. आजरा येथे प्रार्थना आणि नामजप करण्यात आला. जत्राट (तालुका निपाणी) येथील मारुति मंदिरात झालेल्या उपक्रमात श्रीराम सेनेचे युवकही सहभागी झाले होते.

 

सांगली

मिरज शहरात नदीवेस येथील विठ्ठल मंदिर येथे, मंगळवारपेठ येथील अंबामाता मंदिरात, गणेश तलावाजवळ गोपाळकृष्ण मंदिरात श्रीराम मंदिर उभारणीसाठी प्रार्थना आणि नामजप करण्यात आला.

 

सिंधुदुर्ग

वेंगुर्ले येथे सहभागी झालेले प.पू. कलावतीआई संप्रदायाचे साधक

कुडाळ – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असल्याचे पुरातत्व खात्याच्या पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. असे असतांनाही गेली कित्येक वर्षे या ठिकाणी राममंदिर बांधण्याचे प्रलंबित आहे. जगभरातील मुसलमान मक्का-मदिना, तर ख्रिस्ती जेरुसलेमला जातात; मात्र जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली रामजन्मभूमी येथे साधी पूजाही करता येत नाही. गेली अनेक वर्षे प्रभु श्रीराम येथे कापडी तंबूत रहात आहेत. ही प्रभु श्रीरामचंद्र यांची विटंबना आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेलाही याविषयी महत्त्व वाटत नाही, असे वाटते. त्यामुळे आता प्रभु श्रीराम यांच्या चरणीच राममंदिराच्या बांधकामात येणारे अडथळे दूर व्हावेत, न्यायालयातील संबंधित न्यायाधिशांना या प्रकरणी शीघ्रतेने निर्णय घेता यावेत, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी मंदिरांत रामनामाचा जप करून श्रीरामाच्या चरणी प्रार्थना (साकडे) करण्यात आली.

कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात नामजप करतांना धर्माभिमानी हिंदू

कणकवली – तालुक्यातील शिवडाव येथील श्री साई मंदिरात १० जानेवारी या दिवशी सायंकाळी सामूहिक रामनाम जप करण्यात आला. या वेळी सनातनच्या सौ. माधुरी ढवण यांनी उपस्थितांना रामनामाच्या जपाविषयी माहिती दिली. तरंदळे येथील श्री. संभाजी घाडीगावकर यांच्या घरी, घोणसरी येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दारिस्ते गावकरवाडी येथेही सामूहिक रामनाम जप करण्यात आला.

कुडाळ – तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात राममंदिरासाठी सामूहिक साकडे घालून नामजप करण्यात आला. उपस्थितांना रामनामाच्या जपाविषयी श्री. संजोग साळसकर यांनी माहिती दिली. या वेळी कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्या सौ. प्राजक्ता प्रभु आणि येथील लघुउद्योजक श्री. मनीष धांडे सहभागी झाले होते. कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर येथे सामूहिक नामजप करण्यात आला.

देवगड – तालुक्यातील पडेल येथे९ जानेवारीला श्री गणेश मंदिर (सुतारवाडी), श्री गणेश मंदिर (दडदडेवाडी),श्री भावकादेवी मंदिर; बापर्डे येथील धुरेवाडी येथे धर्मशिक्षणवर्गात रामनामाचा जप करण्यात आला. सुतारवाडीतीलश्री गणेश मंदिर आणि दडदडेवाडीतीलश्री गणेश मंदिर येथे डॉ. रविकांत नारकर यांनी, तर श्री भावकादेवी मंदिरातसौ. ज्योत्स्ना नारकर यांनी उपस्थितांना जपाविषयीची माहिती दिली.

वेंगुर्ले येथील पार्सेकर दत्तमंदिर, श्री हनुमान मंदिर, उभादांडा येथीलश्री केपादेवी मंदिर आणि श्री विठ्ठलमंदिर येथे नामजप करण्यात आला.येथील सामूहिक नामजपात प.पू. कलावती आई संप्रदायाच्या साधकांनी सहभाग घेतला होता. या सर्व ठिकाणी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदू यांनी सहभाग घेतला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment