चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

Article also available in :

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. अमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराममंदिरानिमित्त फेर्‍या काढण्यात येत आहेत. संपूर्ण भारत राममय झाला आहे. 22 जानेवारी जशी जवळ येत आहे, तशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे तेवू लागत आहे. प्रसारमाध्यमांतून प्रतिदिन अनेक घंटे श्रीराममंदिर, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, रामायण आदींविषयी कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. श्रीरामाविषयीची नवनवीन भक्तीगीते प्रकाशित होत आहेत आणि त्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोस्ट करून प्रोत्साहन देत आहेत. संपूर्ण देशात राम लहर निर्माण झाली आहे. श्रीरामाच्या मंदिरामध्ये, त्याच्या नामामध्ये किती शक्ती आहे, याची अनुभूती पुन्हा एकदा हिंदू घेत आहेत. श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी रामभक्तांनी प्राणत्याग केला. गेली अनेक दशके न्यायालयात याविषयीचा खटला चालवला गेला आणि अखेर हिंदूंना तेथे विजय मिळवल्यावर आता श्रीराममंदिर उभे रहात आहे. इतिहासामध्ये श्रीरामजन्मभूमीचा लढा अजरामर झाला आहे. आता हिंदूंनी यावर थांबू नये, तर मथुरा आणि काशी येथील मंदिरांची भूमी मुक्त करण्यासाठी लढा चालूच ठेवून तेथेही ईश्वराच्या कृपेने विजय मिळवला पाहिजे. केवळ मथुरा आणि काशीच नव्हे, तर देशातील साडेतीन लाख मंदिरांना पाडून तेथे मशिदी बनवल्या गेल्या आहेत, मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेतील सरस्वतीदेवीचे मंदिर असेच गिळंकृत करण्यात आले आहेत, त्यासाठीही लढा दिला पाहिजे. गोव्यासारख्या राज्यात पोर्तुगीज काळात मंदिरे पाडून चर्च बनवले गेले आहेत. तेही मुक्त करण्याची आवश्यकता आहे. या सर्व ठिकाणांची देवतांची स्थाने पुन्हा जागृत करायला हवीत. यासाठी कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही, तर न्यायालयीन मार्गाने प्रयत्न करता येऊ शकतो. यासाठी स्थानिक राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनीही हिंदूंना साहाय्य करणे अपेक्षित आहे. भाजप शासित राज्यांमध्ये एकवेळ हे शक्य होईल; मात्र अन्य राज्यांमध्ये असे होणे सध्यातरी अवघड आहे. श्रीराममंदिरामुळे या लढ्याला बळ मिळालेले आहे. उद्या मथुरा आणि काशी येथेही हिंदूंना विजय मिळाला, तर उर्वरित मंदिरे परत मिळवण्यासाठी प्रयत्नांना अधिक धार येऊ शकते.

मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत !

हिंदूंची मंदिरे ही चैतन्याची स्रोत आहेत. आध्यात्मिकदृष्टीने त्यांना असणारे महत्त्व भक्त, साधक, संत हेच समजू शकतात. यांमुळेच अशा चैतन्य स्रोतांचा विरोध करणार्‍या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी ही मंदिरे नष्ट करणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही. हिंदूंच्या मंदिरांच्या माध्यमांतून समाजामध्ये भाव-भक्ती, धर्माचरण, साधना, त्याग, मनःशांती आदी गोष्टी साध्य केले जातात. मंदिरांचे हे महत्त्व हिंदूंना ठाऊक आहे. देशात प्रत्येक गावा-गावांमध्ये एक नव्हे, तर अनेक मंदिरे असतात. अशी मंदिरे आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे होणे आवश्यक झाले आहे. श्रीराममंदिराच्या निमित्ताने हिंदूंमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या एक प्रकारची जागृती निर्माण झालेली आहे. ही जागृती पुढे वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देऊन प्रत्यक्ष साधनेला, धर्माचरणाला प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. यातूनच मंदिरांचा अधिक लाभ हिंदूंना, समाजाला आणि देशाला मिळणार आहे. हेही त्यांना सांगितले गेले पाहिजे. श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशातील अनुमाने 5 लाख मंदिरांमध्ये पूजा, आरती आदी कार्यक्रम करण्याचे आवाहन विश्व हिंदु परिषदेने केले आहे. त्यापूर्वी म्हणजे 14 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलेच आहे. म्हणजेच काय, तर या मंदिरांतून हिंदूंना संघटित करता येत आहे. त्यासाठी वेगळी जागृती, प्रबोधन करण्याची आवश्यकता भासत नाही. अद्यापतरी हिंदूंमध्ये मंदिरांविषयी श्रद्धा आणि भाव टिकून आहे. यालाच पुढे नेण्यासाठी हिंदूंना मंदिरांशी प्रतिदिन जोडून ठेवले पाहिजे. भारत निधर्मी देश असल्याने पंतप्रधान मोदी किंवा कोणतेही सरकार हिंदूंना थेट धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करू शकत नाही; मात्र हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. धर्मशिक्षणामुळे हिंदूंच्या देवतांचा जन्महिंदूंकडून होणारा अवमान थांबला जाईल. हिंदूंचा अन्य धर्मियांकडून होणारा बुद्धीभेद थांबून धर्मांतरालाही मोठ्या प्रमाणात चाप बसेल. लव्ह जिहादला बळी पडणार्‍या हिंदूंच्या मुलींचे रक्षण होईल. हिंदूंमध्ये धर्माविषयी अधिक प्रेम आणि जागृती येईल आणि स्वतःला हिंदु मानण्याचा त्यांना खर्‍या अर्थाने अभिमान वाटेल !

 

मंदिरे पर्यटनाची केंद्रे होऊ नयेत !

सध्या मंदिरांचा विकास केला जात आहे. म्हणजे काय, तर तेथे अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. तेथे पोचण्यासाठी विविध माध्यमे निर्माण केली जात आहेत. या गोष्टी आवश्यकच आहेत; मात्र याचा उपयोग एक भक्त, भाविक, साधक या दृष्टीने करवून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात असे किती प्रमाणात होते, याचे चिंतन केले पाहिजे. मंदिरांना आज एक पर्यटन केंद्र म्हणून पाहिले जात आहे. काही मोजकी मंदिरे आहेत जी त्यांचे मूळ स्वरूप टिकवून आहेत किंवा भाविक त्यांना त्याच दृष्टीने पहात आहे. मंदिरे पर्यटनाची केंद्र कदापी होऊ शकत नाहीत. ती चैतन्याची केंद्र आहेत. हे चैतन्य टिकवून ठेवणे भाविकांचे कर्तव्य नाही, तर साधना आहे. जर हे चैतन्य नष्ट झाले, तर त्या मंदिरांना काहीच महत्त्व उरणार नाही. कारण त्यात देव नसेल. अनेक संत, उन्नत यांना हे लक्षात येत आहे की, मंदिरांतील चैतन्य नष्ट होऊन तेथील देवत्व निघून गेले आहे. हे हिंदूंसाठी मोठे समष्टी पाप आहे. काही संत अशा मंदिरांच्या ठिकाणी जाऊन त्यांची शुद्धी करत असतात; मात्र जर चैतन्य नष्ट करणार्‍या गोष्टीच थांबवल्या, तर ते अधिक महत्त्वाचे आहे. सरकारने या दृष्टीने विकास करतांना पाहिले पाहिजे.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

श्रीराममंदिर हे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून बांधण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या ट्रस्टची निर्मिती झाली आहे. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही; मात्र आज देशातील लक्षावधी मंदिरे सरकारांच्या कह्यात आहेत. या मंदिरांमध्ये येणारे अब्जावधी रुपयांचे अर्पण सरकारच्या तिजोरीत जात आहे. यातील थोडासाच पैसा प्रत्यक्ष मंदिरांच्या कार्यासाठी वापरला जात आहे, तर अन्य सर्व पैसा सरकारी योजनांसाठी वापरण्यात येत आहे. तसेच मंदिर समित्याही या पैशांतून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी किंवा धर्मकार्यासाठी वापरत नसल्याचेही दिसून येते. घरातील कर्ता मोठा भाऊ लहान भावांचा सांभाळ करतो, तसे अधिक उत्पन्न असणार्‍या मंदिरांनी देशातील लहान मंदिरे ज्यांचे उत्पन्न नगण्य आहे किंवा ज्यांची पडझड झाली आहे, त्यांचे पालकत्व घेऊन तेथील व्यवस्था पहाण्याची आवश्यकता आहे. तसे होतांना दिसत नाही. म्हणजेच हिंदूंचा अर्पण केलेल्या पैशांचा धर्मासाठी उपयोग होत नाही. हा पैसा रुग्णालये बांधण्यासाठी, पूरग्रस्तांसाठी, शाळांसाठी, रुग्णांच्या साहाय्यासाठी वापरला जात आहे. ही सर्व सामाजिक कार्ये आहेत. सामाजिक कार्यासाठी धर्माचा पैसा खर्च होणे अपेक्षित नाही. सामाजिक कार्यासाठी अन्य स्रोत आहेत; मात्र धर्मकार्यासाठी असे कायमस्वरूप स्रोत नाहीत. त्यामुळे मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी वापरला पाहिजे. काही मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांसाठीही खर्च करण्यात आल्याची उदाहरण समोर आली होती. हे हिंदूंना लज्जास्पद होते. त्यामुळे मंदिरे सरकारांच्या कह्यातून मुक्त करून ती खर्‍या भक्तांच्या, साधना करणार्‍या भाविकांच्या कह्यात दिली पाहिजेत. सरकारी अधिकार्‍यांऐवजी असे भाविकच खर्‍या अर्थाने मंदिरे भावभक्तीने नियंत्रित करू शकतील. यासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आता आवश्यक आहे. ज्या मंदिरांचा भावभक्तीने सांभाळ होत नाही, ज्या मंदिरांच्या पैशांवर, दागिण्यांवर डल्ला मारला जातो, ज्या मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी खर्च होत नाही, तेथे देवतरी राहील का ? यासाठी आता हिंदूंनी लढा देणे आवश्यक आहे. यासाठी आता देशभरात जागृती करून मोठी चळवळ निर्माण केली पाहिजे. मंदिरांचा पैशातून धर्मशिक्षणासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, मोठ्या मंदिरांकडून म्हणजे ज्यांचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे आहे त्यांच्याकडून गुरुकुलांची ठिकठिकाणी निर्मिती करणे आवश्यक आहे. या पैशांतून वातावरणाच्या शुद्धीसाठी सातत्याने यज्ञ-याग करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात निर्जंतुकीकरण करण्यात येत होते, त्याचप्रमाणे यज्ञ-यागही आध्यात्मिक स्तरावर कार्य करतात.

रामराज्यासम आदर्श असे हिंदु राष्ट्र हवे !

श्रीराममंदिराची निर्मिती झाली असली, तरी ते अंतिम साध्य ठरू नये. श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना 500 वर्षांनंतर या देशात होत असेल, तर आता देशात रामराज्याचीही स्थापना होणे आवश्यक आहे. म्हणजे काय तर देशात श्रीरामांनी चालवल्या प्रमाणे राज्य म्हणजे देश चालवण्याची आवश्यकता आहे. सध्या असे आहे का ? तर नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. जेथे धर्मच नाही, तेथे धर्माचरण कसे केले जाऊ शकते ? यासाठी प्रथम भारताला धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे. हा देश हिंदूंचा आहे. या देशावर मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी जवळपास 1 हजार वर्षे राज्य केले आहे. त्यांच्या गुलामगिरीमुळे भारत आपली मूळ संस्कृती विसरला आहे. म्हणजे काय तर साधना करण्याची संस्कृती. भारत जगाचा विश्वगुरु होता तो आध्यात्मिक स्तरावर होता. आज देशात अशी स्थिती आहे का की, भारत जगाचा विश्वगुरु होऊ शकतो. तर याचे उत्तर ‘नाही’. म्हणून प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून हिंदु धर्मानुसार राज्य चालवले गेले पाहिजे. यातून प्रत्येक व्यक्ती हिंदु धर्माचे पालन करू लागेल. हिंदु धर्मानुसार निर्णय घेतले जातील. कार्य केले जातील. विकास त्या दृष्टीने केला जाईल. ही स्थिती देशात आली की, रामराज्य आले असे म्हणता येईल. असे शासनकर्ते पितृशाही प्रमाणे कारभार पहातील. अशा देशातील प्रजा राजाप्रमाणे असेल. या राज्यात कुणीही दुःखी असणार नाही आणि कुणालाही समस्या असतील, तर त्या तत्परतेने सोडवल्या जातील. अन्य देशांमध्ये भारताविषयी शत्रुत्व नाही, तर मान असेल. ते भारताचा आदर्श घेऊन राज्य कारभार करतील.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

Leave a Comment