गुजरात येथील संत पू. वसंतराव जोशी यांचा परिचय आणि जीवनकार्य !

पू. वसंतराव जोशी

१. परिचय

१ अ. पूर्ण नाव

पू. वसंतराव शंकरराव जोशी (सनातनच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. अनुपमा जोशी यांचे मामा)

१ आ. देहत्याग

कार्तिकी एकादशी, १९.११.१९९९ (देहमृत्यूच्या वेळी वय ६० वर्षे)

१ इ. जन्मगाव

जळगाव जवळ नांद्रे (एक खेडेगाव) येथे झाला. पुढे ते जळगाव येथे आणि नंतर ते गुजरातमध्ये स्थायिक झाले.

१ ई. शिक्षण

ग्रॅज्युएट, इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून चाकरी केली.

१ उ. कला

शास्त्रीय गायन, नृत्य, बासरी, तबला, पेटी, कविता लिखाण इत्यादी.

१ ऊ. भाषा

त्यांचे गुजराथी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते.

१ ए. गुरूंचे नाव

सद्गुरु दिनकरदास भगवानदास ठक्कर (मोडासा, गुजरात)

 

२. पू. वसंतराव जोशी यांनी शिष्यावस्थेत केलेली साधना

माझे मामा पू. वसंतराव जोशी यांना लहानपणापासून साधनेची आवड होती. ते ब्रह्मचारी होते. ते नेहमी साधनेसाठी घरातून डोंगरावर पळून जात असत. त्यांची ‘गुरुकृपानुसार’ साधना होती. ते सद्गुरु दिनकरदास भगवानदास ठक्कर यांचे पट्टशिष्य होते. सद्गुरु दिनकरदास महाराज पू. वसंतराव जोशी यांना ‘बहादूर’ या नावाने संबोधित असत.

मामांनी आरंभी चाकरी केली. ते चाकरी करत असतांनाही साधनेसाठी कुणालाही न सांगता सतत हिमालय, गिरनार, त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) किंवा पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन बसायचे; पण त्यांना सर्व जण ‘आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत’ मानत असल्याने त्यांना कुणी काही बोलत नसे. पुढे मामांनी त्यांची आई असेपर्यंतच चाकरी केली. नंतर त्यांनी चाकरी सोडून दिली.

 

३. अध्यात्माविषयी लिखाण

अ. त्यांची भजने हिंदी आणि गुजराथी या भाषांमध्ये अधिक आहेत.

आ. त्यांनी मला (सौ. अनुपमा जोशी यांना) आणि माझ्या आईला (६४ टक्के पातळीच्या सनातनच्या साधिका श्रीमती शांताबाई भालेराव, जळगाव (देहावसान : वर्ष २०१२) यांना) साधनेसाठी स्वतःच्या हस्ताक्षरातील ‘निदिध्यासन पोथी’ लिहून दिली. त्यानुसार पूर्वी आम्ही पोथीवाचन करत होतो.

 

४. दर्शन

‘दर्शन’ हा शब्द फार जुना आहे.

४ अ. काही अर्थ

१. जे सामान्य दृष्टीने कळू शकत नाही, त्यांस समजणे, म्हणजे दर्शन करणे

ऋग्वेदात दीर्घतमा ऋषींचा पुत्र कक्षीवान यांनीही हा शब्द वापरला आहे. ऋग्वेद, मंडल १, सूक्त ११६ यातील २३ वी ऋचा पुढीलप्रमाणे आहे. ‘पशुं न नष्टमिव दर्शनाय विष्णाप्वं ददथुर्विश्‍वकाय ।’ (अर्थ : सत्यस्वरूप देवतांनी ‘एखाद्या हरवलेल्या पशूला त्याच्या धन्यासमोर उभे करावे’, त्याप्रमाणे विष्णापू नावाच्या मुलाला त्याचे वडील विश्‍वक यांच्या समोर आणून उभे केले.) या ऋचेवरील भाष्यात सायणाचार्यांनी ‘दर्शनाय’ याचा अर्थ ‘दृष्टीआड असलेल्या (पशूला) दाखवावे, त्याप्रमाणे’, असा केला आहे. यानुसार ‘जे सामान्य दृष्टीने कळू शकत नाहीं त्यांस समजणे (दर्शन करणे)’ असा ‘दर्शन’ शब्दाचा अर्थ निघतो.

२. दर्शन म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार !

मनु म्हणतात,

सम्यग् दर्शनसम्पन्नः कर्मभिर्न निबध्यते ।
दर्शनेन विहीनस्तु संसारं प्रतिपद्यते ॥ – मनुस्मृति, अध्याय ६, श्‍लोक ७४

अर्थ : योग्य दर्शनाने युक्त असा माणूस कर्मांनी बांधला जात नाही. याउलट दर्शनविहीन माणूस संसार-सागरात गटांगळ्या खात रहातो.

यावर कुल्लूकभट्ट भाष्य करतांना म्हणतात, ‘दर्शन’ याचा अर्थ ब्रह्मसाक्षात्कारच आहे; म्हणून माझ्यामतें तर षड्दर्शने ब्रह्मसाक्षात्कारास कारणीभूत अशी शास्त्रे आहेत.’

– पू. वसंतराव शंकरराव जोशी (सौ. अनुपमा जोशी यांचे मामा), हस्तलिखित ‘निदिध्यासन पोथी’ – ऑक्टोबर १९७३ (देहत्याग : कार्तिकी एकादशी, १९.११.१९९९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात