स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांचा विसर पडलेला समाज अन् संस्कृतीजतन आणि धर्माचरण यांस उद्युक्त करण्यासाठी प्रयत्नरत सनातन संस्था !

देवळे आणि मठ यांची झालेली दुर्दशा पाहून मला सनातन संस्था अन् तिचे कार्य किती आवश्यक आहे, याची जाणीव झाली.

 

१. सनातन संस्थेची स्थापना आणि उद्देश

‘सनातन संस्थेची स्थापना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९९ मध्ये केली. ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनानुसार देश-विदेशांतील अनेक साधक साधना करत आहेत.

 

२. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेची आवश्यकता असणे

सध्याच्या काळात समाजातील सात्त्विकता पुष्कळच उणावली असून साधना करणे कठीण झाले आहे. समाजाला अध्यात्माचे महत्त्व सांगून समाज साधनेकडे वळावा आणि समाजातील सात्त्विकता पुनर्प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनचे साधक अन् संत प्रयत्न करत आहेत. ‘येणारा काळ अत्यंत कठीण असून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अराजक माजणार आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. येणार्‍या भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे.

‘साधना कोणती करावी ? काळाला अनुरूप साधना कोणती ? आपत्काळामध्ये टिकून रहाण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे ?’ इत्यादी विषयांवर समाजामध्ये कुणीही मार्गदर्शन करतांना दिसत नाही. यासाठी योग्य गुरूंची आवश्यकता असते; परंतु ‘आपले गुरु कोण आहेत ?’, हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळू शकत नाही. त्यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास (अध्यात्मातील सिद्धांत ठाऊक) असणे आवश्यक आहे.

 

३. सनातन संस्था जिज्ञासूंना योग्य आणि शास्त्रोक्त
मार्गदर्शन करत असून संस्थेतील साधकांची उत्तरोत्तर प्रगतीच होत असणे

‘गुरु हा देह नसून ते तत्त्व आहे’, हा अध्यात्मशास्त्राचा सिद्धांत आहे. त्यामुळे ‘योग्य साधना कोणती ?’, हे जाणून घेण्यासाठी आज देश-विदेशांतून हजारो लोक सनातनकडे येत आहेत. सनातन संस्था जिज्ञासूंना योग्य आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन करत आहे. योग्य मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे आज अनेक साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. अनेक साधकांची संतपदाकडे वाटचाल चालू आहे आणि अनेक साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी साधकांना मार्गदर्शन केले आहे.

 

४. समाजाला अविरतपणे धर्मशिक्षण देणारी सनातन संस्था !

१. भारतियांना स्वतःच्या संस्कृतीचे विस्मरण झालेले असणे

भारतीय संस्कृती आणि भारताचा इतिहास दैदिप्यमान आहे. याविषयी कुणाचेच दुमत नाही; परंतु याच वैभवशाली इतिहासाची आजची स्थिती काय आहे ? पाश्‍चात्त्य संस्कृतीचा आपले मन आणि बुद्धी यांवर इतका परिणाम झाला आहे की, आपण आपली स्वतःची संस्कृतीच विसरत चाललो आहोत.

२. हिंदूंनी स्वधर्माचरण त्यागून पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणे

साधे उदाहरण पाहूया. ‘भारतीय संस्कृतीमध्ये विवाहित स्त्रियांनी गळ्यात मंगळसूत्र, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या आणि कपाळावर कुंकू लावावे’, असे सांगितले आहे; परंतु आजच्या विवाहित स्त्रियांची स्थिती कशी आहे ? त्या हे अलंकार धारण करत नाहीत. त्यांच्या कपाळावर कुंकू नसते आणि कपडे तर विचारूच नका. हाफ पॅन्ट आणि टी शर्ट हा त्यांचा पेहराव झाला आहे. या स्थितीत आज अनेक स्त्रिया देवळांमध्ये दर्शनासाठी येतांना पहायला मिळतात. केवळ स्त्रियांचीच नव्हे, तर पुरुषांचीसुद्धा हीच अवस्था आहे.

३. हिंदूंनी पाश्‍चात्त्यांचे गुण नाही, तर केवळ दोषच अंगीकारणे

‘कुणाचे, कुठे आणि किती अनुकरण करावे ?’, याचा विचार आज प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. आपण पाश्‍चात्त्यांचा वक्तशीरपणा, देशप्रेम, उद्योगशीलता, वेळेचा पूर्ण उपयोग करणे इत्यादी गुणांचे अनुकरण का करू शकत नाही ?

हे सर्व सांगणार्‍या धर्मगुरूंची भारतामध्ये उणीव निर्माण झाली आहे. हेच सांगण्याचे आणि समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य केवळ सनातनच अविरतपणे करत आहे.

Leave a Comment