मुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती !

Article also available in :

पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली झाडाची बी मूर्तीत ठेवून मूर्ती सिद्ध करणे अशास्त्रीय आहे. श्री गणेशमूर्तीचे पूजन करून त्यातील चैतन्याचा लाभ घेणे आणि या चैतन्यमय मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करून ते चैतन्य सर्वदूर पर्यावरणात पोहोचवणे, या धर्माचरणानेच खर्‍या अर्थाने पर्यावरणरक्षण होणार आहे !

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

मुंबई – धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणार्‍या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत. ही मूर्ती सिद्ध करतांना सिद्ध केलेल्या साच्यात लाल माती आणि खत घट्ट भरले जाते. त्यात सूर्यफुलाचे बी टाकले जाते. ही मूर्ती बनवून कुंडीत ठेवली जाते. काही दिवसांनी या मूर्तीतून रोप उगवू शकते.

 

मूर्तीमध्ये बिया ठेवून कुंडीतच श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा
करण्याचा आणि मूर्तीवर पाणी ओेतून कुंडीतच मूर्ती विसर्जित करण्याचा अशास्त्रीय प्रकार !

‘इको-फ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाखाली ‘ट्री गणेशा’ या अशास्त्रीय संकल्पनेचा प्रचार !

सण आणि उत्सव यांतील प्रत्येक कृती आध्यात्मिक लाभासाठी करावयाची असते, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या लक्षात येत नाही. स्वत: साधना न करणार्‍या व्यक्तीला आध्यात्मिक कृतींमागील अनुभती घेता येत नाही. सण-उत्सव यांमधील कृतींमागील शास्त्र समजून घेण्यासाठी त्या क्षेत्रातील जाणकार म्हणजेच संतांचे मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही. स्वत:चे सामाजिक, भौतिक, पर्यावरणवादी विचारच योग्य वाटत असतात. हा सर्व परिणाम धर्मशिक्षणाच्या अभावाचा आहे. जो स्वत: साधना करतो, त्या ‘इको-फ्रेंडली’सारख्या गोष्टींची निरर्थकता सांगावी लागत नाही. गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी भाविकांनी शास्त्रीय पद्धतीनुसार शाडूच्या श्री गणेशमूर्तीची स्थापना करावी आणि ‘ट्री गणेशा’सारख्या धर्मशास्त्रविसंगत कृती करणार्‍या हिंदूंचे धर्मप्रेमी हिंदूंनी प्रबोधन करावे ! – संपादक

मुंबई – ‘इको-फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करतांना पर्यावरणपूरक मूर्ती सिद्ध करण्याच्या नावाखाली आतापर्यंत फळभाज्या, कागदांचा लगदा, विविध वस्तू यांपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यात येत आहेत. आता त्या जोडीला ‘ट्री गणेशा’ या आणखी एका अशास्त्रीय प्रकाराचा प्रचार करण्यात येत आहे. या संकल्पनेमध्ये लाल मातीची श्री गणेशमूर्ती सिद्ध करून तिच्या आतमध्ये झाडाच्या बिया घालाव्यात आणि कुंडीतच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. एवढ्यावरच न थांबता विसर्जनाच्या वेळी श्री गणेशाची मूर्ती कुंडीसह रोपवाटिकेत ठेवावी आणि रोपाला पाणी घालावे, त्याप्रमाणे मूर्ती विरघळेपर्यंत नियमित मूर्तीवर थोडे-थोडे पाणी घालावे, असा अशास्त्रीय प्रकार सांगण्यात आला आहे. यामध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर तिच्यामध्ये ठेवलेल्या बिया कुंडीत रहातात आणि काही दिवसांनी कुंडीत रोपे रूजतात. ही रोपे श्री गणेशाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानण्यात येते. यामध्ये काही जण फळभाज्या, फुलझाडे यांसह अन्य वृक्षांच्या बिया श्री गणेशमूर्तीमध्ये घालतात.

वर्ष २०१५ मध्ये मुंबई येथील दत्तारी कोथुर या युवकाने ‘ट्री गणेशा’ ही शास्त्रविसंगत संकल्पना मांडली. माती, खत आणि बिया यांपासून त्यांनी सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तीची स्थापना स्वत:च्या घरात केली होती. त्यानंतर या संकल्पनेचा प्रसार सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे चालू असून त्याला प्रतिसाद वाढत आहे. वर्ष २०१७ मध्ये अशा प्रकारच्या ५०० मूर्तींची मागणी आली, तर २०० मूर्ती सिद्ध केल्याचा दावा दत्तारी कोथुर यांनी ‘यू ट्यूब’द्वारे केला आहे.

मागील वर्षी शालेय शिक्षणमंत्री तथा भाजपचे नेते विनोद तावडे यांसह काही प्रतिष्ठित मंडळींनीही या मूर्तीची पाहणी केली. या वर्षी वनविभागाने १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात केलेल्या १३ कोटी वृक्षांच्या लागवडीच्या कार्यक्रमात ‘ट्री गणेशा’ या संकल्पनेविषयी वृक्षारोपणामुळे समाजात घडत असलेले चांगले पालट’, असा उल्लेख करण्यात आला आहे. (धर्मशास्त्राशी विसंगत असलेल्या ‘ट्री गणेशा’सारख्या चुकीच्या पद्धतीला शासनाने प्रोत्साहन देऊ नये, अशी हिंदूंची भावना आहे ! – संपादक) सध्या ‘यू ट्यूब’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘ट्री गणेशा’ या संकल्पनेचा प्रचार करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment