वयोमानानुसार येणार्‍या शारीरिक अडचणींवर मात करून उत्तर महाराष्ट्रातील प्रसार कार्याची घडी बसवणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व : सनातनचे १३ वे सद्गुरु नंदकुमार जाधव !

 

सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा परिचय

मूळ अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सद्गुरु नंदकुमार जाधव पूर्वी शिक्षक होते. वर्ष १९९९ मध्ये त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना प्रारंभ केली. त्या वेळी अकलूज आणि त्या परिसरातील गावांमध्ये अध्यात्मप्रसाराची सेवा केल्यानंतर वर्ष २००२ मध्ये ते पूर्णवेळ साधना करू लागले. वर्ष २००५ मध्ये त्यांनी साधकांसाठी नामजप करून त्यांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण करण्याची सेवाही केली. कालांतराने नांदेड, परभणी आदी शहरांत त्यांनी अध्यात्मप्रसाराच्या कार्याची घडी बसवली. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या परिसरात पुष्कळ उष्णता असूनही सद्गुरु जाधवकाका तेथे दूरदूरच्या जिल्ह्यांत जाऊन प्रसारसेवा करत आहेत. सद्गुरु जाधवकाका यांच्या तळमळीमुळेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांतील साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांना चालना मिळत आहे. त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती अशा स्तरांवरील भावगीते अन् भक्तीगीते यांचा साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे. त्यांनी गायलेली काही गाणी भावजागृती करणारी, काही क्षात्रवृत्ती जागृत करणारी, तर काही वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणारी आहेत.

नंदुरबार येथील सभास्थळी येतांना डावीकडून आमदार राजासिंह ठाकूर, कु. रागेश्री देशपांडे, सौ. क्षिप्रा जुवेकर, सद्गुरु नंदकुमार जाधव

 

सर्वांवर पितृवत् भरभरून प्रेम करणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !

  • सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्याशी बोलतांना ‘घरातल्यांशीच बोलत आहोत’, असे वाटते; कारण ते सर्वांशी खेळीमेळीने बोलतात आणि वागतात. प्रेमभाव हा काकांचा मुख्य गुण आहे.
  • सद्गुरु काकांशी केवळ बोलणे झाले, तरी साधकांचा उत्साह वाढतो. स्थिर, मितभाषी स्वभावाचे सद्गुरु काका सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करत असल्याने अनेक साधक त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून साधनेत मार्गदर्शन घेतात. साधकांना त्यांच्याशी बोलल्यावर अनुभूती येतात.
  • काका साधकांवर भरभरून प्रेम करतात. त्यांना कठीण प्रसंगात सावरतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी आपल्याला सर्वकाही करायचे आहे. त्यांना अपेक्षित असे प्रयत्न करणे हे आपले ध्येय आहे’, असे सतत सांगून ते साधकांची गुरुदेवांवरील श्रद्धा वाढवतात.’
  • सद्गुरु काका नेहमी हसतमुख असतात. त्यांंनी कधी ‘गंभीर मुद्रा केली आहे’, असे पहायला मिळत नाही. त्यांच्या वागण्यात सहजता आहे.
  • प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी, अशी त्यांना तीव्र तळमळ आहे. विदर्भातील साधकांच्या व्यष्टी आढाव्याची घडी बसण्यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच साधकांकडून प्रयत्नही होत आहेत.
  • साधकांसाठी सद्गुरु काका आधारस्तंभ आहेत. साधना म्हणजे काय आणि ती प्रत्यक्षात कशी करायची, हे सद्गुरु काकांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवलेले आहे. ते सर्वांसाठी अतिशय आदर्श आहेत.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाविषयी रचलेले भावपूर्ण काव्य !

तुम ही राम हो, तुम ही कृष्ण हो । श्रीजयंत में तुम ही समाए हो ।

गुरुदेव तुम ही, ईश्‍वर तुम हो । विष्णु के तुम अवतार हो ॥ धृ.॥

गुरुकृपायोग सिखाकर शीघ्र प्रगति का मार्ग दिखा दिया ।

मोक्षप्राप्ति और रामराज्य ध्येय व्यष्टि समष्टि का ।

शरणागति से प्रार्थना है, मोक्ष तक हमें ले चलो ॥ १ ॥

ब्रह्मांडनायक ज्ञानगुरु, राष्ट्रगुरु और जगद्गुरु ।

प्रीती के सागर दयालु कृपाकर, उपकार हम पर अनंत हैैं ।

कितने भी कृतज्ञ हम हुए, फिर भी कृतज्ञता अल्प है ॥ २ ॥

संत देवी-देवता ऋषि गाएं महिमा आपकी ।

अज्ञानी पर भाग्यवान है हम, कृपा जो आपकी मिली ।

और कुछ भी न हमें चाहिए, अब चरणों की धूल बनाइए ॥ ३ ॥

सद्गुरु जाधवकाकांनी गायलेली गीते ऐकतांना आलेल्या अनुभूती

१. ‘माझी अखंड भावजागृती होत होती. गीते ऐकतच रहावीशी वाटत होती. ते समरस होऊन गीते म्हणत असल्याने ऐकणाराही गीतात समरस होत होता.’ – श्री. महादेव जाधव, मिरज

२. ‘प्रत्येक भजन ऐकतांना मला ‘सद्गुरु काका भजनातील शब्दब्रह्माशी एकरूप होऊन, अंतर्मनापासून आणि भावपूर्ण स्वरात भजने म्हणत आहेत’, असे जाणवले.  ‘या जन्मावर, या जगण्यावर…’ हे भावगीत ऐकतांना आश्रमजीवन डोळ्यांपुढे येत होते आणि स्वतः त्यात हरवून गेल्यासारखे वाटत होते.’ – श्रीमती लीला घोले, सहकारनगर, पुणे.

वयाच्या ६७ व्या वर्षीही युवा साधकांना लाजवेल, अशी सेवा करणारे सद्गुरु जाधवकाका !

  • सद्गुरु काका पहाटे ४.३० वाजता उठून रात्रीपर्यंत सेवा, समष्टी नामजप, साधकांना संपर्क इत्यादी करत असतात. कधीही ‘ते थकलेले आहेत’, असे दिसत नाही.
  • ते जिज्ञासूंना अतिशय अभ्यासपूर्वक तळमळीने विषय समजावून सांगतात. त्यामुळे त्यांना एकदा भेटलेली व्यक्तीही त्यांची होऊन जाते.
  • हिंदु धर्मजागृती सभांत क्षात्रवृत्तीने बोलणारे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्यामुळेच जळगाव जिल्हा आणि परिसर येथील कार्य महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांपेक्षा पुष्कळ अधिक पटींनी वाढत आहे.
  • नाशिक येथे वर्ष २०१५ मध्ये झालेल्या कुंभपर्वाच्या कालावधीतही त्यांनी दायित्व सांभाळले. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, तरीही ते अखंड सेवारत असत. त्रास होऊनही ते सकाळी ८.३० वाजता राष्ट्र-धर्म यांविषयीच्या प्रदर्शनस्थळी यायचे अन् दिवसभर संत, प्रतिष्ठित व्यक्ती आणि जिज्ञासू यांच्याशी रात्री १०.३० – ११ पर्यंत संवाद साधायचे. प्रदर्शन संपल्यावर ते सनातनच्या उत्पादनांच्या मुख्य साठ्याच्या ठिकाणी जायचे. साधकांसह साठामोजणीच्या सेवेत सहभागी व्हायचे. तेव्हा ते साधकांसमवेत रात्री १ पर्यंत सेवा करायचे. त्या वेळी गुडघेदुखी आणि पाठदुखी यांचा विचार ते करत नसत. त्यांना सतत सेवेचा ध्यासच असायचा.