गुरुपौर्णिमेनिमित्त संत संदेश !

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

परात्पर गुरु डॉ. आठवले
।। श्री गुरवे नमः ।। ।। श्रीराम समर्थ ।।
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ।। (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : पूर्ण फुललेल्या कमळाच्या पाकळीसारखे टपोरे डोळे असलेले विशाल बुद्धीचे व्यास, ज्यांनी महाभारतरूपी तेलाने पूर्ण असा ज्ञानमय दीप प्रज्वलित केला, त्या तुम्हाला (व्यासपौर्णिमेनिमित्त) नमस्कार असो.

 

१. महर्षि व्यासांच्या साहित्यातील प्रत्येक शब्दात परम अर्थ दडलेला असणे

‘महर्षि व्यासांनी लिहिलेल्या सर्व साहित्यांचा सूक्ष्म अभ्यास करायचा झाल्यास एक जन्म पुरणार नाही. भगवान वेदव्यास यांच्या ऋणातून मानवजात मुक्त होणे शक्य नाही. त्यांचे साहित्य म्हणजे केवळ शाब्दिक मनोरंजन नाही, तर त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये परम अर्थ दडलेला आहे. तो परमार्थ साधल्यास मनुष्याचे कल्याण होते. हा परमार्थ केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच साधकाला समजू शकतो आणि सद्गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी त्यांना अपेक्षित अशी साधना करणे आवश्यक असते; म्हणूनच म्हटले आहे,

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’

 

२. श्रीमन्नारायण हेच ‘सच्चिदानंद परब्रह्म
डॉ. जयंत बाळाजी आठवले’ हे नाव धारण करून पृथ्वीतलावर अवतरित होणे

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

महर्षि व्यासांनी ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांमध्ये ज्या विराट आदिपुरुषाचे वर्णन केले आहे, तोच श्रीमन्नारायण आता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ हे नाव धारण करून पृथ्वीतलावर अवतरित झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेचे कार्य आरंभ केले आहे. या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून आम्हा साधकांची निवड केली. हे आमच्या कित्येक जन्मांच्या साधनेचे फळ आहे. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी त्यांनी ‘गुरुकृपायोग’ या विहंगम मार्गाची निर्मिती केली. या मार्गाने साधना करून आज अनेक साधक सद्गुरुपदावर आरूढ झाले आहेत. अनेक साधक ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त झाले आहेत अन् ही क्रिया चालूच आहे.

 

३. द्वापरयुगात अनिष्ट शक्तींनी भगवान श्रीकृष्णाला
ज्याप्रमाणे त्रास दिला, तसाच त्रास कलियुगात सनातनचे साधक अनुभवत असणे

श्रीमन्नारायणाने द्वापरयुगात श्रीकृष्ण अवतार धारण करून स्वतः मोठ्या असुरांचा नायनाट केला, मथुरावासियांचे रक्षण केले आणि पांडवांच्या माध्यमातून धर्मसंस्थापना केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले या अवतारातही त्यांचे तेच कार्य चालू आहे. द्वापरयुगात असुरांनी पृथ्वीवर हलकल्लोळ माजवला असतांना श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्याच्या जन्मापासूनच सर्व अनिष्ट शक्ती त्याला नष्ट करण्यासाठी एकजुटीने कार्यरत झाल्या. ‘विश्वातील अनिष्ट शक्ती ज्यांच्या मागे पूर्ण शक्तीनिशी लागलेल्या असतात, ते ईश्वरी अवतारच असतात’, हे यातून स्पष्ट होते. ‘सध्या केवळ सनातनच्याच साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास का होतात ?’, या प्रश्नाचे उत्तरही येथेच मिळून जाते. वरील घटना द्वापरयुगातील आहेत; पण सनातन संस्थेतील साधक कलियुगातही तेच अनुभवत आहेत.

 

४. महाकाळाने पंचमहाभूतांच्या साहाय्याने
युगप्रलयाला म्हणजेच भीषण आपत्काळाला प्रारंभ करणे

सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांनी वर्ष २००० पासून विविध संतांच्या माध्यमातून सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या विरुद्ध सूक्ष्मातून युद्ध आरंभले आहे. वर्तमान स्थितीत हे युद्ध ७ व्या पाताळापर्यंत पोचले आहे. महाकाळाने पंचमहाभूतांच्या साहाय्याने युगप्रलयाला आरंभ केला आहे. त्याला आपण ‘भीषण आपत्काळ’ असे म्हणत आहोत.

‘महाकाळ युगप्रलय कसा आणणार ?’, याचे वर्णन सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वेळोवेळी केले आहे. महाकाळ त्यांच्याच आज्ञेत रहातो, हे लक्षात घ्यावे. हा महाकाळ नैसर्गिक आपत्ती आणि तिसरे महायुद्ध यांच्या माध्यमातून भीषण तांडव करणार आहे. ज्याची खडतर साधना असेल, तोच यातून वाचेल. शेवटी सात्त्विक जीवच जिवंत रहातील.

 

५. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे अज्ञान नाहीसे केले,
त्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे साधकांचे अज्ञान नाहीसे करत असणे

५ अ. देहत्याग केलेल्या संतांची चैतन्यशक्ती आपत्काळात साधकांचे रक्षण करणार असणे

गेल्या ४ मासांत अनेक संतांनी देहत्याग केला आहे. यावरून आपत्काळाची भीषणता लक्षात येते. हा सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचा दृश्य परिणाम आहे. सूक्ष्म स्तरावरील लढ्यात स्थूलदेहाला मर्यादा असतात. त्यामुळेच संतांनी देहत्याग केला असून ते चैतन्याच्या स्तरावर सच्चिदानंद परब्रह्माच्या सेवेत रत झाले आहेत. ही चैतन्यशक्तीच आपत्काळात साधकांचे रक्षण करणार आहे.

५ आ. ‘खरी सिद्धता शरणागतभावाने अखंड अनुसंधानात रहाणे’, याची जाणीव
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना करून देणे

जो सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली राहील, तोच या भीषण आपत्काळात तरून जाईल. ‘भीषण आपत्काळ’ ही ईश्वराचीच ‘प्रलय लीला’ असून यातून वाचण्याचा मार्गही त्यानेच दाखवला आहे. श्रद्धेने त्याचे आज्ञापालन करणे आवश्यक आहे. गुरूंनी आपत्काळासाठी स्थुलातून सिद्धता करण्यास सांगितले आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या भावसत्संग, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमधून वेळोवेळी त्याचे विवरण करत आहेत. ‘स्थुलातून कितीही सिद्धता केली, तरी त्याला मर्यादा आहेत. खरी सिद्धता शरणागतभावाने अखंड अनुसंधानात रहाण्यासाठी मन घडवणे हीच आहे’, याची जाणीव त्या साधकांना करून देत आहेत.

५ इ. भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवून स्वकियांच्या
विरोधातील लढ्यात निमित्तमात्र होऊन आज्ञापालन म्हणून लढण्यास सांगणे

अर्जुनाला वाटले की, सत्तेच्या मोहापायी मी स्वकियांशी युद्ध करण्याचे पाप करत आहे. तेव्हा भगवंताने गीतेच्या माध्यमातून त्याचे अज्ञान नष्ट केले. श्रीकृष्णाने ‘हे युद्ध सत्ताप्राप्तीसाठी किंवा स्वकियांविरुद्ध नाही, तर धर्मसंस्थापनेसाठी आहे’, याची अर्जुनाला जाणीव करून दिली. तरीही अर्जुनाचे अज्ञान नष्ट झाले नाही. शेवटी भगवंताने विश्वरूप दाखवून सांगितले, ‘‘मुळात हे युद्ध तू करत नसून मीच करत आहे. तू निमित्तमात्र आहेस. या कार्यासाठी मी तुझी निवड केली आहे. तू आज्ञापालन केल्यास तुझे कल्याण होईल.’’ त्यानंतर अर्जुनाचे अज्ञान नाहीसे झाले. सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे सर्वजण साधकांना तेच सांगत आहेत.

 

६. साधकांनो, तळमळीने साधना करून मारुतिरायांसारखी दास्यभक्ती वाढवा !

गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी गुरुतत्त्व कार्यरत असते. अन्य काळात सहस्रो वर्षे साधना केल्यानंतर जे फळ मिळते, तेच फळ संधीकाळामध्ये काही काळ साधना केल्याने मिळते. त्यातही श्रीमन्नारायणाच्या मार्गदर्शनाखाली राहून साधना करायला मिळते, तेव्हा साधकांनी तळमळीने साधनेचा वेग वाढवून या संधीचा लाभ घ्यावा. मारुतिरायांसारखी दास्यभक्ती वाढवावी. या भीषण आपत्काळात त्यांचे कृपाछत्र विश्वातील सर्व साधकांना लाभो, हीच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना !’

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
– प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, गौतमारण्य आश्रम, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग.

 

प.पू. देवबाबा यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना संदेश

प.पू. देवबाबा

‘सनातन धर्मात गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणारे शिष्य पुढे अत्यंत ज्ञानी होऊन गगनभरारी घेतात. गुरु जीवित असतांना शिष्याची प्रगती होतच असते; परंतु गुरूंच्या निर्वाणानंतरही शिष्याची प्रचंड प्रगती होऊन तो श्रेष्ठ शिष्य म्हणून प्रसिद्ध होतो. प.पू. डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे श्रद्धास्थान असलेली सनातन संस्था मोठी भरारी घेईल. नामजपातून शक्तीची निर्मिती, विविध व्याधींचे निवारण होण्यासाठी वेगवेगळे नामजप करणे आदी संशोधन कार्य प.पू. डॉ. आठवले यांनी प्रारंभ केले आहे. ‘संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आदींच्या माध्यमातून साधक संत होऊ शकतो, याचे संशोधन करून ते सिद्ध करणारे जगातील पहिले संत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्णन करता येईल. त्याच वेळी हिंदु धर्मपालक आणि आध्यात्मिक सैनिक म्हणून जगत असलेले या शतकातील अत्यंत श्रेष्ठ संतही तेच आहेत, असे सांगतांना हृदय भरून येते. सत्याच्या लढ्यात अग्रेसर असणारे प.पू. डॉ. आठवले यांनी सोसलेले घाव १-२ नाहीत, तर सहस्रो आहेत. त्यांनी ‘माझे काहीच नाही’, असे सांगून सर्वकाही श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले आहे. आपल्यावरील संकटे हसत हसत झेलणार्‍या या महान संतांना सदैव विजय प्राप्त होऊ दे, हेच मागणे आहे.

‘सर्व सनातन धर्मीय, तसेच या भूमीवर निवास करणारे सर्व संत आणि साधक यांचे शुभ होवो’, हीच परमेश्वराच्या चरणी या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आपण सर्वांनी संघटित होऊन आणि शरण जाऊन प्रार्थना करूया.’

– प.पू. देवबाबा, श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्निगोळी, कर्नाटक.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment