गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश २०१६

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य संतांच्या मार्गदर्शनाखाली करा !

प.पू. डॉ. जयंत आठवले H.H. Dr. Jayant Athavale

प.पू. डॉ. जयंत आठवले

हिंदु धर्मातील गुरुपरंपरा ही देशातील संतपरंपरेने दिलेली अमूल्य देणगी आहे. संत हे साक्षात् ईश्‍वराचे सगुण रूप असतात. संतांमुळे समाज साधनेकडे वळतो, तसेच समाजातील सत्त्वगुणही वाढीस लागतो. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरुंसह आध्यात्मिक मार्गदर्शन करणार्‍या संतांप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली जाते.

धर्म विरुद्ध अधर्म हा लढा प्रत्येक युगात लढला जातो. सध्याही त्याचे दृश्य रूप देशात सर्वत्र दिसत आहे. जेथे धर्म असतो, तेथे जय असतो, हे गीतेतील वचन असल्याने आगामी काळात प्रत्येकाने धर्माच्या बाजूने उभे रहाणे आणि त्यासाठी कार्य करणे आवश्यक ठरणार आहे. सामान्य हिंदूंना धर्माची बाजू कोणती आहे, हे कळत नाही. अशांनी खर्‍या संतांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यानुसार कृती करणे अपेक्षित आहे.

सध्याच्या काळात भारताच्या आणि हिंदूंच्या सर्व संकटांवरील उपाय म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणे, ही गुरुतत्त्वाला सध्याच्या काळात अपेक्षित असलेली साधना आहे. आगामी काळाच्या दृष्टीनेही हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणे म्हणजे धर्म विरुद्ध अधर्म यांच्या लढ्यात धर्माच्या बाजूने कार्य करण्यासारखे आहे. संतांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य केल्यास या कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान आणि दिशा मिळते. एकसंध भारताचा पहिला सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी आचार्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली, विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचे निर्माते हरिहरराय अन् बुक्कराय यांनी शृंगेरीपिठाचे शंकराचार्य विद्यारण्यस्वामींच्या मार्गदर्शनाखाली, तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रउभारणीचे कार्य केले होते. हा इतिहास आहे; म्हणूनच या गुरुपौर्णिमेपासून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करण्यास आरंभ करा आणि धर्म विरुद्ध अधर्म यांच्या लढ्यात धर्माच्या बाजूने उभे रहा !

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, प्रेरणास्थान, सनातन संस्था. (२०१६)