गुरुपौर्णिमा म्हणजे परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या आदिशक्तीची पूजा !

 

१. गुरुपौर्णिमा ही चैतन्याची गुरुपौर्णिमा
असल्याने स्वतःतील चैतन्याला जागृत करून सेवा करा !

चैतन्यच सर्वत्र आहे आणि तेच गुरुस्वरूपातून कार्य करते. त्याचीच गुरुपौर्णिमा, त्याचेच कार्य आहे आणि तोच करणार आहे. आपण केवळ पहाणार आहोत. यासाठी ही चैतन्याची गुरुपौर्णिमा आहे, असे समजून आपल्यातील चैतन्याला जागृत करून सेवा करायची आहे.

 

२. आदिशक्तीचे स्वतःतील स्वरूप
ओळखून तिचे स्तवन करा आणि तिला जागृत करा !

आपण स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या वेळी आदिशक्ती तू अंतशक्ती तू जगज्जननी तू लयकारी तू ॥ हे शक्तीस्तवन म्हणतो. असे म्हटल्यावर प्रत्येकाने आपल्या अंत:स्थ आदिशक्तीला आवाहन करायचे असते. तिला जागृत करून कार्य करायचे असते; पण आपण बहिर्मुख होऊन ती शक्ती बाहेर शोधल्यास किंवा बाहेरील शक्तीत आदिशक्ती शोधण्याचा प्रयत्न केल्यास ती कार्यान्वित होत नाही.

ही शक्ती माझ्यात आहे. ती जागृत होऊन कार्य करणार आहे, हे बिंबवण्यासाठी तिचे हे स्तवन आहे. हे समजून तिचे स्तवन करणे आणि ती वेगळी आहे, असे समजून तिचे स्तवन करणे यांत भेद आहे. आदिशक्तीला बाहेर पाहिल्याने दूरत्व येते, म्हणजे बाह्यतः पहाण्याचा प्रयत्न केल्याने ती दुसरी शक्ती असून ती जागृत होऊन तिने कार्य करावे, असे प्रतीत होते; परंतु वास्तविक येथे आपल्यातील शक्तीचे स्तवन करून तिला जागृत करून पेटून उठले पाहिजे.

 

३. गुरुपौर्णिमेला गुरूंच्या ठिकाणी
असलेल्या आदिशक्तीचे स्मरण करून तिचे पूजन करा !

३ अ. परब्रह्मस्वरूप असलेल्या गुरुतत्त्वाचे महत्त्व !

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वुरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म (ईश्वराचा ईश्वर) आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.

ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही आदिशक्तीचीच रूपे आहेत. परब्रह्मापासून निर्माण झालेले ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे अंशरूपाने कार्य करतात, हे समजले पाहिजे. गुरुपौर्णिमा म्हणजे त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या आदिशक्तीची पौर्णिमा होय.

३ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली
गुरूंची पूजा ही जगद्गुरु श्रीकृष्णाचीच पूजा !

ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रहः ।
अनादिरादिर्गोविन्दः सर्वकारणकारणम् ॥

– श्री ब्रह्मसंहिता, श्लोक १

अर्थ : श्रीकृष्ण परम ईश्वर आहे. त्याचा श्रीविग्रह नित्य, चितघन आणि आनंदस्वरूप आहे. तो अनादि, सर्वश्रेष्ठ आणि सर्व कारणांचा कारणस्वरूप गोविंद आहे.

गुरूंचे स्थान म्हणजे जो मूळस्वरूप आदि कृष्ण आहे, जो प्रलयानंतरही रहातो तो. अशा त्या जगद्गुरूंची शक्ती आहे, तिला नमन आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली पूजा ही श्रीकृष्णाचीच पूजा आहे, असे समजूनच केली जाते. गुरु परब्रह्मस्वरूपी असल्याने आपण त्यांची पूजा परब्रह्मरूपी श्रीकृष्णाची पूजा म्हणून करतो.

३ इ. संत ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा
मूलस्वरूप अशा आदिशक्तीलाच प्रथम नमन करणे

संत ज्ञानेश्वंर महाराजांनीसुद्धा ज्ञानेश्वधरी लिहितांना मूलस्वरूप अशा आदिशक्तीलाच प्रथम नमन केले आहे. ते म्हणतात,

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या । जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥

– ज्ञानेश्वूरी, अध्याय १, ओवी १

अर्थ : ॐ हे आदिशक्तीचे प्रथम स्वरूप असून ते वेदांनी प्रतिपादन केले आहे. तेच स्वसंवेद्य अशा आत्मस्वरूपाने सर्वत्र कार्य करत आहे, अशा ॐ काररूपी (श्रीकृष्णरूपी) आदिशक्तीला नमस्कार असो.

३ ई. गुरुपौर्णिमेला प.पू. भक्तराज
महाराजरूपी गुरूंच्या चैतन्याची पूजा केली जाणे

सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज श्रीकृष्णाचेच रूप आहेत. आपल्याला गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांच्यातील चैतन्यरूपी महान शक्तीची पूजा करायची आहे. येथे या शक्तीचे नाव प.पू. भक्तराज महाराज आहे. शेवटी ही गुरूंच्या चैतन्याची पूजा आहे. चैतन्याविना दुसरे काही नाही.

 

४. गुरुपौर्णिमा म्हणजे चैतन्यरूपी मूलतत्त्वाची
पूजा असून मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे अन् बहिर्मुख
वृत्तीने कार्य केल्यामुळे विविध संप्रदाय, पंथ इत्यादींची निर्मिती होणे

गुरुपौर्णिमा म्हणजे चैतन्यरूपी मूलतत्त्वाची पूजा आहे; कारण तीच सर्वत्र सर्व जड-चेतन स्वरूपातून कार्य करत असून आपण तिला ओळखण्यासाठी तिच्या स्वरूपाप्रमाणे निरनिराळी नावे देतो. वास्तविक आदिशक्तीचे गुरुतत्त्व हे स्वरूप सर्वत्र एकच आहे. तिच्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे आणि बहिर्मुख वृत्तीने बाह्य रूपाकडे पाहिल्यामुळे विविध संप्रदाय, पंथ इत्यादी बनले. त्यामुळे भेद निर्माण झाले. भेदामुळेच आज हिंदु धर्माची महान शक्ती लोप पावली आहे, विभागली गेली आहे. त्यामुळे धर्मशक्तीवर ग्लानी आली आहे. हा बाह्य संस्कार नाहीसा करून आणि त्या मूळ शक्तीला परत प्रगट करून एकसंघाने कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता बनली आहे.

 

५. गुरु हे आदिशक्तीचे सगुण स्वरूप असून त्यांच्यात
महान सामर्थ्य असल्याने ते शिष्याला ईश्वरत्व प्रदान करू शकणे

गुरु हे आदिशक्तीचे सगुण स्वरूप असून त्यांच्यात महान सामर्थ्य असल्याने ते शिष्याला ईश्व्रत्व प्रदान करू शकतात. आपल्या अंत:स्थ असलेल्या शक्तीला जागृत करण्याचे महान सामर्थ्य केवळ गुरुतत्त्वातच असते. त्या शक्तीला जागृत करण्यासाठी गुरुपौर्णिमेला तिचे पूजन करायचे आहे. यासाठीच सर्वत्र आदिशक्तीच कार्य करणारी आहे, हे समजून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया !

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद (२७.५.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment