इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेला खडतर प्रवास

आमच्या दक्षिण-पूर्व राष्ट्रांच्या दौर्‍याच्या कालावधीत इंडोनेशियाच्या सुमात्रा या बेटावरील वनांत कापराची झाडे असून त्यातून शुद्ध भीमसेनी कापूर मिळत असल्याचे आम्हाला समजले. ‘हे क्षेत्र दुर्गम आणि डोंगराळ असून तेथे जाणे कठीण आहे’, असे काही जणांकडून आम्हाला समजले. त्यामुळे क्षेत्राचा अंदाज आणि प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी आम्हाला (मला आणि श्री. स्नेहल राऊत यांना) जायला सांगण्यात आले.

डावीकडून श्री. स्नेहल राऊत, श्री. सत्यकाम कणगलेकर, श्री. बारुबु, एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारांतियो आणि श्री. मलाऊ

 

१. बारूस येथे जाण्यासाठी केलेला प्रवास

१ अ. पू. रेन्डी इकारांतियो आणि दुभाषिक श्री. मलाऊ यांच्या समवेत बारूस येथे जाण्यासाठी निघणे

१८.४.२०१८ या दिवशी आम्ही दोघे रात्रीचा विमानप्रवास करून सुमात्रा येथील मेडान या शहरात पोहोचलो. येथे एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांनी आमच्या प्रवासाची सोय केली होती. आम्ही तेथे पोहोचल्यानंतर काही वेळातच पू. रेन्डीदादाही मेडान येथे पोहोचले. त्यांच्या समवेत जाकार्ता येथील श्री. कोबालन यांनी माहिती सांगण्यासाठी दिलेले श्री. मलाऊ हेही होते. आमच्या सुमात्रा येथील प्रवासात श्री. मलाऊ हे माहिती, तसेच स्थानिक लोकांशी समन्वय साधण्यासाठी दुभाषिक होते. मेडान येथून आम्ही सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनाने कापराची झाडे असलेल्या वनांच्या दिशेने प्रवास चालू केला. मेडान ते बारूस हा प्रवास १० – ११ घंट्यांचा होता. श्री. मलाऊ हे एकटेच चालक होते. त्यांनी प्रवासात एके ठिकाणी विश्रांती घेऊन नंतर पुढे जाण्याचे सुचवले. ६ घंटे प्रवास केल्यानंतर महामार्गावर असलेल्या एका लॉजवजा धर्मशाळेत आम्ही रात्री निवास केला. तेथे पोहोचण्यास आम्हाला रात्रीचा दीड वाजला होता. दुसर्‍या दिवशी पहाटे ४.३० वाजता उठून आवरून अल्पाहार करून पहाटे ५.३० वाजता आम्ही पुढील प्रवास चालू केला.

१ आ. मार्ग घाटातून आणि वळणाचा असल्याने प्रवासाचा
कालावधी वाढणे आणि नैसर्गिक प्रतिकूलता असतांना गुरुदेवांची कृपा अनुभवणे

हा प्रदेश उष्ण कटिबंधीय वनांचा आणि डोंगराळ आहे. येथील प्रवासाचा मार्ग घाटातून आणि वळणाचा आहे. येथील एकेरी मार्ग आणि मार्गाची स्थितीही चांगली नसल्यामुळे प्रवासाला लागणारा कालावधी वाढत होता. त्यात जोरदार पाऊस पडला. येथे पाऊस मोठ्या प्रमाणात आणि अनिश्‍चित वेळी येतो. आमच्यासाठी येथील वातावरण, परिस्थिती आणि प्रदेश नवीन होता. आम्ही गुरुदेवांच्या कृपेची अनुभूती घेत होतो. आम्हाला त्यांच्या अस्तित्त्वाची पदोपदी जाणीव होत होती आणि आमच्याभोवती त्यांचे संरक्षककवच असल्याचेही आम्हाला जाणवत होते. या सर्व दैवी कवचांच्या आधारेच आमचा हा प्रवास चालू असल्याची जाणीव आम्हाला प्रवासाच्या आरंभापासून झाली होती. आम्हाला बारूस येथे पोहोचण्यास दुपारचे ४ वाजले.

सुमात्रा बेटावर आढळणारे कापराचे झाड वर्तुळात दाखवले आहे

 

२. बारूस येथे गेल्यावर गुरुकृपेने अनेक अडथळे
पार करत कापराच्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रवास

२ अ. बारूस येथे रहाण्याची सोय चांगली नसल्याने सिबोल्गा या गावात रहाणे

बारूस येथे पोहोचल्यावर आमच्या लक्षात आले, ‘तेथे रहाण्याची चांगली सोय नाही.’ त्यामुळे आम्हाला रहाण्याची सोय येथूून अडीच घंट्याच्या अंतरावर असलेल्या सिबोल्गा या गावात करावी लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी पू. रेन्डीदादांना सेवेसाठी जाकार्ता येथे परत जावे लागणार होते.

२ आ. श्री. मलाऊ यांना इंग्रजी भाषा फारशी येत नसल्याने त्यांना
प्रश्‍न विचारतांना इंग्रजी भाषेतील अगदी सोप्या शब्दांचा उपयोग करावा लागणे

श्री. मलाऊ यांच्या समवेत आम्हा दोघांनाच प्रवास करणे क्रमप्राप्त होते. आम्हाला स्थानिक भाषा येत नसल्यामुळे ‘येथील स्थानिक लोकांशी कसा संपर्क करायचा ?’, हा आमच्यासमोर प्रश्‍न होता. श्री. मलाऊ यांना इंग्रजी भाषा फारशी येत नसल्याने त्यांना प्रश्‍न विचारतांना इंग्रजी भाषेतील अगदी सोप्या शब्दांचा उपयोग करावा लागत असे. सुमात्रा येथील बोलीभाषा ‘बाटकनीस’ ही असून जाकार्ता किंवा इंडोनेशिया येथील अन्य भागांतील बाहासा भाषेपेक्षा ती निराळी आहे. श्री. मलाऊ जे सांगतील, त्यावर विश्‍वास ठेवण्याविना आमच्यासमोर अन्य पर्याय नव्हता.

२ इ. श्री. मलाऊ यांच्याकडून मिळालेल्या माहितीविषयी समाधान
न झाल्यास त्यांना पुढील प्रश्‍न विचारले जाणे, मनाला समाधान वाटल्यास मनात प्रश्‍न
उमटणे आपोआपच थांबणे आणि त्या वेळी ‘गुरुसेवेतील केवळ एक माध्यम आहोत’, याची जाणीव होणे

गुरुदेवांच्या कृपेने श्री. मलाऊ यांनी आम्हाला बरीच माहिती दिली, तसेच स्थानिक लोकांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलेली सूत्रे आम्हाला भाषांतरित करूनसुद्धा सांगितली.

या सर्व प्रसंगात मला गुरुदेवांच्या शिकवणीचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. ‘समोरील व्यक्ती काय सांगत आहे ? त्याविषयी मनाला काय संवेदना जाणवतात ? अजून काही माहिती मिळणे किंवा काही विचारायचे राहिले आहे का ?’, असे निरनिराळे प्रश्‍न मनातूनच देवाला विचारून त्यावर जे उत्तर येते, त्यानुसार माझी पुढील कृती होत असे. मिळालेल्या माहितीविषयी समाधान झाले नाही, तर पुढील प्रश्‍न विचारण्याविषयी विचार मनात येऊन त्या अनुषंगाने माझ्याकडून प्रश्‍न विचारले जात होते आणि मनाला समाधान वाटल्यास मनात प्रश्‍न उमटणे आपोआपच थांबत असे. ही प्रक्रिया माझ्या नकळत घडत असून ती गतीने होत असल्याची अनुभूती मी प्रथमच घेत होतो. या सगळ्यांचे चिंतन करतांना ‘आपण खरोखरच गुरुसेवेतील केवळ एक माध्यम आहोत आणि खर्‍या अर्थाने आपले काहीच अस्तित्व नाही’, याची माझ्या मनाला तीव्रतेने जाणीव होत होती. त्या वेळी गुरूंनी आपल्याला त्यांच्या कार्यातील एक माध्यम म्हणून निवडले असल्याच्या जाणिवेने माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

२ ई. कापराच्या झाडाजवळ जाण्यासाठी पायवाट नसल्याने
वनस्पतींची मुळे आणि डोंगरांचे दगड यांचा आधार घेत सरपटत डोंगर चढावा लागणे

२०.४.२०१८ या दिवशी दुपारी आम्ही एका गावामधील श्री. बारुबु या स्थानिक व्यक्तीकडे कापराच्या झाडाविषयी माहिती विचारली असता त्यांनी एका झाडाविषयी सांगितले. श्री. बारुबु यांच्यासह आम्ही त्या झाडाकडे जाणार्‍या वाटेजवळ आलो. येथील कापराचे झाड कोवळे होते. त्यातून कापूर मिळणार नव्हता. श्री. बारुबु यांनी आम्हाला वाट दाखवल्यावर आमच्या लक्षात आले, ‘कापराच्या झाडाजवळ जाणे अत्यंत कठीण आहे.’ आम्हाला सरपटत डोंगर चढावा लागला.

२ उ. स्थानदेवता आणि वास्तुदेवता यांना प्रार्थना केल्यावर चक्कर येणे थांबणे

‘तेथे जाण्यासाठी डोंगर चढतांना मला अकस्मात गरगरल्यासारखे झाले. ‘मी चक्कर येऊन पडतो कि काय ?’, असे मला वाटले. तेव्हा मी तेथेच बसलो. ‘या आधी मला असे कधीही झाले नव्हते. मग आज मला असा त्रास का झाला ?’, याचा मी विचार करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘येथे येण्याआधी मी स्थानदेवता आणि वास्तुदेवता यांना प्रार्थना केली नव्हती.’ देवाने मला माझी चूक लक्षात आणून दिली. मी लगेच वास्तुदेवतेची क्षमा मागितली आणि ‘पुढील सेवा निर्विघ्नपणे करता यावी’, यासाठी प्रार्थना केली. मी प्रार्थना केल्यानंतर काही वेळातच माझे गरगरणे थांबले आणि मला बरे वाटू लागले.’

– श्री. स्नेहल राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ ऊ. डोंगर चढतांना पायाखाली भुसभुशीत माती असणे आणि
पुढील अर्धी चढण केवळ ईश्‍वराच्या नामाच्या जोरावरच झाल्याची अनुभूती येणे

‘तेथे कोणत्याही प्रकारची पायवाट नव्हती. वन्य वनस्पतींची मुळे आणि डोंगरांचे दगड यांचा आधार घेतच आम्हाला वर चढावे लागत होते. आधारासाठी वन्य वनस्पतींची मुळे पकडतांना आमचा सरपटणार्‍या प्राण्याच्या एखाद्या बिळात हात जाण्याची शक्यता होती आणि ‘ते आमच्या लक्षातही येणार नाही’, अशी स्थिती होती. श्री. बारुबु यांच्या समवेत आम्ही दोघेच होतो. आमचा चित्रीकरण करण्याचा आणि छायाचित्रे काढण्याचा विचार होता; परंतु अर्धी चढाई केल्यावर मात्र आम्हाला आमच्या शारीरिक क्षमतेची मर्यादा लक्षात आली. पुढील अर्धी चढण केवळ ईश्‍वराच्या नामाच्या जोरावरच झाल्याची अनुभूती मी घेतली. कापराच्या झाडाजवळ जाण्याच्या या चढाईत लक्षात आले, ‘पाय ठेवलेली मातीसुद्धा भुसभुशीत होती आणि कोणत्याही क्षणी ती ढासळू शकली असती. पायाखालील माती ढासळल्यास आमच्या वर असलेल्या डोंगराचा मोठा भाग ढासळून मोठा अपघातही होऊ शकला असता.’ केवळ ईश्‍वराच्या कृपेमुळे आणि गुरुदेवांच्या संकल्पाने ही सेवा त्यांनी आमच्या माध्यमातून निर्विघ्नपणे करवून घेतल्याचे माझ्या लक्षात आले.

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील बारूस येथे असलेल्या एका कापराच्या झाडाचे कपचे तोडतांना श्री. बारुबु

२ ए. श्री. बारुबु यांनी कापराच्या झाडाचे कपचे आणि पानांच्या
डहाळ्या दिल्यावर आनंद होणे, हातात कॅमेरा अन् झाडाचे भाग घेऊन खाली
उतरणे कठीण असल्याने ते साहित्य खाली घेऊन जाण्यासाठी श्री. बारुबु यांचे साहाय्य घेणे

झाडाच्या जवळ गेल्यावर श्री. बारुबु यांनी आम्हाला झाडाचे कपचे आणि पानांच्या डहाळ्या तोडून दिल्या. या वस्तू हातात मिळाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला; मात्र माझा आनंद थोड्याच वेळात मावळला. माझ्या हातात चित्रीकरणासाठी लागणारा कॅमेरा आणि श्री. बारुबु यांनी तोडून दिलेले झाडाचे भाग होते. तेथून खाली उतरणे वर चढण्याहून अधिक कठीण होते. खाली उतरण्यासाठी केवळ समोर दिसणार्‍या झाडांचा आणि फांद्यांचा आधार होता. ‘मिळेल त्या ठिकाणी पाऊल ठेवायचे आणि खाली घसरत जायचे’, हीच खाली उतरण्याची पद्धत होती. श्री. बारुबु यांना त्याची सवय असल्यामुळे ते अतिशय सहजतेने खाली गेले. मी एका टप्प्यापर्यंत आल्यावर मला हातातील साहित्य घेऊन खाली उतरणे शक्य होत नव्हते; म्हणून मी श्री. बारुबु यांना माझ्याजवळ येण्याची विनंती केली. ते ज्या सहजतेने खाली गेले, त्याच सहजतेने माझ्याजवळ आले आणि माझ्या हातातील साहित्य घेऊन पुन्हा तितक्याच सहजतेने खाली उतरून गेले. त्यांना पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. त्यानंतर मी दिसेल त्या फांदीचा आधार घेत खाली आलो.

२ ऐ. डोंगर उतरतांना स्वतःला सांभाळतांना मनगटावर
जोर पडल्याने सूज येणे आणि दुसर्‍या दिवशी सूज नाहीशी होणे

या वेळी एके ठिकाणी माझा तोल जात असतांना स्वतःला सांभाळतांना माझ्या मनगटावर जोर पडला. दुसर्‍या दिवशी माझ्या मनगटावर सूज आली होती; परंतु केवळ गुरुदेवांचा आशीर्वाद आणि कृपा यांमुळे दुसर्‍या दिवशीच्या सेवेच्या समाप्तीपर्यंत मनगटाची सूज उतरली आणि वेदनाही न्यून झाल्या. ‘ईश्‍वरच सेवेत असतांना काळजी घेतो’, याची प्रचीती मला या प्रसंगात आली.

२ ओ. समवेत असलेल्या अन्यांच्या शरिरांना जळवा
लागणे; मात्र भगवत्कृपेमुळे साधकांच्या शरिरांना जळवा न लागणे

आम्ही वनाच्या ज्या भागात होतो, तेथे शरिराला जळवा हमखास लागतात. आमच्यासह डोंगरावर न चढता खालीच थांबलेले श्री. मलाऊ आणि पू. रेन्डीदादा या दोघांच्या शरिरालाही जळवा लागल्या. श्री. बारुबु यांच्या शरिरालाही जळवा लागल्या; परंतु आम्हा दोघांच्या शरिराला एकही जळू लागली नाही. यासारखे दुसरे आश्‍चर्य नाही. विशेष म्हणजे २२.४.२०१८ या दिवशी आम्ही या ठिकाणी पुन्हा आलो होतो. त्या वेळीही आम्हाला जळवा लागल्या नाहीत; मात्र श्री. बारुबु यांच्या शरिराला ४ जळवा लागल्या होत्या. दोन्ही वेळा एकसारखा प्रसंग घडलेला पाहून माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञताही व्यक्त होत होती. या वेळी माझ्या लक्षात आले, ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेली साधना, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह केलेले अग्निहोत्र, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि भगवत्कृपा यांमुळे आमच्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले होते. त्यामुळे आम्हाला जळवा लागल्या नाहीत किंवा अन्य कोणताही अनिष्ट प्रकार घडला नाही.’

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील ‘बारूस’ या गावाजवळ असलेल्या उष्ण कटिबंधीय वनांत कापरांची झाडे मोठ्या प्रमाणात असून येथूनच जगात शुद्ध कापराची निर्यात होते. या भागामध्ये ‘कापूर बारूस’ या नावाने कापूर प्रसिद्ध आहे. येथे रहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कापराची माहिती असली, तरी ‘तो वनातून कसा मिळवायचा ?’, यासंबंधी माहिती असलेले मोजकेच लोक आहेत. काही वर्षांपूर्वी बारूसच्या उष्ण कटिबंधीय वनात मोठ्या प्रमाणात कापराची झाडे होती. कापराच्या जागतिक मागणीमुळे झालेल्या वृक्षतोडीच्या तुलनेत झाडांची लागवड नगण्य असल्यामुळे आता बारूस येथून होणार्‍या कापराच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कापराची झाडे मिळणेही दुर्लभ झाल्याचे येथील जाणकार लोकांनी सांगितले. गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासाच्या वेळी आलेले अनुभव, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, अशा सेवेसाठी आम्हाला जाण्याची संधी मिळेल. गुरुकृपेने आम्हाला ही संधी मिळाली. त्यासाठी आम्ही श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.

– श्री. स्नेहल राऊत, श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

२ औ. श्री. विनायक शानभाग यांच्याशी बोलतांना साधकाने
‘गुरुदेवांसाठी काहीही कठीण नाही. तेच काळजी घेत आहेत आणि
पुढेही घेणारच आहेत’, असे सांगणे आणि त्या वेळी साधकाची भावजागृती होणे

पू. रेन्डीदादा जाकार्ता येथे गेल्यानंतरही आमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका नव्हती. सिबोल्गा ते बारूस येथे प्रवासाच्या दरम्यान माझा श्री. विनायक शानभाग यांच्याशी जेथे ‘इंटरनेट’ सुविधा आणि ‘रेंज’ आहे, तेथे संपर्क होत होता. या वेळी मी त्यांना येथील परिस्थितीची माहिती सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना कळवण्यास सांगितली. श्री. विनायक म्हणाले, ‘‘गुरुदेवांच्या सर्वांत कठीण अशा मोहिमेवर तुम्ही आहात.’’ या वेळी माझ्या अंतरंगातून उत्तर उमटले, ‘‘गुरुदेवांसाठी काहीही कठीण नाही. तेच काळजी घेत आहेत आणि पुढेही घेणारच आहेत. त्यामुळे कसलीही काळजी वाटत नाही.’’ अंतरंगातून आलेल्या या उत्तराने माझी भावजागृती झाली. पदोपदी काळजी घेणार्‍या गुरुदेवांच्या चरणी मी मनोमन नतमस्तक झालो. या वेळी माझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू थांबत नव्हते. काही वेळाने या अवस्थेतून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आले, ‘आम्ही बारूस या गावाच्या जवळ पोहोचलो आहोत.’

२ अं. एका जाणकार व्यक्तीने कापूर निर्मितीच्या प्रक्रियेविषयी माहिती सांगणे

बारूस येथे श्री. मलाऊ यांनी आम्हाला एका जाणकार व्यक्तीच्या घरी नेले. तिला कापराच्या झाडांविषयी माहिती असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. तिला सनातनचा सात्त्विक कापूर दाखवल्यावर तिने हा सर्वांत चांगल्या प्रतीचा आणि शुद्ध कापूर असल्याचे आम्हाला सांगितले. तिने सांगितले, ‘‘बारूस येथे कापराच्या झाडांतून मिळणारा कापूरही असाच असतो.’’ या वेळी श्री. मलाऊ यांच्याशी बाटकनीस भाषेत तिचे संभाषण होत होते. श्री. मलाऊ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘कापराच्या झाडाच्या गाभ्यात कापूर निर्माण होतो. हा कापूर निर्माण होण्यासाठी ५० ते १५० वर्षांचा कालावधी लागू शकतो. ‘या कालावधीत त्या वृक्षाची वाढ किती सकसपणे झाली आहे’, त्यावर कापराचे उत्पन्न ठरते. झाडातून कापूर येण्यासाठी त्या वृक्षाला स्वतःचे अस्तित्व संपवावे लागते. वृक्ष कापल्यानंतर त्याच्या गाभ्यामध्ये पांढर्‍या रंगाचा कापूर असतो. कापराला मूलतः ‘चंद्रभस्म’ असे म्हणतात.’’

कापराच्या झाडातून कापूर काढण्याची प्रक्रिया !

साधारणतः ५० ते १५० वर्षे आयुष्य असलेल्या कापराच्या झाडाच्या बुंध्यातून कापूर मिळतो. एका झाडाचा बुंधा कापतांना श्री. मलाऊ ! झाडातून कापूर येण्यासाठी त्या वृक्षाला स्वतःचे अस्तित्व संपवावे लागते !
कापलेल्या बुंध्याला अशा प्रकारे आडवी चीर दिली जाते. बुंध्याच्या गाभ्यात अशा प्रकारे पोकळ भाग असतो. त्यातून कापूर मिळतो. (ज्या ठिकाणी कापूर मिळतो, तो बुंध्याच्या मध्यभागी असलेला भाग गोलात दाखवला आहे.)

२ क. कापराच्या वनात जाण्यासाठी ३ घंटे पायी चालत जावे लागणे

कापराच्या झाडांसंबंधी प्राथमिक माहिती घेऊन आम्ही कापराच्या वनात जाण्यास निघालो. आम्ही आता उष्ण कटिबंधीय जंगलांच्या गर्भात प्रवेश करणार होतो. येथे कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता असते. त्या वेळी वातावरण मोकळे असल्याने आधी वनात जाऊन कापराच्या वृक्षांची छायाचित्रे काढून आणि चित्रीकरण पूर्ण करून परत येण्याच्या विचाराने आम्ही वनाच्या दिशेने प्रवास चालू केला. आम्हाला हा सर्व प्रवास पायी करायचा होता. या प्रवासाला ३ घंटे लागणार होते. अशा वनात जाण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव असल्यामुळे ‘तेथील परिस्थिती आणि पुढे काय होणार आहे ? प्रवासात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे ?’, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. श्री. मलाऊ यांनी त्यांच्या ओळखीने वृक्ष तोडण्यासाठी अजून ३ जणांना समवेत येण्यास सांगितले होते. त्यांनी वृक्ष कापण्यासाठी यंत्रही आणले होते.

 

कापराच्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी
घनदाट जंगल, दर्‍या, ओढे, यांतून केलेला खडतर प्रवास !

१. जंगलच असल्यामुळे वाटेत येणारे ओढे, नाले, चढ-उतार पार करण्यासाठी अशा प्रकारे झाडाच्याच अरुंद अशा बुंध्याचा आधार घेत चालतांना श्री. स्नेहल राऊत आणि त्यांच्यामागे श्री. मलाऊ
२. सतत पडणार्‍या पावसामुळे चिंब भिजलेल्या स्थितीत गुडघ्याएवढे पाणी असलेल्या ओढ्यातून जातांना श्री. स्नेहल राऊत

 

२ ख. वनात प्रवेश करतांना ओढे पार करावे लागणे, पुष्कळ पाऊस पडत
असल्याने ओढ्यातील पाण्याची पातळी वाढणे आणि पुढे जातांना वन अधिकाधिक घनदाट होत जाणे

आम्ही वनात जाण्यासाठी निघतांनाच पाऊस पडायला आरंभ झाला होता. वन घनदाट होते. आम्ही जसजसे वनाच्या आतील भागात जाऊ लागलो, तसतसा पावसाचा जोरही वाढत होता. सभोवती घनदाट वन आणि मुसळधार पाऊस यांमुळे तेथील स्थिती भीतीदायक होती. वनात प्रवेश करतांना आरंभीच्या २० मिनिटांच्या प्रवासातच आम्ही २ वेळा घोट्याएवढ्या पाणी असलेला ओढा पार केला, तर २ वेळा पडलेल्या झाडाच्या खोडावरून तोल सांभाळत खोल खड्डे ओलांडून गेलो. आम्ही जसे पुढे-पुढे जात होतो, तसतसे वन घनदाट होत होते आणि जोरदार पाऊसही चालू झाला. ‘आमचा वनात जाण्याचा हा अनुभव विलक्षण असणार आहे’, याची आम्हाला कल्पना येऊ लागली. आम्ही आमच्या समवेत चित्रीकरण करण्याचे आणि छायाचित्र काढण्याचे साहित्य घेतले होते; परंतु पावसामुळे आम्हाला कॅमेरे बाहेर काढणे कठीण झाले होते. आम्ही दीड घंटा चालून वनात आत-आत गेलो होतो. या वेळी आम्हाला ७ – ८ वेळा ओढा ओलांडावा लागला. आम्हाला प्रत्येक ७ – ८ मिनिटांनी ओढा ओलांडत पुढे वाटचाल करावी लागत होती. पुष्कळ पाऊस पडत असल्याने आम्ही चिंब भिजलो होतो. आम्ही वनातच केलेल्या एका आश्रयस्थानी थांबलो.

२ ग. साधनेमुळे वनातून जात असतांना स्वतःत एक विलक्षण ऊर्जा असल्याचे जाणवणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू आमच्याकडून प्रतिदिन अग्निहोत्र करवून घेत असल्यामुळे, तसेच योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेली साधना आम्ही करत असल्यामुळे वनात जातांना तेथील वातावरणाचा माझ्या मनावर काही परिणाम होत नव्हता. वनातून जात असतांना प्रत्येकी ५ ते ७ मिनिटांनी तेथील ओढा ओलांडून जावे लागत असे. या वेळी मनात चालू असलेल्या नामजपामुळे स्वतःत एक विलक्षण ऊर्जा असल्याची मला जाणीव होत होती.’

२ घ. वनात भेटलेल्या व्यक्तीने ‘पुढे जाणे धोक्याचे ठरेल’,
असे सांगितल्यावर तेथूनच परत मागे फिरण्याचा निर्णय घेणे

‘आम्ही वनात जात असतांना आमच्या समवेत ४ गावकरी होते. गावाकडे परतणार्‍या एका व्यक्तीने आमची विचारपूस केली. आम्ही एके ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबलो. या ठिकाणी ७ फूट उंचीवर एक झोपडी बांधलेली होती. शेजारीच ओढा होता. गावकर्‍यांची आपापसात पुढे जाण्याविषयी चर्चा चालू होती. आमच्या समवेत असलेले श्री. मलाऊ यांनी आम्हाला सांगितले, तिने सांगितले, ‘‘पुढे वनात जाणे धोक्याचे ठरेल. पाऊस असाच पडत राहिल्यास डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी ओढ्यात पडत असल्याने ओढ्यातील पाण्याची पातळी पाणी वाढते. काही करून तुम्ही वनात इप्सित ठिकाणी पोहोचलात, तरी पुढील २४ घंट्यांत तुम्हाला परतणे शक्य होणार नाही. तोपर्यंत ओढ्याचे पाणी वाढलेले असेल आणि परतीचा मार्ग बंद झालेला असेल. संपूर्ण रात्र या घनदाट जंगलात अन्न-पाण्याविना आणि पावसात भिजत काढावी लागेल.’’ अशा स्थितीत आम्हाला वनातच ठिकठिकाणी उभारलेल्या झोपड्यांमध्ये वेळ काढावा लागला असता.

आम्ही वनातील कापराच्या झाडापासून २ कि.मी. अंतरावर होतो. असे असले, तरी एकंदर स्थिती पहाता आम्हाला मागे फिरणे अपरिहार्य होते. या वेळी माझ्या लक्षात आले, ‘एरव्ही अशा प्रसंगात ध्येयाच्या इतक्या जवळ जाऊन मागे फिरतांना मन निराश झाले असते; मात्र या प्रसंगाकडे ईश्‍वरेच्छेने पहाता येत असल्यामुळे निराशा येण्याऐवजी आनंद मिळून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.’

– श्री. सत्यकाम कणगलेकर आणि श्री. स्नेहल राऊत

२ च. वनात भेटलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून भगवंत
आमच्या रक्षणासाठी आला असल्याचे जाणवणे, वनातून परत येतांनाही
मनात कोणताही विकल्प न येता ‘जे घडत आहे, ती सर्व ईश्‍वरेच्छा !’, असा भाव मनात असणे

‘या वेळी ईश्‍वर पदोपदी आमचे रक्षण करत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘वनात भेटलेल्या त्या व्यक्तीच्या माध्यमातून भगवंत आमच्या रक्षणासाठी आला होता’, हे माझ्या लक्षात आले. वनातून परत येतांनाही आमच्या मनात कोणताही विकल्प न येता ‘जे घडत आहे, ती सर्व ईश्‍वरेच्छा !’, असा भाव होता. आमचे मन स्थिर आणि कृतज्ञतेने भरलेले होते. वनातून परततांना आमच्या लक्षात आले, ‘ओढा ओलांडतांना घोट्यापर्यंत असलेले पाणी आता गुडघ्यापर्यंत आले आहे आणि त्याचा प्रवाहसुद्धा वाढला आहे.’ त्यामुळे परतण्याचा निर्णय घेण्याची बुद्धी देवानेच आम्हाला दिली होती आणि ‘तोच आमच्याकडून योग्य कृती करवून घेत आहे’, याबद्दल आमच्याकडून त्याच्याप्रती मनोमन कृतज्ञता व्यक्त होत होती.

बारूस येथील जंगलात आढळणार्‍या कापराच्या एका झाडाचे खोड

 

३. एका व्यक्तीच्या जागेत असलेल्या कापराचा
वृक्ष पहाण्यासाठी जातांना आलेल्या अडचणी आणि अनुभवलेली गुरुकृपा

बारूस येथे आढळणार्‍या शुद्ध भीमसेनी कापराच्या वृक्षाचे भाग

कापराच्या झाडाचे रोप
कापराच्या झाडाचे कपचे

३ अ. कापराचा वृक्ष पाहून भावजागृती होणे

आम्ही वनातून परतल्यावर पावसाचा जोर न्यून झाला होता. तेथील एका स्थानिक व्यक्तीने आम्हाला सांगितले, ‘‘येथून दीड किलोमीटर अंतरावर रहात असलेल्या एका व्यक्तीच्या जागेत कापराचा एक वृक्ष आहे. त्या ठिकाणी असलेल्या अन्य वृक्षांतून तिने कापूर काढून घेतला असला, तरी तुम्हाला हे तोडलेले वृक्ष पहायला मिळू शकतात.’’ तेव्हा आम्ही तेथे जाण्याचे ठरवून लगेचच निघालो. आम्हाला लांबूनच कापराच्या एका वृक्षाचे दर्शन घडले. कापराच्या वृक्षाला पाहून आमची भावजागृती झाली आणि आम्हाला गदगदून आले.

श्री. सत्यकाम कणगलेकर यांचा सदरा बारूस येथील घनदाट जंगलातील एका वनस्पतीच्या काट्यांमध्ये अडकल्याचा क्षण ! (गोलात वनस्पतीच्या काट्यांचा भाग मोठा करून दाखवला आहे.)

३ आ. पाऊस पडल्यामुळे निसरडी झालेली पाऊलवाट
आणि वेळूसारख्या वनस्पतींना असलेले काटे यांतून मार्ग काढावा लागणे

४०० मीटर अंतरावरून तो वृक्ष पहातांना आम्हाला वेगळेच तेज जाणवत होते. आम्ही लगेचच झाडाच्या दिशेने निघालो. तेथे जायला कोणतीही पाऊलवाट नव्हती, तसेच पाऊस पडल्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. आम्हाला ५०० मीटर उंचीवरून खाली उतरून जायचे होते. ‘पाऊल घसरले, तर थेट त्या दरीतच कोसळणार’, अशी स्थिती होती. या ठिकाणी आणि आम्ही आधी गेलेल्या वनांतही अतिशय तीक्ष्ण काटे असलेल्या वेळूसारख्या वनस्पती होत्या. या वनस्पतींची उंची अधिक असून त्यांचे काटे दीड ते दोन इंच लांबीचे होते. या काट्यांमध्ये कुणी अडकल्यास त्याला चांगलीच इजा होईल. या वेळूच्या अग्रभागांवर असलेले आणि चटकन लक्षात न येणारे काटे चालतांना एखाद्याच्या नकळत त्याच्या कपड्यांमध्ये अडकून त्याला मागे खेचतात. काट्यांत अडकलेली व्यक्ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतांना तिच्या हाताला काटे लागतात. सहकार्‍यांनी अशा अडकलेल्या व्यक्तीला सोडवणे आवश्यक असते.

३ इ. समवेत आलेल्या व्यक्तीने ‘वृक्षातून कापूर कसा काढतात ?’, हे दाखवणे

आम्ही खाली उतरून गेल्यावर मला ‘तेथे ३ – ४ वृक्ष आधीच कापले आहेत’, असे दिसले. आम्हाला तेथे घेऊन गेलेल्या व्यक्तीने हे कापराचे वृक्ष असून त्यांतून आधीच कापूर काढून घेतला असल्याचे आम्हाला खुणावून सांगितले. त्यांनी आम्हाला ‘वृक्षातून कापूर कसा काढतात ?’, हे दाखवले. त्यांनी एका वृक्षाच्या खोडामध्ये असलेल्या भोकाकडे बोट करून ‘येथे कापूर असतो’, असे सांगितले, तसेच एका खोडाला उभे चिरलेले दाखवून यातून कापूर काढून घेतला असल्याचेही सांगितले.

३ ई. पायांखाली सर्वत्र चिखल किंवा तोडलेल्या वृक्षांचे अवशेष
असणे, सभोवती अनेक किडे असूनही गुरुकृपेने कोणताही कीडा जवळ
न येणे आणि कापराच्या झाडाचे एक रोप अन् कापलेल्या वृक्षाचे काही कपचे मिळणे

तोडलेल्या या वृक्षांच्या जागेवर पाय ठेवायला आम्हाला भूमी सापडत नव्हती. आमच्या पायांखाली सर्वत्र चिखल किंवा तोडलेल्या वृक्षांचे अवशेष होते. अशातच विविध प्रकारच्या जंगली किड्यांची वाढ होते. ‘हे किडे विषारी आहेत कि बिनविषारी’, हेसुद्धा कळणे कठीणच होते. मला ८ – ९ इंच लांबीची एक गोम दिसली. तेवढ्यात काळ्या रंगाची एक गोम क्षणार्धात पानांमध्ये मिसळून गेली. हे सर्व किडे पहातांना आमच्या अंगावर शिरशिरी येत होती; परंतु आम्हाला भीती वाटत नव्हती. येथे कोणताही कीडा आमच्याजवळ आला नाही. हे सर्व केवळ गुरुदेवांच्या आमच्याभोवती असलेल्या संरक्षककवचामुळेच शक्य झाले. येथे आम्हाला कापराच्या झाडाचे एक रोप, कापलेल्या वृक्षाचे काही कपचे, अशा वस्तू मिळाल्या. त्या घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.

३ उ. दिवसात ३ वेळा मुसळधार पावसात भिजल्याने दिवसभर ओलेत्यानेच सेवा करणे,
‘देवाने त्याच्या समष्टी रूपाची सेवा ओलेत्याने करवून घेतली’, या विचाराने भावजागृती होणे

मार्गात आम्हाला ‘डोलोकसांगोल’ या गावात सांब्राण्णी धूप आणि बारूस येथून कापराच्या झाडांतून मिळणार्‍या कापरावर प्रक्रिया केलेला कापूर (प्रोसेस्ड कापूर) मिळाला. नंतर आम्ही समोसीर या गावाकडे जाण्यास निघालो. या एका दिवसाच्या प्रवासात आम्ही ३ वेळा मुसळधार पावसात साहित्य मिळवण्यासाठी किंवा वृक्ष पहाण्यासाठी भिजलो. रात्री खोलीवर पोहोचेपर्यंत आम्ही ओलेत्यानेच सेवा करत होतो. या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘देवाची पूजा ओलेत्याने करण्याची पद्धत आहे. देवाने आमच्याकडूनही आज त्याच्या समष्टी रूपाची सेवा ओलेत्याने करवून घेतली आहे.’ या विचाराने माझी भावजागृती झाली. आम्हाला खोलीवर पोहोचायला रात्रीचे १२.३० वाजून गेले होते.

३ ऊ. पायाची कातडी पाण्याने भिजून पांढरी पडून मऊ होणे; मात्र त्वचेला सुरकुत्या न पडणे

आम्ही खोलीवर पोहोचल्यानंतर पायातील बूट आणि मोजे काढल्यावर आम्हाला पायाची कातडी पाण्याने भिजून पांढरी पडून मऊ झाल्याचे लक्षात आले; मात्र ‘पाण्यात भिजल्यामुळे एरव्ही त्वचेला पडणार्‍या सुरकुत्या या वेळी नव्हत्या’, हे आम्हाला विशेष वाटले. समोसीर येथे सर्व साहित्य व्यवस्थित भरून आम्ही मेडानच्या दिशेने प्रवास चालू केला.

– श्री. सत्यकाम कणगलेकर
१. सुमात्रा बेटावर असलेल्या बारूस येथील याच घनदाट वनामध्ये कापराची झाडे आढळतात

 

४. परतीचा प्रवास

४ अ. मेडान शहराच्या जवळ एके ठिकाणी वटवाघळे पिंजर्‍यात ठेवलेली
दिसणे आणि वटवाघळाचे मांस सांधेदुखी अन् अस्थमा या रोगांवर उपयुक्त असल्याचे समजणे

मोसीर येथून मेडानचा प्रवास ८ घंट्यांचा होता. या प्रवासातही आम्हाला पाऊस लागला. मेडान जवळ येऊ लागल्यावर पावसाचे प्रमाण न्यून झाले. मेडान शहराच्या जवळ एके ठिकाणी आम्हाला बरीच वटवाघळे पिंजर्‍यात ठेवलेली दिसली. आम्ही त्यांची छायाचित्रे काढली आणि चित्रीकरण केले. त्यांना असे का ठेवले आहे ?, असे आम्ही तेथील मालकांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ज्या लोकांना सांधेदुखी किंवा अस्थमाचा त्रास आहे, अशांनी वटवाघळाचे मांस खाल्ल्यास हे आजार न्यून होतात. हे ऐकून आम्ही आश्‍चर्यचकित झालो. यापूर्वी झालेल्या प्रवासाच्या काळात लोक निरनिराळे प्राणी आणि कीटक खात असलेले पाहिले होते; परंतु वटवाघूळ खाणारे लोक आहेत, हे आम्ही प्रथमच पाहिले.

२. मेडान शहरात पिंजर्‍यात ठेवलेली वटवाघळे ! वटवाघळाचे मांस सांधेदुखी आणि अस्थमा या रोगांवर उपयुक्त असल्याचा तेथील लोकांचा अनुभव आहे. (वटवाघळ्यांना गोलात मोठे करून दाखवले आहे.)

४ आ. सर्व साहित्याची पुनर्बांधणी करणे

आम्ही रात्री मेडान येथे खोलीवर पोहोचलो. दुसर्‍या दिवशी आमचा भारतात परतण्याचा प्रवास चालू होणार होता. सकाळी उठून आम्ही जतन करण्यासाठी घेतलेल्या सर्व साहित्याची पुनर्बांधणी चांगल्या प्रकारे केली. विमानाचा प्रवास असल्यामुळे आम्हाला दोघांना मिळून ५० किलोचे साहित्य नेता येणार होते. साहित्याची बांधणी केल्यावर आम्ही त्याचे पुन्हा वजन केले. तेव्हा वजन ५१ किलो असल्याचे लक्षात आले. आम्ही अन्य साहित्य आमच्या हातात घेतले होते.

४ इ. विमानतळावर झालेेली साहित्याची तपासणी आणि आलेली अनुभूती

४ इ १. विमानतळावर साहित्याची तपासणी करतांना तेथील अधिकार्‍यांनी बॅगा उघडून दाखवण्यास सांगणे आणि सर्व साहित्य भारतातील गोवा येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयामध्ये जतन करणार असल्याचे त्यांना सांगणे

विमानतळावर पोहोचल्यावर प्रवेशद्वारावर तपासणी यंत्राद्वारे (एक्स-रे मशीनमधून) साहित्य पडताळावे लागते. साहित्याची तपासणी करतांना तेथील अधिकार्‍यांनी आम्हाला अडवले आणि बॅगा उघडून दाखवण्यास सांगितले. आम्ही बॅगा उघडून दाखवल्या आणि सर्व साहित्य भारतातील गोवा येथे होणार असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयामध्ये जतन करणार असल्याचे सांगितले. आम्ही त्यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संबंधी माहितीही दिली.

४ इ २. अधिकार्‍यांनी विमानसेवा देणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून अनुमती घेण्यास सांगणे, साधकाने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे माहितीपत्रक बाहेर काढणे, समोर बसलेल्या अधिकार्‍यांनी साहित्य नेण्यास अनुमती देणे आणि माहितीपत्रकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामुळे अधिकार्‍यांच्या विचारांत पालट झाल्याची अनुभूती येणे 

या अधिकार्‍यांनी आम्हाला आम्ही प्रवास करणार असलेल्या विमानसेवा देणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून अनुमती घेण्यास सांगितले. या वेळी श्री. स्नेहल आणि श्री. मलाऊ अनुमती घेण्यासाठी गेले. मी माझ्याजवळ असलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे माहितीपत्रक आणि माझे ओळखपत्र काढून ठेवले. तेव्हा समोर बसलेल्या अधिकार्‍यांनी साहित्यासंबंधी काही अडचण नसून तुम्ही पुढे जाऊ शकता, असे सांगितले. अधिकार्‍यांच्या विचारांतील पालट केवळ त्या माहितीपत्रकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामुळे झाल्याची अनुभूती या वेळी मी प्रत्यक्ष घेतली. गुरुदेवांच्या केवळ छायाचित्रामुळे सर्व कार्य निर्विघ्नपणे घडत असल्याचे या वेळी मला तीव्रतेने जाणवले. त्यांनी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती एकत्रित असते, याची प्रचीती मला दिली. त्यांच्या रूपामुळे म्हणजेच त्यांच्याच अस्तित्वाने हे कार्य घडले. त्यानंतर आम्ही साहित्य देण्यास गेलो. या वेळीही साहित्याचे वजन आवश्यक तेवढेच भरले. आम्ही साहित्याचे वजन केल्यावर आढळलेले १ किलोचे अतिरिक्त साहित्यही विमानसेवेच्या अधिकार्‍यांनी स्वीकारले आणि आम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागले नाहीत.

 

५. दौर्‍यात शिकायला मिळालेले सूत्र – स्वतःला
विसरून ईशस्मरणात रहायचा प्रयत्न करणे, हीच खरी साधना !

चार दिवसांच्या या दौर्‍यात आम्ही प्रत्येक क्षणी ईश्‍वरी अस्तित्वाची अनुभूती घेतली. या प्रवासातून माझ्या मनावर एक सूत्र अंकित झाले, सर्वकाही ईश्‍वरेच्छेने घडते. प्रत्येक क्षण हा पूर्वनियोजित आहे. काळाच्या त्या प्रवाहात स्वतःला विसरून ईशस्मरणात रहायचा प्रयत्न करणे, हीच खरी साधना आहे. खरे पहाता आपले काहीच अस्तित्व नाही. आपण ईश्‍वराचे नामस्मरण करतो आणि आपले ध्येय ईश्‍वरप्राप्ती हे आहे. साध्य म्हणजे ईश्‍वरप्राप्ती आणि साधन म्हणजे नामस्मरण. दोन्ही ईश्‍वरच आहेत. मग स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्‍न येतो कुठे ? कर्ता-करविता ईश्‍वरच आहे. मग मी, माझे, माझ्यासाठी, असे विचार कशाला ?

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०१८)

 

कापराच्या झाडांची तोडणी अन् त्या तुलनेत कापूर देणार्‍या वृक्षांच्या
लागवडीचे अत्यल्प प्रमाण, यांमुळे कापूर मिळणे न्यून होणे आणि झाडातून
कापूर मिळवून त्याची प्रक्रिया करण्याची माहिती सांगणार्‍या व्यक्ती मोजक्याच असणे

आम्ही बारूस येथे गेल्यावर आम्हाला स्थानिक व्यक्तींकडून कळले, पूर्वापार चालत आलेली कापराच्या झाडांतून कापूर मिळवण्याची पद्धत आता बंद पडली आहे. कापराच्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी झालेली कापराच्या झाडांची तोडणी आणि त्याच्या तुलनेत कापूर देणार्‍या वृक्षांच्या लागवडीचे अत्यल्प प्रमाण, यांमुळे वृक्षांतून कापूर मिळणे न्यून झाले आहे. या गावातील कापूर सिद्ध करण्याची पद्धत आता नामशेष झाली आहे. झाडातून कापूर मिळवून त्याची प्रक्रिया करण्याची माहिती सांगणार्‍या व्यक्तीही मोजक्याच आहेत. आता नवीन पिढीला कापूर कसा सिद्ध करतात ?, हे सांगणारे कुणीच नाही. आम्हाला तेथे एका वयस्कर गृहस्थांनी झाडातून कापूर कसा मिळवायचा ? विविध प्रकारचे कापूर आणि ते कसे ओळखायचे ?, यांसंबंधीची माहिती सांगितली. त्या वेळी माझ्या लक्षात आले, आधुनिकतेमुळे नवीन पिढी अशा चांगल्या आणि दैवी ज्ञानापासून वंचित होत आहे.

– श्री. स्नेहल राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment