इंडोनेशियातील बाली द्विपावरील विविध मंदिरे आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास

Article also available in :

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि अध्यात्म
विश्‍वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’

तंपकसिरिंग गावाजवळ असलेल्या तीर्थक्षेत्री स्नान करतांना भाविक
बालीमध्ये ७ सागर मंदिरांपैकी एक असलेले ‘तनाह लोट मंदिर’. बालिनी भाषेत ‘तनाह लोट’ म्हणजे ‘समुद्र भूमी’ असा अर्थ होतो !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
‘इंडोनेशियातील बाली द्विपावर ८७ टक्के लोक हिंदू आहेत. बाली येथील मंदिरांना ‘पूरा’ या नावाने संबोधले जाते. त्यांतील पूरा बेसाखी, पूरा तीर्थ एंपूल, पूरा तनाह लोट आणि पूरा उलुवातू ही प्रमुख आहेत. आज आपण त्यातील पूरा तीर्थ एंपूल, पूरा तनाह लोट आणि पूरा उलुवातू या मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत.
श्री. विनायक शानभाग

 

१. पूरा तीर्थ एंपूल : पवित्र अमृत तीर्थाजवळ असलेले आणि श्रीमन्नारायणासाठी बांधलेले मंदिर

बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिरही आहे. ‘हे मंदिर श्रीमन्नारायणासाठी बांधले असावे’, असे म्हणतात. बाली येथील हिंदू या तीर्थाला ‘पवित्र अमृत तीर्थक्षेत्र’ मानतात. ‘या तीर्थक्षेत्री स्नान केल्याने चर्मरोग आणि इतर व्याधी दूर होतात’, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (छायाचित्र क्र. १ पहा) त्यामुळे अनेक भाविक या तीर्थक्षेत्री स्नान करण्यासाठी येतात. या तीर्थक्षेत्रापासून ५० मीटर अंतरावर मुख्य मंदिर आणि त्या मंदिराच्या शेजारी मुख्य स्वयंभू तीर्थक्षेत्र आहे.

 

२. पूरा तनाह लोट : वरुणदेवता अथवा समुद्रदेवता यांच्यासाठी बांधलेले मंदिर

बालीमध्ये ७ सागर मंदिरे आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘तनाह लोट मंदिर’. (छायाचित्र क्र. २ पहा) बालिनी भाषेत ‘तनाह लोट’ म्हणजे ‘समुद्र भूमी’ असा अर्थ होतो. समुद्र भूमी म्हणण्याचे एक कारण असे की, हे मंदिर समुद्रात; पण भूमीला लागून आहे. बाली येथील हिंदूंचे म्हणणे आहे की, या मंदिराच्या खाली अनेक विषारी नाग आहेत. हे नाग मंदिराचे सतत रक्षण करतात. हे मंदिर निरर्थ नावाच्या एका ऋषींनी वरुणदेवता अथवा समुद्रदेवता यांच्यासाठी बांधलेले मंदिर असावे. हे मंदिर बालीची राजधानी देनपासर या शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे. मंदिरात कोणतीही मूर्ती नसून केवळ एक पूजापीठ आहे. याला ‘पद्मासन’ असे म्हणतात.

 

३. पूरा उलुवातू : रुद्रासाठी बांधलेले मंदिर

बालीची राजधानी देनपासर या शहरापासून दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर पूरा उलुवातू हे मंदिर समुद्र तटावर आहे. समुद्रसपाटीपासून ७० मीटर उंचीवर असलेल्या एका मोठ्या टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिराच्या खाली बघितले, तर तीनही बाजूंनी विशाल असा समुद्र आहे. हे मंदिर बाली येथील ७ सागर मंदिरांपैकी एक आहे. ‘हे मंदिर निरर्थ नावाच्या ऋषींनी रुद्रासाठी बांधले असावे’, असे म्हटले जाते. याच ठिकाणी निरर्थ ऋषी निर्वाण पावले; म्हणून या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्यांच्यासाठी एक उत्सव साजरा केला जातो. या मंदिराच्या परिसरात अनेक माकडे आहेत. येथील माकडांविषयी वैज्ञानिकांनी संशोधन केले असून ही माकडे इतर माकडांपेक्षा वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या मंदिराजवळ प्रतिदिन संध्याकाळी पर्यटकांसाठी स्थानिक पारंपारिक कचक नृत्याचे सादरीकरण असते.’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई

Leave a Comment