इंडोनेशियातील जावा द्विपावरील प्रंबनन मंदिरातील ‘रामायण’ नृत्यनाट्य !

Article also available in :

१. मुसलमानबहुल इंडोनेशियात रामायणाला प्राधान्य दिलेले असणे

‘आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील अनेक लोक पाठिंबा देतात. मुसलमान असले, तरी येथील लोकांची नावे ‘विष्णु’, ‘सूर्य’, ‘राम’, ‘भीष्म’, ‘युधिष्ठिर’, ‘भीम’ अशी आहेत. येथील लोक मुसलमान असले, तरी त्यांनी रामायणाला प्राधान्य दिलेले आहे. जावा द्विपावर श्रीरामाला ‘रामा’, सीतामातेला ‘शिंता’, रावणाला ‘र्‍हावण’, तर लंकेला ‘अलेंकापुरी’ असे म्हणतात.

२. अनेक शतकांपासून जावा द्विपावर रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यकला
प्रसिद्ध असणे आणि आजही प्रतिदिन मंदिराच्या भव्य परिसरात ही कला सादर केली जाणे

जावा हे इंडोनेशियातील सर्वांत मोठे द्वीप असून या द्विपावर अनेक शतकांपासून रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य कला प्रसिद्ध आहे. योग्यकर्ता शहरापासून १७ कि.मी. अंतरावर प्रंबनन नावाचे गाव आहे. येथे ‘चंडी प्रंबनन’ नावाचा मंदिरांचा समूह आहे. ‘चंडी’ म्हणजे मंदिर आणि ‘प्रंबनन’ म्हणजे परब्रह्मन्. ‘परब्रह्म मंदिर समूह’ असा याचा अर्थ होतो. एके काळी विश्‍वातील सर्वांत उंच असलेले हे मंदिर बघण्यासाठी प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. या मंदिराच्या भव्य परिसरात प्रतिदिन संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य सादर केले जाते. उन्हाळाच्या दिवसांत हे नृत्यनाट्य मंदिराच्या बाहेरच्या परिसरात एका मोठ्या व्यासपिठावर सादर केले जाते, तर पावसाळ्यात एका सभागृहात (‘इंडोर स्टेडियम’मध्ये) सादर केले जाते.

नृत्यनाट्यात सीता स्वयंवराच्या वेळी प्रभु श्रीरामचंद्र धनुष्य उचलण्याचा प्रसंग सादर करतांना कलाकार
सीताहरण करणार्‍या रावणाशी जटायूने युद्ध केले. त्या वेळी रावणाने त्याचा वध केल्याचा प्रसंग सादर करतांना कलाकार
हनुमंताने सीतामातेला भेटून श्रीरामाची मुद्रिका (अंगठी) भेट दिल्याचा प्रसंग सादर करणारे कलाकार

३. जावा द्वीपावरील रामायणावर आधारित
नृत्यनाट्यातील काही प्रसंग आणि या नृत्यनाट्याची वैशिष्ट्ये

या नृत्यनाट्यात सीता स्वयंवर, मारिचाने सुवर्णमृगाचे रूप धारण करणे, सीतेच्या सांगण्यावरून राम आणि लक्ष्मण त्या मृगाच्या मागे जाणे, रावणाने सीताहरण करणे, रावणाने जटायूचा वध करणे, हनुमंताने सीतेला भेटून श्रीरामाची मुद्रिका (अंगठी) देणे, हनुमंताने लंकादहन करणे, राम-रावण युद्ध, सीतामातेने अग्नीपरिक्षा देणे असे प्रसंग अतिशय सुंदर भावमुद्रेत सादर केले जातात.

इंडोनेशियातील जावा बेटावरील हे एक पारंपरिक नृत्यनाट्य असून २० कलाकार हे नृत्यनाट्य अतिशय सुंदर भावमुद्रेत सादर करतात. या नृत्यनाट्याला अनुरूप असे पारंपरिक संगीत असते. सूत्रसंचालक मधून-मधून पार्श्‍वभूमी सांगून कथा पुढे नेतात. नृत्यनाट्याचे संगीत ‘जावानीस्’ भाषेत असले, तरी कलाकारांच्या भावमुद्रेतून कथा कळणे सोपे जाते. नृत्यनाट्य पहातांना पूर्णवेळ डोळे नृत्यनाट्याकडे केंद्रित असतात. सुंदर प्रस्तुतीकरणामुळे ‘आपण प्रत्यक्षात ‘रामायण’ पहात आहोत’, असे वाटते.

४. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टर, आपण नेहमी सांगता, ‘‘पृथ्वीवर कितीही महान पुरुष आणि राजे होऊन गेले, तरी श्रीराम अन् श्रीकृष्ण यांना लोक कधीही विसरणार नाहीत; कारण ते देवाचे अवतार होते.’’ भारतापासून दूर असलेल्या इंडोनेशियात अजूनही तेथील लोकांनी रामायण नृत्यनाट्याच्या माध्यमातून रामाचे आदर्श जपले आहेत. ‘रामायण’ प्रत्यक्षात घडून युगानुयुगे झाली, तरी वेगवेगळ्या रूपांत रामायणाची कथा विश्‍वात अनेक ठिकाणी सांगितली जाते. श्रीमन्नारायण स्वरूप श्रीरामाची लीला सांगणार्‍या या सर्व भक्तांना त्रिवार वंदन ! ‘परात्पर गुरु डॉक्टर, हे सर्व प्रत्यक्ष अनुभवायला आणि शिकायला मिळाले’, यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

– श्री. विनायक शानभाग, इंडोनेशिया

Leave a Comment