बाटीक नक्षीचे कपडे आणि त्या नक्षीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे इंडोनेशियातील राज्यकर्ते अन् नागरिक !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि
अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘बाटीक’ या शब्दाचा अर्थ आणि कापडावर ती नक्षी काढण्याची पद्धत

‘भारतात जसे खादीचे कापड प्रसिद्ध आहे, तसे इंडोनेशियात ‘सुती बाटीक’ प्रकारची कलाकुसर असलेले राष्ट्रीय कापड प्रसिद्ध आहे. बाटीक हा ‘जावानीस’ भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘लिहिणे किंवा बिंदू किंवा नक्षी काढणे’, असा आहे. मेणामध्ये नैसर्गिक रंग मिसळून विविध रंग बनवले जातात आणि त्यापासून सुती कापडावर हाताने विशिष्ट प्रकारे नक्षीकाम केले जाते. तांबे (कॉपर) या धातूपासून बनवलेल्या शिक्क्यांनीही कापडावर नक्षी काढली जाते. भारतातील राजस्थानमध्ये कपड्यांवर जशी नक्षी असते, तशी ही नक्षी असते. इंडोनेशियात बाटीक नक्षीचा पुष्कळ मोठा व्यवसाय आहे.

२. विविध प्रसंगी घालावयाचे विविध प्रकारची बाटीक नक्षी असलेले कापड

कापडावर करण्यात येणार्‍या नक्षींचेही पारंपरिक वैशिष्ट्य आहे. कुमारिका, तिची आई आणि आजारी व्यक्ती यांच्यासाठी, तसेच दुःखाच्या अन् आनंदाच्या क्षणी परिधान करण्यासाठी, अशा अनेक विविध नक्षी आणि त्या त्या नक्षींचे ठराविक महत्त्व असलेले कापड असते. खास राजकीय पोषाखांतर्गत केवळ राजा आणि राणी, तसेच राजघराण्यातील व्यक्तीच घालू शकतात, अशा वेगळ्या स्वतंत्र नक्षीचे कापडही असते. देशातील विविध प्रांतांचीही ठराविक ‘बाटीक नक्षी’ आहे.

३. ‘पूर्वापार चालत आलेली बाटीक नक्षीची परंपरा जपली जावी’,
यासाठी इंडोनेशिया सरकारने २ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय बाटीक डे’ म्हणून घोषित करणे

इंडोनेशियामध्ये २ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय बाटीक डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तेथील सर्व नागरिक आवर्जून बाटीक वस्त्रे परिधान करतात. येथील माजी राष्ट्रपती आणि शासन यांनीच ‘या व्यवसायाला उत्तेजन मिळावे आणि राष्ट्रीय परंपरेचा भाग असलेल्या बाटीक वस्त्रांचा वारसा पुढेही टिकून रहावा’, यासाठी ‘नागरिकांनी आठवड्यातून न्यूनतम एका दिवशी म्हणजे शुक्रवारी, तसेच राष्ट्रीय सुटीच्या दिवशी बाटीक वस्त्रे परिधान करावीत’, असे आवाहन केले होते. तेथील नागरिक स्वयंस्फूर्तीने केवळ शुक्रवारच नाही, तर गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी बाटीक वस्त्रे परिधान करतात. त्यासाठी कुणालाही आग्रह करावा लागत नाही. ‘देशातील रूढी-परंपरा येथील राजा आणि प्रजा या दोघांनी जपल्या आहेत’, हे शिकण्यासारखे आहे.

४. भारतीय जनतेची उदासीनता

भारतातही खादीचे कापड आहे; पण भारतीय लोक हे कापड मोठ्या प्रमाणात वापरतांना दिसत नाहीत.’

– श्री. दिवाकर आगावणे, नोम फेन, कंबोडिया. (२४.३.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment