दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती

१. सकाळी दूधवाल्याकडून भेसळयुक्त दूध मिळते.

२. कार्यालयात बसने जातांना बसवाहकाकडून फसवणूक होते.

३. रिक्शा किंवा टॅक्सी यांचे भाडे मीटरप्रमाणे घेतले जात नाही. गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांच्या सुटीच्या काळात खाजगी वाहनांचे भाडे दुप्पट-तिप्पट करून जनतेला लुटले जाते.

४. पेट्रोलपंपवाले वाहनात भेसळयुक्त इंधन भरतात किंवा आपल्या रकमेच्या तुलनेत न्यून इंधन देऊन फसवणूक करतात.

५. शासकीय कार्यालये, रुग्णालये, पोलीस ठाणी, न्यायालये येथे लाच दिल्याविना कामे होत नाहीत. (‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मार्च २०१७ मधील अहवालानुसार आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये भारत हा सर्वाधिक लाच देणारा देश आहे.)

६. भाजी किंवा धान्य खरेदी करतांना वजनमापात फसवले जाते किंवा भेसळयुक्त सामान विकत घ्यावे लागते.

७. शाळा-महाविद्यालयात प्रवेशासाठी खंडणीरूपी देणगी द्यावी लागते.

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे. शुद्ध दूध, अन्नधान्य, इंधन आदी मिळणे, हा आपला अधिकार असल्याने त्यासाठी सामाजिक अपप्रवृत्तींविरुद्ध लढले पाहिजे. शासनाकडून भरपूर वेतन मिळूनही जनतेला लुटणार्‍या शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांना धडा शिकवला पाहिजे. अन्याय करणार्‍या सामाजिक आणि शासकीय क्षेत्रांतील दुष्प्रवृत्ती धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे निर्माण झाल्या आहेत. लोकहो, या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींचा अन्याय सहन करू नका, तर त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढून त्यांना रोखा ! हे एकप्रकारचे सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यच आहे.

अन्याय सहन करणार्‍या प्रजेचाही नाश होतो, हे लक्षात घ्या !

राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।

असद्वृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ॥

– रामायण ७.७३.१६

अर्थ : अन्याय सहन करणार्‍या प्रजेचा राजाच्या दोषांनी नाश होतो. राजा दुर्वर्तन करणारा निघाल्यास लोक अकाली मरतात.

अन्यायाचा प्रतिकार करणे, हे दैवी कार्यच आहे, हे लक्षात घ्या !

सर्व ईश्‍वरी अवतार अन्याय संपवण्यासाठीच पृथ्वीवर अवतीर्ण झाले होते. याचाच अर्थ अन्यायाचा प्रतिकार करणे, हे दैवी कार्यच आहे. विश्‍वामित्र ऋषींच्या विनंतीवरून प्रभु श्रीरामाने ताडकावनात राक्षस कुळाकडून ऋषींवर होणारे अन्याय रोखले होते. त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता. त्या वेळी जमलेल्या ऋषींनी प्रभु श्रीरामाला सांगितले की, या अत्याचारी राक्षसांचा प्रतिकार केल्यामुळे आमच्या तपस्येतील चौथा भाग तुम्हाला मिळणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment