रामराज्यासारखी आदर्श राज्यव्यवस्था आणण्यासाठी संघटित व्हा !

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र म्हणजे
विश्‍वकल्याणार्थ कार्यरत असलेल्या सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र !

सर्वप्रथम ‘हिंदु राष्ट्र म्हणजे काय’, हे समजून घेऊया. ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटना अन्य समविचारी संघटनांच्या साहाय्याने भारतात रामराज्यासारखी आदर्श राज्यव्यवस्था असलेले धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविषयी प्रयत्नशील आहेत. काही जणांना ‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, एखाद्या राजकीय पक्षाने मांडलेली संकल्पना आठवते; पण ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना म्हणजे राजकारण नाही, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती अन् राज्यव्यवस्था असेल.

हिंदु राष्ट्र म्हणजे ‘विश्‍वकल्याणार्थ कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र’, असे म्हणता येईल. असे आदर्श हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी भ्रष्ट व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवणे आवश्यक आहे. लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा दिल्याने हे कार्य काही प्रमाणात होईल.

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध
लढा देणे, हा हिंदु राष्ट्र-स्थापनेचा मार्ग !

असंघटित समाजामुळेच लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती समाजाच्या तुलनेत प्रबळ ठरतात. त्यांना धडा शिकवण्यासाठी संघटित होऊन संवैधानिक मार्गाने लढा द्यायला हवा. त्यांच्याविरुद्ध लढा देण्याविषयी जनजागृती केल्यास अन्यायग्रस्त समाजव्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात सक्रीय होईल. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आवश्यक व्यवस्था परिवर्तनासाठीचा हा पहिला टप्पा आहे.

 

अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध जनमानसांत असंतोष
निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळक यांचा आदर्श घ्या !

आपल्याला लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढायचे झाल्यास प्रथम निद्रिस्त झालेल्या समाजाला जागृत करण्यासाठी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाची त्याला जाणीव करून द्यावी लागेल. जोपर्यंत हा समाज आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांविषयी संवेदनशील बनणार नाही, तोपर्यंत तो या कार्यात योगदान देऊ शकणार नाही. या जागृतीतून भ्रष्टाचार आणि अन्याय यांच्या विरोधात व्यापक स्तरावर असंतोष निर्माण होईल. जागृत झालेला समाज राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य स्वयंस्फूर्तीने करतो. यासाठी लोकमान्य टिळकांचे उदाहरण आपण लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्याच्या वेळी इंग्रजांनी टिळकांना ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ म्हणजे ‘भारतीय असंतोषाचे जनक’ संबोधले होते त्यांनी समाजमनामध्ये इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध असंतोष निर्माण करून समाजाला जागृत आणि कृतीशील बनवले होते. अशाच प्रकारचे कार्य लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देऊन आपल्याला करायचे आहे.

 

दुष्प्रवृत्तींविरुद्ध कृती करण्यासाठी
समाजाच्या मनावर हिंदु राष्ट्राचे महत्त्व बिंबवणे

राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार, उघडपणे होत असलेला सामाजिक अन्याय आणि न्यायालयातून विलंबाने मिळणारा न्याय यांमुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्‍वास डळमळीत होत आहे. सर्वसामान्य लोक गोंधळलेल्या मनःस्थितीत असून ते हतबलपणे लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींकडून केले जाणारे अन्याय आणि अत्याचार सहन करत आहेत. त्यांना या अन्यायाच्या विरोधात लढण्यास प्रवृत्त अथवा साहाय्य करतांना आदर्श अशा हिंदु राष्ट्राचे महत्त्व त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन हे सामाजिक कार्य नाही, तर हा व्यवस्था-परिवर्तनाचा, म्हणजेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचाच लढा आहे’, असे गांभीर्य प्रत्येकामध्ये निर्माण झाल्यास हे कार्य अधिक प्रभावी होईल.

 

साधना म्हणून लोकशाहीतील
दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनाचे कार्य करूया !

निःस्वार्थ हेतूने समाजाच्या हितासाठी केलेले कार्य, ही कर्मयोगानुसार समष्टी साधनाच असते. यातही काळानुसार साधना केल्याने अधिक प्रमाणात लाभ होतो. जसे सूर्योदय, सूर्यास्त, तसेच ग्रहणकाळ या संधीकाळात उपासना केल्याने अधिक लाभ होतो, तसाच संधीकाळ सध्या चालू आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य आपल्याला वर्ष २०२३ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्या दृष्टीने यापुढील ६ वर्षांचा काळ हा संधीकाळ असणार आहे. या संधीकाळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य साधना म्हणून केल्यास त्याचा अधिक प्रमाणात लाभ होणार आहे. कालमाहात्म्यानुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. आपण केवळ स्वतःची साधना म्हणून या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनाचे कार्य करायचे आहे.

 

लोकशाहीमुळे अन्यायग्रस्त असणार्‍यांचे संघटन करणे

आजची लोकशाही ही ‘भ्रष्टाचार्‍यांनी भ्रष्टाचारासाठी चालवलेले भ्रष्ट राज्य’ अशी झालेली आहे. भ्रष्ट व्यवस्थेमुळे अनेक जण सामाजिक अन्यायाला बळी पडत आहेत. त्यांतील काही जण एकाकीपणे लढत आहेत, तर काही जण दिशाहीन आहेत, उदा. कोणी राजकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात, कोणी भेसळीच्या विरोधात, कोणी धरणग्रस्तांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात, तर काही जण न्यायालयीन लढा देत आहेत. हेच कार्य सर्वांनी संघटितपणे केले, तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल. काही वेळा काही सूत्रांवर मतभेद असले, तरी या लढ्यातून कोणालाही स्वार्थ साधायचा नसल्याने सामाजिक आणि राष्ट्रीय हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. आर्य चाणक्याचा सिद्धान्तच आहे, ‘शत्रूच्या शत्रूला आपला मित्र बनवावा.’ येथे भ्रष्ट व्यवस्थाच शत्रू असल्याने तिच्या विरोधात लढणार्‍या सर्वांनी मित्रत्वाने एकत्र यायला हवे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment