विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन प्रभात नियतकालिंकाविषयी माहिती जाणून घेतांना डावीकडून डॉ. कुणाल, डॉ. जनक राज आणि माहिती सांगतांना डॉ.दुर्गेश सामंत

रामनाथी (फोंडा) – म्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी हरियाणा येथील डॉ.जनक राज, अमृतसर येथील डॉ.कुणाल, राजस्थान येथील आयुर्वेदाचार्य डॉ.नवनीत कटारे, आयुर्वेदाचार्य डॉ.अंजु कटारे; कोटा, राजस्थान येथील कु.ज्योती शर्मा, डॉ.रोहित कुमार, बिलवाडा (राजस्थान) येथील डॉ.अशोक जोशी, मेडता (नागौर, राजस्थान) येथील डॉ.पुष्कर राठोड आणि मध्यप्रदेशमधील बेतुल येथील डॉ.कमल किशोर कावडे, आदी एकूण २३ वैद्यांनी सनातनच्या आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म यांचे कार्य, सूक्ष्म आणि कला यांविषयी चालणारे संशोधन यांची माहिती जाणून घेतली. आश्रमात आलेले सर्व वैद्य न्यूरोथेरपीस्ट आहेत.

 

वैद्यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेले अभिप्राय !

अ. डॉ.जनक राज आणि डॉ.कुणाल यांनी आश्रम
आणि आश्रमातील साधक यांच्याविषयी व्यक्त केलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. डॉ.जनक राज आणि डॉ.कुणाल यांनी आश्रमात प्रवेश करताच येथे किती सकारात्मक स्पंदने जाणवतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

२. सनातनचे काही फिजिओथेरपी उपचार करणारे साधक शिबिरात उपचारांची पद्धत शिकण्यासाठी गेले होते. डॉ. जनक राज आणि डॉ. कुणाल आश्रम पहातांना म्हणाले की, शिबिरात तुमच्या साधकांना आम्ही डॉक्टर म्हणून शिकवत होतो; पण आता आश्रमातील साधक म्हणून शिकवू.

३. आश्रमातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून आनंद जाणवतो आणि भितींना हात लावल्यावर हालचाल होत असल्याचे जाणवले.

आ. असे व्यवस्थापन अन्यत्र कुठेही पाहिलेले नाही ! – श्री. दीपक जागा, कोटा, राजस्थान

१. आश्रमात येऊन मला खूप चांगले वाटले. आता जेव्हा मी गोव्यात येईन, तेव्हा प्रथम आश्रमात येईन. मला गोवा फिरण्याची आवड नाही. मी आश्रमात आल्यावर मला गोव्यात फिरल्याप्रमाणे वाटले.

२. मी अधिक शिकलेलो नाही किंवा वैद्यकीय पदवी प्राप्त केलेली नाही; पण मी आतापर्यंत जसा आहे, तो भगवंताच्या कृपेमुळे आहे. आश्रमात प्रवेश केल्यावर मला प्रथम हनुमंताचे मंदिर दिसले. ते पाहून मी भावूक झालो.

३. परात्पर गुरु डॉ.आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करण्यासाठी बसल्यावर आंतरिक चेतना जागृत झाली, असे वाटले.

४. आश्रमातील साधक साधना म्हणून सर्व करत असल्याने ते परिपूर्ण आहेत. आश्रमातील व्यवस्थापनाप्रमाणे व्यवस्थापन मी अन्यत्र कुठेही पाहिलेले नाही.

इ. आश्रम पाहिल्यावर मनाला शांती आणि समाधान लाभले. आश्रमातील सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद दिसतो. सर्वांच्या चेहर्‍यावर हास्य असते. सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहून सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदनांविषयी लक्षात आले. – कु.सुशिला मीणा, डुंगला, चित्तोडगड, राजस्थान.

 

डॉ. जनक राज आणि डॉ. कुणाल यांची साधकाला जाणवलेली वैशिष्ट्ये

१. डॉ.जनक राज आणि डॉ.कुणाल हे अनुक्रमे हरियाणा आणि अमृतसर येथे स्वत:चे रुग्णालय चालवतात. आश्रमात आल्यावर मी सर्व वैद्यांना खोलीत घेऊन गेलो आणि म्हटले की, थोडी विश्रांती घेऊन मग आश्रमदर्शन करूया. त्यावर ते म्हणाले, शिष्य सतत काम करत रहातो. हनुमंत अविश्रांत श्रीरामाच्या सेवेत असायचा. आम्हीसुद्धा सेवेला लगेच आरंभ करू.

२. म्हापसा ते आश्रम या प्रवासात दोघेही सध्या हिंदूंवर होत असलेल्या विविध आघातांविषयी बोलत होते.

– श्री.सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी

Leave a Comment