कंबोडियामधील ‘सीम रीप’ शहरातील ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ !

‘सीम रीप’ या शहरात ‘अंकोर वाट मंदिर’ आहे. ‘सीम रीप’ येथे भारत शासनाने स्थापन केलेले ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ आहे. त्याच्या निर्देशिका प्राचार्या (सौ.) अर्चना शास्त्री या आहेत. २६.३.२०१८ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सौ. अर्चना शास्त्री यांना भेटण्यासाठी त्या संग्रहालयात गेल्या. या संग्रहालयात भारत, कंबोडिया, म्यानमार, लाओस्, व्हिएतनाम आणि थायलँड अशा ६ देशांची पारंपरिक वस्त्रे ठेवण्यात आली आहेत, तसेच ती वस्त्रे बनवण्याची शैली अन् त्या मागचा इतिहास यांविषयीची माहिती दिली आहे. येथील लोकांचे पोषाख आणि त्यांनी जपलेल्या हिंदु संस्कृतीच्या खुणा येथे पाहूया.

‘आशिया पारंपरिक वस्त्रांच्या संग्रहालया’मध्ये प्रदर्शित केलेल्या कंबोडियात वापरात असलेल्या कपड्यांच्या पदरावरील विविध नक्षी

१. कंबोडियामधील लोकांच्या पोषाखांचे वैशिष्ट्य

१ अ. ‘राजघराण्याशी संबंधित लोकांनी प्रत्येक दिवशी धारण केलेल्या वस्त्रांचा रंग हा त्या-त्या ग्रहांच्या (वारांच्या) वैशिष्ट्यांशी संबंधित असणे आणि ‘कार्यातील ग्रहबाधा नष्ट होऊन कार्य यशस्वी व्हावे’, हा त्यामागील उद्देश असणे

त्या काळी या लोकांकडे आतासारख्या आधुनिक वैज्ञानिक सुविधा नव्हत्या. १०० कि.मी. अंतरावर संस्कृती, भाषा आणि त्यांची परंपरा पालटायची. प्रत्येक राष्ट्र्रातील राजाने बनवलेले नियमही वेगळे होते, उदा. कंबोडिया येथील राजाने नियम केला होता, ‘राजघराण्याशी संबंधित लोकांनी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करायचे, उदा. रविवारी लाल, सोमवारी भगवा, मंगळवारी जांभळा, बुधवारी पोपटी, गुरुवारी गडद हिरवा, शुक्रवारी निळा आणि शनिवारी तपकिरी रंग.’ त्या-त्या दिवशी धारण केलेल्या वस्त्रांचा रंग हा त्या-त्या ग्रहांच्या (वारांच्या) वैशिष्ट्यांशी संबंधित असायचा, जेणेकरून ‘कार्यातील ग्रहबाधा नष्ट होऊन कार्य यशस्वी व्हावे’, हा त्या मागचा उद्देश होता.

१ आ. कार्य, साधनामार्ग आणि जमात यांनुसार पोषाखावरील नक्षी असणे

युद्धाला जाणार्‍यांनी घालायचे पोषाख, त्यांचे रंग, त्यांवरील विणकाम, नक्षी हे सर्व वेगळे असायचे. काही जण तंत्रमार्गानुसार साधना करायचे, तर कुणी तांत्रिक विद्या शिकलेले असायचे. त्यांच्या कपड्यांवरील तंत्रविद्येशी संबंधित नक्षी आणि विणकाम बघितल्यावर ‘हे तांत्रिक आहेत’, असे लोक ओळखू शकायचे. तांत्रिक लोकांच्या कपड्यांमध्ये मंत्रशक्तीने भारित केलेल्या चमकदार वस्तू असायच्या. प्रत्येक गावात वेगवेगळ्या जमातीचे लोक रहायचे. ‘कोण कोणत्या जमातीचा आहे ?’, हे त्यांच्या कपड्यांवरून ओळखता यायचे. विविध जमातींच्या कपड्यांचे रंग जरी एकसारखे असले, तरी त्यांच्या कपड्यांवरील नक्षी वेगवेगळी असायची. त्या नक्षीवरून ‘अमुक व्यक्ती कोणत्या जमातीची आहे ?’, हे लक्षात यायचे.

(वरील छायाचित्र पहा.)

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई

कंबोडिया येथे वापरण्यात येणार्‍या पारंपरिक वेशभूषांचे नमुने !

१ इ. पोषाख बनवतांना व्यक्तीच्या सुरक्षेचाही विचार केला जाणे

रात्री झोपतांना व्यक्तीला, लहान बाळाला, आजारी व्यक्तींना सुरक्षाकवच मिळावे; म्हणून त्यांच्या चादरीवर, पांघरुणावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आणि कलाकुसर केलेली असायची. ‘विशिष्ट नक्षी, रंग आणि चित्र व्यक्तीचे रक्षण करतात’, असे त्या वेळचे लोक मानायचे. खरंच, ‘त्या वेळचे लोक सांस्कृतिक दृष्ट्या किती श्रीमंत होते आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार केला होता’, हे यावरून आपल्या लक्षात येते.

सुरक्षाकवच नक्षी असलेले पांघरूण

(छायाचित्र क्रमांक १ पहा.)

१ ई. पोषाख नैसर्गिक पद्धतीने बनवले जाणे, स्थानिक परंपरेनुसार त्यांवर मंत्रसंस्कार केले जाणे आणि दैनंदिन जीवनात त्यांना देवासारखे पूजले जाणे

काही पोषाख बनवायला ५ – ६ मासही (महिनेही) लागत. याचे कारण म्हणजे हे सर्व पोषाख नैसर्गिक पद्धतीने आणि नैसर्गिक साहित्य वापरून बनवले जात. कपड्यांना नैसर्गिक रंग दिले जात. सर्व कपडे हातमागावर करायचे असल्यानेही त्याला वेळ लागायचा. कपडे हातमागावर विणतांना त्यांवर स्थानिक परंपरेनुसार काही मंत्रसंस्कार केले जायचे. कपड्यांना दैनंदिन जीवनात पुष्कळ महत्त्व होते. त्यांना देवासारखे पूजले जायचे. त्यांचा आदर केला जायचा.

२. पवित्र गंगा नदीप्रमाणे असलेली मेकांग नदी आणि तिच्या काठी असलेल्या हिंदु संस्कृतीच्या खुणा

जगातील १२ वी मोठी नदी असलेली मेकांग नदी हिमालयात जन्माला येते. चीन, कंबोडिया, म्यानमार, लाओस्, व्हिएतनाम आणि थायलँड अशा ६ देशांची ती जीवनदात्री आहे. या नदीच्या काठी रहाणार्‍या ७ कोटी लोकांसाठी ती सांस्कृतिक प्रतीकही आहे. या नदीमुळे या ६ देशांची नैसर्गिक सीमारेषा आखली गेली आहे. भारतातून गेलेले आपले पूर्वज समुद्रमार्गाने कंबोडियापर्यंत जाऊन तेथून पुढे या नदीच्या वाटे या सर्व देशांमध्ये गेले. त्यांनी तेथील लोकांना धर्माचे शिक्षण दिले आणि तेथे मंदिरे बांधली. या नदीमुळे भारताशी व्यापारमार्ग चालू झाला. तेथील राजेही हिंदु होते आणि त्यांचा भाव होता, ‘ही नदी पवित्र गंगा नदीसारखी आहे.’ ‘मेकांग’ हा शब्द ‘मा गंगा’ या शब्दाचा अपभ्रंश आहे’, असे आम्हाला प्राचार्या (सौ.) अर्चना शास्त्री यांनी सांगितले.

कंबोडिया येथील जगप्रसिद्ध हिंदु मंदिरांसाठी लागणारे दगड मेकांग नदीतून वहात आल्यामुळे या नदीला आमचा भावपूर्ण नमस्कार ! या नदीच्या काठी हिंदु संस्कृतीच होती आणि त्याच्या खुणा त्यांचा दैनंदिन पोषाख आणि पारंपारिक वेशभूषा यांवरून आपल्याला मिळतात.

३. प्रार्थना

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेमुळे आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला दक्षिण आशियातील राष्ट्र, त्यांची संस्कृती, तेथील हिंदु संस्कृतीशी जोडलेले धागे, त्यांचे पारंपारिक वेशभूषा, त्यांच्या रुढी आणि परंपरा हे सर्व जवळून पहाता आले अन् शिकता आले. गुरुदेवांच्या चरणी आम्हा साधकांची भावपूर्ण प्रार्थना आहे, ‘या सेवेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मोक्षमार्गावर न्यावे. पुढे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात आपल्याला अपेक्षित असे हिंदु संस्कृती जतन करण्याचे आणि महान हिंदु संस्कृतीची शिकवण संपूर्ण विश्‍वात पोहोेचवण्याचे कार्य आम्हाला तन्मयतेने करता येऊ दे.’

– श्री. विनायक शानभाग

Leave a Comment