कंबोडियामध्ये एकेकाळी अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या वैभवशाली संस्कृतीच्या पतनाचे कारण आणि सद्यःस्थिती !

अहंकार अन् आंतरिक कलह यांमुळे खमेर साम्राज्याचे
पतन होणे, याउलट भारतातील त्रावणकोर येथील हिंदु राजांनी
‘देवाचे सेवक’ म्हणून राज्य केल्याने आजही तिरुवनंतपुरम् येथील
मंदिर जागृत असून विश्‍वभरातील भक्त या मंदिराकडे आकर्षिले जात असणे

‘महाभारतात ज्या देशाला ‘कंभोज देश’ असे संबोधिले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश. येथे सहस्रो वर्षांपासून हिंदूंनी राज्य केले. ७ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ज्यांनी कंबोडियावर राज्य केले, त्या साम्राज्याला खमेर साम्राज्य म्हणतात. या खमेर साम्राज्याचे राजे स्वतःला चक्रवर्ती म्हणजे ‘पृथ्वीचे राजे’ असे समजायचे. कदाचित यामुळेही त्यांच्यात एकमेकांमध्ये अनेक भांडणे झाली आहेत. कंबोडियाच्या शेजारी असलेले श्याम देश (आताचा थायलंड) आणि चंपा देश (आताचा व्हिएतनाम) यांनी खमेर राजांचा अहंकार अन् आंतरिक कलह यांचा लाभ घेऊन अनेक वेळा खमेर साम्राज्यावर आक्रमण केले. १५ व्या शतकात हे साम्राज्य नष्ट झाले आणि तेथील हिंदु संस्कृतीही लोप पावली. खमेर राजांनी बांधलेले विश्‍वातील सर्वांत मोठे मंदिर ‘अंकोर वाट’ येथे गेली ५०० वर्षे पूजा झालेली नाही. मंदिराकडे बघून भकास वाटते.

याउलट भारतातील केरळमधील त्रावणकोर  येथील हिंदु राजांकडून आपण बरेच काही शिकू शकतो. त्रावणकोरच्या राजांनी तिरुवनंतपुरम् येथे अनंतपद्मनाभ मंदिर निर्माण केले आणि स्वतःला ‘पद्मनाभ दास’ असे नाव दिले. त्या वेळी त्रावणकोरचे राजे स्वतःला देवाचे सेवक म्हणून राज्य सांभाळायचे; म्हणूनच इतकी वर्षे झाली, तरी तिरुवनंतपूरम् येथील मंदिर जागृत आहे आणि तेथे प्रतिदिन पूजा आणि उपासना चालू आहे. आजही सहस्रो भक्तांना अनुभूती येतात आणि विश्‍वभरातील भक्त या मंदिराकडे आकर्षिले जातात.’

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

 

पैसा मिळवण्यासाठी ‘अंकोर वाट’ मंदिराचा वापर करणारे कंबोडिया सरकार !

‘अंकोर वाट’ या श्रीविष्णूच्या प्राचीन मंदिराच्या परिसरात ऑक्टोपस विकतांना तेथील महिला

‘कंबोडिया हे बौद्ध राष्ट्र असले, तरी येथील सरकार माओवादावर आधारित आहे. ‘बौद्ध धर्म फोफावण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी येथील सरकार काहीही करायला सिद्ध आहे’, हे आम्हाला ‘अंकोर वाट’ मंदिर पाहिल्यावर लक्षात आले. कंबोडियात प्रत्येक वर्षी ‘अंकोर वाट’ मंदिर बघायला १० लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात. येथे आल्यावर न्यूनतम एक आठवडा तरी पर्यटक रहातात. कंबोडियाला सर्वाधिक पैसे पर्यटकांमुळे मिळतात. सध्याच्या स्थितीत कंबोडिया सरकार ‘अंकोर वाट’ मंदिर हे हिंदु मंदिर नसून बौद्ध मंदिर असल्याचे दाखवत आहे. मंदिरात बुद्धाच्या ६ – ७ मोठ्या मूर्ती उभ्या केल्या आहेत. या मूर्तींची मंदिरात येणार्‍या पर्यटकांकडून ऐच्छिक पूजा केली जाते. मंदिरात अनेक बौद्ध भिक्कूही असतात. मंदिराच्या परिसरात मांस विकणे, किड्यांची भेळ आणि ऑक्टोपस (वरील छायाचित्र पहा), साप अन् बेडूक यांची भजी करून विकणे, हे तर सामान्य झाले आहे.’

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

Leave a Comment