कंबोडिया येथे ‘समराई’ नावाच्या जमातीसाठी भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते समराई’ मंदिर !

१. राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने १२ व्या शतकात ‘समराई’ जमातीसाठी
भगवान शिवाचे मंदिर बांधण्यास प्रारंभ करणे, नंतर राजा यशोवर्मन (दुसरा) याने
या मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे आणि पुढे त्यास ‘बंते समराई’, असे नाव दिले जाणे

बंते समराई मंदिर

‘खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे. या जमातीतील लोक मंदिरे, राजवाडा, नगर येथील विविध वास्तू, पूल आदी बांधण्यासाठी लागणारे दगड महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी जाऊन तेथून आणत. ते भगवान शिवाची उपासना करत. राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने १२ व्या शतकात या जमातीसाठी एक सुंदर मंदिर बांधण्यास प्रारंभ केला. नंतर राजा यशोवर्मन (दुसरा) याने या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. पुढे या मंदिराला ‘बंते समराई’ नाव देण्यात आले. (छायाचित्र क्रमांक १ पहा.) ‘बंते’ म्हणजे किल्ला आणि ‘समराई’ हे जमातीचे नाव. त्यामुळे ‘बंते समराई’ म्हणजे ‘समराई जमातीचा किल्ला’ किंवा ‘समराई जमातीचे मुख्य स्थान’, असे म्हटले जाते.

२. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत, तसे इतरही प्रसंगांची अनेक सुंदर शिल्पे कोरलेली असणे

छायाचित्र क्र. २ : मंदिराच्या एका भिंतीवर कोरलेला रामायण काळातील असुर आणि वानर यांच्यामधील युद्धाचा प्रसंग (गोलात डावीकडे घोड्यावर बसलेल्या असुराशी युद्ध करतांना उजवीकडे असलेला वानर दिसत आहे.)
छायाचित्र क्र. ३ : मंदिराच्या एका भिंतीवर कोरलेला वालीने ‘मायावी’ नावाच्या राक्षसाचा वध करतांनाचा प्रसंग (गोलात मोठे करून दाखवले आहे.)

या मंदिराच्या भिंतींवर अनेक सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने राम-रावण युद्ध, असुर आणि वानर यांच्यातील युद्ध (छायाचित्र क्र. २ पहा.), गोवर्धन पर्वत उचलतांना भगवान श्रीकृष्ण, समुद्रमंथनाचे दृश्य, रामायणातील वेगवेगळे देखावे, प्रभु श्रीराम हनुमंताच्या आणि लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर बसलेले दृश्य, वालीने ‘मायावी’ नावाच्या राक्षसाचा वध करतानाचा प्रसंग (छायाचित्र क्र. ३ पहा.), इंद्रजिताच्या बाणांनी मूर्च्छित झालेला लक्ष्मण आणि त्याच्यावर उपचार करतांना वैद्य सुशेण, स्वर्गलोकातील दृश्य, तसेच अप्सरा नृत्य करतांनाचे दृश्य, अशा विविध शिल्पांचा समावेश आहे.’

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

Leave a Comment