बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम

मंदिर स्वच्छता करतांना धर्मप्रेमी

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली. या वेळी मंदिराचे विश्‍वस्त हे साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले आणि प्रत्येक मासात मंदिरात उपक्रम राबवण्यास त्यांनी अनुमती दिली. विठोबा रखुमाई मंदिरातही स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला.

डहाणू येथे ओम श्री दत्त गणेश मंदिरात, तर बोईसरमध्ये श्री दत्त मंदिरात साकडे !
८ मे या दिवशी डहाणू येथील ओम श्री दत्त गणेश मंदिरामध्ये श्री गणपतीला साकडे घालण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी, वाचक, साधक, विश्‍वस्त उपस्थित होते. पुरोहित श्री. मंदार फाटक यांनी संकल्प केला. मंदिर विश्‍वस्त श्री. रवींद्र फाटक यांनी मंदिर स्वच्छता अभियानासाठी ३ मंदिरांची अनुमती मिळवून देणार असल्याचे सांगितले. या वेळी ९ विशेषांकांचे वितरण करण्यात आले. १० मे या दिवशी बोईसर, दत्तवाडी येथील श्री दत्त मंदिरात श्रीदत्तगुरूंना साकडे घालण्यात आले. मंदिराबाहेर ९ मुले क्रिकेट खेळत होती. ती कधीच मंदिरात येत नाहीत; परंतु श्रीकृष्णाला प्रार्थना करून विषय सांगितल्यावर ती खेळ सोडून मंदिरात साकडे घालायला आली आणि शेवटपर्यंत थांबली.

नंदुरबार येथे हुतात्मा शिरिषकुमार स्मारकाची स्वच्छता आणि अभिवादन !

स्वच्छतेसाठी उपस्थित धर्माभिमानी

येथील हुतात्मा शिरिषकुमार यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी परिसरातील दुकानदार आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. स्मारकाला कपड्याचे व्यापारी श्री. मनोजकुमार बाफना यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

विविध मंदिरांत स्वच्छता करून देवतांना साकडे घातले !

नंदुरबार येथील सप्तश्रृंगी मंदिर, जळगाव येथील श्री हनुमान मंदिर, तसेच शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली, तसेच तेथे साकडेही घालण्यात आले. जळगाव येथील सप्तश्रृंगीदेवी मंदिरात उपस्थित धर्माभिमानी महिलांनी देवाला प्रार्थना करून साकडे घातले. चोपडा येथील मुजुमदार गणपति मंदिराची स्वच्छता करण्यात आली. शेंदुर्णी (जळगाव) येथे ‘साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे शिवमंदिर, तसेच श्री विठ्ठल मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली.

मुंबई आणि नवी मुंबईत व्याख्यानांंद्वारे व्यापक जनजागृती !

अखंड हरिनाम सप्ताहाचे विश्‍वस्त श्री. आबासाहेब खाडे (डावीकडे) श्री. सतीश कोचरेकर यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन सत्कार करतांना

येथील विविध भागांमध्ये ‘साधना आणि हिंदु राष्ट्र्राची आवश्यकता’ या विषयांवर ३४ व्याख्याने घेण्यात आली. त्यांचा लाभ १ सहस्र २७१ जिज्ञासूंनी घेतला. या वेळी  ३ ठिकाणी नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली, तर काही जण स्वत:हून नियतकालिकांचे वर्गणीदार झाले.

बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगितलेे. या वेळी ७०० हून अधिक भाविक उपस्थित होते. सप्ताहाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. खंडूजी महाराज शिरोळे यांनी विशेष सहकार्य केले. विश्‍वस्त श्री. आबासाहेब खाडे यांनी श्री विठ्ठलाची मोठी प्रतिमा देऊन श्री. कोचरेकर यांचा सत्कार केला.

नाशिक येथे धर्मप्रेमींकडून मंदिर स्वच्छता आणि समितीच्या कार्याचे कौतुक !

मंदिर स्वच्छता करतांना धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी महिला

येथे गंगा घाट येथील एकमुखी दत्त मंदिराची धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमानी महिला आणि साधक यांनी स्वच्छता केली. मंदिराचे पुजारी श्री. मयूर बर्वे यांनीही सहकार्य करून कार्याचे कौतुक केले. पंचवटी येथील श्रीराम मंदिर आणि रामकुंड येथील गंगा गोदावरी मंदिर यांची स्वच्छता धर्माभिमानी महिला आणि साधक यांनी केली. गंगा गोदावरी मंदिराचे पुजारी श्री. कृष्णा पंचाक्षरी यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. मंदिराजवळील फुलवाल्यांनी सांगितले की, या लोकांना पुण्य मिळणार आहे !

भिवंडी येथे धर्मप्रेमींसाठी युवा शौर्य जागरण शिबीर

युवकांना संबोधित करतांना श्री. अमोल पाळेकर

येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल पाळेकर यांनी गीता आश्रम, बालाजी नगर, भिवंडी येथे घेण्यात येणार्‍या युवा शौर्य जागरण शिबिरात मार्गदर्शन केले. या वेळी ३० धर्मप्रेमी युवक उपस्थित होते. शिबिरात लाठीकाठी आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.

ठाणे

येथील श्री हनुमान मंदिरात स्वच्छता करतांना धर्मशिक्षणवर्गातील महिलाही सहभागी झाल्या होत्या. वर्तकनगर येथील श्री पालाय देवीमंदिर, तसेच श्री जनकादेवी मंदिर येथेही स्वच्छता करण्यात आली. डोंबिवलीतील श्री हनुमान मंदिरात स्वच्छता करतांना धर्मशिक्षणवर्गातील ५ मुलीही सहभागी झाल्या. सप्तशृंगी मंदिर, अंबरनाथ येथे मंदिर स्वच्छता करण्यात आली.

पालघर

डहाणू येथील ॐ दत्त श्री गणेश मंदिरात धर्माभिमानी श्री. मंदार फाटक यांनी श्री गणेशाला साकडे घातले, तर बोईसर (प.) येथे दत्तवाडीतील दत्त मंदिरात मंदिराचे विश्‍वस्त श्री. संजय नारखेडे यांच्यासह समितीचे साधक आणि धर्माभिमानी यांनी श्री दत्तगुरूंना साकडे घातले. यात लहान मुलांचाही सहभाग होता.

वणी (यवतमाळ) येथे मंदिर स्वच्छता आणि देवतांना साकडे

येथे ५ मंदिरांची स्वच्छता करून हनुमान, वणी शहराचे ग्रामदैवत शेषशायी श्रीविष्णु रंगनाथस्वामी आणि वणी नगरीची माता म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री जैताईमाता यांना साकडे घालण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment