पू. सुनील चिंचोलकर आणि सनातन !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना पू. सुनील चिंचोलकर (१६.११.२०१७)

१. बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी सनातन आवडी !

– पू. सुनील चिंचोलकर, समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, साहित्यिक आणि ख्यातनाम वक्ते, पुणे. (२६.७.२०११])

२. प्रसारास धर्मद्रोह्यांचा झालेला विरोध आणि सनातनशी संपर्क

अ. प.पू. तोडकर महाराज यांनी पू. काकांना प.पू. डॉक्टरांच्या भेटीस नेणे 

कोल्हापूर येथे पू. काकांची (पू. चिंचोलकर यांची) ३ दिवसांची व्याख्यानमाला होती. त्या व्याख्यानमालेत पू. काकांनी एका धर्मद्रोह्यावर चांगलेच कोरडे ओढले. त्यावरून मोठा गदारोळ उठून ‘पू. चिंचोलकर यांना अटक करा’, अशा मथळ्याचे वृत्त व्याख्यानाच्या दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात आले. पू. काकांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्या वेळी प.पू. डॉक्टरही कोल्हापूरमध्ये होते. कोल्हापूर येथील संत प.पू. तोडकर महाराज यांनी पू. काकांना प.पू. डॉक्टरांच्या भेटीस नेले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी पू. काकांना सांगितले होते, ‘‘सनातनचे साधक तुमच्या संरक्षणास असतील. तुम्ही व्याख्यानमाला चालू ठेवा.’’ अशा प्रकारे पू. काकांचा सनातनशी प्रथम संपर्क झाला. त्यानंतर पू. काका सनातनच्या मिरज, फोंडा, रामनाथी येथील आश्रमांत जाऊन आले. तेथे त्यांनी साधकांना मार्गदर्शनही केले.

 

राष्ट्र आणि धर्म कार्याला संपूर्ण जीवन
वाहून घेतलेले पुणे येथील समर्थभक्त (कै.) पू. सुनील चिंचोलकर !

विविध संत, हिंदुत्वनिष्ठ यांच्यासमवेत पू. सुनील चिंचोलकर (सर्वांत डावीकडे) यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले (उजवीकडे) यांच्यासह झालेल्या भेटीचा क्षण (वर्ष २०१३)

१. जन्म आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी

पू. सुनील चिंचोलकर यांचा जन्म फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी (१४ मार्च १९५१) या दिवशी महाराष्ट्रातील मनमाड येथे झाला. पू. चिंचोलकर यांच्या वडिलांनी पंढरपूर येथे माधुकरी मागून शिक्षण पूर्ण केले. वडील श्री विठ्ठलाचे भक्त, तर आई श्रीरामाची उपासना करत असत. त्यामुळे घरात वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय यांचे वातावरण होते. समकालीन अनेक नामवंत कीर्तनकारांचा पू. चिंचोलकर यांच्या घरी मुक्काम असे. आई दासबोधाचे वाचन करत असल्यामुळे दासबोधाशी पू. चिंचोलकर यांची ओळख होती. अशा प्रकारे कौटुंबिक वातावरण पूर्णतः आध्यात्मिक होते.

२. शिक्षण आणि साधनेस प्रारंभ

वर्ष २०१३ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात मार्गदर्शन करतांना पू. सुनील चिंचोलकर

पू. चिंचोलकर यांचे जुनी मॅट्रिक (११ वी) पर्यंतचे शिक्षण मनमाड येथे झाले. तेथे महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने ते पुढील शिक्षणासाठी बारामती येथे आले. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत असतांना पू. चिंचोलकर यांनी संत, राष्ट्रपुरुष आणि तत्त्वज्ञान यांचे गाढे अभ्यासक कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे समर्थांवरील व्याख्यान ऐकले. महाविद्यालयातील व्याख्यानानंतर नगरातील मोरोपंत वाचनालयात कै. प्राचार्य भोसले यांनी स्वामी विवेकानंद विषयावरील व्याख्यानास त्यांना बोलावले. त्यानंतर कै. प्रा. भोसले यांच्याशी फलटण येथे वरचेवर संपर्क होऊ लागला. त्यामध्ये कै. प्रा. भोसले यांनी पू. चिंचोलकर यांना सज्जनगडावर जाऊन येण्याचा सल्ला दिला. तसेच १९७१ या वर्षी फलटण येथील थोर सत्पुरुष कै. काका उपाख्य गोविंद उपळीकर यांनी त्यांना समर्थांच्या चरित्राचा अभ्यास आणि रामनामाचा जप करण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पू. चिंचोलकर यांनी स्वामी विवेकानंद, समर्थ रामदासस्वामी, संत मीराबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, अशा अनेक संत, राष्ट्रपुरुष यांच्या चरित्रांचा अभ्यास केला. ‘जे जे चांगले आहे, ते ते वेचायचे’ या ध्यासाने त्या काळात पुष्कळ वाचन आणि अभ्यासकांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले.

३. सज्जनगडावर जाणे

महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक दिवाळी आणि वर्षअखेरीच्या सुट्टीत, तसेच संधी मिळेल तेव्हा सज्जनगडावर जाण्यास त्यांनी प्रारंभ केला. केवळ सणाच्या दिवशी ते घरी जात असत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९७४ ते १९७७ या काळात पू. चिंचोलकर यांनी वालचंदनगर येथे कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अध्यापनाची चाकरीही केली. पू. चिंचोलकर यांच्या व्याख्यान सत्रांचा प्रारंभही याच काळात झाला. त्या काळात त्यांची साधनाही चालूच होती.

४. समर्थांच्या छायाचित्राकडून अनुग्रह घेणे

पू. चिंचोलकर यांनी समर्थांचे शिष्य प.पू. श्रीधरस्वामी यांच्या चरित्राचा अभ्यास केला. त्यामध्ये प.पू. श्रीधरस्वामींनी समर्थांच्या छायाचित्राकडून अनुग्रह घेतल्याचे त्यांनी वाचले. त्यातून त्यांना समर्थांच्या सज्जनगडावरील समाधीकडून अनुग्रह घेण्याची प्रेरणा मिळाली. वर्ष १९७४ मध्ये त्यांनी सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीकडून अनुग्रह घेतला.

५. पूर्णवेळ साधनेचा निर्णय

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने त्यांनी या कालावधीत ऐकली. ती ऐकल्यावर बाबासाहेबांनी जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी आयुष्य समर्पित केले, तसे समर्थांच्या कार्यासाठी जीवन अर्पण करण्याचे पू. चिंचोलकर यांनी ठरवले. साधनेच्या तीव्र ओढीमुळे त्यांनी पूर्णवेळ सज्जनगडावर राहून उपासना करण्याचे ठरवले. वर्ष १९७७ मध्ये त्यांचा विवाह होऊन धर्मपत्नीसह ते सज्जनगडावर रहाण्यास गेेले. वर्ष १९७७ ते १९८८ हा काळ त्यांचे गडावर वास्तव्य होते. सज्जनगडावर रहाण्याच्या आणि पूर्णवेळ साधना करण्याच्या त्यांच्या निर्णयास प्रारंभी कौटुंबिक विरोध (विशेषत: वडिलांकडून) झाला; मात्र त्यांची व्याख्याने अन् अभ्यास पाहून कालांतराने त्यांचा विरोध अल्प होत गेला.

६. सज्जनगडावरील साधना

६ अ. समर्थांनी पू. चिंचोलकर यांच्याकडून ‘कर्मयोगाची साधना’ करवून घेणे

गडावरील वास्तव्यात पू. चिंचोलकर यांच्याकडून समर्थांनी ‘कर्मयोगाची साधना’ करवून घेतली. गडावरील संपूर्ण व्यवस्था पहाण्याचे दायित्व त्यांच्याकडे होते. ते गडावर १२-१३ घंटे सेवा करत असत. केवळ १ वेळ भोजन करत असत. द्रोणात मावेल इतकाच आहार घेऊन रात्री पोहे किंवा उपमा असा आहार घेत असत. उरलेला वेळ ते वैयक्तिक साधनेला देत असत. त्यामध्ये अधिक काळ ते मौन अनुष्ठान, ध्यानधारणा करत असत. समर्थांच्या समाधीपाशी बसून समर्थांचे चरित्र आणि दासबोध यांचा अभ्यास, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे मनाचा अभ्यास केला. भीमरूपी स्तोत्राचे अनेक पाठ केले. समर्थांनी दासबोधात सांगितलेले आदर्श गुण बाणवण्यासाठी ते प्रयत्न करायचे.

६ आ. प्रयत्नांत सातत्य ठेवून मनाविरुद्धच्या संघर्षावर मात करणारे पू. चिंचोलकर

पू. चिंचोलकर त्यांच्या स्वतःच्या साधनेविषयी म्हणतात, ‘‘अंतःकरण पालटले पाहिजे, हे दक्षतेने पाहिले. प्रारंभी मला मनाच्या विरुद्ध संघर्ष करावा लागला; परंतु प्रयत्नांत सातत्य ठेवल्याने कालांतराने संघर्ष अल्प होत गेला. सातत्य ठेवल्यामुळे साधनेचीच वृत्ती निर्माण होण्यास साहाय्य होते. माघार घ्यायची नाही, हे पक्के ठरवून प्रयत्न केले. साधनेच्या काळात आलेल्या अनुभूतींमध्ये न अडकता समर्थांनी दासबोधामध्ये मार्गदर्शन केलेली साधनेची सूत्रे आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केले.’’

पू. चिंचोलकर ‘कृतीभक्ती’ हा अत्यंत समर्पक शब्द या ठिकाणी वापरतात. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचा इयत्ता चौथीपर्यंतचा अभ्यास त्यांनी गडावरच करवून घेतला.

७. प्रसारकार्यास गती देण्याच्या उद्देशाने पुणे येथे वास्तव्यास असणे

मुलीच्या पुढील शिक्षणासमवेतच समर्थांच्या विचारांच्या प्रसारकार्यास गती देण्याच्या उद्देशाने वर्ष १९९० मध्ये पू. चिंचोलकर पुणे येथे रहाण्यास आले. ते पहाटे ५ वाजता उठून नामजप, व्यायाम, प्राणायाम करायचे. त्यानंतर ग्रंथांचा अभ्यास, लिखाण, वाचन सतत चालू असायचे.

८. पू. सुनील चिंचोलकर यांचे प्रसारकार्य !

८ अ. देश-विदेशांत मराठी आणि हिंदी भाषांतून १० सहस्रांहून अधिक व्याख्याने देणे

पू. चिंचोलकर यांची वाणी अत्यंत ओजस्वी, क्षात्रवृत्तीपूर्ण, समर्थांप्रती भाव असणारी असल्याची प्रचीती त्यांची व्याख्याने ऐकणार्‍यांना येत असत. आजपर्यंत पू. चिंचोलकर यांनी मराठी आणि हिंदी भाषांतून १० सहस्रांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रासह  देहली, डेहराडून, चेन्नई, रायपूर, भोपाळ, भाग्यनगर, ग्वाल्हेर, बिलासपूर, गुणा, तंजावर या ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली आहेत. दुबई येथेही वर्ष २००६, २०१० आणि २०११ मध्ये रामायण, मनाचे श्‍लोक या विषयांवर त्यांच्या व्याख्यानमाला झाल्या आहेत.

८ आ. विविध वृत्तपत्रांतून सहस्रो लेख लिहिले असून ४० ग्रंथ प्रकाशित झालेले असणे

त्यांनी विविध वृत्तपत्रांतून सहस्रो लेख लिहिले असून त्यांचे जवळपास ४० ग्रंथ प्रकाशित झाले. यांपैकी ‘समर्थ रामदास – आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ तिसर्‍या आवृत्तीपासून परात्पर गुरु डॉक्टरांना (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अर्पण केला. मागील ३० वर्षांत पू. चिंचोलकर यांनी कोणतेही व्याख्यान अथवा लिखाण यांचे मानधन मागितले नसून ते म्हणतात, ‘‘परमेश्‍वरानेच आजवर सर्व व्यवस्था केली. त्यामुळे समर्थांच्या कृपेने जे मिळेल तेवढेच घ्यायचे. समर्थांच्या कृपेमुळे आर्थिकदृष्ट्या कधीही अडचण आली नाही.’’ ‘भगवंत संसार चालवतो त्याचा पू. चिंचोलकर हे पुरावा आहेत’, असे गौरवोद्गार कै. प्रा. शिवाजीराव भोसले यांनी पू. चिंचोलकर काकांविषयी काढले होेते.

८ इ. प्रसारात राखलेली तत्त्वनिष्ठा

पू. चिंचोलकर यांचा गाढा अभ्यास, सखोल चिंतन, अमोघ वक्तृत्वशैली आणि वाणीतील चैतन्य यांनी प्रभावित होऊन राज्यातील काही साखरसम्राटांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानाचे त्यांना निमंत्रण दिले. मात्र त्यामध्ये समर्थ रामदासस्वामींचा उल्लेख न करण्याची विनंती केली. तेव्हा पू. चिंचोलकर यांनी त्यास ठामपणे नकार दिला.

९. पुरस्कार

पू. चिंचोलकर यांना ४० हून अधिक पुरस्कार, सन्मानपत्रे मिळाली आहेत. त्यामध्ये समर्थ रामदासस्वामी पुरस्कार, वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार, संत दासगणू महाराज प्रतिष्ठानचा पुरस्कार, शिवसमर्थ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत; मात्र वर्ष २०१३ पासून कोणताही पुरस्कार घ्यायचा नाही, असे पू. चिंचोलकर यांनी ठरवले.

१०. संतसंमेलनांचे आयोजन करणे

विविध संत, संप्रदाय यांच्यामध्ये विखुरलेेले भक्त, शिष्य, अध्यात्माची आवड असलेला सर्व हिंदु समाज एकत्र आणणे, संत वाङ्मयाचा प्रसार करणे, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता साधणे या व्यापक उद्देशाने पू. चिंचोलकर यांनी प.पू. गोविंददेव गिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) आणि ज्येष्ठ संतसाहित्य अभ्यासक कै. राम शेवाळकर यांच्यासह संतसंमेलने भरवली.

 

समर्थांनी दिलेले रामपंचायतन पू. चिंचोलकर यांना मिळणे

रायगड येथील पाचाड गावाच्या अलीकडे नातं हे गाव आहे. तेथे देशमुख नावाचे मठपती होते. त्यांना अनुमाने ३०० वर्षांपूर्वी समर्थ रामदासस्वामींनी पंचधातूंचे रामपंचायतन दिले होते. या रामपंचायतनामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तींचा समावेश असतो. हे रामपंचायतन देशमुखांनी त्यांच्या घराण्यात त्याची पूजा-अर्चना करणारे कोणी न उरल्याने सज्जनगडावर आणून दिले. तेथे अण्णाबुवा कालगावकरांनी पू. चिंचोलकर यांना या मूर्ती दिल्या. पू. चिंचोलकर प्रतिदिन गरम पाणी, अत्तर यांनी स्नान घालून त्यांची विधीवत् पूजा करत. या रामपंचायतनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अखंड दिसते; पण त्याचे सर्व भाग सुटे करून पहाता येतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment