प.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेली प्रार्थना !

प.पू. दास महाराज यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या
कांदळी येथील समाधीस्थळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेली प्रार्थना !

‘२३.६.२०१७ या दिवशी मी आणि धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) प.पू. भक्तराज महाराज यांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाला जावा’, यासाठी साकडे घालण्यासाठी कांदळी येथील आश्रमात गेलो होतो. या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीसमोर बसल्यावर माझे पुढीलप्रमाणे निवेदन होऊन प्रार्थना झाली.

प.पू. भक्तराज महाराज,

आपल्या आज्ञेप्रमाणे वर्ष १९९० पासून परात्पर गुरु डॉ. आठवले धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी देह झिजवत आहेत. समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक बळ देऊन धर्मस्थापना केली, त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेव धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत. आरंभी त्यांनी साधकांना संघटित केले. सध्या ते समस्त हिंदु समाजाला संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. आज धर्माला ग्लानी आलेली असतांना हिंदू संघटित होत नाहीत. अनेक साधू-संत स्वतःचा संप्रदाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्त्रिया, कुमारिका, तसेच बालक यांच्यावर अत्याचार होत आहेत. ‘अनेक माध्यमांतून हिंदु धर्मावर आघात होत आहेत’, हे मला पहावत नाही.

 

१. धर्मसंस्थापनेसाठी प.पू. भक्तराज महाराज यांचा आशीर्वाद आणि परात्पर गुरु
डॉ. आठवले यांची तळमळ कार्यरत असणे; मात्र साधकांची तळमळ अल्प पडत असणे

आपण परात्पर गुरुदेवांना

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥

आणि

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

या दोन श्‍लोकांची जोड देऊन धर्मसंस्थापना करण्याची आज्ञा दिली आहे. गुर्वाज्ञेचे पालन करण्यासाठी ते अत्यंत तळमळीने कार्य करत आहेत. आपला आशीर्वाद आणि परात्पर गुरुदेवांची तळमळ कार्यरत आहे; पण साधकांची तळमळ अल्प पडत आहे. साधकांतील चैतन्यशक्ती आणि त्यांची साधना अल्प असल्यामुळे हिंदूंचे संघटन होण्यास विलंब होत आहे.

 

२. प.पू. दास महाराज यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी
अखंड नामजपाचा संकल्प करणे आणि ‘त्याची शक्ती परात्पर गुरु
डॉ. आठवले अन् साधक यांना मिळावी’, अशी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करणे

‘साधकांमधील चैतन्यशक्ती वाढावी’, यासाठी मी वर्षभर माझ्या अल्प क्षमतेप्रमाणे मौनसाधना केली. त्या काळात रुद्राक्षाच्या १ सहस्र ८ मण्यांच्या माळेने अखंड जप केला. आता याच माळेने ‘हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रातीशीघ्र व्हावी’, यासाठी अखंड जप करण्याचा संकल्प करत आहे. ‘माळेत चैतन्य यावे’, यासाठी ही माळ आपल्या समाधीवर ठेवत आहे. आपण या माळेत आपली पूर्ण शक्ती प्रक्षेपित करा. या माळेने जप करतांना निर्माण होणारी शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तळमळीने कार्य करणार्‍या साधकांना प्राप्त करून द्या. मी पायाने अधू असल्याने धर्मजागृतीसाठी सगळीकडे फिरू शकत नाही. त्यामुळे नामजप आणि प्रार्थना करण्याव्यतिरिक्त मी परात्पर गुरुदेवांची आणखी काही सेवा करू शकत नाही. ‘आपले आणि परात्पर गुरुदेवांचे नियोजन काय आहे ?’, हे मला समजत नाही.

प.पू. भक्तराज महाराज, आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे, ‘साधकांना चैतन्यशक्ती आणि बळ द्या. हिंदूंना संघटित होण्याची बुद्धी प्रदान करा अन् तुमचा आशीर्वाद लवकरात लवकर फळाला येऊन हिंदु राष्ट्राची पहाट उजाडू द्या.’

– प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग. (२३.७.२०१७)

 

प्रार्थना करून प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीवर
रुद्राक्षाची जपमाळ ठेवून मस्तक टेकवल्यावर ‘समाधीतून तेजस्वी प्रकाश
देहावर पडला आहे’, असे दिसणे अन् ‘हरि ॐ तत्सत्’ आणि ‘श्रीराम’, असा ध्वनी ऐकू येणे

‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून मी त्यांंच्या समाधीवर रुद्राक्षाची जपमाळ घातली. आश्‍चर्य म्हणजे ही १ सहस्र ८ मण्यांची माळ अगदी समाधीच्या आकाराचीच निघाली. माळेचा समाधीला वेढा घातल्यावर मेरूमणी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या अंगठ्याजवळ आला. जणूकाही ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी या माळेचा स्वीकार केला’, असे मला वाटले. मी माळ ठेवून समाधीवर मस्तक टेकवल्यावर ‘समाधीतून तेजस्वी प्रकाश माझ्या देहावर पडला आहे’, मला असे दिसले. त्या प्रकाशाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. या वेळी समाधीतून ‘हरि ॐ तत्सत्’ आणि ‘श्रीराम’, असा ध्वनी ऐकू आला. तेव्हापासून मी हिंदु राष्ट्रासाठी अखंड नामजपाला आरंभ केला आहे.’

– प.पू. दास महाराज (२३.७.२०१७)

Leave a Comment