अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हा जीवनाधार असलेले नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

२५ ते २९ मे २०१४ या कालावधीत सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ महाराष्ट्रात ठिकठिकाणी भ्रमण करत होत्या. त्या नगरच्या दौर्‍यावर असतांना त्यांची प्रा. अशोक गुलाबराव नेवासकर यांच्याशी भेट झाली. प्रा. नेवासकरकाका एक थोर इतिहास संशोधक असून त्यांच्यातील नम्रतेमुळे साधकांना त्यांच्याशी जवळीक वाटली. त्यानंतर सनातन संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचेे संबंध निर्माण झाले. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांच्या संतत्वाची प्रचीती आल्याने ३.६.२०१४ या दिवशी ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. १०.१०.२०१७ या शुभ दिवशी असलेल्या त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अलौकिक कार्य आणि त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे या लेखात दिली आहेत.

 

पू. (प्रा.) अशोक नेवासकर

१.पू. (प्रा.) नेवासकर यांचे ज्ञानसंपन्न जीवन

१ अ. प्राचीन नागरी जीवन, परंपरा, तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा सखोल अभ्यास !

पू. (प्रा.) नेवासकरकाका यांनी ‘इतिहास’ आणि ‘पुरातत्त्वशास्त्र’ या विषयांत एम्.ए. ही पदवी प्राप्त केली आहे. मूळचे नगर येथील असलेले पू. (प्रा.) नेवासकर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच डेक्कन कॉलेज, पुणे येथे पुरातत्त्व विभागात संशोधन करू लागले. प्राचीन नागरी जीवन, परंपरा, तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हा त्यांचा जीवनाधार आहे. वर्ष १९६९ मध्ये ‘नगर महाविद्यालया’तील इतिहास विभागात ते व्याख्याते म्हणून रुजू झाले. तेथील इतिहास विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.

१ आ. इतिहासाच्या विविध कालखंडावर विपुल लेखन !

पू. (प्रा.) नेवासकर यांनी इतिहासाच्या विविध कालखंडावर विपुल लेखन केले आहे. नगरचा वैभवशाली इतिहास, तसेच नगरमधील मुसलमान शिलालेख यांवर त्यांनी अनेक माहितीपूर्ण लेख लिहिलेे आहेत. त्यांनी ‘नगर जिल्ह्यातील हेमाडपंथी मंदिर’, तसेच ‘निजामशाहीकालीन अहमदनगर जिल्ह्याचे मोगल सुभेदार’ या विषयांवरील प्रकल्प पूर्ण केले आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक यांना हे प्रकल्प पुष्कळ मार्गदर्शक आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले असून ‘शिवाजीराजांचे लोकशासन’, ‘निजामशाहीकालीन अहमदनगर’, ‘स्वराज्य संकल्पक शहाजीराजे’, ‘विवेकानंदांचे असामान्य कार्य’ इत्यादी विषयांवरील इतिहास परिषदा आणि संमेलने यांमध्ये शोधनिबंध वाचले अन् व्याख्याने दिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना ‘संदर्भग्रंथ’ म्हणून पुणे विद्यापिठाने मान्यता दिली आहे.

१ इ. नगर जिल्ह्यातील अनेक गावांतील उत्खननासाठी मार्गदर्शन !

त्यांना अनेक ठिकाणी संशोधन, उत्खनन, शिलालेखांचा अभ्यास, भूर्जपत्रांचे वाचन करण्याची संधी मिळाली. नगर जिल्ह्यातील इनामगाम, नेवासे, तसेच पैठण येथील उत्खननांत ते सहभागी झाले होते. इतिहासाच्या अभ्यासाची ती जिवंत अनुभूती होती. या उत्खननांत सापडलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू नगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयात पहावयास मिळतात.

१ ई. पू. नेवासकरकाकांनी केलेले विपुल लिखाण – त्यांचे पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

१. मध्ययुगीन भारताचा इतिहास

२. ऐसी लढाई झाली नाही (पानिपतची अप्रसिद्ध बखर)

३. युरोपीय राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद

४. शिवाजीराजांचे लोकशासन

५. अहमदनगर जिल्ह्याची ऐतिहासिक पाहणी

६. प्राचीन भारत

७. नेपाळमधील नाथ संप्रदाय

 

२. नाथ संप्रदायाच्या अभ्यासाला आरंभ !

२ अ. सद्गुरु देवेंद्रनाथ यांची प्रथम भेट !

‘पू. (प्रा.) नेवासकरकाकांचा पिंड संशोधक वृत्तीचा आहे. आरंभी ‘नवनाथांच्या जन्मकथा भाकडकथा आहेत’, असे ते म्हणायचे. एकदा पत्नीच्या आग्रहामुळे ते नाथभक्त असलेल्या सद्गुरु श्री देवेंद्रनाथ (पूर्वाश्रमीचे श्री. विजयकुमार सुळे, जे स्वतः अभियंता (इंजीनियर) आणि वास्तूविशारद (आर्क्टिटेक्ट) होते. त्यांना त्यांचे गुरु राघवेंद्रस्वामी यांनी सूक्ष्मातून ‘देवेंद्रनाथ’ या नावाने दीक्षा दिली.) यांच्याकडे गेले. त्यांचे नाथांवरचे प्रवचन ऐकतांनाच पू. (प्रा.) नेवासकर यांच्या सगळ्या शंकांचे निरसन होऊन ते नाथमय झाले आणि नाथ संप्रदायाचा अभ्यास, संशोधन अन् प्रचार-प्रसार यांचे पुरस्कर्तेच बनले.

२ आ. अलौकिक शक्ती प्राप्त झालेले सद्गुरु देवेंद्रनाथ आणि त्यांच्या
सहवासाने पू. (प्रा.) नेवासकरकाकांच्या इतिहास संशोधनाला मिळालेली चालना !

पू. (प्रा.) नेवासकरकाकांना सद्गुरूंचा लाभ आणि सहवास मिळाला. श्री देवेंद्रनाथ यांच्या घराण्यात ७० वर्षांपासून पूर्वापार चालत आलेली नाथभक्ती होती. त्यांची आई मच्छिंद्रनाथांची उपासक असल्याने बालपणापासूनच त्यांना नाथपंथाचे आकर्षण होते. गृहस्थाश्रमी असूनही त्यांची निस्सीम गुरुभक्ती, नाथांची कृपा आणि नाथांची निष्काम सेवा यांमुळे त्यांना अलौकिक शक्ती प्राप्त झाली. नवनाथांच्या सर्व विद्या, सामर्थ्य आणि हठयोगासारखी उच्च योगसाधना त्यांना प्राप्त झाली होती. गुरुपौर्णिमा आणि ‘धर्मनाथांची बीज’ या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या दिवशी त्यांच्यात कानिफनाथांचा संचार होऊन त्यांच्या मुखातून नाथवाणी ऐकायला मिळे. अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी पीडित लोकांवर श्री देवेंद्रनाथांनी योगिक उपचार केले अन् त्यांना व्याधीमुक्त केले.

त्यांच्या सत्संगामुळे पू. नेवासकरकाकांना पुढील इतिहास संशोधनाला चालना मिळाली. ते श्री देवेंद्रनाथ यांच्यासह वर्ष १९७३ ते १९८२ अशी १० वर्षे नाथ संप्रदायाचा अभ्यास, संशोधन, प्रचार-प्रसार आदींसाठी भ्रमंती करत होते.

२ इ. ‘नाथ संप्रदाय’ या विषयावर सखोल अभ्यास करून ‘अलख निरंजन’ हे नाथ संप्रदायाचे वार्षिक चालू करणे

नाथ संप्रदाय हा त्यांच्या अभ्यासाचा आवडीचा विषय आहे. नगर जिल्ह्यातील नाथ संप्रदायाच्या अभ्यासासाठी त्यांनी कानिफनाथ गड (मढी), गोरक्षनाथ गड इत्यादी ठिकाणी वारंवार भेटी दिल्या. त्या ठिकाणचा इतिहास, मंदिरे, परंपरा, सांप्रदायिक बाणा यांचा त्यांनी अभ्यास करून त्यावर लेख लिहिले. त्यांनी भारतातील आणि महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय अन् त्याचे तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास केला. नेपाळमधील नाथ संप्रदायाच्या अभ्यासासाठी ते नेपाळला गेले होते. त्यांनी ‘अलख निसरंजन’ हे नाथ संप्रदायाचे वार्षिक चालू केले. त्यात त्यांचे आणि श्री देवेंद्रनाथ यांचेही संशोधनात्मक लेख प्रसिद्ध होऊ लागले. पू. नेवासकरकाकांनी देवेंद्रनाथांच्या प्रवचनांचे संकलन करून ‘सद्गुरु सत्संगातील अमृतानुभव’, ‘सिद्ध श्री देवेंद्रनाथ कार्य आणि साधना’ हे ग्रंथ लिहिले. नगर येथील मार्कंडेय मंदिरातील नाथ संप्रदायप्रणीत द्वैत-अद्वैत पिठाच्या स्थापनेमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

पू. (प्रा.) नेवासकर यांंच्या या ज्ञानसाधनेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. हेमलता यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभलेे. २८.५.२०१४ या दिवशी नगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्या ज्ञानसंपन्न कार्याचा गौरव करण्यात आला.

 

सनातनच्या कार्याप्रती आत्मीयता असणारे आणि ‘महर्षि अध्यात्म
विश्‍वविद्यालया’साठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची सिद्धता असणारे नगर येथील पू. नेवासकरकाका !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

डोळ्यांना अंधूक दिसत असूनही आध्यात्मिक कार्याची प्रचंड तळमळ असणारे पू. नेवासकरकाका !

३ – ४ वर्षांपूर्वी पू. नेवासकरकाकांची आणि माझी भेट झाली होती. त्यांच्या डोळ्यांना अगदी अंधूक दिसते. डोळे अधू झाले, तरी त्यांचे लेखनकार्य, समष्टीसाठीची धडपड आणि ज्ञान देणे हे कार्य चालूच आहे. आध्यात्मिक कार्याची त्यांची तळमळ प्रचंड आहे. त्या तळमळीलाही आमचा नमस्कार ! पू. नेवासकरकाका, ‘तुमच्यासारखा उत्साह आणि तळमळ आमच्यात येऊ दे’, अशी नवनाथांच्या चरणी प्रार्थना !’

– (सद्गुरु) सौ. अंजली मुकुल गाडगीळ (५.१०.२०१७)

१. ‘संशोधक’ म्हणून कार्य करतांनाच संतपदही प्राप्त करणे

पू. नेवासकरकाका डेक्कन कॉलेज, पुणे येथे पुरातत्त्व विभागामध्ये ‘संशोधक’ पदावर कार्यरत होते. संत गोरा कुंभाराच्या ‘तेर’ या गावी (जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र) त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले आहे. पुरातत्त्व खात्यामध्ये ‘संशोधक’ या मोठ्या पदावर राहून, तसेच ‘व्याख्याते’ म्हणून कार्य करून सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने अध्यात्मात प्रगती करणे आणि संतपद प्राप्त करणे, असे उदाहरण विरळाच आहे.

२. साधी राहणी आणि निगर्वी स्वभाव

एवढे उच्चपदस्थ असूनही ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ ही उक्ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. त्यांना कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही. ते अगदी सहज स्थितीत असतात. त्यांच्या पत्नीही तेवढ्याच सहज आहेत.

३. गुरु श्री देवेंद्रनाथांचा लाभलेला सत्संग !

३ अ. श्री देवेंद्रनाथांसह पुष्कळ प्रवास करणे

पू. नेवासकरकाकांचे गुरु म्हणजे श्री देवेंद्रनाथ ! ते नाथपंथाचे उपासक होते. आपण त्यांना ‘नाथपंथीय महायोगी’, असे म्हणू शकतो. पू. नेवासकरकाकांना श्री देवेंद्रनाथांचा सहवास लाभला. त्यांनी श्री देवेंद्रनाथांसह पुष्कळ प्रवास केला. या भ्रमणकाळात शिष्यावस्थेत राहून ते गुरूंकडून पुष्कळ शिकले.

३ आ. गुरूंची महान शिकवण ग्रंथरूपांत जतन करणे

गुरूंकडून ते नुसते शिकले नाहीत, तर गुरूंनी दिलेली शिकवण त्यांनी ग्रंथरूपांत लिहून ठेवली आहे. पू. नेवासकरकाकांनी देवेंद्रनाथांची शिकवण आणि त्यावरील स्वतःचे अनुभव यांविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. देवेंद्रनाथांवर लिहिलेल्या ‘सिद्ध श्री देवेंद्रनाथ कार्य व साधना’ आणि ‘सद्गुरु सत्संगातील अमृतानुभव’ या ग्रंथांत ‘आपले गुरु देवेंद्रनाथ भावसमाधीत कसे जायचे ?’, याचे वर्णन अत्यंत सोप्या भाषेत केले आहे. त्यांच्या ग्रंथांचा मानवजातीला मोठा लाभ झाला आहे.

४. पू. नेवासकरकाकांना आलेल्या आध्यात्मिक अनुभूती 

सद्गुरूंच्या सत्संगात राहून पू. नेवासकरकाकांना अनेक आध्यात्मिक अनुभव, उदा. ज्योतीचे दर्शन, प्रकाश दिसणे किंवा नादाच्या रूपात दृष्टांत होणे, असे अनुभव घेतले आहेत. थोडक्यात सांगायचे, तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून त्यांनी दैवी सामर्थ्य प्राप्त करून घेतले.

 

५. सनातनला लाभलेला आशीर्वाद !

५ अ. सनातन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ प्रेम

वर्ष २०१४ मध्ये पू. नेवासकरकाका आपल्या संपर्कात आले. त्यांची भेट होणे, हा एक दैवी योगायोगच आहे. भगवंताचा आशीर्वाद असल्याविना अशा गोष्टी घडत नाहीत. त्यांना सनातन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ प्रेम आहे. त्यांचेे सनातनच्या कार्याकडे पुष्कळ लक्ष असते. ते वेळोवेळी मला भ्रमणभाष करतात.

५ आ. सनातनच्या कार्यासाठी संकल्प करणे

ते सनातनच्या कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करतात. काही वेळा मंत्राक्षता  भारित करून आपल्याला देतात. त्यांनी यज्ञाच्या वेळी, तसेच अन्य वेळीही मंत्राक्षता भारित करून दिल्या आहेत. ते पौर्णिमेला काही ठिकाणी स्वतः यज्ञ करतात आणि त्या वेळी सनातनच्या कार्यासाठी संकल्प करतात, ‘कार्य निर्विघ्नपणे होऊ दे. हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येऊ दे.’ त्यांच्यामुळे अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण होत आहे.

५ इ. ग्रंथांचा अमूल्य ठेवा सनातनकडे सोपवणे

पू. नेवासकरकाकांकडे ग्रंथ आणि ज्ञान सामर्थ्य पुष्कळ मोठे आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथांचा अमूल्य ठेवा सनातनच्या महर्षि आध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी म्हणून आपल्याला देऊ केला आहे. हे त्यांचे केवढे मोठे योगदान सनातनला लाभले आहे !

कार्याची कुठेही वाच्यता न करता साहाय्य करणारे असे संतरत्न सनातनला लाभले आहे. पू. नेवासकरकाकांच्या माध्यमातून सनातनच्या कार्याला प्रत्यक्ष नवनाथांचेच आशीर्वाद लाभले असून त्यांच्या आशीर्वादामुळेच सनातनचे कार्य अनेक पटींनी वृद्धींगत होत आहे.

५ ई. सनातनच्या आश्रमात रहाण्यास, तसेच महर्षि अध्यात्म
विश्‍वविद्यालयासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध असणे

ते म्हणाले, ‘‘काही दिवसांनी आम्ही दोघेही सनातनच्या आश्रमात रहायला येऊ, म्हणजे तेथेे आमची साधनाही होईल. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी तुम्हाला जे साहाय्य लागेल, उदा. म्युझियम उभे करणे किंवा वस्तूंचे दालन सिद्ध करणे या संदर्भात मला पुष्कळ माहिती (ज्ञान) आहे. याविषयी मला केव्हाही विचारा. मी तिकडे (गोव्यात) येऊन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पायाभरणीला अवश्य साहाय्य करीन.’’ आपल्याला पू. नेवासकरकाकांचे मोठे सहकार्य आणि आशीर्वाद लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून होणारी श्री देवेंद्रनाथांची कृपा आपल्यासाठी महत्त्वाची आहे !

सनातनचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे कार्यही वाढत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्पच आता मूर्त रूपात साकारतांना दिसत आहे.

प्रार्थना

‘आम्हा सर्व साधकांकडून पू. नेवासकरकाकांच्या चरणी कोटी कोटी नमस्कार ! सनातनवर त्यांची अशीच अखंड कृपा रहावी, ही प्रार्थना !’

– (सद्गुरु) सौ. अंजली मुकुल गाडगीळ (५.१०.२०१७)

 

पू. अशोकराव नेवासकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त
नगर येथील धर्माभिमानी पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी व्यक्त केलेले विचार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने संतपदी विराजमान झालेले पू. (प्रा.) अशोकराव नेवासकर यांनी आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

इतिहास संशोधन आणि अध्यात्म यांमुळे आम्ही जवळ आलो. ते उपाध्यक्षपद भूषवत असलेल्या नगर जिल्हा इतिहास संशोधन मंडळाचा सेक्रेटरी म्हणून मी काम पहात होतो. त्यांचा सहवास जवळून लाभण्याचे भाग्य मला लाभले.

पू. नेवासकर हे नाथभक्तांना प्रेरित करण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतात. ‘ज्ञानामधून वैराग्य प्राप्त व्हावे’, हा त्यांचा विचार साधकांना दिशा देणारा आहे. कर्मयोग हाच राजयोग होय. ‘ब्रह्म सेवेतूनच ज्योतीब्रह्माची प्राप्ती होते’, हे त्यांचे अनुभवसिद्ध विचार ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ची अनुभूती देत ‘इदं न मम’पर्यंत आणून जीवनाच्या कृतार्थतेची अनुभूती मिळवून देतात. संतपदी विराजमान झालेले पू. प्रा. अशोकराव नेवासकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मला लेखनसेवा करता येणे, ही मी भगवान श्रीकृष्णाचीच आज्ञा समजतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment