वडोद (जिल्हा संभाजीनगर) येथील मंदिरात कठोर साधना केलेले नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचा सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी पू. महाराजांना सनातनचे पंचांग भेट दिले आणि सनातनच्या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराजांनी या वेळी सनातनच्या कार्याचे कौतुक केले. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला लवकरच भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर लेखातून वडोद येथील कानिफनाथ यांनी तपश्‍चर्या केलेल्या स्थानाचे महात्म्य, तसेच पू. शिवनगिरीकर महाराज यांचे कार्य इत्यादी माहिती जाणून घेऊया.

पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज

वडोद येथील कानिफनाथ यांनी तपश्‍चर्या केलेल्या स्थानाचे महात्म्य !

संभाजीनगर येथून जवळच असलेल्या वडोद या गावी कानिफनाथ यांनी तपश्‍चर्या केलेले स्थान आहे. पू. महाराज अनेक भक्तांना तेथे दर्शन घेण्यासाठी पाठवतात. दर्शन घेतल्यावर बर्‍याच भक्तांचे त्रास दूर झाले आहेत.

पू. महाराजांनी सांगितले, ‘‘वडोद येथील स्थानाला ९ खेटे घातले, म्हणजेच तिथे ९ वेळा जाऊन दर्शन घेतले की, कर्करोग बरा होणे, शस्त्रकर्म टळणे, तसेच संतती न होणार्‍यांना संतती होणे, असे अनुभव काही भक्तांना आले आहेत. ‘सनातन-गोअर्क’ देऊनही बर्‍याच भक्तांचा त्रास दूर झाला आहे.’’

वडोद येथील कानिफनाथ यांच्या मंदिराचा पूर्वेतिहास !

वडोद येथे कानिफनाथ यांचे मंदिर आहे. हे स्थान ‘वडोद कान्होबा’ या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी कानिफनाथांनी काही वर्षे तपश्‍चर्या केली आणि त्यांची मच्छिद्रनाथांशी भेट झाली होती. कानिफनाथ यांचे जे सेवेकरी या ठिकाणी होते, त्यांची समाधीही येथे आहे.

पू. शिवनगिरीकर महाराज यांचे गुरु पू. पाथर्डीकर महाराज एका जंगलात तपश्‍चर्या करत असतांना त्यांना दृष्टांत झाला आणि या स्थानी येण्याची आज्ञा झाली. त्यापूर्वी हे मंदिर दुर्लक्षित होते. पू. पाथर्डीकर महाराज यांनी या मंदिराला ऊर्जितावस्थेत आणून येथील सर्व व्यवस्थेची घडी बसवली. पू. पाथर्डीकर महाराज यांना शिवाने वडोदपासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील एक शिवलिंग वडोद येथील मंदिरात आणून त्याची स्थापना करण्याविषयी स्वप्नदृष्टांत दिला. हा दृष्टांत होण्याआधी ते शिवलिंग अनेक जणांनी हलवूनही हलत नव्हते. पू. पाथर्डीकर महाराज यांना दृष्टांत झाल्यावर ते शिवलिंग केवळ चार जणांनी उचलून वडोद येथे आणले. त्यानंतर त्या लिंगाची स्थापना ‘काशी विश्‍वेश्‍वर’ या नावाने मंदिरात करण्यात आली.

पू. शिवनगिरीकर महाराज यांनी मंदिरात येणार्‍या भक्तांसाठी व्यवस्था करणे

पू. पाथर्डीकर महाराज यांच्या पश्‍चात पू. शिवनगिरीकर महाराज यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले. त्यांनी मंदिरात येणार्‍या भक्तांची सोय व्हावी, यासाठी व्यवस्था केली. काही स्थानिकांचा विरोध असूनही मंंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी त्यांनी आवश्यक ते पालट केले. या मंदिरात अन्नदान, यज्ञ इत्यादी कार्ये नियमितपणे होत आहेत.

पू. शिवनगिरीकर महाराज यांचे
सनातन संस्था आणि साधक यांना लाभलेले आशीर्वाद !

१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि साधक यांना
कानिफनाथांचा आशीर्वाद असलेला धागा, तसेच यज्ञातील विभूती देणे

या वेळी महाराजांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि चित्रीकरण सेवेसाठी त्यांच्यासह प्रवास करणारे साधक यांना रक्षणासाठी कानिफनाथांचा आशीर्वाद असलेला धागा, तसेच यज्ञातील विभूती दिली.

२. पौर्णिमेनिमित्त मंदिरात झालेल्या यज्ञात साधकांचे त्रास आणि
साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करून आहुती देण्यात येणे

वडोद येथे कानिफनाथ यांच्या मंदिरात प्रत्येक मासात पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी यज्ञ केला जातो. ६.९.२०१७ या दिवशी पौर्णिमेनिमित्त झालेल्या यज्ञात सनातनच्या साधकांचे त्रास आणि साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करून आहुती देण्यात आली. या यज्ञाचा २०० हून अधिक भक्तांनी लाभ घेतला. या वेळी सनातनचे संभाजीनगर येथील काही साधक उपस्थित होते. पूर्णाहुती देतांना पू. महाराजांनी तेथे उपस्थित असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनाही नारळ अर्पण करण्यास सांगितले. यज्ञानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.

३. पू. महाराजांनी दिलेला आशीर्वाद

पू. महाराज म्हणाले, ‘‘या यज्ञामुळे कानिफनाथांचे आशीर्वादरूपी कवच प्राप्त होऊन साधकांचे रक्षण होईल. सनातनच्या साधकांना होणारे शारीरिक त्रासही दूर होतील, तसेच सनातन कार्याची वृद्धी होईल !’’

पू. शिवनगिरीकर महाराज यांना सनातन-निर्मित पंचांग भेट देतांना (१) सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. महाराजांच्या बाजूला त्यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर
यज्ञाची पूर्णाहुती देतांना (१) सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, (२) पू. शिवनिगिरीकर महाराज आणि उपस्थित भक्त

पू. शिवनगिरीकर महाराज यांचे कार्य

पू. शिवनगिरीकर महाराज त्यांची नोकरी सांभाळून भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या घरात असलेल्या ध्यानमंदिरात ते भक्तांना कानिफनाथांचा आशीर्वाद देऊन एक अभिमंत्रित धागा आणि प्रत्येक पौर्णिमा अन् अमावास्या या तिथींना होणार्‍या नाथपंथीय हवनाची (या हवनात शाबरी विद्येतील मंत्रांनी आहुती दिली जाते.) विभूती देतात. या ध्यानमंदिरात अनेक भक्त नामजप करतात. त्यामुळे बाह्य बाधा आणि त्रास यांपासून भक्तांचे रक्षण होते.

पू. शिवनगिरीकर महाराज यांची साधना

पू. महाराजांनी गुर्वाज्ञेने ५ वर्षे मौनव्रत ठेवून वडोद येथील मंदिरात कठोर साधना केली आहे. ‘शंकरमहाराज पाथर्डीकर या गुरूंच्या कृपेने साधना करू शकलो’, असे त्यांनी या वेळी सांगितले.

स्वतः तीव्र साधना करून परमार्थात पतीला पूर्णपणे साथ
देणार्‍या पू. महाराजांच्या धर्मपत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर !

पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या धर्मपत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर या देवीभक्त असून त्यांना देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांनी ‘जगदंब’ या नामाचा ‘११,११,११,१११ वेळा, म्हणजे अकरा कोटी, अकरा लक्ष, अकरा सहस्र आणि एकशे अकरा वेळा’ नामजप करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या संकल्पाची पूर्तता होऊन तेवढ्याच संख्येत आहुती देणारा यज्ञही देवीने त्यांच्याकडून करून घेतला. सौ. वनिता शिवनगिरीकर पू. महाराजांना परमार्थात पूर्णपणे साहाय्य करतात.

पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या घरातील ध्यानमंदिर

क्षणचित्र

यज्ञानंतर सनातनच्या साधिका कु. प्रियांका लोणे यांनी सनातन संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी दोन धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment