शक्तिदेवता !

अनुक्रमणिका

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेणार आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया.

देवीच्या ९ रूपांविषयी… !

प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।। ३ ।।

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम् ।। ४ ।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।। ५ ।।

– देवीकवच

अर्थ : पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघण्टा, चौथी कुष्माण्डा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री अशी ही नऊ दुर्गांची नावे साक्षात् ब्रह्मदेवाने सांगितली आहेत.

नवरात्रीतील ९ दिवस देवीच्या वरील ९ रूपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आज आपण शैलपुत्री या देवीच्या प्रथम रूपाविषयी जाणून घेऊया.

 

१. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्ति देवीचे प्रकट होणारे शैलपुत्री रूप !

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् ।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ।।

अर्थ : ‘मस्तकावर अर्धचंद्र धारण करणार्‍या, वृषभारूढ, त्रिशूलधारी, वैभवशाली अशा शैलपुत्री देवीला इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी’, यासाठी मी वंदन करतो.

वृषभावर आरूढ असलेल्या शैलपुत्रीदेवीचे सुंदर रूप

१ अ. शैलपुत्री, म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’,
असे संबोधले जाणे, सर्व देवतांच्या अहंकाराचेही हरण करणार्‍या शैलपुत्रीला ‘हैमावती’, असेही संबोधत असणे

भक्तांचे मनोवांछित पूर्ण करणारी, चंद्रालंकार धारण करणारी, वृषभारूढ, त्रिशूळधारी आणि यश प्राप्त करवून देणार्‍या शैलपुत्री देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ! ‘शैल’ म्हणजे पर्वत. दक्षाने केलेल्या यागाच्या वेळी दक्षपुत्री देवी सती तिचे ‘आदिशक्ति’ हे’ स्वरूप प्रकट करून तिचा अवतार संपवते. त्यानंतर आदिशक्ति पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला येते. तिचे हे रूप ‘शैलपुत्री’ या नावाने पूजले जाते. या रूपात देवी वृषभावर आरूढ आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसर्‍या हातात कमळ आहे. शैलपुत्री पार्वतीला ‘हैमावती’ असेही म्हणतात. एकदा देवतांनाही अहंकार झाला होता. त्या वेळी देवी शैलपुत्रीने त्यांचे गर्वहरण करून त्यांचा अहंकार नाहीसा केला होता.

१ आ. प्रार्थना

‘हे देवी शैलपुत्री, ज्याप्रमाणे तू हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेऊन एकनिष्ठेने आई-वडिलांची सेवा केलीस आणि शंकराची अनन्य भक्ती केलीस, त्याचप्रमाणे आम्हा साधकांना गुरुसेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा) करण्यासाठी अन् गुरुदेवांची अनन्य भक्ती करण्यासाठी आशीर्वाद दे. हे देवी हैमावती, ज्याप्रमाणे तू देवतांचा अहंकार नाहीसा केलास, त्याचप्रमाणे तू आमचा अहंकार नष्ट कर. आमच्याकडून ‘अहं’विरहित गुरुसेवा होण्यासाठी तूच आमच्याकडून ‘अहं’निर्मूलनासाठी साधना करवून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या आरंभी
कुलदेवतेची उपासना करण्यास सांगून त्यांच्याकडून आदिशक्तीची उपासना करवून घेणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधक साधना करू लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रथम साधकांना त्यांच्या त्यांच्या कुलदेवीची उपासना करायला सांगितली आणि सर्व साधकांकडून त्यांच्या कुलदेवीचे नामस्मरण करवून घेतले. कुलदेवीची उपासना, म्हणजेच आदिशक्तीची उपासना आहे ! साधनेतील प्राथमिक अवस्थेत गुरुदेवांनी आम्हा साधकांकडून ‘कुलदेवीची उपासना, नामस्मरण आणि कुलाचार पालन’, असे सर्व करवून घेतले. देवी आदिशक्तीनेही साधकांना भरभरून दिले. साधकांच्या साधनेतील प्राथमिक टप्प्याचे सर्व अडथळे देवीनेच दूर केले. आम्हा साधकांकडून आदिशक्तीची उपासना करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

– तन्त्रोक्त देवीसूक्त, श्लोक ६

अर्थ : सर्व जिवांमध्ये जी ‘विष्णुमाया’ या रूपाने ओळखली जाते, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान (१६.९.२०२१)

१ ई. भगवान शिवाची शक्ति म्हणजेच ‘आदिशक्ति’ !

‘आदिशक्ति कोण आहे ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर स्वामी भोलेबाबाजी (उत्तर भारतातील एक संत) यांनी सांगितलेली कथा अत्यंत बोधप्रद आहे. आदिशक्तीविषयी अनेक ग्रंथ वाचूनही आपल्या जे लक्षात येणार नाही, ते केवळ या एका प्रसंगातून लक्षात येईल.

श्री. विनायक शानभाग

१ ई १. शाक्तमताचे खंडण करण्याचा प्रयत्न करणार्‍या
आद्यशंकराचार्यांना देवीने ते खंडण करू शकत नसल्याची जाणीव करून देणे

अ. शाक्तमताचे खंडण करण्यासाठी काश्मीर येथे गेलेल्या आद्यशंकराचार्यांना दमल्यामुळे बोलण्याचीही शक्ती नसणे

स्वामी भोलेबाबाजींनी सांगितले, ‘‘एकदा भगवत्पाद आद्यशंकराचार्य ‘शाक्तमता’चे खंडण करण्यासाठी काश्मीर येथे गेले होते. ‘शाक्तमता’पेक्षा ‘अद्वैत सिद्धांत’ कसा श्रेष्ठ आहे ?’, असा विषय ते तिथे मांडणार होते; पण काश्मीरला पोचेपर्यंत ते पुष्कळ दमले. ते इतके दमले होते की, त्यांना उठणे, बसणे आणि बोलणे यांसाठीही शक्ती नव्हती.

आ. एका बालिकेच्या रूपात आलेल्या देवीने शंकराचार्यांना ‘तुम्ही शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताचे मंडण करू शकता का ?’, असे विचारणे

थोड्या वेळाने दैवी सौंदर्य असलेली एक १२ वर्षांची कन्या त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या कानात म्हणाली, ‘हे शंकर, तुम्ही शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताचे मंडण करू शकता का ?’ अगदी लहान आवाजात आद्यशंकराचार्य तिला म्हणाले, ‘देवी, यासाठीच मी काश्मीरला आलो आहे; मात्र आता माझ्यात बोलण्याचीही शक्ती नाही. जेव्हा माझ्या अंगात शक्ती येईल, तेव्हाच मी याविषयी काही बोलू शकेन. माझ्यात शक्ती आल्याविना मी काही करू शकत नाही.’

इ. देवीने ‘शक्तीविना शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताची मांडणी कशी करू शकता ?’, असे विचारल्यावर आद्यशंकराचार्य आनंदाने देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिथून निघून जाणे

तेव्हा ती दैवी कन्या स्मितहास्य करत त्यांना म्हणाली, ‘हे विद्वोत्तम, तुमच्यात शक्तीच नाही, तर तुम्ही शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताचे मंडण कसे करू शकता ? मी शिवाची शक्ति ‘शिवा’ आहे. शिव अचल आहे, शक्तिविना शिवाकडून कुठलीही क्रिया होऊ शकत नाही. शिवाला जाणण्यासाठी आणि ‘शिव कोण आहे ?’, हे इतरांना कळण्यासाठी शिवानेच शक्तीची उत्पत्ती केली आहे. हे शंकर, माझी उत्पत्ती शिवापासूनच झाली असल्याने तुम्ही माझे खंडण कसे करू शकता ? ‘खंडण असो किंवा मंडण असो’, ते मीच करू शकते. ज्या शक्तीविना तुम्ही काही करू शकत नाही, त्याचे खंडण तुम्ही करूच शकत नाही.’ देवीचे हे बोल ऐकून शंकराचार्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी देवीचे चरण धरले आणि तत्क्षणी ते काश्मीरमधून परत आले.’

१ ई २. ‘आदिशक्ति’ ही सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपिणी असून तिला शरण
जाऊन भक्तीभावाने तिची नित्यउपासना करणे’, एवढेच आपण करू शकणे

स्वामी भोलेबाबाजी सांगतात, ‘‘शक्ति कोण आहे ? कुठून आली ? तिची निर्मिती कुणी केली ? कुणासाठी केली ? कशासाठी केली ? कुठे केली ? कधी केली ?’, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे व्यर्थ आहे. ‘शक्ति अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत असणारच आहे’, हेच एकमेव सत्य आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून जी काही क्रिया घडत आली आहे, त्यामध्ये तीच आहे ! अशी ती आदिशक्ति सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपिणी आहे. तिला शरण जाऊन भक्तीभावाने तिची नित्यउपासना करणे’, एवढेच आपण करू शकतो.’’

१ ई ३. शक्तिविना शिव कार्य करू शकत नाही, त्याचप्रमाणे गुरुकृपेविना
साधक काहीच करू शकत नसणे, केवळ श्री गुरूंच्या चैतन्यशक्तीच्या माध्यमातूनच कार्य होत असणे

सनातनच्या साधकांच्या साधनेचेही असेच आहे. सनातनच्या तीन गुरूंची, म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची कृपा असणे’, हीच सनातनच्या साधकांची शक्ती आहे. गुरुकृपेविना साधक काहीच करू शकत नाहीत. गुरुकृपारूपी शक्तीच साधकांकडून सर्वकाही करवून घेते. ‘गुरुकृपा’ काय आहे ?’, याचे आपण कुणीही वर्णन करू शकत नाही. ‘ती ‘गुरुकृपा’रूपी शक्ती सर्व साधकांच्या माध्यमातून कार्य करवून घेत आहे’, हे सत्यवचन आहे ! ‘गुरुकृपारूपी शक्ती प्राप्त होण्याआधी आपली काय स्थिती होती ?’, ते साधकांनी काही प्रमाणात अनुभवलेले आहे.

सनातनच्या साधकांमध्ये ‘चैतन्यशक्तीच्या’ रूपात अखंड विराजमान असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी त्रिवार वंदन !’

 

२. नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे रूप ‘ब्रह्मचारिणी’ !

२ अ. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवी सतीने केलेली अतिशय कठीण तपश्चर्या !

‘ब्रह्मचारिणी’ हे देवी सतीचे अविवाहित रूप आहे. ‘ब्रह्मचारिणी’ या नावामधील ‘ब्रह्म’ म्हणजे ‘शुद्ध आत्मतत्त्व’ आणि ‘ब्रह्मचारिणी’, म्हणजे आत्मतत्त्वाच्या उपासनेत सतत रत (मग्न) असलेली. पार्वतीने ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी महर्षि नारद यांच्या सांगण्यावरून सहस्रो वर्षे कठीण तपश्चर्या केली. शेवटची काही सहस्र वर्षे ती केवळ बिल्व पानांच्या (बेलाच्या पानांच्या) आहारावर राहिली आणि शेवटी तिने बिल्वपाने खायचेही सोडून दिले. तेव्हा तिला ‘अपर्णा’ असे नाव पडले. ‘पर्ण’ म्हणजे ‘पान’ आणि ‘अपर्णा’, म्हणजे ‘व्रतपालन करतांना जिने पानांच्या सेवनाचाही त्याग केला ती.’ ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप ज्योतिर्मय आणि भव्य आहे. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितले, ‘देवी, आजपर्यंत तुझ्यासारखी एकनिष्ठेने कुणीही साधना केली नाही. तुला साक्षात् शिवशंकर पतीरूपात लाभणार आहे.’ देवीने जगासमोर ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करून अविरत साधनेचा अत्युत्तम आदर्श ठेवला आहे.

२ आ. प्रार्थना

‘हे देवी ब्रह्मचारिणी, तू आम्हा साधकांना तुझ्यासारखी साधनापथाशी एकनिष्ठ रहाण्याची शक्ती दे आणि या साधनामार्गापासून दूर न जाण्याचा आशीर्वाद दे.

‘हे देवी, आम्ही साधक श्री गुरुचरणांच्या प्राप्तीसाठी तळमळत आहोत. साधनापथामध्ये येणारे सर्व अडथळे आणि संघर्ष यांवर आम्हाला मात करता येऊ दे अन् स्थिर राहून आणि संयम ठेवून श्री गुरुचरणांची सेवा करता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आई, आमचे नामस्मरण अखंड होऊ दे. आम्हाला सदैव गुरुचरणांचा ध्यास लागू दे. ‘हे जगन्माते, तू आम्हा साधकांकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करवून घे’, अशी प्रार्थना आहे. तुझ्या चरणी कोटीशः वंदन !’

 

३. चंद्रघण्टा हे आदिशक्तीचे तिसर्‍या दिवशी प्रकट होणारे रूप !

श्री चंद्रघंटादेवी

३ अ. चंद्रघण्टा

देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्‍या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात. देवी चंद्रघण्टा भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते. देवी तिच्या भक्तांच्या जीवनातील भूत, प्रेत आणि पिशाच बाधा दूर करते.

३ आ. प्रार्थना

‘हे देवी चंद्रघण्टा, ज्याप्रमाणे तू भक्तांच्या जीवनातील भूत, प्रेत आणि पिशाच बाधा तात्काळ दूर करतेस, त्याप्रमाणे तू आम्हा साधकांना होणार्‍या वाईट शक्तींचा त्रास दूर करून आमचे रक्षण कर. ‘हे भवभयहारिणी देवी, आम्हाला गुरुसेवेत सदैव तत्पर रहाण्याचा आशीर्वाद दे. जेव्हा आमचे स्वभावदोष अन् अहं उफाळून येतील, तेव्हा आम्हाला सतर्क ठेव आणि त्यांच्यावर चैतन्याचा वार करण्याची शक्ती दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

 

४. आदिशक्तीचे नवरात्रीतील ४ थ्या दिवशी प्रकट होणारे कुष्मांडा रूप !

अष्टभुजा आणि आदिस्वरूप असलेली कुष्मांडादेवी

४ अ. कुष्मांडा

‘कूष्म’ म्हणजे स्मितहास्य !’ ‘कुष्मांडा’ (टीप १) म्हणजे केवळ आपल्या स्मितहास्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी ! ‘जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते आणि सर्वत्र अंधकार होता, त्या वेळी देवीने ‘कुष्मांडा’ रूपात केवळ हास्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. ‘कुष्मांडा’ हे आदिशक्तीचे आदिस्वरूप आहे. सूर्यमंडलाच्या आत जी शक्ति आहे, तीच ‘कुष्मांडा’ होय !’

(साभार : नवदुर्गा, गीताप्रेस, गोरखपूर)

‘कुष्मांडादेवी अष्टभुजा देवी आहे. संस्कृत भाषेत कोहळ्यालाही ‘कुष्मांड’ म्हटले जाते. कुष्मांडादेवीला कोहळ्याचा बळी अत्यंत प्रिय आहे. कुष्मांडादेवी भक्तांचे रोग, दैन्य आणि शोक दूर करणारी अन् आयुष्यवृद्धीचीही देवता आहे.’

टीप १ – देवीच्या या नावाविषयी अनेक पाठभेद आहेत.

४ आ. प्रार्थना

‘हे कुष्मांडा देवी, तू तुझ्या स्मितहास्यातून एका क्षणात ब्रह्मांडाची उत्पत्ती केलीस, तशीच तू हिंदु राष्ट्राची स्थापना कर. हे देवी, आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहोत. आम्हा साधकांना गुरुसेवा करण्यासाठी आणि अध्यात्मप्रसार करण्यासाठी निरोगी शरिराची आवश्यकता आहे. हे देवी, तू रोग, दैन्य आणि शोक दूर करणारी आहेस. तू आम्हा साधकांना चांगले आरोग्य दे अन् आमच्याकडून गुरुदेवांची एकनिष्ठेने सेवा करवून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

५. आदिशक्ति देवीचे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी प्रकट होणारे ‘स्कंदमाता’रूप !

स्कंदमाता

५ अ. बालरूपातील कार्तिकेयाला कडेवर घेतलेली
आदिशक्ति ज्ञानदायिनी असल्यामुळे तिचे ‘स्कंदमाता’ हे ज्ञानस्वरूप असणे

देवांचे सेनापती, म्हणजे कार्तिकेय ! कार्तिकेयाचे एक नाव ‘स्कंद’ आहे. ‘स्कंदमाता’ म्हणजे कार्तिकेयाची माता. या अर्थाने देवीचे एक नाव ‘स्कंदमाता’, असे आहे. नवरात्रीच्या पंचमी तिथीला आदिशक्तीची ‘स्कंदमाता’ या रूपात पूजा करण्यात येते. या रूपात देवीच्या कडेवर भगवान कार्तिकेय बालरूपात बसला आहे. चतुर्भुज असलेली स्कंदमाता सिंहावर आरूढ आहे. या रूपात देवी ज्ञानदायिनी आहे. या रूपात स्कंदमातेने बालरूपातील कार्तिकेयाला स्वरूपाचे ज्ञान दिले; म्हणून ती ज्ञानस्वरूपिणी आहे.

५ आ. प्रार्थना

‘हे देवी स्कंदमाते, आम्ही अज्ञानी आहोत. आम्हा साधकांसाठी तू ज्ञान प्रदान करणारी ‘ज्ञानमाता’ आहेस. आमच्या श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांना प्रसन्न करण्याचे रहस्य तू आम्हाला शिकव. ‘आई जगदंबे, तू आम्हाला गुरुकृपा संपादन करण्यासाठी आम्ही कशी साधना करावी ?’, याचे ज्ञान दे. हे स्कंदमाते, हे ज्ञानांबिके, तू आम्हाला चिरंतन अध्यात्माचे ज्ञान दे, योग्य-अयोग्य यांचे ज्ञान दे, इष्ट-अनिष्टचे ज्ञान दे आणि संस्कृती-विकृतीचे ज्ञान दे ! हे ज्ञानदायिनी माते, आमच्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करणार्‍या तुला आम्ही सर्व साधक शरण आलो आहोत.’

६. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी प्रकट होणारे
आदिशक्तीचे भय आणि शोक दूर करणारे ‘कात्यायनी’ रूप !

सिंहावर आरूढ असलेली श्री कात्यायनीदेवी

६ अ. ‘महर्षि कात्यायन यांनी ‘आदिशक्तीने आपल्या घरी ‘पुत्री’रूपात जन्म घ्यावा’,
यासाठी घोर तपश्चर्या करणे, तेव्हा देवीने ‘योग्य वेळ येताच मी जन्म घेईन’, असे आशीर्वचन देणे

‘महर्षि कत यांचे पुत्र कात्यऋषि आणि कात्यऋषि यांचे पुत्र महर्षि कात्यायन ! महर्षि कात्यायन यांची ‘देवीने त्यांच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा’, अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी आदिशक्तीची कठोर तपश्चर्या केली. महर्षींच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्याने आदिशक्तीने ‘योग्य वेळ आल्यावर तुमच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घेईन’, असे त्यांना सांगितले.

६ आ. महिषासुराचा त्रास वाढल्यावर ब्रह्मा-विष्णु-महेश
यांच्या संयुक्त ऊर्जेने कात्यायनी ऋषींच्या आश्रमात देवीची उत्पत्ती होणे

कालांतराने महिषासुराचा त्रास वाढल्याने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या संयुक्त ऊर्जेने जी शक्तीस्वरूपिणीची उत्पत्ती झाली, त्या शक्तीने आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीला कात्यायन ऋषींकडे जन्म घेतला. देवीने कात्यायन ऋषींकडे जन्म घेतल्याने तिला ‘कात्यायनी’ असे नाव पडले. दुर्गा, भवानी, चामुंडा ही सर्व कात्यायनी देवीचीच रूपे आहेत. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते.

६ इ. देवी कात्यायनी आणि महिषासुर यांचे युद्ध !

६ इ १. दनूच्या पुत्रांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करणे, त्याची तपश्चर्या भंग करण्याच्या प्रयत्नांत देवांकडून करंभ मारला जाणे

आज आपण ‘देवीने महिषासुराचा वध कसा केला ?’, ते जाणून घेऊया. श्रीमद् देवीभागवताच्या पाचव्या स्कन्धात महिषासुर वधाची कथा आहे. दनूचे करंभ आणि रंभ नावाचे दोन पुत्र होते. दोघांनाही मूल नव्हते. मूल होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. देवतांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत करंभ असुराचा मृत्यू होतो.

६ इ २. करंभचा भाऊ रंभ क्रोधित होऊन स्वतःचे शिर अग्नीमध्ये अर्पण करायला निघणे; परंतु अग्निदेवतेने त्याला तसे करण्यापासून परावृत्त करणे, तेव्हा रंभच्या इच्छेनुसार त्याला अग्निदेवाकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळणे

तेव्हा रंभला पुष्कळ राग येतो. तो त्या क्रोधावस्थेतच अग्निदेवाला स्वतःचे मस्तक अर्पण करायला निघतो. तत्क्षणी अग्निदेव प्रकट होऊन त्याला असे करण्यापासून परावृत्त करतो. रंभ अग्निदेवाकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मागून घेतो. तो ‘देवता, दानव आणि मनुष्य’ यांच्याशी युद्धात पराजित न होणारा आणि ‘इच्छेनुसार स्वतःचे रूप पालटू शकणारा असावा’, असे वरदान रंभासुर अग्निदेवाकडून मागून घेतो. अग्निदेव म्हणतो, ‘ज्या सुंदरीविषयी तुला प्रेम वाटेल, तिच्याकडून तुला दोन पुत्रांची प्राप्ती होईल.’

६ इ ३. रंभ आणि म्हैस यांच्या चिताग्नीतून ‘महिषासुर’ प्रकट होणे, पुढे महिषासुराने कठीण तपश्चर्येद्वारे ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेणे आणि ‘मला एका स्त्रीकडून मृत्यू येऊ दे’, असा वर मागून घेणे

पुढे दानवराज रंभला एक म्हशीकडे बघून कामभावना निर्माण होते. त्याच्या वीर्याने ती म्हैस गर्भवती होते. त्या म्हशीकडे बघून कामांध झालेला एक रेडा तिच्याजवळ येतो. रंभ आणि त्या रेड्यामध्ये झालेल्या युद्धात रंभ मरतो. रंभाच्या चितेवर ती म्हैस सती जाते. तेव्हा आधी त्या चिताग्नीतून ‘महिषासुर’ प्रकट होतो. थोड्या वेळाने त्या चिताग्नीतून रंभ असुर ‘रक्तबीज’ असुराच्या रूपात प्रकट होतो. सर्व दानव एकत्र येऊन त्याला राजा घोषित करतात. पुढे महिषासुर कठीण तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो. महिषासुर ब्रह्मदेवाकडून ‘देव, दानव आणि पुरुष यांच्या हातून मृत्यू न येता मला एक स्त्रीकडून मृत्यू येऊ दे’, असा वर मागून घेतो. महिषासुराला वाटते, ‘स्त्री अबला आहे. जगात अशी कुठलीही स्त्री नाही, जी माझ्याशी युद्ध करू शकेल.’

६ इ ४. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे महिषासुराला कुणीही पराजित करू न शकणे, त्यामुळे ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति उत्पन्न होणे

ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाल्यावर महिषासुर अजूनच अहंकारी होतो. तो सर्वांना त्रास देऊ लागतो आणि शेवटी देवतांनाही युद्धात पराजित करतो. संपूर्ण देवलोक त्याच्या हातात येतो. त्यामुळे सर्व देव पळून एका गुहेत रहातात. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे भगवान विष्णु आणि शिवही महिषासुराशी युद्ध करूनही त्याचा वध करू शकत नाहीत. शेवटी सर्व देवता, ब्रह्मदेव आणि शिव वैकुंठात जाऊन ‘श्रीविष्णूकडे याविषयी काही उपाय आहे का ?’, असे विचारतात. तेव्हा श्रीमहाविष्णु सांगतो, ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति महिषासुराचा वध करू शकते. कात्यायन ऋषींच्या आश्रमात ब्रह्मदेव, शिव, विष्णु आणि सर्व देवतांच्या तेजातून एका देवीची उत्पत्ती होते. सर्व देवता त्यांची आयुधे आणि अलंकार त्या देवीला देतात. अष्टादश, म्हणजे १८ भुजा असलेली देवी सिंहावर आरूढ असते.

६ इ ५. देवीने सर्व देवतांना ‘मी महिषासुराचा वध करीन’, असे आश्वस्त करणे, देवीने महिषासुराला युद्ध करण्याचे आवाहन देणे

सर्व देवता त्या देवीची स्तुती करतात. ती स्तुती ऐकून देवी सर्व देवतांना आश्वस्त करते, ‘मी महिषासुराचा वध करीन.’ यानंतर देवी मोठ्याने हसते. देवीचा हसण्याचा नाद एवढा मोठा असतो की, ‘एका क्षणासाठी संपूर्ण विश्वच हलते. त्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात, सुमेरू पर्वत हलतो आणि दानव घाबरतात. ‘हे कुणाचे हास्य आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी महिषासुर एका दूताला पाठवतो. दूत महिषासुराला सिंहावर आरूढ असलेल्या सुंदर देवीचे वर्णन करतो. ते ऐकून महिषासुराच्या मनात देवीशी विवाह करण्याचा विचार येतो; मात्र देवी त्याच्याशी युद्ध करण्याविषयी सांगते. महिषासुर देवीला बंदी बनवून आणण्यासाठी एक एक करून अनेक शूरवीर दानवांना पाठवतो; मात्र देवी त्या सर्वांना मारून टाकते. दानव सैनिकांना देवीचा सिंहच मारून टाकतो. शेवटी महिषासुराला युद्धभूमीवर यावेच लागते.

६ इ ६. शेवटी देवी कात्यायनीने सुदर्शनचक्राने त्याचे डोके शरिरापासून वेगळे करून त्याचा वध करणे

दानव जेवढे पराक्रमी असतात, तेवढेच ते बुद्धीहीन असतात. महिषासुर देवीशी युद्ध करायला जातो; मात्र देवीला पाहून तो मंत्रमुग्ध होतो. तो सर्व अस्त्र-शस्त्र यांचा त्याग करून देवीला शरण जातो. तो देवीला सांगतो, ‘‘मी तुझी पत्नीरूपात सेवा करतो.’’ तेव्हा देवी त्याला म्हणते, ‘‘परमेश्वररूपी पुरुष सोडून अन्य कुणी पुरुष नाही. ज्या परमेश्वराने या विश्वाची उत्पत्ती केली आहे, त्याचे मी सतत ध्यान करत असते. तोच माझा सर्वस्व आहे.’’ महिषासुर देवीला ‘स्त्रीने बलशाली पुरुषाशी विवाह का करावा ?’, याविषयी अनेक गोष्टी सांगतो; मात्र देवी नकार देते. शेवटी महिषासुर देवीशी युद्ध करतो आणि देवी सुदर्शनचक्राने त्याचे डोके शरिरापासून वेगळे करते. तेव्हा देवता आणि ऋषीगण आनंदी होऊन देवीची स्तुती करतात.

६ ई. आदिशक्तीने ‘रक्तबीज’ असुराला कसे मारले ?

१. एका वैज्ञानिक सिद्धांतानुसार ‘शक्ती निर्माण करता येत नसणे किंवा ती नष्टही करता येत नसणे, केवळ तिचे रूपांतर एका शक्तीतून दुसर्‍या शक्तीत होणे’

‘एक वैज्ञानिक सिद्धांत आहे, ‘शक्ती कधीही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ती केवळ एका रूपातून दुसर्‍या रूपात रूपांतरित होते.’ (Energy cannot be created nor destroyed; it can only be changed from one form to another.)

जो नियम विज्ञानाला आता कळला आहे, तो नियम सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून आहे. वाईट शक्ती या एकप्रकारे शक्तीचे एक रूप आहेत; मात्र त्यांचे कर्म, विचार आणि ध्येय विरुद्ध असल्याने त्यांना ‘वाईट शक्ती’, असे म्हटले जाते. वाईट शक्ती कधी मरत नाहीत; पण त्यांची शक्ती न्यून होते. त्यांची शक्ती न्यून झाली की, त्या पाताळात जाऊन साधना करून दुसरे रूप धारण करून परत पृथ्वीवर येतात’, असे अध्यात्म म्हणते. जय-विजय यांनी पृथ्वीवर हिरण्याक्ष-हिरण्यकश्यपू, रावण-कुंभकर्ण आणि शिशुपाल-दंतवक्र या रूपांत जन्म घेतले. महाभारत युद्धाच्या वेळी नरकासुराने सूर्यपुत्र कर्णामध्ये प्रवेश केला आणि दानात अग्रेसर असलेल्या कर्णाला दुर्याेधनाच्या बाजूने लढण्याची बुद्धी झाली.

२. रंभाच्या चिताग्नीतून रक्तबिजाची निर्मिती होणे, आदिशक्ति जगदंबेने अनेक रूपे धारण करून अनेक असुर मारणे, त्यानंतर शुंभने महापराक्रमी ‘रक्तबीज’ असुराला देवीशी युद्ध करायला पाठवणे

‘रंभ’ या महाबली असुराचे दुसरे रूप म्हणजे ‘रक्तबीज’ असुर होय ! रंभाच्या चिताग्नीतूनच रक्तबिजाची निर्मिती झाली आहे. महिषासुराचा वध झाल्यावर शुंभ-निशुंभ नावाचे महापराक्रमी राक्षस दानवांचे राजा बनतात. त्यांच्या अधिपत्याखाली असलेला ‘रक्तबीज’ हा असुर मोठा पराक्रमी आणि चाणाक्ष असतो. शुंभ-निशुंभ या दानवांच्या संहारासाठी आदिशक्ति जगदंबा अनेक रूपे धारण करते. देवीशी झालेल्या युद्धात शुंभ-निशुंभचे अनेक सैनिक आणि मोठे पराक्रमी असुर मारले जातात. शुंभ-निशुंभचे सेनापती चंड-मुंडही देवीशी झालेल्या युद्धात मारले जातात. चंड-मुंड यांना मारण्यासाठी देवी चंडी आणि चामुंडा हे रूप धारण करते. चंड-मुंड यांच्या मृत्यूनंतर शुंभ महापराक्रमी ‘रक्तबीज’ असुराला देवीशी युद्ध करायला पाठवतो. देवी युद्धभूमीत मध्यभागी सिंहावर विराजमान असते आणि तिची चंडी, चामुंडा, अंबिका, काली आदी रूपे असुरांशी युद्ध करत असतात.

३. ‘रक्तबीज असुराच्या रक्ताचा एक थेंब जरी भूमीवर पडला, तरी त्यातून त्याच्यासारखाच शक्तीशाली रक्तबीज असुर निर्माण होईल’, असे वरदान त्याला भगवान शिवाकडून प्राप्त होणे

रक्तबीज देवीशी युद्ध करायला येतो आणि आरंभी तो देवीच्या सिंहावर आक्रमण करतो. देवी बाण सोडून त्याला मूर्च्छित करते. थोड्या वेळाने तो मूर्च्छितावस्थेतून बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्याला राग येतो आणि तो त्याची मायावी शक्ती वापरण्याचे ठरवतो. रक्तबिजाकडे अशी मायावी शक्ती असते की, ‘त्याचे रक्त भूमीवर पडले की, त्याच्या रक्ताच्या एकेका थेंबातून त्याच्यासारखा दिसणारा आणि त्याच्या एवढाच बलशाली असुर सिद्ध होतो.’ यासाठीच त्याला ‘रक्तबीज’ असे नाव पडलेले असते. त्याने भगवान शिवाकडून हे वरदान मागून घेतलेले असते. शापाला उःशाप असतो, तसेच असुरांनी मागून घेतलेल्या विचित्र वरदानातही ईश्वरी युक्ती असतेच. देव असुरांना वरदान देतांना असे एकतरी द्वार उघडे ठेवतो, जेथून त्याला आत येऊन असुरांना मारता येते.

युद्धभूमीत आदिशक्तीची अनेक रूपे प्रकट होतात. शेवटी श्रीविष्णूची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून युद्धभूमीत येते आणि सुदर्शनचक्राने रक्तबिजाचे डोके शरिरापासून वेगळे केल्यावर त्याच्या शरिरातून रक्ताचा फवारा उडतो. जेथे जेथे रक्तबिजाचे रक्त पडते, तेथे तेथे त्याच्या रक्ताच्या थेंबातून त्याच्यासारखा एक-एक असुर सिद्ध होतो. ब्रह्मणी, माहेश्वरी, एैंद्री, नारसिंही, वाराही अशा अनेक देवी रक्तबिजावर शस्त्राने आघात करतात; मात्र प्रत्येक वेळी अनेक पटींनी रक्तबिजासारखे असुर सिद्ध होतात.

४. आदिशक्तीने कालीदेवीला त्याचे सर्व रक्त प्यायला आणि त्याच्या कापलेल्या अवयवांतील रक्ताचा एक थेंबही खाली पडू न देता ते प्यायला सांगणे, त्यामुळे रक्तबीज असुराचा नाश होणे

शेवटी आदिशक्ति जगदंबा ठरवते, ‘आता पुरे झाले आणि ती कालीकडे बघून सांगते, ‘हे काली, आता तू तुझे तोंड उघडून रक्तबिजाच्या शरिरातून निघणारे रक्त प्यायला आरंभ कर. मी आणि अन्य देवी मिळून रक्तबिजाच्या सर्व रूपांना मारून टाकतो. हे देवी, तू त्याचे रक्त अशा प्रकारे प्यावेस की, त्याच्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडू नये. आता हाच एकमेव उपाय आहे. मी रक्तबिजाला मारून टाकल्यावर तू त्याला संपूर्ण खाऊन टाक.’ आदिशक्तीचे हे बोल ऐकून कालीने रक्तबिजाच्या शरिरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला. देवीने रक्तबिजाच्या शरिराचे एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती. त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबिजाला खाऊन टाकले. रक्ताचा एकही थेंब शेष राहिला नाही. याप्रमाणे रक्तबिजाचा वध झाला. रक्तबिजाला मारून देवीने संपूर्ण सृष्टीला आनंदी केले. तेव्हा सर्व देवता आणि ॠषिमुनी आदिशक्ति जगदंबेवर पुष्पवृष्टी करू लागले.

५. रक्तबिजासारख्या वाईट दुष्प्रवृत्ती परत पृथ्वीवर आलेल्या असणे

आज रक्तबीज असुराची गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे सध्या या पृथ्वीवर पुन्हा रक्तबिजासारख्या वाईट दुष्प्रवृत्ती आल्या आहेत. अशा वाईट दुष्प्रवृत्ती सर्व देशांमध्ये आहेत. त्यांची संख्या रक्तबिजाच्या रक्तातून निर्माण होणार्‍या असुरांप्रमाणे गतीने वाढत आहे. ‘असे लोक रक्तबिजाचे कलियुगातील रूप आहेत’, असे आपण म्हणू शकतो. रक्तबिजाला नष्ट करण्याचे कार्य मानव करू शकत नाही. हे केवळ आणि केवळ आदिशक्तीच करू शकते; मात्र ‘ती हे कसे आणि केव्हा करणार ?’, हे भगवंतालाच ठाऊक आहे.

आपण सर्वांनी आपली भक्ती एवढी वाढवूया की, आदिशक्ति जगदंबा लवकर प्रकट होऊन वाईट दुष्प्रवृत्तीला नष्ट करील. ‘मोठ्या अनिष्ट शक्तीलाही मारू शकते’, अशी शक्ती भक्तीत आहे. ती भक्ती करण्यासाठी आपण आदिशक्तीचे भक्त होऊया आणि तिची कृपा संपादन करूया. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु !

६ उ. वर्तमानकाळातही पृथ्वीवर आसुरी वृत्तीचे लोक असणे

आज पृथ्वीवरही महिषासुरासारखी वागणारी मंडळी पुष्कळ आहेत. हे दुष्प्रवृत्तीचे लोक सध्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांचा छळ करत आहेत. ‘स्त्रीचा अनादर करणे, तिला तुच्छ लेखणे, तिला केवळ सुख उपभोगण्याचे माध्यम समजणे’, अशी पाशवी वृत्ती महिषासुरातही होती; म्हणून आदिशक्तीने त्याचा वध केला.

(साभार : श्रीमद् देवीभागवत, स्कंद ५)

६ ऊ. प्रार्थना

‘हे देवी कात्यायनी, अहंकाराचे दुसरे रूप असलेल्या महिषासुराचा तू नाश केलास. त्याचप्रमाणे आमच्यातील अहंरूपी महिषासुराचा नाश कर. हे देवी, तू शोक दूर करणारी आणि भय नष्ट करणारी आदिशक्ति आहेस. आम्हा साधकांचे सर्व शोक आणि भय दूर कर. एकनिष्ठेने गुरुसेवा करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. तू आम्हाला कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी आवश्यक मानसिक बळ आणि धैर्य दे. हे देवी, पृथ्वीवर आजही महिषासुर वृत्तीचे लोक आहेत, त्यांना येणार्‍या काळात शिक्षा करून तूच हिंदु राष्ट्राची स्थापना कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

‘हे कात्यायनीदेवी, या जगात वर्तमानातील सर्व महिषासुररूपी दैत्यांचा तू वध कर आणि त्यांना नेहमीसाठी पाताळात पाठव. हे देवी, तुला सोडून आम्ही अन्य कुणाला शरण जाणार ? हे आई जगदंबे, तुझ्या मणिद्वीपातून तू आमच्यासाठी पुन्हा प्रकट हो.’

 

७. नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे
आदिशक्तीचे कालरात्री रूप, म्हणजे शुभंकरी !

महाकालस्वरूपिणी श्री कालरात्रीदेवी

७ अ. नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे
आदिशक्तीचे ‘कालरात्री’ हे स्वरूप पुष्कळ भयंकर असून त्या रूपाला
सर्व दानव, भूत, प्रेत आदी घाबरत असणे; मात्र ती शुभफलदायिनी असल्यामुळे तिला ‘शुभंकरी’ म्हटले जाणे

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्यात येते. कालरात्रीदेवीचा रंग काळा आहे. या देवीच्या उच्छ्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. देवीला ब्रह्मांडासारखे गोल आकारांतील ३ नेत्र आहेत. तिचे वाहन गर्धभ (गाढव)आहे. कालरात्रीदेवीचे स्वरूप भयंकर आहे; मात्र ती नेहमी शुभफल देणारी आहे. त्यामुळेच कालरात्रीदेवीला ‘शुभंकरी’ (मंगलदायिनी) असे नाव दिले आहे. देवी कालरात्री म्हणजे आदिशक्तीचे विनाशकारी रूप आहे. देवीचे हे रूप पाहून सर्व दानव, भूत, प्रेत आदी घाबरतात. कालरात्रीदेवीची उपासना केल्याने ग्रहपीडा, अग्नीभय, जलभय, जंतूभय आणि शत्रूभय दूर होतात. कालरात्रीदेवी शुभंकरी असल्याने ती पापनाशिनी आणि पुण्यप्रदायिनी आहे. काली, कालिका ही कालरात्रीचीच रूपे आहेत.

७ आ. प्रार्थना

‘हे कालरात्रीदेवी, या जगात सुर आणि असुर ही दोन्ही रूपे तुझीच आहेत. तू असुर आणि देवता यांची जननी आहेस. जेव्हा असुरांचे वर्चस्व वाढते आणि धर्माचा र्‍हास होतो, तेव्हा तू असुरांचा नाश करतेस. आताही पृथ्वीवर वाईट दुष्प्रवृत्तींनी थैमान घातले आहे. त्यांनी पृथ्वीवरील स्त्रिया आणि दुर्बल मनुष्य यांवर अनेक अत्याचार केले आहेत. मनुष्यामध्ये नास्तिकता वाढू लागली आहे आणि वृत्ती पशूप्रमाणे होऊ लागली आहे. हे महाकालस्वरूपिणी कालरात्रीदेवी, आता तू या असुरी दुष्प्रवृत्तींच्या नाशासाठी प्रकट हो आणि त्यांचे समूळ उच्चाटन कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

 

८. नवरात्रीच्या आठव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तिदेवीचे ‘महागौरी’ रूप !

वृषभ वाहनावर आरूढ असलेली श्री महागौरीदेवी

८ अ. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवीने केलेल्या कठोर तपामुळे
तिचे शरीर काळे पडणे, शिवाने प्रसन्न होऊन तिला पवित्र गंगाजलाने
स्नान घालणे, तेव्हा देवीचे गौर रूप दिसणे; म्हणून तिला ‘महागौरी’ म्हटले जाणे

नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला आदिशक्तीची ‘महागौरी’ या रूपात पूजा केली जाते. या रूपात देवीला आठ वर्षांची मुलगी मानले आहे. देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग पांढरा आहे. देवीला चार भुजा असून देवीचे वाहन वृषभ आहे. देवीने लहान वयातच शिवाला पती मानले होते. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवीने तिच्या पार्वती रूपात कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे देवीचे शरीर काळे पडले. देवीच्या तपश्चर्येने शिव प्रसन्न झाला. त्याने गंगेच्या पवित्र जलाने देवीचे शरीर धुतले. त्यामुळे देवीचे शरीर स्वच्छ पांढरे झाले. संस्कृत भाषेत स्वच्छ पांढर्‍या रंगाला ‘गौर वर्ण’ असे म्हणतात. यामुळे देवीला ‘महागौरी’ असे नाव पडले.

आदिशक्ति तिच्या महागौरी रूपात ‘भक्तांचे ताप, पाप आणि संचित धुऊन काढते’, असे शास्त्रात म्हटले आहे. थोडक्यात महागौरीच्या उपासनेने भक्त पवित्र बनतो आणि त्याची अंतर्-बाह्य शुद्धी होते. महागौरीचे वैशिष्ट्य म्हणजे देवी मनुष्याला सत् कडे जाण्याची प्रेरणा देते.

८ आ. आदिशक्तीचे योगमाया स्वरूप आणि तिने केलेला असुरांचा नाश !

‘अष्टमी’ ही तिथी आदिशक्तीशी निगडित आहे. कृष्णाष्टमीला श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आदिशक्ति स्वतः ‘योगमाया’ रूपात जन्म घेते. ‘योगमाया’, म्हणजे जगत् जननी होय ! तिची माया अनंत आणि अवर्णनीय आहे. हीच ‘योगमाया’ श्रीविष्णूच्या श्रीरामावतारात सीता बनून आली आणि रावणासुराच्या बंधनात राहिली. साक्षात् आदिशक्तीला एका असुराच्या बंधनात रहाण्याचे काय कारण ? ‘हीच तिची माया आहे’, जी कुणीही समजू शकत नाही.

८ इ. आदिशक्ति योगमायेच्या साहाय्याने श्रीविष्णूने मधु आणि कैटभ या असुरांचा नाश करणे

८ इ १. श्रीविष्णूच्या कानाच्या मळातून मधू आणि कैटभ या राक्षसांची निर्मिती होणे, त्यांनी देवीचे मंत्र म्हणून कठोर तप करणे, देवी प्रसन्न झाल्यावर त्यांनी देवीकडून इच्छामरणाचा वर मागून घेणे

पृथ्वीची उत्पत्ती होण्यापूर्वी क्षीरसागरात श्रीविष्णु सहस्र फण्यांच्या शेषनागावर पहुडला होता. त्याच्या कानातील मळातून मधु आणि कैटभ या नावांच्या २ असुरांची निर्मिती झाली. तेव्हा श्रीविष्णु योगनिद्रेत होता. मधु आणि कैटभ क्षीरसागरात राहून ध्यान करू लागले. त्यांना आदिशक्तीचे वाक्मंत्र ऐकू आले. त्यांनी त्या मंत्रांचा उच्चार करायला आरंभ केला. अनेक वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना इच्छामरणाचे वरदान दिले.

८ इ २. मधू आणि कैटभ या असुरांनी ब्रह्माला खाण्याचा प्रयत्न करणे, ब्रह्मदेवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने या असुरांशी ५ सहस्र वर्षे युद्ध करणे; परंतु देवीकडून मिळालेल्या इच्छामरणाच्या वरामुळे त्यांना मारणे अशक्य होणे

देवीकडून इच्छामरणाचे वरदान मिळाल्याने ते दोघे असुर ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मालाच खायला निघाले. ब्रह्मदेवाने श्रीविष्णूकडे जाऊन त्याला प्रार्थना केली. श्रीविष्णूने मधु आणि कैटभ यांच्याशी युद्ध करायचे ठरवले. श्रीविष्णु आणि त्या दोन असुरांमध्ये ५ सहस्र वर्षे युद्ध चालले. श्रीमहाविष्णु थकले, तरी मधू-कैटभ थोडेही थकले नाहीत. त्यामुळे श्रीविष्णूने युद्धविरामाची घोषणा केली. श्रीविष्णूला प्रश्न पडला, ‘या दोन असुरांचा मृत्यू का होत नाही ?’ तेव्हा श्रीविष्णूच्या लक्षात आले, ‘देवीने या दोन्ही असुरांना इच्छामरणाचे वरदान दिले असल्याने त्यांना मारणे अशक्य आहे.’ त्यामुळे श्रीविष्णूने आदिशक्तीचे स्मरण केले.

८ इ ३. श्रीविष्णूने आदिशक्तीलाच मधू आणि कैटभ यांना मारण्याचा उपाय विचारून घेणे

आदिशक्तीनेच त्या दैत्यांना वरदान दिल्यामुळे असुरांना मारण्याचे उपाय देवीलाच विचारावे लागणार होते. भगवंताने अत्यंत दीनभावाने आणि सुंदर शब्दांत देवीची स्तुती केली. देवी अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाली, ‘हे श्रीहरि, युद्धाच्या वेळी मी माझे ‘योगमाया’ रूप धारण करून त्या दोन्ही असुरांना मोहित करते. त्या वेळी तुम्ही योग्य तो उपाय करावा.’

८ इ ४. आदिशक्तीने दोन्ही असुरांना मोहित केल्याचे पाहून श्रीविष्णूने युद्ध थांबवून त्या दोघांना वर मागण्यास सांगणे

श्रीविष्णु आणि त्या दोन्ही असुरांमध्ये पुन्हा युद्ध चालू झाले. युद्धात एक क्षण असा आला की, श्रीविष्णूने आदिशक्तीकडे अत्यंत करुणेने पाहिले. तेव्हा देवी हसली. ती युद्धभूमीवर आली आणि तिने त्या दोन्ही असुरांना मोहित केले. तिचे सुंदर रूप पाहून दोन्ही असुर मंत्रमुग्ध झाले. ‘दोघेही मोहित झाले आहेत’, हे बघून श्रीविष्णूने युद्ध थांबवले आणि म्हणाले, ‘‘आजपर्यंत तुमच्यासारखे शूर-वीर मी पाहिले नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्ही जो वर मागाल, तो द्यायला मी सिद्ध आहे.’’

८ इ ५. मधू आणि कैटभ यांनी अहंकाराने श्रीविष्णूलाच वर मागण्यास सांगितल्यावर श्रीविष्णूने ‘तुमचा मृत्यू माझ्या हाती होवो’, हा वर मागणे

आश्चर्य म्हणजे योगमायेने मोहित झालेले ते दोन्ही असुर श्रीविष्णूला म्हणाले, ‘‘विष्णु, तू आम्हाला काय देणार ? आम्ही याचक नसून दाता आहोत. आम्हीच तुला वर देऊ. ‘तू आमच्याशी एवढी वर्षे युद्ध केलेस’, यासाठी आम्हीच तुझ्यावर प्रसन्न आहोत. ‘तुला आमच्याकडे काय मागायचे आहे ?’, ते तू माग.’’ श्रीविष्णूने हीच वेळ साधून त्यांना सांगितले, ‘तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल, तर ‘तुमचा मृत्यू माझ्या हातून होवो’, हेच वरदान मला द्या.’

८ इ ६. योगमायेच्या कृपेने श्रीविष्णूने अत्यंत बलशाली अशा मधू आणि कैटभ या असुरांचा नाश करणे

मधू आणि कैटभ यांना ‘आपण फसलो !’, हे लक्षात आले. त्यांना दुःख झाले. त्या वेळी सर्वत्र क्षीरसागरच होता. पृथ्वी कुठेही नव्हती. मधू आणि कैटभ यांनी श्रीविष्णूला सांगितले, ‘हे जर्नादन, या आधी तुम्हीही आम्हाला वर देण्याचे वचन दिले आहे. आम्हाला जेथे पाणी नाही, अशा ठिकाणी तुझ्या हातातून मृत्यू यावा.’ लगेच श्रीविष्णूने विराटरूप धारण केले. श्रीविष्णूचे रूप क्षीरसागरापेक्षाही विशाल झाले. त्याने मधु आणि कैटभ यांना त्याच्या जांघेवर मस्तक ठेवण्यास सांगून सुदर्शनचक्राने त्यांचे धड शरिरापासून वेगळे केले. अशा प्रकारे योगमायेच्या कृपेने श्रीविष्णूने अत्यंत बलशाली अशा मधू आणि कैटभ या असुरांचा नाश केला.

जगत् जननी, महामाया, दैत्यसंहारिणी, त्रिभुवननायिका श्री दुर्गादेवीचा विजय असो !’

८ ई. प्रार्थना

‘हे महागौरी, ज्याप्रमाणे तू भक्तांचे ताप, पाप आणि संचित नष्ट करतेस, त्याप्रमाणे तू आम्हा साधकांचे ताप, पाप आणि संचित नष्ट कर. हे देवी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवल्यानुसार आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन योग्य प्रकारे होऊन आमची अंतर्-बाह्य शुद्धी होऊन आमची साधना होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ‘हे देवी, तू आम्हाला नेहमी सत् मध्ये रहाण्याची प्रेरणा दे आणि आमच्याकडून निर्मळ मनाने गुरुसेवा घडू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

 

९. नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे ‘सिद्धिदात्री’ रूप !

कमळावर बसलेली श्री सिद्धिदात्रीदेवी

९ अ.अष्टमहासिद्धी प्राप्त असलेली आणि भक्तांच्या लौकिक अन् पारलौकिक इच्छा पूर्ण करणारी देवी सिद्धिदात्री !

‘नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या ८ सिद्धी आहेत. या सिद्धी प्रदान करणारी ती ‘सिद्धिदात्री !’ देवीपुराणानुसार देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने शिवाने या ८ सिद्धी प्राप्त केल्या आणि तिच्याच कृपेने शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे शिवाला ‘अर्धनारीश्वर’ असे नाव पडले. देवी कमळावर बसलेली असून ती चतुर्भुज आहे. श्री सिद्धिदात्रीदेवी भक्ताच्या लौकिक आणि पारलौकिक दोन्ही इच्छा पूर्ण करते. सर्व भक्त ईश्वरप्राप्तीची इच्छा करतील, असे नाही. ज्याला सिद्धीप्राप्तीची इच्छा आहे, त्याला सिद्धिदात्रीदेवी सिद्धी प्रदान करते आणि ज्याला अष्टसिद्धींचा स्वामी असणारा ‘ईश्वर’ पाहिजे आहे, त्याला ती ईश्वराची प्राप्ती करून देते, म्हणजे ती मोक्षदायिनी आहे. अशा मोक्षदायिनी सिद्धिदात्रीदेवीच्या चरणी कोटीशः नमन !

९ आ. प्रार्थना

‘हे देवी सिद्धिदात्री, आम्हा साधकांना लौकिकाची कामना नाही; मात्र आम्हा साधकांना गुरुचरणांची इच्छा आहे. हे देवी, आम्हा साधकांमध्ये गुरुभक्तीची इच्छा निर्माण करणारी तूच आहेस. आम्हा साधकांचा जन्म गुरुसेवेसाठीच झाला आहे. ‘आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत अधिकाधिक गुरुसेवा घडो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

१०. महामाया आदिशक्तीला शरण जाणे, हाच एकमेव मार्ग असणे !

१० अ. ‘मनुष्य रूपातील देवता किंवा असुर यांना ओळखता न येणे’, हीसुद्धा आदिशक्तीची योगमाया असणे

आज आपण कलियुगात आहोत. अन्य युगांच्या तुलनेत हे युग जड आहे आणि अधिक स्थूल आहे. या युगात भगवंताने मनुष्य रूपात अवतार घेतला किंवा असुर मनुष्य रूपात आले, तरी ते कळणे अशक्य आहे. आदिशक्तीची योगमाया एवढी प्रबळ आहे की, ‘मनुष्य रूपातील देवता आणि असुर यांना ओळखणे अशक्य आहे.

१० आ. आदिशक्ति म्हणजे भगवंताचे शक्तिस्वरूप असून त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे कार्य अव्याहत चालू असणे

आदिशक्तीच्या संदर्भातील वरील लिखाणांतून ‘आदिशक्तीविना आपले अस्तित्व नाही’, हे लक्षात येईल. थोडक्यात सांगायचे झाले, तर आदिशक्ति म्हणजे भगवंताची शक्ति आहे. तिच्यामुळे भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचे चक्र चालू रहाते. जसे अग्नी आणि अग्नीची दाहकशक्ती एकच आहेत, तसे भगवंत अन् त्याची शक्ती एकच आहेत. निर्गुण भगवंताचे सगुणत्व शक्तीमुळे आहे. त्रिगुणांच्या आधारे आदिशक्तीच सर्व कार्य करते आणि सर्वांकडून कार्य करवून घेते. भले ते देव असोत, दानव असोत किंवा मनुष्य असोत. या सर्वांकडून होणारे कार्य आदिशक्तीच्या कृपेमुळेच होत असते.

१० इ. सर्वकाही आदिशक्तीच्या इच्छेने होत असल्याने तिला शरण जाणे, हाच एकमेव मार्ग असणे

काही जणांना प्रश्न पडतो, ‘सर्वकाही आदिशक्तीच्या इच्छेने होते, तर आपण का धडपडावे ? आपण का कार्य करावे ?’, याचे उत्तरही ‘आदिशक्ती’च आहे. ‘आपण गप्प बसू’, असे म्हटले, तरी आपण गप्प बसूच शकत नाही. येनकेन प्रकारेण आदिशक्ति आपल्या सर्वांकडून कार्य करवून घेतेच. ‘कर्म करत रहाणे आणि आदिशक्तीला शरण जाणे’, एवढेच आपण करू शकतो. ‘मी कर्मच करणार नाही’, असे म्हणणे अयोग्य आहे. ‘जे कर्म आपल्याला मिळाले आहे, ते कर्म योग्य प्रकारे करण्याची शक्ती आपल्याला मिळू दे’, अशी त्या जगन्माता आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना आहे.

अशा त्या आदिशक्तीची अनन्यभावाने भक्ती करण्याचे ९ दिवस म्हणजे ‘नवरात्री’ होय ! आदिशक्तीची कृपा सर्वांवर समान असते; मात्र ज्याची जशी भक्ती, तशी त्याला देवीची कृपा प्राप्त होते.

१० ई. कृतज्ञता

या नवरात्रीनिमित्त मला हे लिखाण करण्याची प्रेरणा देणारी आणि ते करवून घेणार्‍या आदिशक्ति जगदंबेच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. महर्षि व्यासांनी लिहिलेल्या श्रीमद्देवीभागवत पुराणामुळे आणि अन्य शक्तीउपासकांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लिखाणातून हे सर्व लिखाण करता आले; म्हणून त्यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे. गुरुदेवांच्या कृपेने हे सर्व मला शब्दबद्धही करता आले. गुरुदेवांच्या कृपेने हे सर्व लिखाण करत असतांना माझी आदिशक्तीविषयी श्रद्धा वाढली आणि मला तिच्याविषयी प्रेम वाटू लागले. आदिशक्तीविषयी भक्तीभाव निर्माण करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

‘आदिशक्तीच्या संदर्भात असे पुष्कळ लिखाण त्यांनीच माझ्याकडून करवून घ्यावे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), बेंगळुरू (२६.९.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment