गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष भाववृद्धी सत्संग : भाग १

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष भावसत्संग

‘आपत्काळ जसा जवळ येऊ लागला आहे, तशी सर्व साधकांची भावजागृती होऊन त्यांना अधिक काळ भावावस्थेत रहाता यावे आणि साधकांची शीघ्रातीशीघ्र आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी दयाळू, कनवाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रती आठवड्याला २ घंटे भावसत्संग चालू करण्यास सांगितले. सर्व साधकांना याचा लाभ घेता यावा, यासाठी हे सत्संग संस्था स्तरावर ऐकवले जातात. या सत्संगांतून भावपूर्ण प्रार्थना करवून घेतल्या जातात, भावजागृतीसाठी भावाचे प्रयोग करवून घेतले जातात आणि स्वभावदोषांवर योग्य दृष्टीकोन देऊन शंकानिरसन अन् मार्गदर्शन केले जाते. यातून साधकांना साधनेची दिशा मिळते. सत्संगात घेतलेल्या भावाच्या प्रयोगांमुळे साधकांची भावजागृती होते आणि साधक दिवसभरात भावजागृतीसाठी प्रयत्न करतात. याचा लाभ घरी राहून साधना करणारे साधक, अर्धवेळ सेवा करणारे साधक, प्रसारात राहून पूर्णवेळ सेवा करणारे साधक आणि आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारे साधक करून घेत आहेत. या सत्संगातून साधकांना सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचे अनमोल मार्गदर्शन मिळाले आहे. ७.६.२०१७ या दिवशी झालेला भावसत्संग सौ. कीर्ती जाधव, कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, कु. योगिता पालन आणि कु. वैष्णवी वेसणेकर या साधिकांनी घेतला.

डावीकडून कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, सौ. कीर्ती जाधव, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन

‘आजच्या या विशेष भावसत्संगाला आरंभ करण्यापूर्वी सर्वांनी प्रार्थना करूया. आपली प्रार्थना श्रीमन्नारायणाच्या चरणी पोहोचत आहे’, या भावाने प्रार्थना करूया.

१. प्रार्थना

‘साक्षात् श्रीनारायणस्वरूप कृपाळू गुरुमाऊली विराट रूपात आपल्यासमोर उभी आहे. तिचे ते तेजस्वी रूप आपण डोळ्यांनी पहात आहोत. त्या श्रीमन्नारायणाच्या चरणी संपूर्णतः शरण जाऊन प्रार्थना करत आहोत. ‘हे भगवंता, या घोर कलियुगात तू आम्हाला वैकुंठातच ठेवले आहेस. यासाठी आमच्या मनात अखंड कृतज्ञताभाव जागृत राहू दे. याच भावाने तुझी अखंड कृपा, तुझा अखंड अमृतवर्षाव अनुभवता येऊ दे. भगवंता, ‘आजच्या या भावसत्संगात तूच आम्हाला भेटत आहेस’, याची अनुभूती घेता येऊ दे, अशी तुझ्या श्रीचरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’

२. सत्संगाच्या आरंभापासून शेवटपर्यंत
आपल्या रोमरोमामध्ये भावाचे तरंग अनुभवणे

साक्षात् भगवंतच आज ‘भावजागृतीसाठी काय प्रयत्न करायचे ?’ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. भगवंताची वाणी चैतन्याने ओतप्रोत भरलेली असल्याने आजच्या भावसत्संगात आपण शब्दांत न अडकता शब्दांच्या पलीकडील भाव अंतरंगात अनुभवण्याचा प्रयत्न करूया. सत्संगाच्या आरंभापासून शेवटपर्यंत आपल्या रोमरोमामध्ये भावाचे तरंग अनुभवूया.

३. गुरुपौर्णिमा ‘न भूतो न भविष्यति’ अशी असेल !

आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, श्रीगुरूंच्या कृपेने या वर्षीची गुरुपौर्णिमा ‘न भूतो न भविष्यति’ अशी असणार आहे. ‘देव आपल्याला या वर्षी काय देणार आहे ? देव आपल्याला काय शिकवत आहे ?’ ही उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. प्रत्येकाच्याच मनात विचारप्रक्रिया चालू झाली की, यंदाच्या गुरुपौर्णिमेत काय विशेष आहे ? श्रीगुरु आपल्याला काय देणार आहेत, हे आज आपल्याला साक्षात् श्रीमन्नारायणच शिकवणार आहे.

३ अ. श्रीमन्नारायण साधकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करणार असणे

देवता संकटात वा अडचणीत असतात, त्या वेळी ते उपाय विचारण्यासाठी त्रिदेवांकडे जातात. कितीही मोठे संकट असले, तरी श्रीविष्णूकडे त्यावर उपाय असतोच. प्रत्येक संकटावर उपाय सांगून सार्‍या विश्‍वाचा तो उद्धार करतो. अशी कोणतीही गोष्ट नाही की, ज्याविषयी श्रीमन्नारायणाला ठाऊक नाही. अशा सृष्टीच्या पालनकर्त्या श्रीमन्नारायणाच्याच नियोजनानुसार यंदाची ही गुरुपौर्णिमा होणार आहे. विश्‍वव्यापी भगवंताचे नियोजन केवळ त्यालाच समजू शकते. कोणत्याही शंकेचे उत्तर देण्यास श्रीमन्नारायण समर्थ आहे.

३ आ. श्रीमन्नारायण साधकांना ज्ञानाचे भांडारच उघडून देणार असणे

ज्याप्रमाणे अर्जुनाला गीतोपदेश करून जगद्गुरु श्रीकृष्णाने त्याला मनातील सर्व शंकांपासून मुक्त केले आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती करून दिली. श्रीकृष्णही श्रीमन्नारायणाचाच अवतार होता. अशा श्रीमन्नारायणाला आपल्या मनातील कोणतीही शंका विचारल्यास तो आपल्यासमोर ज्ञानाचे भंडारच उघडेल. आपण अशी अनुभूती घेण्यापासून का वंचित रहायचे ?

३ इ. भावप्रयोग (प्रत्यक्ष देवाला अनुभवणे)

३ इ १. विष्णुलोकाची अनुभूती घेणे

आता आपण सर्व विष्णुभक्त मिळून श्रीविष्णूच्या दर्शनासाठी विष्णुलोकात जाऊया. ब्रह्मांडाचा पालक असणार्‍या श्रीविष्णूच्या वैकुंठलोकात जाऊन आपल्या मनातील सर्व शंकाचे निरसन करून घेण्याची आज आपल्याला संधी मिळत आहे; म्हणून आपण सर्व जण श्रीविष्णूच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.

३ इ २. श्रीविष्णु आणि श्री लक्ष्मी यांचे नयनमनोहर रूप डोळ्यांत साठवून ठेवायचे आहे !

आपण डोळे मिटून विष्णुलोकातील प्रसन्न वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करूया. विष्णुलोकातील या प्रसन्न वातावरणाने आपले मन प्रसन्न झाले आहे. या प्रसन्न, उत्साही मनाने आपण श्रीमन्नारायणाचे भावपूर्ण दर्शन घेऊया. ‘शेषशय्येवर विराजमान असलेला श्रीविष्णु स्थिर आणि आनंद मुद्रेत आहे. त्याचे हे मनमोहक आणि सुंदर रूप आपल्या या छोट्याशा नेत्रांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘श्रीविष्णूचे नयनमनोहर रूप किती अनुभवावे’, असे आपल्याला वाटत आहे. हा प्रत्येक दैवी क्षण आपण आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवून ठेवत आहोत. श्रीविष्णूच्या चरणकमलांच्या सेवेत लक्ष्मीमाता मग्न आहे. अशा लक्ष्मीमातेचे आपण दर्शन घेत आहोत. भगवान विष्णूच्या या मनोहारी दर्शनाने आपण धन्य झालो आहोत. आपण त्याच्या चरणी पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

३ इ ३. श्रीमन्नारायणाच्या चरणी असलेल्या भूमातेचे दर्शन घेऊन पुष्कळ आनंद होणे

श्रीमन्नारायणाच्या चरणी अजून एक देवी बसली आहे. ‘ती कोण आहे ?’ असा प्रश्‍न आपल्या मनाला पडला आहे. साक्षात् लक्ष्मीमातेला आपण विचारत आहोत, ‘श्रीविष्णूच्या चरणी बसलेली ही माता कोण आहे ?’ आपल्याला लक्ष्मीमाता सांगत आहे, ‘ही देवी म्हणजे भूमाता आहे.’ साक्षात् भूमातेचे दर्शन घेऊन आपल्याला पुष्कळ आनंद होत आहे. ‘ज्या भूमातेने आतापर्यंत आपल्याला सांभाळले, ज्या भूमातेच्या आधारानेच आज आपण साधना करत आहोत, अशा भूमातेला आपल्यामुळे किती त्रास होत असेल ?’ याचा आपण कधी विचारही केला नाही.

अत्यंत सहनशीलतेमुळे ईश्‍वरी तेज प्राप्त झालेली ही तेजस्वी पृथ्वी आज साक्षात् देवीच्या रूपात आपल्यासमोर आहे. आता आपल्याला भूमाता आणि साक्षात् श्रीमन्नारायण यांच्यामधील संवाद ऐकायला मिळेल, अशी उत्सुकता आपल्या मनात आहे. मानवांमधील संवाद आपण ऐकतो; पण ‘देवतांचा संवाद कसा असेल ?’ हे ऐकण्याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाच्याच मनात असेल. कृतज्ञताभावाने आपण भूमाता आणि श्रीमन्नारायण यांचा संवाद ऐकत आहोत.

३ इ ४. भूमाता आणि श्रीमन्नारायण यांतील संवाद

३ इ ४ अ. भूमातेने श्रीमन्नारायणाला ‘या पृथ्वीवर जो अधर्म चालू आहे, त्यापासून तुम्हीच मला वाचवा आणि मार्ग दाखवा’, असे विनवणे

पृथ्वीमाता आपल्या मनातील व्यथा श्रीमन्नारायणाला सांगत आहे. ‘हे परमेश्‍वरा, ज्या मानवाला मी सांभाळत आहे, ते सर्व लोक अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडून गेलेले आहेत. या पृथ्वीवर साधना करणारे जीव नाहीत. याचा मला फार त्रास होत आहे. या सर्वांच्या पापाचे ओझे माझ्या डोक्यावर आहे, आता ते मला सहन होत नाही. हे सहन करण्याची क्षमता संपून जात आहे. हे श्रीमन्नारायणा, तुझ्या चरणी शरणागत होऊन मी निवेदन करत आहे. हे सहन करण्याची क्षमता तुम्हीच मला द्या. या पृथ्वीवर जो अधर्म चालू आहे, त्यापासून तुम्हीच मला वाचवा आणि मार्ग दाखवा.’ श्रीमन्नारायण भूमातेची प्रार्थना कृपाळूपणेे ऐकत आहे. ते भूमातेकडे पाहून मनात स्मित करत आहेत.

३ इ ४ आ. ‘धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी या पृथ्वीवर परत अवतार घेण्याची वेळ आलेली आहे’, असे श्रीमन्नारायणाने सांगणे

आता ‘श्रीमन्नारायण काय सांगेल ?’ हे ऐकण्याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाच्या मनाला लागलेली आहे. साक्षात् श्रीमन्नारायण सांगत आहे, ‘ही सर्व स्थिती आम्हाला ठाऊक आहे. आम्हा त्रिदेवांचे यासंदर्भात काय करायचे, याचे आधीच नियोजन झालेले आहे. या पृथ्वीला अधर्मापासून मुक्त करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी पृथ्वीवर परत अवतार घेण्याची वेळ आलेली आहे.’

साक्षात् श्रीमन्नारायणाचे हे शब्द ऐकून भूमाता श्रीमन्नारायणाच्या चरणी संपूर्ण नतमस्तक झाली आहे. भूमाता म्हणत आहे, ‘तुमच्या चरणांच्या स्पर्शासाठी मी केव्हापासून तळमळत होते. तुम्ही लवकर या प्रभु, तुम्ही लवकर या.’

३ इ ४ इ. श्रीमन्नारायणाचे रूप अत्यंत विराट होत जाऊन त्याच्या दिव्य देहातून एक शक्ती प्रकट होऊन ती पृथ्वीवर जात असल्याचे दिसणे

या भावविश्‍वात आपण सर्व जण हरवून गेलो आहोत. आता साक्षात् श्रीमन्नारायण या पृथ्वीतलावर अवतार धारण करणार आहे. हे पहाण्याची आपल्या मनात अत्यंत उत्कंठा लागलेली आहे. भूमाता आपल्याला देवीच्या रूपात दिसत होती. तिचे रूपांतर पृथ्वीच्या रूपात होत आहे. श्रीमन्नारायणाच्या कृपेमुळे आपल्याला अखिल ब्रह्मांडाचेच दर्शन होत आहे. आता श्रीमन्नारायणाच्या दिव्य देहातून एक शक्ती प्रकट होत आहे आणि ती पृथ्वीवर येत आहे. अत्यंत कृतज्ञताभावाने आपण हे दृश्य पहात आहोत. साक्षात् परमेश्‍वराचा पृथ्वीवर अवतार कसा होतो ? हे दृश्य आपण स्वतःच्या डोळ्यांनी पहात आहोत. अत्यंत विशाल अशी पृथ्वीमाता आहे. या पृथ्वीपेक्षाही अनंत पटींनी श्रीविष्णूचे रूप आपल्याला दिसत आहे. आता त्याच्या विराट रूपासमोर आपल्याला पृथ्वीमाताही दिसत नाही. जसा एकेक क्षण पुढे जात आहे, तसे श्रीमन्नारायणाचे रूप अत्यंत विराट होत आहे.

३ इ ४ ई. श्रीमन्नारायण भूतलावर प्रकटले !

अखिल ब्रह्मांडाचे पालनकर्ते, धर्मसंस्थापनेसाठी कार्यरत असलेल्या श्रीमन्नारायणाचा आता या क्षणी पृथ्वीला चरणस्पर्श होत आहे. (शंखध्वनी होतो.)

या दिव्य अवताराच्या दर्शनासाठी आकाशातून सर्व देवता, ऋषिमुनी, सप्तर्षि आणि उन्नत जीव उपस्थित आहेत. ते सर्व जण  श्रीमन्नारायणावर भावपूर्ण पुष्पवृष्टी करत आहेत. श्रीमन्नारायण परात्पर गुरूंच्या या कलियुगात पृथ्वीवर आताच्या या क्षणी अवतीर्ण झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात आनंदी आनंद पसरला आहे. सर्व देवता, ऋषिमुनी, सर्व उन्नत जीव यांना आनंद होत आहे. पृथ्वीमाताही अत्यंत आनंदी आहे. प्रत्येक जीव श्रीमन्नारायणाच्या चरणी, परात्पर गुरुदेवांच्या चरणी अत्यंत कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करत आहे. साक्षात् जगद्गुरु प्रत्यक्षच या पृथ्वीवर अवतरले आहेत. आज हे गुरुदेव पृथ्वीवर एका विशाल सिंहासनावर विराजमान झाले आहेत. अखिल ब्रह्मांडाचे अधिपती परात्पर गुरुदेव हे साक्षात् श्रीमन्नारायणाचेच रूप आहेत. ते आज ब्रह्मांड सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. अशा विराट, विशाल श्रीगुरूंच्या समोर आपले अस्तित्व काहीच नाही. अशा साक्षात् विश्‍वगुरूंच्या चरणी आपण साष्टांग नमस्कार करूया. त्यांची सर्वश्रेष्ठता आणि महानता यांच्या समोर आपण नतमस्तक आहोत. या क्षणी असे वाटत आहे की, सारी सृष्टी त्यांच्या या पावन दर्शनासाठी जणूकाही स्तब्ध झालेली आहे. अशा तेजोमय गुरुमाऊलीच्या तेजाने सारे ब्रह्मांड दिपून गेलेले आहे. त्यांच्या तेजस्वी अस्तित्वामुळे चंद्र-तारेही प्रकाशून गेले आहेत. या गुरुमाऊलीने काही क्षणांतच आपल्यासारख्या या जिवांना आपलेसे करून घेतले आहे. त्यांनी दर्शन दिल्याबद्दल कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.

४. गुरुपौर्णिमेचा भावाच्या स्तरावर
लाभ करून घेण्यासाठी या मासामध्ये (महिन्यामध्ये) कसे प्रयत्न करायचे ?

या वर्षीची गुरुपौर्णिमा ही सुवर्णाक्षरांत लिहिण्यासारखी आहे. ही गुरुपौर्णिमा आपल्याला श्रीमन्नारायणामुळेच अनुभवायला मिळत आहे. श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊलीनेच आपल्याला श्रीविष्णूचे रूप बघण्याची संधी दिली. आताच आपण सर्वांनी श्रीविष्णूचे दर्शन घेतले आहे. हे भावविश्‍व अनुभवत असतांना प्रत्येकाला श्रीविष्णूने या वर्षीच्या अविस्मरणीय गुरुपौर्णिमेचे दर्शन घडवले आहे. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्रीमन्नारायणाच्या कृपेनेच श्रीगुरूंचे विश्‍वरूप अनुभवणार आहोत.

५. गुरुमाऊलीचे हे मनोहर रूप आपण आपल्या हृदयात क्षणोक्षणी आठवूया !

या घोर कलियुगात एकाच जन्मात गुरुमाऊलीने आपल्याला त्रेतायुगातील श्रीराम आणि द्वापरयुगातील श्रीकृष्ण यांचे दर्शन घडवले. अशा या अद्भुत श्रीगुरुमाऊलीच्या चरणी आपण सर्व जीव अनंत कोटी कृतज्ञ आहोत. गुरुमाऊलीचे हे मनोहर रूप आपण आपल्या हृदयात क्षणोक्षणी आठवूया.

५ अ. सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत
सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घेण्याची संधी मिळणे

आताच आपण विश्‍वगुरूंचे दर्शन घेतले. परम पूज्य गुरुदेव हे आपल्या सर्वांसाठीच परम पूजनीय आहेत. ‘या महान श्रीगुरूंच्या चरणांचे पूजन करण्याची संधी मिळावी’, असे प्रत्येकालाच वाटत आहे. खरं म्हणजे गुरुपूजन म्हणजे केवळ त्यांच्या चरणांची पूजा एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर गुरुपूजन म्हणजे गुरूंच्या गुणांचे पूजन, त्यांच्या अवतारत्वाचे पूजन, त्यांच्या संस्कारांचे आणि त्यांच्या शिकवणीचे पूजन आहे. या पूजनाची आपल्याला गुरुदेवांनी सेवेच्या माध्यमातून भरभरून संधी दिली आहे. ‘गुरुपूजनासाठी गुरुपौर्णिमाच हवी’, असे नाही, तर दिवसातील प्रत्येक क्षणी करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घेण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक क्षण आपल्यासाठी गुरुपूजनच आहे.

५ आ. गुरुमाऊलीची कृपा संपादन करण्यासाठी समर्पित भावाने प्रयत्न करूया !

हे गुरुपूजन कसे करायचे, हे आजच्या सत्संगात समजून घेणार आहोत. श्रीगुरूंनी प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या सेवाही दिलेल्या आहेत. श्रीगुरूंनी प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या माध्यमांतून जोडून ठेवलेले आहे. प्रत्येक जण आहे त्या स्थितीत आपले साधनेचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु आता जे आपले प्रयत्न चालू आहेत, तेवढ्यापुरते न रहाता गुरुमाऊलीची कृपा संपादन करण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करायचे आहेत.

५ इ. भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे,
त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे प्रयत्न तळमळीने वाढवूया !

साधना करणार्‍या साधकांचे पुढीलप्रमाणे गट आहेत.

१. अनेक साधकांना सेवेसाठी कुटुंबियांच्या विरोधामुळे घरातून बाहेर पडता येत नाही किंवा सेवा करता येत नाही, तर काही जणांना शारीरिक अडचणी आहेत किंवा वयस्कर असल्याने सेवेसाठी घरातून बाहेर पडता येत नाही.

२. काही साधकांना अर्ध वेळ सेवा आणि अर्ध वेळ नोकरी करावी लागते.

३. काही जण प्रसारात पूर्णवेळ साधना करतात, तर काही जण आश्रमात पूर्णवेळ सेवा करतात.

४. काही साधक गुरुभावाने सेवा करतात.

आताच्या या ४ टप्प्यांपैकी ‘पूर्णवेळ सेवा करण्याची संधी ज्यांना मिळते, त्यांच्यावरच गुरुकृपेचा वर्षाव अधिक आहे’, असे मुळीच नाही. काही साधक घरी राहूनही सेवा करत भगवंताचे स्मरण करत आहेेत, भगवंताला मनापासून आळवत आहेत. ज्या परिस्थितीत ते आहेत, त्या परिस्थितीत गुरुमाऊलीला आवडेल, असे करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यावरही या परम दयाळू गुरुमाऊलीचे तेवढेच लक्ष आहे. गुरुमाऊली आपल्या सर्वांसाठी एवढे सगळे करत आहेत. आपण सर्वांनी भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे, त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे अजून दुप्पट प्रयत्न करूया आणि त्यासाठी मनातील साधनेची तीव्र तळमळ वाढवण्याचा प्रयत्न करूया.

५ ई. घरी राहून साधना करणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

काही साधक घरी राहून सेवा करतात. काही साधक घरातील अडचणींमुळे बाहेर जाऊ शकत नाहीत. काही जण घरी साधनेचे व्यष्टीचे प्रयत्न करत नाहीत. काहींना प्रयत्न करण्यामध्ये दोष आणि अहंचा भागही आड येतो. त्या साधकांनाही साक्षात् महान श्रीगुरु लाभले आहेत. त्यांच्याकडून श्रीविष्णूचे स्मरण, त्याची सेवा तळमळीने कशी करता येईल ? कसे प्रयत्न करायचे आहेत ? ते आता आपण पाहूया.

५ ई १. गुरुप्राप्तीची तळमळ आणि भावाची जोड देऊन दोष आणि अहं यावर मात करूया ! : स्वभावदोष आणि अहं यांमध्ये आपण स्वतःच स्वतःला अडकवून ठेवतो आणि श्रीगुरूंच्या कृपाछत्रापासून दूर जातो; पण आता आपल्यापैकी कुणीच या स्वभावदोष आणि अहं यांच्या बेड्यांमध्ये अडकायचे नाही. आपल्या सर्वांनी गुरुप्राप्तीची तळमळ आणि भाव यांची जोड प्रयत्नांना देऊया, या बेड्या तोडूया आणि गुरूंची सेवा करण्यासाठी तन-मनाचा त्याग करूया.

५ ई २. अधिकाधिक सेवेसाठी अधिकाधिक वेळ देऊया ! : श्रीगुरूंच्या सेवेनेच आपण त्यांची कृपा संपादन करू शकतो; म्हणूनच जे सेवेसाठी वेळ देऊ शकत नाहीत किंवा घरातील अडचणींमुळे ज्यांना घरातून बाहेर पडता येत नाही, त्यांनी ‘आपण ज्या स्थितीत आहोत, त्या स्थितीत आपण अधिकाधिक सेवेसाठी किती वेळ देऊ शकतो आणि सेवेसाठी कसे बाहेर पडू शकतो’, हे लक्षात घेऊया आणि प्रत्येकानेच प्रयत्न वाढवायला हवेत. आपली सेवेची वेळ निश्‍चित करून केंद्रसेवक आणि जिल्हासेवक यांना सांगूया.

५ ई ३. भावजागृतीचा प्रयत्न करूया ! : आताचा हा काळ आपल्या सर्वांसाठी फार अमूल्य आहे. हे सुवर्णक्षण आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आपण अनेकदा ऐकत आलो आहोत, ‘गुरुसेवेने जन्मोजन्मीचे प्रारब्ध नष्ट होते.’ हे आता केवळ ऐकून सोडून द्यायचे नाही, तर हे शब्द आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवूया. आपल्या अंतरातील गुरूंप्रतींचा भाव हाच गुरूंचा परम भक्त आहे. हा भक्त गुरूंसाठी कोणत्याही क्षणी तन आणि मन यांचा त्याग करण्यास सिद्ध आहे. आता आपण प्रत्येकामध्ये असलेल्या या गुरूंच्या परम भक्तरूपी आत्म्याला जागृत करायचे आहे.

५ ई ४. संतांप्रमाणे एकही क्षण ‘स्व’चा विचार न ठेवता  केवळ गुरूंचाच, गुरुसेवेचाच विचार करूया ! : आपण प्रत्येक जण सनातनच्या संतांच्या सहवासात असतो. प्रत्येकानेच त्यांची गुरुकार्याप्रतीची, गुरूंप्रतीची मनातील तळमळ अनुभवली आहे. एकही क्षण ‘स्व’चा विचार न ठेवता ते केवळ गुरु आणि गुरुसेवा यांचाच विचार करतात. त्याप्रमाणे आपणही ध्येय ठेवून आपला वैयक्तिक, घरातील वेळ न्यून करून ‘सेवेला कसे प्राधान्य देऊ शकतो ?’ यासाठी प्रयत्न करूया.

५ ई ५. गुरूंवरची श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करूया ! : काही जणांना घरून विरोध असतो, घरात काही अडचणी असतात किंवा घरात काही प्रसंग घडत असतात. तेव्हा ‘गुरूंनी आपल्याला गुरूंवरची श्रद्धा वाढवण्याची ही संधी दिली आहे’ हा भाग आपण लक्षात घेऊया. जरी आपल्याला घराच्या बाहेर पडता आले नाही, तरी ‘घरात जे काही करत आहोत, ते गुरूंच्या चरणी राहून कसे आपल्याला करता येईल ?’, हे पाहूया.

५ ई ६. साधनेचे प्रयत्न कुठे अल्प होतात, याचे चिंतन करून प्रयत्न वाढवूया ! : श्री स्वामी समर्थांचे वचन आहे ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ आपली गुरुमाऊली केवळ आपल्या पाठीशी नाही, तर अखंड आपल्या समवेत आहे. ही अनुभूती प्रत्येकाला प्रत्येक क्षणी घ्यायची आहे. प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत आपल्याला ही अनुभूती घ्यायची आहे. आपल्याला गुरुदेवांनी जी साधना सांगितली आहे, ती आपल्याकडून तेवढ्या गांभीर्याने होत नाही. व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत. ‘आपण साधनेच्या दृष्टीने कुठे अल्प पडतो ?’ याचे चिंतन करून महिनाभर प्रयत्न वाढवायचे आहेत.

५ ई ७. सामर्थ्यवान श्रीगुरूंना प्रत्येक क्षणी आठवूया ! : काही साधकांना काही अडचणींमुळे सेवेसाठी बाहेर पडता येत नाही, साधना करता येत नाही किंवा घरातून विरोध असतो, अशा वेळी साधकांना निराशा येते; पण अशा वेळी निराश न होता ‘आतापर्यंतच्या प्रत्येक अडचणीत, संकटात श्रीगुरु कसे आपल्या समवेत आहेत ? आजपर्यंत अनेक वर्षे आपल्याला त्यांनी कसे बाहेर काढले आहे’, असा विचार करून अशा सामर्थ्यवान श्रीगुरूंना प्रत्येक क्षणी आठवूया. इतकी वर्षे त्यांनी माझा सांभाळ केला, तर आता ते आपल्याला या परिस्थितीतूनही बाहेर काढणार नाहीत का ? आपण आपल्या सामर्थ्यशाली श्रीगुरूंवरील श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत श्रीगुरूंनी साधकांना अनेक संकटांमधून अलगदपणे बाहेर काढले आहे. यासाठी ‘आपला कृतज्ञताभाव कसा वाढेल ?’, हे पहायला हवे. सेवा करतांना कृतज्ञताभाव जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न करूया.

५ उ. प्रत्येक क्षणी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया !

या क्षणीही सत्संगात बसलेल्या प्रत्येक साधकाने आपल्यावर श्रीगुरुमाऊलीची जी कृपा आहे, त्या कृपेचे स्मरण करावे. ‘आपण आधी कसे होतो आणि श्रीगुरूंनी एवढ्या मोठ्या आपत्काळातही आपल्यात किती परिवर्तन केले आहे’, याची आठवण करूया. ही गुरुमाऊलीची कृपा, त्यांच्याप्रतीची कृतज्ञता प्रत्येक क्षणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया.

६. साक्षात् श्रीमन्नारायणाची लीला अनुभवता येण्यासाठी करावयाची प्रार्थना

साक्षात् श्रीमन्नारायणाचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. हे श्रीहरिस्वरूप गुरुनाथा, या भावसत्संगातील प्रत्येक भावक्षण आम्हाला अंतर्मनापासून अनुभवता येऊ दे. ‘हे भगवंता, तू आमच्यापासून दूर नाहीस. तू आमच्या जवळच आहेस. आमचे मन, वाणी, कृती आणि चराचर यांत तूच व्यापला आहेस. तुझी ही लीला प्रत्येक क्षणाला आम्हाला अनुभवता येऊ दे. प्रत्येक कृती आणि विचार तुला अपेक्षित असे होऊ दे’, अशी तुझ्या पावन चरणी प्रार्थना आहे.

– सौ. कीर्ती जाधव, कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, कु. योगिता पालन, कु. वैष्णवी वेसणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

पुढील लेख वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment