पर्यावरणाच्या र्‍हासामुळे निसर्गदेवतेचा होणारा कोप

भूकंप, ज्वालामुखी अन् सुनामी

पर्यावरणाचा र्‍हास होत असल्यानेच समुद्राच्या तळाशी तीव्र भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप होण्याची घटना घडल्यास सुनामीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता असते. लाटांचा पुढे सरकण्याचा वेग घंट्याला ८०० ते १ सहस्र किलोमीटर असतो.

पाणीटंचाई

‘येत्या १५ वर्षांत पृथ्वीवरच्या दोन तृतीयांश परिसराला पाण्याची टंचाई जाणवू लागेल; पण भारतात ९ वर्षांतच ती तीव्र होईल’, असे भाकित अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री रॉबर्ट ब्लेक यांनी केले आहे. हिमालयातील बर्फ वितळल्याने गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्यासारख्या महानद्या ऐन उन्हाळ्यात भरून वहातात. काठांवरची लक्षावधी एकर भूमी भिजवतात. कोट्यवधी भारतियांची तहान भागवतात. हे चक्र ९ वर्षांत आटेल, असा गंभीर संकेत ब्लेक देत आहेत. (११.३.२०११)

शेती, ऊर्जानिर्मिती आणि इतर कारणांसाठी पाण्याची मागणी इतक्या प्रमाणात वाढेल की, त्या मागणीच्या तुलनेत ४० प्रतिशत पाणीटंचाई भेडसावेेेल. एका पिढीत हे संकट आपल्या समोर असेल. त्यात भर म्हणजे पूर आणि दुष्काळ या घटना घडण्याचे प्रमाण वाढेल. पूर्वी १०० वर्षांत एकदा घडणारी हवामानाची तीव्र आपत्ती आता २० वर्षांमध्ये घडू लागली आहे.

दुष्काळ आणि महापूर

यांत्रिकीकरण आणि पर्यावरणाचा र्‍हास यांमुळे नैसर्गिक संकटे भविष्यकाळात वाढत जाणार असून येत्या २७ वर्षांत जगातील ७५ प्रतिशत लोकांना दुष्काळ आणि महापूर यांचा फटका बसणार आहे. या नैसर्गिक संकटांची तीव्रता सर्वांत जास्त विकसनशील गरीब देशांना बसणार आहे. मानवाने चालवलेले यांत्रिकीकरण आणि ते करतांना मोठ्या प्रमाणावर होत असलेला पर्यावरणाचा र्‍हास यांमुळे निसर्गाचे पर्यावरण चक्र विस्कळीत झाले आहे. याचे भयंकर परिणाम मानवाला येत्या काळात भोगावे लागणार आहेत. – ‘ख्रिश्‍चन एड’ (पर्यावरणाचा अभ्यास करणारी संस्था)

साखर उद्योगालयातून कार्बनडाय ऑक्साईड वायूचे प्रक्षेपण

साखर उद्योगालयाच्या धुराड्यातून ‘कार्बनडाय ऑक्साईड’ वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकला जातो. त्याचा परिणाम उद्योगालयाच्या जवळ असणार्‍या पर्यावरणाच्या घटकांवर होतो. राख हवेतील बाष्प शोषून घेते. त्यामुळे हवेचा कोरडेपणा वाढून उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो.

प्लास्टिकमुळे दुर्धर व्याधींची निर्मिती

प्लास्टिक जाळल्यानंतर त्यातून ‘झिंक’, ‘लेड कॅडमियम’सारखे जड धातू; ‘बेन्झोपायरीन’, ‘डायेक्सिन क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन’ यांसारखे घातक वायू हवेत मिसळले जातात. त्यातून श्‍वसनाचे विकार आणि कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीही उद्भवू शकतात.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात