मंगळुरू जिल्ह्यातील एक योगमार्गी संत प.पू. देवबाबा !

प.पू. देवबाबा

 

१. प.पू. देवबाबा यांची काही वैशिष्ट्ये !

१ अ. गोपालन करणारे प.पू. देवबाबा !

‘प.पू. देवबाबा हे एक योगमार्गी संत आहेत. मंगळुरू जिल्ह्यातील तालीपडी (किन्नीगोळी) या गावी प.पू. देवबाबा यांचा ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रम’ हा अतिशय सुंदर आश्रम आहे. त्यांच्याकडे एकूण ३०० गायी आहेत. भूतलावर ‘कपिला’ जातीच्या केवळ चाळीसच गायी शेष राहिल्या आहेत. या चाळीस गायी प.पू. देवबाबा यांच्या गोशाळेत आहेत. प.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात. त्यांना प्रेमाने जवळ घेतात. ते आश्रमात आलेले दिसले की, गायीही ‘त्यांनी आपल्याला जवळ घ्यावे’, याकरता मान डोलवत, हंबरत त्यांच्याकडे पहातात. आश्रमातील सर्व गायी आणि वासरे यांच्याकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवते. प.पू. देवबाबांनी आम्हाला सांगितले की, या गायींमुळेच हा आश्रम चैतन्यदायी झाला आहे.

१ अ १. प.पू. देवबाबांना प्राण्यांची भाषा कळणे

प.पू. देवबाबांना प्राण्यांची भाषा कळते. एखादी नकारात्मक घटना घडणार असल्यास त्यांच्या आश्रमात असलेला एक बैल त्याविषयी प.पू. बाबांना सूचित करतो. प.पू. देवबाबा बोलतांना गायीसुद्धा त्यांच्या संभाषणात सहभागी होतात. त्यांनी एखादे सूत्र सांगितल्यावर त्याला दुजोरा देण्यासाठी गायी हंबरतात.

१ अ २. अयोध्येच्या एका गायीने अन्य गायींच्या वासरांनाही दूध पिऊ दिल्याने प.पू. देवबाबांनी तिचे नाव ‘कौसल्या’ ठेवणे

आश्रमात एक अयोध्येची गाय आहे. तिचे नाव प.पू. देवबाबांनी ‘कौसल्या’ ठेवले आहे. यामागील माहिती सांगतांना त्यांच्या शिष्या कु. प्रसन्नलक्ष्मी यांनी सांगितले, ‘‘आश्रमात गायींनी वासराला जन्म देण्यासाठी एक वेगळे स्थान आहे. एकदा अयोध्येच्या गायीने वासराला जन्म दिला. त्याच वेळी अन्य तीन गायींनीही वासरांना जन्म दिला. तेव्हा सर्व वासरे अयोध्येच्या गायीचे दूध पिऊ लागल्या. तिनेही सहजपणे त्या वासरांना दूध पिऊ दिले. तेव्हा अन्य गायींच्या वासरांनाही मातेप्रमाणे प्रेम देणा-या या गायीला प.पू. देवबाबा प्रेमाने ‘कौसल्या’ म्हणतात. संत प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकीकरण कसे करतात, तसेच प्राणीसुद्धा निरपेक्षपणे प्रेम करतात, हे शिकायला मिळाले.

१ आ. संगीत चिकित्सेद्बारे कर्करोगासारखे असाध्य रोग
असलेल्या ब-याच रुग्णांना प.पू. देवबाबांनी रोगमुक्त करणे

प.पू. देवबाबा स्वत: संगीत चिकित्सकही आहेत. त्यांनी संगीत चिकित्सेअंतर्गत कर्करोगासारखे असाध्य रोग असलेल्या ब-याच रुग्णांनासुद्धा रोगमुक्त केले आहे. अशा प्रकारच्या रोगांच्या निवारणार्थ ब-याचदा प.पू. देवबाबांनी काही रुग्णांना केवळ गोसेवाच करायला सांगितली होती. असे केल्याने त्या रुग्णांचे रोग बरे झाल्याचे लक्षात आले. अशा ब-याच अनुभूती प.पू. देवबाबांच्या भक्तांकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या.

१ आ १. कर्नाटकी आणि उत्तर हिंदुस्थानी अशा दोन्ही प्रकारचे संगीत ज्ञात असणे

प.पू. देवबाबा हे स्वत: कर्नाटकी आणि उत्तर हिंदुस्थानी या दोन्ही प्रकारचे संगीत शिकलेले आहेत. त्याचबरोबर बासरी, सतार आणि व्हायोलीन ही वाद्येही ते मधूर स्वरात वाजवतात. बासरी वादनाद्वारे त्यांचे स्वरांशी संबंधित संशोधन चालू आहे. प.पू. देवबाबा हे निस्सीम श्रीकृष्णभक्त आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या बासरीतून जे सुमधूर अनाहत सूर निघत, तसे सूर त्यांच्याही बासरीतून निघायला हवेत, यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

१ इ. प.पू. देवबाबांची अन्य वैशिष्ट्ये !

१ इ १. डोळे प्रकाशित होणे

प.पू. देवबाबांच्या डोळ्यांकडे पाहिले असता त्यांचे डोळे निळसर आणि पांढ-या प्रकाशाने प्रकाशित दिसले.

१ इ २. साधे राहणीमान आणि सहजस्थिती

प.पू. देवबाबांचे राहणीमान अतिशय साधे आहे. त्यांना कोणत्याही मानापानाची अपेक्षा नाही. त्यांच्या पायांवर सूज होती; पण त्याचे त्यांना काही वाटत नव्हते. ते अविरत सेवेत असायचे. चहा घेऊन ते सर्वांप्रमाणेच सहज खाली बसून तो प्यायचे. ‘संतांना देहबुद्धी नसते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता असते, तसेच त्यांना अहं नसतो’, हे प्रत्यक्षातही अनुभवायला आले.

१ इ ३. प.पू. देवबाबा प्रत्येकात ईश्वर बघत असल्याने समोरच्याशी बोलतांना शक्यतो डोळे बंद करूनच बोलणे

मार्गदर्शन करतांना अथवा समोरच्याशी बोलतांना प.पू. देवबाबा डोळे बंद करून बोलतात. याविषयी त्यांनी सांगितले, ‘‘डोळे उघडे ठेवून बोललो, तर मला समोरच्याचे जड शरीर दिसते (या व्यक्तीच्या शरिराशी बोलतोय, असे होते); परंतु डोळे बंद करून बोलल्यावर मला समोरच्याच्या अंत:करणातील देवता दिसतात आणि मी त्यांच्याशी संवाद साधतो.’’

प.पू. देवबाबांमध्ये एवढी वैशिष्ट्ये असूनही कोणताही कर्तेपणा स्वत:कडे न घेता ते नेहमी ‘मला काहीच येत नाही. जे काही करतो, तो भगवान श्रीकृष्णच करतो’, या भावात असतात.

डावीकडून साधिका कु. तेजल पात्रीकर, श्री. चेतन एम्.एन्. प.पू. देवबाबा, डॉ. (कु.) आरती तिवारी, कु. प्रतीक्षा आचार्य आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर

१ ई. प.पू. देवबाबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

१ ई १. प.पू. देवबाबांनी साधकांना उशिरा पोचल्याची जाणीव करून देणे, चित्रीकरणास नकार देणे आणि साधकांनी श्रीकृष्णाच्या चरणी शरणागतीने प्रार्थना केल्यावर त्यांनी ‘चित्रीकरण करू शकता’, असा निरोप पाठवणे

प.पू. देवबाबांनी आम्हाला सकाळी ९ वाजता आश्रमात बोलावले होते. काही कारणास्तव आम्हाला तेथे पोचण्यास उशीर झाला. त्या वेळी प.पू. देवबाबांनी आम्हाला त्याची जाणीव करून दिली आणि सांगितले, ‘‘कोणतेही चित्रीकरण करायचे नाही.’’ त्या वेळी त्यांची भेट, त्यांनी केलेले मार्गदर्शन समष्टीसाठी अमूल्य आहे, असे तीव्रतेने वाटून श्रीकृष्णाच्या चरणी शरणागतीने प्रार्थना होत होत्या. नंतर त्यांनी आम्हाला ‘चित्रीकरण करू शकता’, असा निरोप पाठवला. तेव्हा ‘संत किती दयाळू असतात’, याची प्रचीती आली आणि शरणागतीचे महत्त्वही लक्षात आले. नंतर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘मी मनाने काहीच करत नाही. भगवंत मला सांगत असतो. मी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरु  डॉ. आठवले यांना विचारून तुम्हाला सांगितली आहे.’’ तिथे आलेल्या साधकांपैकी ‘सर्व जण आश्रमात विचारून आले आहेत ना’, हेही त्यांनी आवर्जून विचारले.

१ ई २. ‘चित्रीकरण चांगले व्हावे’, यासाठी संगीत शिकवण्यासाठी सुयोग्य सेटअप सिद्ध करणे

दुपारी साधारण २.३० वाजता प.पू. देवबाबा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले. संगीत शिकवतांनाचा सेटअप चित्रीकरणात चांगला दिसावा, यासाठी त्यांनी २ तानपुरे स्वरात लावून घेतले. स्वत: हार्मोनियम घेऊन योग्य रचना करून आम्ही बसलो. इथेही प.पू. देवबाबांचा ‘चांगले चित्रीकरण कसे होईल’, हाच विचार असल्याचे लक्षात आले.

१ ई ३. साधकांना मार्गदर्शन करण्यास प्राधान्य देणे

सप्ताहातील एक दिवस प.पू. देवबाबा घरातील वैयक्तिक कामासाठी देतात; परंतु आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी तो दिवस आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच दिला.

१ ई ४. साधकांना आश्रमात सेवा करण्यास सांगणे

प.पू. देवबाबांचा सत्संग संपल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही आश्रमात तुम्हाला हवी ती किंवा जमेल ती सेवा करू शकता.’’ आश्रमात आल्यानंतर ‘आश्रमाविषयी आपलेपणा वाटावा’, या हेतूने प.पू. देवबाबा तिथे आलेल्याला एखादी सेवा करण्यास सांगतात, हे लक्षात आले.

१ ई ५. आश्रमात विशिष्ट असा दैवी सुगंध दरवळणे

प.पू. देवबाबा आम्हाला संगीत, नृत्य यांसंदर्भात विविध ज्ञान देत असतांना मधेच विशिष्ट असा दैवी सुगंध दरवळत होता. त्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘वेगवेगळे सुगंध येत असतात. कधी कोणता सुगंध येतो, हे तुम्ही आश्रमातील लोकांना विचारा.’’ याविषयी त्यांच्या शिष्या कु. प्रसन्नलक्ष्मी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. हंसबाबा (एक हिमालयीन योगी) आश्रमात आल्यावर कधी कधी सुगंध येतो. इतर वेळीही येतो; पण ‘तो का येतो ?’, हे प.पू. देवबाबांनाच ठाऊक असते. त्यांना स्वतःविषयी काही सांगायला आवडत नाही; म्हणून त्यांनी त्याविषयी सांगणे टाळले.’’

कु. तेजल पात्रीकर यांना संगीत दीक्षा देण्यापूर्वी प्राणायाम करून घेतांना प.पू. देवबाबा

१ उ. प.पू. देवबाबांचे योगसामर्थ्य !

१ उ १. गायिकेने सराव थांबवल्यावर स्वत: ध्यानास बसले असतांनाही ‘तुला अजून १ घंटा सराव करायचा आहे’, असा निरोप देणे

आम्ही आश्रमात गेलो, त्या दिवशी एक गायक कलाकार सराव करतांना ‘आम्ही ते ऐकावे’, असा निरोप प.पू. देवबाबांनी पाठवला. आम्ही ते ऐकत असतांना त्या गायिकेने तिच्या वडिलांना सांगितले, ‘‘आता सराव पुरे. बराच वेळ झाला. मी दमले.’’ आणि तिने सराव थांबवला. त्या वेळी प.पू. देवबाबा ध्यान करण्यासाठी गेले होते; परंतु काही क्षणांतच त्यांच्या शिष्या कु. प्रसन्नलक्ष्मी यांनी तिला निरोप दिला, ‘तुला अजून १ घंटा सराव करायचा आहे’, असे प.पू. देवबाबांनी सांगितले आहे.’ तेव्हा तिने लगेच विविध भजने म्हणत सराव करण्यास आरंभ केला. त्या वेळी ‘प.पू. देवबाबा शरिराने कुठेही असले, तरी सूक्ष्मातून त्यांचे त्या गायक कलाकाराकडेही लक्ष आहे’, याची जाणीव झाली.

१ उ २. प.पू. देवबाबांनी योगसामर्थ्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रामनाथीतील रहात्या खोलीत सूक्ष्मातून जाऊन त्यांचे दर्शन घेतल्याचे सांगणे

२१.३.२०१७ या दिवशी ४ – ५ घंटे प.पू. देवबाबा यांनी आमच्या संगीत आणि नृत्य या विषयांवरील तात्त्विक प्रश्नांवर मार्गदर्शन केले. त्या वेळी ३.४९ वाजता अकस्मात् ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी आताच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाऊन आलो. ते झोपले होते. मी त्यांच्या पलंगाभोवती फिरून त्यांना पाहून आलो.’’ प.पू. देवबाबा हे योगमार्गी संत असल्याने ते सूक्ष्मदेहाने रामनाथीला (गोवा येथे) क्षणार्धात जाऊन आले होतेे. साधारण या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले झोपलेले होते, हे आम्हाला नंतर समजले. प.पू. देवबाबांचे सूक्ष्म सामर्थ्यही या प्रसंगातून देवाच्या कृपेने अनुभवण्यास मिळाले.

१ उ ३. रात्री खोलीत सूक्ष्मातून प.पू. देवबाबांचे अस्तित्व अनुभवणे आणि ‘योगसामर्थ्याने आमच्या आंतरिक चक्रांवर ते काम करत आहेत’, असे जाणवणे

२१.३.२०१७ या दिवशी रात्री झोपल्यावर प.पू. देवबाबा सूक्ष्मातून आमच्या खोलीत आले आहेत आणि ‘योगसामर्थ्याने आमच्या आंतरिक चक्रांवर ते काम करत आहेत’, असे आम्हा तिघींनाही जाणवले. त्या वेळी ‘नामजप आतून श्वासासमवेत चालू आहे’, असे जाणवत होते. दुस-या दिवशी प.पू. देवबाबांनी ते सूक्ष्मातून आमच्या चक्रजागृतीसाठी आमच्या खोलीतच असल्याचे सांगितले.

१ ऊ. प.पू. देवबाबांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

प.पू. देवबाबांनी आम्हाला सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आज पुष्कळ आनंद मिळाला आहे. त्यांनी तुम्हाला इकडे पाठवून मला पुष्कळ आनंद दिला. आश्रमातील ज्या अन्य साधकांना संगीत आवडते, त्यांनाही इकडे पाठवू शकता. त्यांनाही असे ज्ञान देता आले, तर समष्टीसाठी आपण केलेले संगीताविषयीचे हे प्रयोग उदाहरण म्हणून सांगता येतील आणि आपले ते संशोधन समष्टीसाठी अत्यंत उपयोगी ठरेल.’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर, कु. तेजल पात्रीकर, डॉ. (कु.) आरती तिवारी आणि श्री. चेतन एम्.एन्.

 

२. प.पू. देवबाबांनी सूक्ष्म-स्तरावर संगीत शिकवणे

२ अ. प.पू. देवबाबांनी अंर्तसंगीत अनुभवण्यासाठी दीक्षा देण्याचे महत्त्व सांगणे

‘२०.३.२०१७ या दिवशी दुपारी प.पू. देवबाबांना भेटल्यानंतर मार्गदर्शनापूर्वी आम्ही त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यांनी आरंभी मला सांगितले, ‘‘तुझ्यात संगीतातून पुढे जाण्याची क्षमता आहे. माझ्यामधील (प.पू. देवबाबांमधील) सूक्ष्म संगीताचे सामर्थ्य तुझ्यात प्रक्षेपित करता यावे, यासाठी आधी मला तुला दीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे ते अंर्तसंगीत तुला अनुभवता येईल.’’

२ आ. प.पू. देवबाबांनी अंर्तसंगीत अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष दीक्षा देणे

प.पू. देवबाबांनी आम्हाला आपल्या शरिरातील इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीन नाड्या अन् कुंडलिनी शक्ती यांची थोडी माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी मला ५ मिनिटे प्राणायामांतर्गत अनुलोम-विलोम करायला सांगितले. थोड्या वेळानंतर त्यांना मला आवडत असलेल्या मालकंस रागातील विलंबित ख्यालाची माझ्यासाठी आवश्यक असलेली एक ओळ सुचली. त्याचे बोल ‘राधेश्याम सुमन दे’, असे होते. ती त्यांनी मालकंस रागांच्या स्वरांत मला म्हणायला सांगितली. ही ओळ गातांना त्यांनी ‘राधेकृष्णा, तूच मला संगीतातून आत (अंतरंगात) जाण्याचा मार्ग दाखवून तुझ्यापर्यंत घेऊन चल’, असा भाव ठेवण्यास सांगितले. या अनुषंगानेच एक मंत्र देऊन ‘याच्या नियमित जपाने तुला आतील संगीत अनुभवता येईल’, असेही सांगितले.’

– कु. तेजल पात्रीकर

२ इ. ‘प.पू. देवबाबांनी प्राणायाम करण्यास आरंभ केला. त्याच क्षणी आमचे ध्यान लागले.’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि डॉ. आरती तिवारी

 

३. प.पू. देवबाबांनी संगीत साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

३ अ. संगीतात जसे मंत्र घेऊन आतील साधना
चालू करू शकतो, तसे नृत्याच्या माध्यमातूनही मंत्र घेऊन आतली साधना अनुभवू शकणे

‘२१.३.२०१७ या दिवशी प.पू. देवबाबांनी संगीत आणि नृत्य यांविषयी विविध तात्त्विक प्रश्नांची आध्यात्मिक स्तरावर उत्तरे दिली. प.पू. बाबा म्हणाले, ‘‘संगीतात जसे मंत्र घेऊन आतील साधना चालू करू शकतो, तसे नृत्याच्या माध्यमातूनही मंत्र घेऊन आतली साधना अनुभवू शकतो. यासाठी आपल्याला नृत्य करता येत असेल ते आवडते गीत सुरात म्हणता येणे आवश्यक आहे. नृत्य करतांना त्या गीताच्या रागानुसार सूक्ष्मातून मंत्र काढून देऊ शकतोे.’’

३ आ. प.पू. देवबाबांनी साधिकेला गीतातील रागाच्या स्वरांवरून एक मंत्र सिद्ध करून देणे

प.पू. देवबाबांनी डॉ. आरती आणि सौ. सावित्री यांना आवडणारे एकेक नृत्यगीत म्हणण्यास सांगितले. ते सुरात नव्हते. तेव्हा प.पू. देवबाबांनी सांगितले, ‘‘आता सराव नसल्याने जमत नाही. तुम्ही सराव केला, तर तुम्हालाही सुरात म्हणता येईल.’’

डॉ. आरती यांना आवडणा-या गीताचा राग (राग यमन) ठाऊक असल्याने ते गीत पुन्हा म्हणण्यास सांगितले. त्या रागाच्या स्वरांवरून प.पू. देवबाबांनी त्यांना एक मंत्र सिद्ध करून दिला. त्याच्या ओळी ‘दासी हूं मै गुरुचरणनकी । गुरुचरणोंमे पूर्ण शरण मैं । चरणम् शरणम् सद्गुरु चरणम् ।’ अशा शरणागत भावाच्या होत्या.

डावीकडून कु. प्रतीक्षा आचार्य, कु. तेजल पात्रीकर संगीताविषयी मार्गदर्शन करतांना प.पू. देवबाबा, कु. आरती तिवारी आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर

४. प.पू. देवबाबांनी नृत्य शिकवण्याच्या
प्रक्रियेच्या संदर्भात साधिकेला आलेल्या सूक्ष्म स्तरावरील अनुभूती !

४ अ. डोळे मिटले जाणे

आरंभी दोन वेळा त्यातील शब्द आणि चाल यांकडे माझे लक्ष गेले. नंतर माझे डोळे आपोआप मिटले गेले.

४ आ. सूक्ष्मातून प.पू. देवबाबांच्या जागी मोठे चरण
दिसून मानसभावाने त्यावर डोके ठेवल्यावर मन शांत होणे

त्यानंतर सूक्ष्मातून प्रथम प.पू. देवबाबांच्या जागी मोठे चरण दिसले. तेव्हा मी मानसभावाने त्या चरणांवर डोके ठेवले. तेव्हा माझे मन शांत झाले. काही क्षण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच ते चरण आहेत’, असे दिसले. नंतर ‘प.पू. देवबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले एकच आहेत’, असे जाणवून माझा भाव जागृत झाला.

४ इ. ‘प.पू. देवबाबांच्या डोळ्यांतून पांढ-या प्रकाशाचा प्रवाह
माझ्या अनाहतचक्रामधे प्रवेश करत आहे आणि माझ्या अनाहतचक्राखाली शरीर नाही’, असे दिसणे

त्यानंतर ‘प.पू. देवबाबांच्या डोळ्यांतून पांढ-या प्रकाशाचा प्रवाह माझ्या अनाहतचक्रामधे प्रवेश करत आहे’, असे दिसले. तेव्हा ‘माझ्या अनाहतचक्राखाली शरीर नाही’, असे दिसले. अनाहतच्रकातील तो पांढरा प्रकाश सर्वत्र व्यापून राहिला आणि मला काही क्षण सभोवतालचा विसर पडला. शेवटी काही क्षण मन निर्विचार झाले.

त्यानंतर प.पू. देवबाबांनी ‘सतत शरण रहायला हवे, असाच मंत्र दिला’, असे वाटून शरणागतीचे महत्त्व जाणवले. माझी साधनेची स्थिती चांगली नाही, तरी देव माझ्यावर किती कृपा करतो, यासाठी कृतज्ञता वाटत होती. काही वेळाने मी प.पू. देवबाबांना विचारले, ‘‘माझ्यात मोह, क्रोध इत्यादी दोष आहेत. ते कसे घालवायचे ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘देवाला शरण गेले की, सर्वकाही होते.’’

– डॉ. आरती तिवारी

४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

‘प.पू. देवबाबा आम्हाला संगीत आणि नृत्य यांच्यासंदर्भात विविध ज्ञान देत असतांना मधेच विशिष्ट असा दैवी सुगंध दरवळत होता. तेव्हा हा गंध घेण्यापूर्वी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासमवेत आहेत, तेच मला तो गंध घेण्यास सांगत आहेत’, असे जाणवले.’

– डॉ. आरती तिवारी

४ उ. प.पू. बाबांनी डोक्यावर बराच वेळ हात ठेवल्यावर ध्यान लागणे

‘प.पू. देवबाबांच्या मार्गदर्शनानंतर त्यांना नमस्कार केला. त्या वेळी प.पू. बाबांनी माझ्या डोक्यावर बराच वेळ हात ठेवला. तेव्हा बराच वेळ माझे ध्यान लागले. त्यांच्या आश्रमातील ध्यानमंदिरात जशी अनुभूती आली होती, तसेच पुन्हा जाणवले.’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर

 

५. प.पू. देवबाबांनी कलेच्या साधनेतून
अंर्तमनात जाण्यासाठी शरणागतीलाच अत्यंत महत्त्व असल्याचे सांगणे

‘संगीत, नृत्य यांतील दीक्षा घेण्यासाठी काय पात्रता निर्माण व्हायला हवी ?’, असे विचारल्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘यासाठी शरणागतीला पुष्कळ महत्त्व आहे. आताच्या काळानुसार १०० टक्के शरणागती कोणाचीच नाही; परंतु न्यूनतम ५० – ६० टक्के तरी ती असायला हवी, तर दीक्षा देऊ शकतो.’’

५ अ. प.पू. देवबाबांनी एका गायक कलाकाराला
गाणे देवाला आवडेल असे भावपूर्ण होत नसल्याची जाणीव करून देणे

आम्ही प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात असतांना एक आकाशवाणीवर गाणारी गायिका कलाकार त्यांच्याकडे आली होती. प.पू. देवबाबांनी तिला ‘केवळ गाण्याच्या सरावाच्या वेळीच गाणे म्हणणे आणि इतर वेळी कोणाशीही न बोलता मौन पाळणे’, असे सांगितले होते. ही गायिका काही दिवसांनी एका राज्यात मोठा कार्यक्रम करण्यासाठी जाणार होती. प.पू. देवबाबा तिला म्हणाले, ‘‘तू वरवर गाऊन उपयोग नाही. देवाला आशा-आकांक्षा ठेवून म्हटलेले गाणे आवडत नाही. गाण्यातून ईश्वराला भावपूर्ण आळवले, तर ती कला देवाचरणी अर्पण होते. तुझ्या मनात पुष्कळ अपेक्षा आहेत. ते विचार मनात ठेवून तू भजने म्हटलीस, तर काय उपयोग ? देव कसा भेटेल ? ती भक्ती तुझ्या मनात कशी निर्माण होईल ? आताच्या काळात किमान ५० टक्के तरी शरणागती आवश्यकच आहे. आरंभी ती बुद्धीनेच प्रयत्न करून निर्माण करावी लागेल. नंतर हळूहळू कधीतरी ती नक्कीच निर्माण होईल. तेव्हा मग तुला ख-या अर्थाने भजने गाण्याचा लाभ होईल आणि प्रचीती येईल. त्यासाठी प्रयत्न कर.’’

 

६. प.पू. देवबाबांनी तीन दिवसांत ते त्यांच्याकडील
ज्ञान आम्हाला देणार आहेत, असे सांगणे आणि प्रत्यक्षात ते एकाच दिवसात देणे

‘प.पू. देवबाबांनी आम्हाला २ – ३ दिवसांसाठी त्यांच्या आश्रमात बोलावले होते. त्या तीन दिवसांत ते त्यांच्याकडील ज्ञान आम्हाला देणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला संगीताविषयी काही माहिती सांगितली. त्यानंतर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘या दोन दिवसांत मी जे देणार होतो, ते एकाच दिवसात दिले. आता तुम्ही इकडे १ दिवस राहून पुढे तुमची सेवा करू शकता.’’

६ अ. प.पू. देवबाबा यांच्या आश्रमातील ध्यानमंदिरात
लिखाणासाठी बसल्यावर त्यांनी दीक्षा देतांना जी स्थिती अनुभवली, ती पुन्हा अनुभवणे

२१.३.२०१७ या दिवशी सकाळी १०.३० वाजता प.पू. देवबाबा यांच्या आश्रमातील ध्यानमंदिरात मी लिखाणासाठी बसले. जेमतेम २ – ३ ओळीच लिहिल्या असतील. त्यानंतर माझे लक्ष श्वासावर केंद्रित व्हायला लागले. २०.३.२०१७ या दिवशी प.पू. देवबाबा यांनी दीक्षा दिली, त्या वेळी जशी स्थिती अनुभवली, तशीच स्थिती पुन्हा अनुभवायला मिळाली. थोड्याच वेळात माझे ध्यान लागले. या वेळी त्यांनी दिलेला मंत्र श्वासासह सहज होत होता. हळूहळू त्या मंत्राचे शब्द न येता त्या शब्दांपाठीमागील मालकंस रागाचे स्वर यायला लागले. त्या वेळी ‘आतमध्ये हे स्वर माझ्या आतील एकतारीतून प्रगट होत आहेत’, असे जाणवले. याविषयी प.पू. देवबाबा यांना सांगितल्यावर ते आनंदाने हसून म्हणाले, ‘‘पटले ना आता, आपले शास्त्र कसे बरोबर आहे ते ?’’

– कु. तेजल पात्रीकर

६ आ. दुस-या दिवशीही कु. तेजल ध्यानावस्थेत गेल्याचे जाणवणे

‘सकाळी ध्यानमंदिरात बसलेे असतांना ‘कु. तेजल पुन्हा ध्यानावस्थेत आहेत’, असे जाणवले. मी त्यांना त्या स्थितीतून न उठवता सेवेसाठी अन्य ठिकाणी गेले. याविषयी प.पू. देवबाबा यांना सांगितल्यावर त्यांनी ‘कु. तेजल यांना त्या अवस्थेतून उठवल्यास त्रास होऊ शकतो’, असे सांगितले.’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर

 

७. प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात जातांना आणि आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

७ अ. आश्रमात जातांना आलेल्या अनुभूती

७ अ १. प.पू. देवबाबांच्या आश्रमात जातांना प्रवासात ‘स्वत: एक नर्तकी असून ‘मी तुला देवबाबांकडे पाठवत आहे’, असे शिवाने सांगितल्याचे जाणवणे

‘२०.३.२०१७ या दिवशी प.पू. देवबाबांच्या आश्रमात जात असतांना प्रवासात माझ्या मनात ‘देवबाबा आणि शिव’, असे शब्द एक-आड-एक मनात नामजप केल्याप्रमाणे येऊ लागले. त्यानंतर शिव-पार्वती यांचे दर्शन झाले. त्या वेळी ‘मी एक नर्तकी आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा शिव मला म्हणाला, ‘मी तुला देवबाबांकडे पाठवत आहे. त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून तू ते माझे इष्ट असलेल्या श्रीमन् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी एकरूप हो.’

७ अ २. शेषशायी श्रीविष्णु, शिव-पार्वती आणि अन्य देवता दिसणे अन् ‘स्वत: त्यांच्यासमोर नृत्य करत त्यांना पुष्पांजली अर्पण करत आहे’, असे दिसणे

त्यानंतर मला शेषशायी श्रीविष्णु दिसले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी शिव-पार्वती आले होते. तेव्हा दुस-या बाजूला अन्य देवता उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांच्यासमोर मी ‘धीम धीम तन धिरेना’ (तराना) या बोलांवर नृत्य करत त्यांना पुष्पांजली अर्पण करत आहे’, असे दिसले. तेच बोल असलेले एक गाणे मला मिळाले. त्यानंतर पूर्ण प्रवासात मी ते बोल अनेक वेळा ऐकले. त्या वेळी श्रीविष्णूसमोर नृत्य करण्याचा आनंद मिळाला.

७ अ ३. शिवाने ‘प.पू. देवबाबांकडून तुला तांडव नृत्याचे ज्ञान होईल’, असे सांगणे

प.पू. देवबाबांचा आश्रम येण्यापूर्वी काही क्षण अगोदर शिवाने सांगितले, ‘प.पू. देवबाबांकडून तुला माझ्या तांडव नृत्याचे ज्ञान होईल.’ ते ऐकून मी कृतज्ञता व्यक्त केली. प्रवासात सातत्याने शिव-शक्ती यांचे दर्शन होत असल्याने तेथे गेल्यावर प.पू. देवबाबांच्या आश्रमाचे ‘श्रीशक्तीदर्शन आश्रम’ असे नाव वाचून कृतज्ञता व्यक्त झाली.’

– डॉ. आरती तिवारी

७ आ. आश्रमात आलेल्या अनुभूती

७ आ १. प.पू. देवबाबा स्वागताकरता येणे आणि त्यांनी अतिशय प्रेमाने विचारपूस करून आशीर्वाद देणे

‘२०.३.२०१७ या दिवशी सकाळी आम्ही प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात पोचलो. तेथे गायींच्या सहवासात असणारे, अगदी साध्या वेशातील प.पू. देवबाबा आमच्या स्वागताकरता आले. त्यांनी अतिशय प्रेमाने आमची विचारपूस करून आम्हाला आशीर्वाद दिले. मला मालकंस राग आवडतो, हे मी त्यांना पूर्वी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी मला तो राग म्हणण्याचा सराव करण्यास सांगून आम्हाला दुपारी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

७ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांना सूक्ष्मातून मनातले विचार सांगितल्यावर मालकंस रागातील गीत म्हणता येणे

अनेक वर्षे शास्त्रीय संगीताचा सराव नसल्याने माझ्या मनावर दडपण आले. ‘मला कसे जमेल ?’, असे वाटू लागले. शेवटी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांना सूक्ष्मातून मनातील विचार सांगितले. त्यानंतर मी तेथील ध्यानमंदिरात बसून एकटीच सराव करत होते. त्या वेळी मी अकस्मात् ‘मन तडपत हरि दरशन को आज’ हे मालकंस रागातील गीत म्हटले. ते म्हणतांना याचना होऊन माझी भावजागृतीही झाली.’

– कु. तेजल पात्रीकर

७ आ ३. एका गायिकेने साधिकेच्या आवडीचे एक भजन म्हणणे आणि ते ऐकून भावजागृती होणे

आम्ही आश्रमात गेलो, त्या दिवशी प.पू. देवबाबांनी एक गायक कलाकार सराव करतांना ‘आम्ही ते ऐकावे. त्यातूनही काही शिकता येईल’, असा निरोप पाठवला. त्याप्रमाणे आम्ही ते ऐकत होतो. त्या गायिकेने एक भजन म्हटले, ‘…येई वो विठ्ठले, भक्तजन वत्सले…’ आणि ‘येरे येरे माझ्या रामा, मनमोहना, मेघश्यामा…’ ही भजने मी सनातन संस्थेमध्ये येण्यापूर्वी सतत ऐकत असे. विठ्ठलाचे भजन दूरदर्शनवर ५ मिनिटे दाखवायचे. केवळ ते ऐकण्यासाठी त्या वेळी मी वैद्यकीय महाविद्यालयातून कोणाकडे न जाता थेट घरी यायचे. त्या वेळी मला ‘मी असे का करते ?’, याचे कारण कळायचे नाही. मला केवळ ते भजन आवडते आणि मी ते ऐकते, एवढेच कळत होते. आज तेच भजन ऐकतांना मला त्या क्षणांची आठवण होऊन माझी भावजागृती झाली. ती भजने ऐकणे, हे माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळातील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक होते. त्यातूनच मला संगीत आवडू लागले. जणू देवानेच मला त्या माध्यमातून धरून ठेवले होते. नंतर तिने श्रीकृष्णाचे एक भजन म्हटले. त्या वेळी मला हातात सतार घेतलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले.

७ आ ४. ‘कोणाला प्रार्थना करावी’, असा मनाचा गोंधळ होणे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून ‘आता तू प.पू. देवबाबांच्या आश्रमात आहेस, तर तू सर्व प्रार्थना त्यांनाच करायला हव्यात’, असे सांगणे

काही वेळाने माझ्या लक्षात आले की, तिथे सगळीकडे श्रीकृष्णाची चित्रे लावलेली आहेत; परंतु मला मात्र प्रार्थना करतांना तिथे वारंवार शिवाचेच दर्शन होत होते. तेव्हा ‘माझे काही चुकते कि काय ?’, असे वाटून ‘श्रीकृष्ण, शिव, प.पू. देवबाबा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांपैकी कोणाला प्रार्थना करू ?’, असा गोंधळ मनात चालू होता. त्याच वेळी अकस्मात् त्या गायिकेने ‘पाय तुझे गुरुराया, देवपूजा माझी देवपूजा..।’ हे भजन म्हणण्यास आरंभ केला. ते ऐकून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून सांगितले, ‘आता तू प.पू. देवबाबांच्या आश्रमात आहेस, तर तू सर्व प्रार्थना त्यांनाच करायला हव्यात. जसे एखाद्या स्थानावर आपण गेलो, तर तेथील स्थानदेवतेला प्रार्थना करतो, तसे आता देवबाबा गुरुरूपात आहेत. गुरुतत्त्व एकच असते; म्हणून तू मनात गोंधळ न ठेवता त्यांनाच प्रार्थना कर.’ त्यानंतर माझे मन शांत झाले आणि काही वेळ माझे ध्यान लागले. मन हलके हलके झाले. मी डोळे उघडले, तेव्हा तेथील गायिका ‘….तुने द्विधा मनकी तोडी रे, गुरुचरणकमल मतवारी रे….।’ (माझ्या मनातील द्विधा स्थिती तू संपवलीस, अशा कोमल गुरुचरणांवर मी सर्वस्व अर्पण करते…) हे भजन म्हणत होती. ते ऐकून माझी भावजागृती होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

७ आ ५. प.पू. देवबाबा कृष्णभक्त असूनही आणि आश्रमातही सगळीकडे राधा-श्रीकृष्णाचे चित्र असूनही तिथे वारंवार शिवाचे दर्शन होणे आणि त्याचे कारण

प.पू. देवबाबा कृष्णभक्त असतांना आश्रमातही सगळीकडे राधा-श्रीकृष्णाचे चित्र असूनही मला तिथे वारंवार शिवाचे दर्शन होत होते. ‘असे का होत आहे ?’, हे मी देवबाबांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘शिव आणि श्रीकृष्ण वेगळे नाहीत. शिव हे स्वयंभू, ईश्वर आहेत. आश्रमात सगळीकडे ईश्वरच आहे. त्यामुळे तुम्हाला तशी अनुभूती आली.’’

– डॉ. आरती तिवारी

७ आ ६. प.पू. देवबाबांच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

७ आ ६ अ. प.पू. देवबाबा ज्या आसनावर बसतात, तेथे सूक्ष्मातून ध्यानस्थ शिवाचे दर्शन होणे

‘मी ध्यानमंदिरात नामजपासाठी गेले. तिथे समोर दोन आसने ठेवली होती. त्यांपैकी प.पू. देवबाबा ज्या आसनावर बसतात, तेथे सूक्ष्मातून ध्यानस्थ शिवाचे दर्शन झाले. त्यांच्या चरणी नमस्कार करतांना पुष्कळ गारवा (स्थुलातून) जाणवला. जप करतांना काही क्षण प.पू. देवबाबा आणि शिव असे आलटून-पालटून दिसत होते.’

– डॉ. आरती तिवारी

७ आ ६ आ. प.पू. देवबाबांच्या आसनापुढे नमस्कार केला असता प्रचंड वेगवान लहरी आज्ञाचक्रातून आत जात असल्याचे जाणवणे

‘ध्यानमंदिरात समोर दोन आसने ठेवली होती. त्यांपैकी प.पू. देवबाबा ज्या आसनावर बसतात, त्या आसनाच्या पुढे नमस्कार केला असता प्रचंड वेगवान लहरी माझ्या आज्ञाचक्रातून आत जात असल्याचे जाणवले. तेथून डोके उचलण्याचा प्रयत्न केला; पण ते पुष्कळ जड वाटत होते.’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर

७ आ ७. सापासारखे चमकल्यासारखे काहीतरी जातांना दिसणे आणि ‘प.पू. देवबाबांसह सूक्ष्मातून एक मणीधारी नाग असतो’, असे नंतर समजणे

‘२०.३.२०१७ या दिवशी रात्री मला स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूस सापासारखे चमकल्यासारखे काहीतरी जातांना दिसले. मला काही क्षण भीती वाटली. त्यानंतर ‘प.पू. देवबाबांसह सूक्ष्मातून एक मणीधारी नाग असतो. तो कधी कधी स्थुलातूनही दिसतो. आश्रमातील इतरांनाही तो दिसतो; परंतु ते घाबरत नाहीत. सर्वांची ‘प.पू. देवबाबा त्यांचे रक्षण करणार’ अशी श्रद्धा आहे’, हे आश्रमातील एका साधिकेकडून कळले.’

– डॉ. आरती तिवारी

७ आ ८. थकवा असतांना मानसभावाने प.पू. देवबाबांच्या चरणांवर डोके ठेवले असता ते उपाय करत असल्याचे जाणवणे

‘२१.३.२०१७ ला सकाळी मला थकवा वाटून झोपावेसे वाटत होते. त्या वेळी मी खोलीत गेले आणि मानसभावाने प.पू. देवबाबांच्या चरणांवर डोके ठेवले. त्यानंतर उठल्यावर मला अधिक प्रसन्न आणि उत्साही वाटले.’

– डॉ. आरती तिवारी

 

प.पू. देवबाबांनी सूक्ष्म-स्तरावर संगीत शिकवतांना साधिकांना आलेल्या अनुभूती

अ. ‘आता यापुढे तुला अंर्तसंगीत अनुभवता येईल’, असा आशीर्वाद देणे

‘प.पू. देवबाबांनी सूक्ष्म-स्तरावर संगीत शिकवतांना मला मालकंस रागाच्या स्वरातून संगीत साधनेसाठी दीक्षा दिली. मी सकाळी सरावाच्या वेळी म्हटलेल्या गाण्याचे सूर प.पू. देवबाबांपर्यंत पोहोचल्याचीच ही अनुभूती मला आली होती. त्यांनी ‘आता यापुढे तुला अंर्तसंगीत अनुभवता येईल’, असा आशीर्वादही दिला.

आ. तानपु-यावरही मंत्राचेच स्वर ऐकू येणे आणि त्या स्वरांवर लक्ष केंद्रित झाल्यावर मन निर्विचार होणे

प.पू. देवबाबांनी ‘आता कोणत्याही वाद्यातून तुला तोच मंत्र ऐकू येईल’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी तानपु-यावर लावलेले स्वर ऐकवले. त्यांतूनही त्यांनी सांगितलेला मंत्रजपच ऐकू येत होता. त्यानंतर त्यांनी मला डोळे बंद करून हाताची ज्ञान मुद्रा करण्यास सांगितले आणि लक्ष केवळ मला दिलेल्या मंत्राच्या तानपु-यातून निघणा-या स्वरांवरच केंद्रित करायला सांगितले. त्याप्रमाणे मी डोळे मिटले आणि ती ओळ आपोआप अंतर्मनातून यायला लागली. मन श्वासावर सहज केंद्रित झाले. काही वेळाने तीव्रतेने ‘श्रीकृष्णाने आताच यावे’, अशी व्याकुळता वाढली आणि डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यानंतर मी पूर्ण निर्विचार झाले होते. या स्थितीतून बाहेर आल्यावर कळले की, जवळपास ४५ मिनिटे मी त्याच अवस्थेत होते.

इ. ‘शास्त्रीय संगीतातून ईश्वरप्राप्तीकडे जाण्याच्या या
मार्गातील तू माझी पहिली शिष्या आहेस’, असे प.पू. देवबाबांनी सांगणे

त्यानंतर प.पू. देवबाबांना नमस्कार केल्यावर ते म्हणाले, ‘‘शास्त्रीय संगीतातून ईश्वरप्राप्तीकडे जाण्याच्या या मार्गातील तू माझी पहिली शिष्या आहेस. आजपर्यंत मी कोणालाच या प्रकारची दीक्षा दिलेली नाही. आज मी पुष्कळ आनंदी आहे. जे काही तुला आज मिळाले, ती देवाची अमूल्य भेट आहे. ‘परमेश्वरानेच तुझ्यातील परमेश्वराला ही भेट दिली’, हाच भाव ठेव. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

– कु. तेजल पात्रीकर

ई. कु. तेजल नामजप करतांना गाढ ध्यानावस्थेत
गेल्यावर त्यांना न उठवण्याविषयी प.पू. देवबाबांनी सूचना देणे

‘कु. तेजल नामजप करता करता गाढ ध्यानावस्थेत गेल्या होत्या. त्या वेळी प.पू. देवबाबांनी त्यांना न उठवण्याविषयी आम्हाला सूचना दिली होती. त्यांनी सांगितले, ‘‘त्या जेव्हा उठतील, तेव्हा उठू दे. आपण त्यांना उठवायला नको.’’ कु. तेजल साधारण ४५ मिनिटे त्या अवस्थेत होत्या. तेजल त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर वाटले, ‘जणू प.पू. देवबाबांच्या इच्छेनेच त्या उठल्या.’ या संपूर्ण प्रक्रियेच्या कालावधीत मी सतत भावावस्थेत होते आणि मधेमधे ध्यान लागत होते.’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर

कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांच्याकडे गेल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती

१. साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे सकाळी लवकर उठून अभ्यासासाठी सिद्ध
होण्यात अडचणी असणे आणि प.पू. देवबाबांनी अभ्यासाची वेळ ३ वेळा पालटून साधिकेला सोयीस्कर अशी ठेवणे

प.पू. देवबाबा यांच्याकडे जातांना सहसाधिकांनी मला सांगितले, ‘प.पू. देवबाबा सकाळी ९ वाजता अभ्यासाचे सत्र चालू करतात. त्याच्या आधी ५ मिनिटे आपण अभ्यासस्थळी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.’ मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने सकाळी लवकर उठता येत नाही, तसेच वैयक्तिक आवरायलाही पुष्कळ वेळ लागतो. त्यामुळे ‘सकाळी ९ वाजता होणार्‍या सत्राला मी कशी उपस्थित राहू शकणार ?’, याचा माझ्या मनावर ताण आला होता; परंतु आश्रमात गेल्यावर तेथील सेविकेने प्रथम ‘दुसर्‍या दिवशीचे सकाळचे अभ्याससत्र ९.३० वाजता चालू होईल’, असा आणि थोड्या वेळाने ‘१० वाजता चालू होईल’, असा निरोप दिला. तेव्हा मला आश्‍चर्य वाटले आणि आनंदही झाला. ‘माझी अडचण ठाऊक असल्यामुळेच प.पू. देवबाबांनी सत्र उशिरा ठेवले’, असे मला जाणवले.

२. साधिकांना खोलीत सुगंध येणे, त्यावरून प.पू. देवबाबा सूक्ष्मातून
येऊन ‘सर्वकाही ठीक आहे ना’, हे पाहून गेल्याचे साधिकेने सहसाधिकेला सांगणे आणि
नंतर दुसर्‍या इमारतीतील प.पू. देवबाबांच्या कक्षात तोच सुगंध आल्यावर साधिकेला स्वतःच्या विधानाची प्रचीती येणे

कु. सुप्रिया शरद नवरंगे

दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्राला वेळेवर पोहोचता यावे, यासाठी मी पुष्कळ लवकर उठून धडपड करत सर्व आवरत होते. एवढे करूनही ‘१० वाजण्याच्या आत मी अभ्यासस्थळी पोहोचेन’, असे मला वाटत नव्हते. एवढ्यात प.पू. देवबाबांचा निरोप आला, ‘अभ्याससत्र १० ऐवजी १०.३० वाजता चालू करूया.’ हे ऐकल्यावर मी थांबून थोडा श्‍वास घेतला आणि पुन्हा आवरू लागले. माझी सिद्धता पूर्ण होत आली असतांना मला आणि सहसाधिकेला खोलीमध्ये एकदम सुगंध आला. तेव्हा मी तिला म्हटले, ‘‘असा सुगंध आला म्हणजे ‘प.पू. देवबाबा सूक्ष्मातून येऊन आपली सिद्धता झाली आहे ना ? सर्वकाही ठीक आहे ना ? हे पाहून गेले आहेत’, असे वाटते.’’ काही वेळाने आम्ही दुसर्‍या इमारतीमध्ये असलेल्या अभ्याससत्राच्या कक्षात गेलो तेव्हा प.पू. देवबाबा त्यांच्या एका साधिकेचा संगीताचा सराव घेत होते आणि त्या कक्षातदेखील तसाच सुगंध दरवळत होता. त्या वेळी मी खोलीत सहसाधिकेला सांगितलेल्या गोष्टीची मला प्रचीती आली.

३. प.पू. देवबाबा यांनी गोठ्यात प्रवेश करताच सर्व गायी उठून
उभ्या रहाणे आणि त्यावरून संतांमधील चैतन्य जाणण्याची गायींची क्षमता लक्षात येणे

२९.४.२०१७ या दिवशी आम्ही प.पू. देवबाबा यांच्याबरोबर गोमाळा (या ठिकाणी प.पू. देवबाबा यांच्या गायी आहेत) येथे गेलो. तेथे पोहोचल्यावर प.पू. देवबाबा यांनी गोठ्यात प्रवेश करताच एखादी महनीय व्यक्ती आल्यावर तिला मान देण्यासाठी जसे सगळे उभे रहातात, त्याप्रमाणे सर्व गायी लगबगीने उठून उभ्या राहिल्या. संतांमधील चैतन्य आणि त्यांची निरपेक्ष प्रीती जाणण्याची गायींची क्षमता या प्रसंगावरून लक्षात आली.

. साधकांकडील संगीताविषयी प.पू. देवबाबांना विचारावयाचे
प्रश्‍न संपले असणे,तरीही प.पू. देवबाबांनी अभ्यासाचे सत्र ठेवणे आणि सत्राच्या आधी
साधकांना आपोआप प्रश्‍न सुचू लागल्यावर संतांना सगळे आधीच कळत असल्याची अनुभूती त्यांना येणे

प.पू. देवबाबा यांच्याकडून निघण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत आमचे त्यांना विचारावयाचे संगीताविषयीचे सर्व प्रश्‍न विचारून झाले होते. त्यामुळे ‘उद्या सकाळी येथून निघायचे’, असा विचार माझ्या मनात होता; मात्र सायंकाळी प.पू. देवबाबांकडे आलेल्या एका पाहुण्यांना ते म्हणाले, ‘‘उद्या या साधकांचे आणखी एक प्रश्‍नोत्तरांचे सत्र होईल आणि सायंकाळी हे जातील.’’ त्यानंतर रात्रीपर्यंत प.पू. देवबाबांनी दोन वेळा आम्हाला ‘‘प्रश्‍न आहेत का ?’’, असे विचारले; पण आमच्याकडे प्रश्‍न नव्हते, तरीही आश्रमातून जातांना त्यांनी त्यांच्या सेविकेमार्फत निरोप पाठवला, ‘‘उद्या दुपारी १२ वाजता भेटू.’’ आम्ही सर्व जण ‘आता उद्या काय विचारायचे ?’, या विचारात पडलो. दुसर्‍या दिवशी सकाळी आपापले आवरतांना अचानक सर्वांना संगीताविषयीचे नवीन प्रश्‍न सुचू लागले आणि दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांची मोठी सूचीच सिद्ध झाली. तेव्हा लक्षात आले, ‘आमच्या मनांत प्रश्‍न आहेत, किंबहुना भगवंत आम्हाला प्रश्‍न सुचवणार आहे, हे आम्हाला ठाऊक नव्हते; पण प.पू. देवबाबांना ते ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी आजचे हे सत्र ठेवले.’ संतांना सगळे कसे ज्ञात असते, हे या प्रसंगावरून शिकायला मिळाले.

. प.पू. देवबाबा यांच्याकडून आश्रमात परतल्यावर रात्री
झोपतांना मूलाधारचक्राशी सापाप्रमाणे संवेदना जाणवणे, तेव्हा श्‍वास मोकळा होऊन
शांत वाटणे आणि दुसर्‍या दिवशी हा प्रसंग आठवल्यावर प्रत्येक वेळी रात्रीप्रमाणेच शांत वाटणे

३.५.२०१७ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्याकडून रामनाथी आश्रमात परत आल्यावर रात्री झोपतांना मला जाणवले, ‘माझ्या मूलाधारचक्राशी वीतभर लांब आणि जाडसर असे सापाच्या पिल्लासारखे काहीतरी सळसळत स्वतःभोवती गोलाकार फिरले. यानंतर माझ्या आज्ञाचक्रातून शक्तीचा प्रवाह जोरात शरिरात शिरला. मग माझा श्‍वासोच्छ्वास दोन्ही नाकपुड्यांनी होऊ लागला आणि मला शांत वाटू लागले.’ दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा जेव्हा मला हा प्रसंग आठवला, तेव्हा तेव्हा माझा श्‍वासोच्छ्वास दोन्ही नाकपुड्यांनी होण्यास प्रारंभ होत होता.

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘गायींना संतांचे महत्त्व जसे कळते, तसे हल्लीच्या मानवांना, विशेषतः बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment