आपत्काळात बालकांवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करण्याकडे लक्ष केंद्रित करणे !

कु. प्रियांका लोटलीकर

‘उच्च स्वर्ग, महर् आणि जन अशा उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालकांचा परिचय आपण यापूर्वी करून घेतला आहे. पुढे येणा-या हिंदु राष्ट्राची घडी बसवण्याचे अमूल्य कार्य ही मुले करणार आहेत. ही मुले त्यांच्यावर पूर्वजन्मी असणा-या संस्कारांसह जन्माला येतात, तसेच येथील त्यांच्या सभोतालचे रज-तमात्मक वातावरण, पूर्वजन्मीचे संस्कार आणि स्वभावदोष अन् अहं यांचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. आपत्काळ जवळ येत चालल्यामुळे या बालकांवर अनिष्ट शक्तीची आक्रमणे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

 

१. अनिष्ट शक्तीची आक्रमणे म्हणजे काय ?

आपल्याला ताप, खोकला यांसारखे आजार होत असतात. हे आजार निर्माण करणारे रोगजंतू आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत; परंतु आजारावर औषधे घेतल्यावर आपण बरे होतो. त्याप्रमाणे या रोगजंतूंपेक्षाही अतिसूक्ष्म अशा अनिष्ट शक्ती वातावरणात कार्यरत असतात. त्यांच्या त्रासामुळे मुलांना आकलन न होणे, त्यांनी आई-वडिलांचे न ऐकणे, सातत्याने रडणे अथवा कारण नसतांना चिडचिड करणे, यांसारखी अनेक लक्षणे पहायला मिळतात.

 

२. मुले संवेदनशील असल्यामुळे त्यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे लवकर होणे

मुले ही मोठ्यांपेक्षा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे त्यांच्यावर लगेचच होत असतात आणि कालांतराने या सर्वांच्या आहारी जाऊन मुले अयोग्य कृती करू लागतात.

काळ जसा पुढे सरकेल, तशी ही परिस्थिती आणखी भयानक होईल. साधनेविना येणा-या काळाला सामोरे जाणे अशक्यप्राय आहे, हेच सत्य आहे !

 

३. तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे अनिष्ट शक्तींशी लढण्यात साधना
व्यय होत असल्यामुळे आध्यात्मिक पातळीवर परिणाम होऊन पातळी न्यून होणे

एखाद्या साधकाने योग्य प्रकारे साधना केल्यास त्याच्या आध्यात्मिक पातळीमध्ये प्रतिवर्षी दोन टक्क्यांनी वाढ होते; मात्र तीव्र आध्यात्मिक त्रास असतांना केलेली साधना अनिष्ट शक्तींशी लढण्यात व्यय होत असल्यामुळे त्याचा आध्यात्मिक पातळीवर परिणाम होऊन पातळी न्यून होते. त्यामुळे मुलांना आध्यात्मिक त्रास होऊ नये, यासाठी पालकांनी त्यांच्याकडून नियमित आध्यात्मिक उपाय करून घेणे आवश्यक आहे.

 

४. काही सोपे आध्यात्मिक उपाय

अ. प्रतिदिन नियमित २ घंटे मुलांनी नामजप करावा अथवा मुलांकडून वहीमध्ये लिहून घ्यावा.

आ. अभ्यासाला बसतांना, उपायांना बसतांना आणि रात्री झोपतांना चारही दिशांनी रिकामी खोके लावावीत. खोक्यांची तोंडे आतल्या दिशेने असावीत.

इ. सप्तचक्रांवर देवतांची चित्रे अथवा नामपट्ट्या लावाव्यात.

ई. अर्धी बालदी पाण्यात ३ – ४ चमचे खडे मीठ घालावे. ‘माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती या पाण्यात खेचली जाऊ दे’, अशी कुलदेवता वा उपास्यदेवता यांना प्रार्थना करून त्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसावे. या वेळी नामजप करावा.

उ. घरामध्ये देवतांचा नामजप लावून ठेवावा.

ऊ. अधूनमधून सात्त्विक अत्तराचा सुगंध घ्यावा आणि सात्त्विक उद्बत्ती लावावी. सुगंधामुळे मन उत्साही राहिल्याने मनाची एकाग्रता वाढते, तसेच वातावरणाची शुद्धीही होते.

ए. सात्त्विक उद्बत्तीची विभूती लावावी. स्वतःच्या कपाळावर सात्त्विक उद्बत्तीची विभूती लावावी.

ऐ. अधूनमधून सात्त्विक कापूर हुंगावा. यामुळे मनातील अशुद्ध विचार नाहीसे झाल्याने अभ्यास अधिक एकाग्रतेने होतो.

ज्याप्रमाणे मानवाला जिवंत रहाण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते, त्याप्रमाणे काळानुसार आध्यात्मिक त्रासापासून संरक्षण होण्यासाठी आध्यात्मिक उपायांची आवश्यकता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.’

– कु. प्रियांका लोटलीकर

Leave a Comment