हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !

 

१.हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी तीन पिढ्यांनी परिश्रम करणे आवश्यक !

‘तीन पिढ्यांचा अवधी लागण्याचे कारण आणि त्या पिढ्यांत होणारी प्रक्रिया याप्रमाणे आहे.

१ अ १. सध्याची पहिली पिढी : हिने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे बीज भूमीत रोवायचे आहे.

१ अ २. दुसरी पिढी : हिने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे बिजाच्या अंकुरण्यापासून ते त्याचे वृक्षात रूपांतर होण्यासाठी प्रयत्नरत रहायचे आहे.

१ अ ३. तिसरी पिढी : हिला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची फळे मिळण्यास आरंभ होईल. या पिढीने हिंदु राष्ट्राच्या सिद्धान्तांचे कठोर आचरण करून त्याचे कुठेही पतन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

१ आ. परिणाम होण्यासाठी तीन पिढ्यांचा अवधी आवश्यक !

तीन पिढ्यांचा अवधी लागण्याचे कारण आणि त्या पिढ्यांत होणारी प्रक्रिया याप्रमाणे आहे.

१ आ १. सध्याची पहिली पिढी (४० वर्षांपुढील) : ही जन्मापासून आतापर्यंत जे संस्कार घेऊन वाढली आणि जगली आहे, तिच्यात पालट करणे तिला अशक्य असते.

१ आ २. दुसरी पिढी (२० ते ४० वर्षे वयोगटातील) : यांच्यावर जन्मापासून जे संस्कार झालेले असतात ते आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ झाल्यामुळे जे संस्कार निर्माण होतात ते, या दोघांच्यात संघर्ष होतो. त्यामुळे यांच्यात थोडा-फार पालट व्हायला हळूहळू आरंभ होतो.

१ आ ३.   तिसरी पिढी (जन्म ते २० वर्षे वयोगटातील) : यांच्यावर जन्मापासून आणि लहान वयातच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ झाल्यामुळे जे संस्कार होतात, त्यामुळे तेव्हापासूनच खर्‍या अर्थाने ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ त्यांच्या मनातही होते.’

 

२. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांचे टप्पे

२ अ. २.  हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांचे टप्पे

२ अ. शारीरिक स्तर (वर्ष २०१८ ते २०२३) : ‘या काळात होणार्‍या तिसर्‍या जागतिक महायुद्धात प्रचंड मनुष्यहानी होईल. भारतालाही या युद्धाची मोठी झळ बसेल. सर्वत्रच घरे, रस्ते, पूल, कारखाने इत्यादींची अपरिमित हानी होईल. युद्धाच्या शेवटी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झालेली असेल.

२ आ. मानसिक स्तर (वर्ष २०२४ ते २०५०) : युद्धाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी सज्जनांना आणि सज्जन होऊ इच्छिणार्‍यांना ‘मानसिकदृष्ट्या सक्षम कसे व्हायचे’, हे शिकवण्यात येईल.

२ इ. आध्यात्मिक स्तर (वर्ष २०५० नंतर) : साधना शिकवल्यामुळे सर्व जण साधक असतील. तेव्हाच ते खर्‍या अर्थाने रामराज्य असेल.’ (२४.११.२०१४)

 

३.  हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास लागणार्‍या
कालावधीविषयी संत सांगत असलेल्या भाषेतील भेद !

‘काही संत सांगतात, ‘हिंदु राष्ट्र २०२३ या वर्षी स्थापन होईल’, तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन सांगतात, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना ५० वर्षांनी होईल.’

‘संतांच्या सांगण्यात असा भेद का ?’, असा प्रश्‍न कोणालाही पडेल. त्याचे उत्तर असे की, संतांच्या सांगण्याप्रमाणे २०२३ या वर्षी ज्या हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, ती स्थुलातील असेल. खर्‍या अर्थाने ‘हिंदु राष्ट्र’, म्हणजेच ‘रामराज्य’ स्थापन होण्यास एका पिढीवर साधनेचे संस्कार करावे लागतील. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे उद्गार या संदर्भात आहेत.’ (२७.१२.२०१४)

 

४.  खर्‍या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक-दोन पिढ्या लागणार असण्याचे कारण !

‘सध्या बहुतांश मुले इंग्रजी माध्यमांच्या किंवा ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांत शिकतात, हेच त्यांचे शिक्षण योग्य नसल्याचे एकमेव कारण नाही. घरातील संस्कारहीनता, भांडणे, तसेच दैनिकांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या स्वैराचार, भ्रष्टाचार, जात्यंधता, अपहरण, बलात्कार, हत्या इत्यादी बातम्या यांमुळेही त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होतात. पुढे अशा बातम्यांचे त्यांना काही वाटेनासे होते आणि काही काळानंतर त्यांच्यातील काही जण या गोष्टी स्वतःही करू लागतात. मुलांवर अनिष्ट संस्कार होऊ नयेत, यासाठी ‘समाजात अनिष्ट गोष्टी घडू नयेत’, याला प्राधान्य द्यावे लागेल. यातच एका पिढीचा, म्हणजे ३० वर्षांचा कालावधी जाईल. त्यानंतरच्या पिढीत मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार झाल्याने हिंदु राष्ट्राला अपेक्षित अशी पहिली पिढी सिद्ध होण्यास आरंभ होईल.’ (२६.११.२०१४)

 

५.‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, याची निश्‍चिती बाळगा !

‘हिंदूंनो, आपल्या सर्वांत सामावलेली इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांद्वारे आपल्याला सर्व काही मिळवता येईल; कारण हिंदु धर्मात पुनरुत्थानाची एक अद्भुत शक्ती सामावलेली आहे. जगातील अनेक मोठमोठे देश, जाती आणि राज्ये नष्ट झाली; परंतु आपण अद्याप टिकून आहोत; कारण आपल्यामध्ये तसे अमर चैतन्य आहे. सूतसंहितेत सूत ऋषींनी सांगितले आहे.

स्थापयध्वमिमं मार्गं प्रयत्नेनापि हे द्विजाः ।
स्थापिते वैदिके मार्गे सकलं सुस्थितं भवेत् ॥ – सूतसंहिता, अध्याय २०, श्‍लोक ५४

अर्थ : हे द्विजांनो, सनातन धर्माच्या स्थापनेकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करा. सनातन वैदिक हिंदु धर्म स्थिर होताच सगळे स्थिर आणि ऐश्‍वर्यशाली होईल.

ईश्‍वरी योजनेनुसार वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. संत आणि द्रष्टेपुरुष यांनाही त्याचे वेध लागले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर गोप-गोपींनी ज्याप्रमाणे स्वतःचे कर्तव्य म्हणून त्यांच्या काठ्या गोवर्धन पर्वताला लावल्या, त्याप्रमाणे आपल्यालाही आपले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कर्तव्य बजावायचे आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी ईश्‍वराला आपली आवश्यकता नाही; पण आपल्याला मात्र त्याची आवश्यकता आहे. आपण साधना म्हणून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर स्वतःचाही उद्धार होईल.’ (२४.५.२०१५)

 

६. हिंदु राष्ट्र स्थापणे, हा पहिला टप्पा, तर
‘जगभर हिंदु धर्माची प्रस्थापना करणे’, हा अंतिम टप्पा !

‘विदेशातील हिंदूंची दु:स्थिती रोखण्यासाठीही भारतात हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ हिंदूंसाठीच नाही, तर जगभरच्या मानवांसाठी आवश्यक आहे. भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यामुळे जगभर हिंदु धर्माचा प्रसार करणे सुलभ होईल. जगभर हिंदु धर्माची प्रस्थापना झाल्यामुळे पृथ्वीवर सत्त्वप्रधान वातावरण निर्माण होऊन अखिल मानवजात सुखी होईल ! आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम्’, म्हणजेच ‘अवघे विश्‍व सुसंस्कृत करू’, अशी घोषणा केली होती. आपण सर्व हिंदुत्वनिष्ठ याच ऋषीमुनींचे वंशज आहोत. या श्रेष्ठ मंडळींचा वारसा जपण्याचे दायित्व आपलेही आहे. या दायित्वाचा पहिला टप्पा, म्हणजे भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील होणे. हे धर्मकार्य करण्यासाठी हिंदु समाजाला आशीर्वाद मिळो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’ (२.५.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment